Chalitale Divas - 2 in Marathi Biography by Pralhad K Dudhal books and stories PDF | चाळीतले दिवस - भाग 2

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

चाळीतले दिवस - भाग 2

भाग 2

त्या काळी कॉलेजमधून घरी आलो की अभ्यासाव्यतिरिक्त करण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते.वस्तीतल्या अनेक मुलांशी ओळख  झाली होती.नित्यनेमाने संध्याकाळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मंडळाच्या पोरांच्यात गप्पा मारत उभे राहणे हाच माझा एकमेव टाईमपास होता.तिथे भेटलेल्या मुलांशी नंतर माझी छान मैत्री झाली.

   शिर्के बंधुबरोबरच बाळू नितनवरे,आसिफ पठाण,सुरेश गायकवाड,आल्फ्रेड सायमन, चंदू घोलप, अशोक कांबळे, सदा निकम नाना निकम असे वीस पंचवीस मित्र माझ्याशी जोडले गेले.

  यातले बरेचजण अर्धशिक्षित होते.काहीजण वर्कशॉपमधे छोटीमोठी कामे  करत.कुणी रिक्षा चालवायचे.एकाची पानटपरी  होती तर एकाचे किराणा मालाचे दुकान होते.त्यातल्या त्यात आमच्या या  मित्रांमध्ये आल्फ्रेड सायमन हा अव्हेरी इंडिया सारख्या नामांकित कंपनीत नोकरी करायचा,यातले अनेकजण बेकार होते.काहीजण नियमितपणे दारूही पीत असत.अनेकांची लफडी कुलंगाडी चालू  होती.यापूर्वीही शाळेत असताना मी अशा व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलांच्यात वावरलो होतो.अर्थात,मला एरवी कोण काय करतो याचे काहीच देणेघेणे नव्हते.फावला वेळ त्यांच्यात घालवणे या एकमेव उद्देशाने मी या मुलांच्याबरोबर चौकात उभा असायचो एवढेच! मी कॉलेजला जातो याचे या मित्रांना खूप कौतुक होते.सगळेजण आम्हा शिकणाऱ्या मुलांना आदराने वागवत होते. सगळ्या छत्रपती शिवाजी मंडळात आमच्या शब्दाना किंमत होती.

   मला वाचनाची खूप आवड होती,पण त्यासाठी इथे पुस्तके मिळवणेही अवघड होते.छत्रपती शिवाजी मंडळाची एखादी लायब्ररी चालू करावी अशी कल्पना वस्तीत राहणाऱ्या लहाने या व्यक्तीने मांडली आणि मंडळातल्या नोकरी करत असलेल्या काही मंडळींनी ती उचलून धरली.मला वाचनाचा नाद आहे हे मंडळात सर्वांना माहीत होते त्यामुळे ही लायब्ररी चालवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली.पुण्यात आप्पा बळवंत चौकात तसेच डेक्कन भागात अनेक ठिकाणी फुटपाथवर जुनी पुस्तके मिळायची.चांगल्या कंडिशनमधली अनेक गाजलेली पुस्तके इथे स्वस्त दरात मिळायची.मी अशी मला आवडलेली पुस्तके मंडळाच्या पैशातून घेऊन ही लायब्ररी सुरु केली.दर रविवारी मंडळाच्या मैदानात ठराविक वेळेत पुस्तकांची पिशवी घेऊन मी उभा राहायचो.वस्तीतले लोक त्यातल्या त्यात महिला माझ्याकडून पुस्तके बदलून घेऊन जात असत.

   नागपूर चाळीत आम्ही ज्या गल्लीत राहायचो त्या गल्लीच्या तोंडाशी एका शीख माणसाची पोल्ट्री होती. तिथेच आतल्या बाजूला हे तब्बेतीने आडदांड सरदार रहायचे.त्यांच्या व्यक्ती मत्वामुळे  असेल  कदाचित,पण सगळे त्यांना टरकून असायचे.अख्या वस्तीत केवळ या सरदाराकडे त्यावेळी टीव्ही होता. त्या काळी दूरदर्शनवर रविवारी हिंदी सिनेमा आणि गुरुवारी छायागीत हे दोन्ही कार्यक्रम लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते.वस्तीतले अनेकजण पंचवीस पैसे फी भरून  सिनेमा आणि छायागीत बघायला या सरदाराकडे जात असत..

   सरदारच्या पोल्ट्रीत कापल्या जाणाऱ्या कोंबड्यांची घाण तिथेच जवळ मैदानाच्या कडेला टाकली जायची.महानगरपालिकेकडून  आठ आठ दिवस कचरा उचलला जायचा नाही त्यामुळे आसपासच्या भागात या घाणीची दुर्गंधी पसरत असे.आम्हा मंडळाच्या मुलांनाही संध्याकाळी तिथे उभे राहणे अशक्य व्हायचे एवढी दुर्गंधी तिथे पसरत होती.यावर काहीतरी उपाय करायला हवा अशी चर्चा आमच्यात व्हायची,पण नक्की काय करायचे ते मात्र कुणाला समजत नव्हते. त्याच दरम्यान मनोजकुमारचा ‘शिर्डी के साईबाबा’ हा सिनेमा आला आणि खूपच लोकप्रिय झाला.एकदा असेच आम्ही नेहमीच्या जागी गप्पा  मारत असताना साईबाबा सिनेमाबद्दल गप्पा सुरु झाल्या.आमच्यापैकी कुणाच्यातरी डोक्यातून एक कल्पना आली.आपण साईबाबांचे मंदिर जर सरदार घाण टाकतो तिथेच बांधले तर? सर्वांना ती आयडिया आवडली.एक धार्मिक काम केल्याने छत्रपती शिवाजी मंडळाचे नाव वाढेल आणि तिथे होणारी दुर्गंधीही हटेल अशा दुहेरी उद्देशाने आम्ही सगळेजण प्रेरित झालो. महानगरपालिकेने त्या ठिकाणचा कचरा उचलण्याची वाट पाहू लागलो. कचरा उचलला गेला त्याच रात्री मंडळाचे दहा पंधरा कार्यकर्ते खराटे कुदळी फावडी घेऊन जमा झालो आणि ती कचरा कुंडीची जागा स्वच्छ केली.पाणी ओतून ती जागा धुवून काढली. लगेच  साईबाबाची मूर्ती  किंवा तसबीर मिळणे अवघड होते  म्हणून एक उभट मोठा दगड त्या जागेवर उभा केला,आमच्यातल्या एकाने शेंदूर आणून त्या दगडाला रंग दिला आणि कचरा कुंडीच्या जागेवर एका बिनछताच्या मंदिराची सुरुवात झाली.नंतर तेथे एक साईबाबाची फ्रेम आणून ठेवली गेली.लवकरच पावती पुस्तके छापून आमच्या कल्पनेतल्या साईबाबा मंदिराच्या बांधकामासाठी वर्गणी गोळा करायला सुरुवात झाली. 

. या आमच्या उपक्रमाला वस्तीतल्या आबालवृद्धांचा आशीर्वाद मिळू लागला.

- प्रल्हाद दुधाळ.

(क्रमश:)