चाळीतले दिवस भाग 11.
मी कॉलेजला नियमितपणे जात असलो तरी माझे सगळे लक्ष पोस्टाने येणाऱ्या त्या संभाव्य पत्राकडे लागलेले होते.दररोज घरी पोचलो की पोस्टमन येऊन गेला का याची मी चौकशी करायचो.
माझे बंधू आणि वहिनीं मुलांसहीत काही दिवस पुण्यातल्या घरी तर काही दिवस वहिनींच्या माहेरी असायचे.
डिसेंबर 1981 च्या दुसऱ्या आठवड्यात मी ज्या पत्राची वाट बघत होतो ते पत्र एकदाचे आले.पत्र वाचून मला प्रचंड आनंद झाला.
पुणे टेलिफोन्सकडून मला टेलिफोन ऑपरेटर पदासाठी निवडले गेले होते!
28 डिसेंबर 1981 रोजी माझे तीन महिन्यांचे प्रशिक्षण सुरु होणार होते.
पहिल्या दिवशी सदर्न कमांडशेजारी असलेल्या ऑफिसात जायचे होते.
मी अर्धा तास आधीच तिथे पोहचलो.एकूण तीस उमेदवार आमच्या बॅचला जॉईन होणार होते.एक आठवडा आधी अजून दोन बॅच चालू झालेल्या होत्या.
तिथे पोहोचल्यावर मुलांखती आणि कागदपत्रे जमा करायला गेलो होतो तेव्हा दिसलेले काही चेहरे दिसले.आमच्या बॅचमध्ये आम्ही फक्त सहाजण जेन्टस होतो बाकी चोवीस लेडीज!
प्रत्येक बॅच मधल्या स्री आणि पुरुष उमेदवारांचे प्रमाण साधारणपणे असेच होते.बहुसंख्य लेडीज असलेल्या प्रशिक्षण वर्गात आता माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या बुजऱ्या व्यक्तीचा कसा निभाव लागणार म्हणून मला काळजी वाटू लागली होती.दोन वर्षे पुण्यात रहात असूनही मी बऱ्यापैकी ग्रामीण भाषा बोलायचो.गरवारे कॉलेजात जात असूनही अजून पुणेरी भाषेत बोलता येत नव्हते असा न्यूनगंड मी बाळगत होतो.आता तर नव्वद टक्के बायका असलेल्या ऑफिसात आपण कसे बोलणार असा प्रश्न पडला होता.पहिल्या दिवसापासूनच आपल्या तोंडातून ग्रामीण भाषा वा शिवी निघू नये याची मी जाणीवपूर्वक काळजी घेऊ लागलो.
आम्हाला नाईक नावाच्या रिटायरमेन्टला तीनचार वर्षे शिल्लक असलेल्या मॅडम शिकवणार होत्या.
टेलिफोन खात्यात जिथे जिथे ऑपरेटरचे काम पडत असे त्या प्रत्येक विभागात आम्हाला प्रशिक्षण दिले जाणार होते.त्या काळात एका गावाहून दुसऱ्या गावाकडे फोन लावण्यासाठी ट्रंक कॉल बुक करायला लागायचा.ते कॉल जोडून द्यायचे काम ऑपरेटर करायचे.पुण्यातले हे ट्रंक कॉल बुकिंग करण्यापासून ते जोडून देणे आणि त्याचे बिलिंग करण्यापर्यंतचे सगळे काम महिला ऑपरेटरच करायच्या.या कामासाठी तिन्ही शिफ्टमधे मिळून संख्येने हजारच्या वर महिला टेलिफोन ऑपरेटर्स नोकरीला होत्या.ग्रामीण भागात मात्र महिलांबरोबर पुरुष ऑपरेटरही असायचे.
टेलिफोन दुरुस्ती विभागात तांत्रिक कामे करणारा सर्व स्टाफ पुरुषवर्ग होता.अर्धशिक्षित किंवा अडाणी पुरुष कर्मचाऱ्याना दुरुस्तीसाठी केंद्रातल्या महिला ऑपरेटर्सबरोबर कामे करताना अनेक अडचणी यायच्या म्हणून पुणे शहर विभागात महिला ऑपरेटर्स बरोबर काही पुरुषांचीही भरती करण्याचा सरकारी निर्णय झाला होता आणि त्या अंतर्गत आम्हा बोटावर मोजता येतील अशा काही पुरुष ऑपरेटर्सची खात्यात वर्णी लागली होती.माझी नोकरीची निकड लक्षात घेऊन सर्वशक्तीमान परमेश्वरानेच अशी योजना करून मला टेलिफोन ऑपरेटरची नोकरी मिळवून दिली असे मला मनापासून वाटले.
बीएस्सी च्या अभ्यासात आता या ट्रेनिंगच्या अभ्यासाची भर पडली होती.
सकाळी सात वाजता सायकल घेऊन मी कॉलेजच्या प्रॅक्टिकलला जायचो.प्रॅक्टिकल झाले की मी कॅम्पमधील ट्रेनिंग क्लाससाठी सायकल दामटायचो. टेलिफोन खात्यातली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीन होती त्यामुळे इथेही लक्ष देऊन ट्रेनिंग घेणे आवश्यक होते.घरून एवढ्या सकाळी डबा घेऊन निघणे नेहमी शक्य नसल्याने खिशाला परवडेल तेव्हढे बाहेरचे खाणे पोटात टाकून ही पळापळ मी करत होतो.त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे कॅन्टोन्मेंट टेलिफोन केंद्राच्या परिसरात खात्याचे कॅन्टीन होते आणि अत्यंत कमी पैशात येथे नाश्ता आणि जेवणाची सोय होती! पंधरा पैशात चहा,पंचवीस पैशात नाश्ता,अडीच रुपयात राईसप्लेट म्हणजे माझ्यासारख्या साठी पर्वणीच होती. पाहिला स्टाईपेंड मिळेपर्यंत इकडून तिकडून गोळा केलेल्या वीस पंचवीस रुपयात आता माझ्या खाण्याचा प्रश्न सुटलेला होता.
एक गोष्ट मात्र झाली...वेळेत ट्रेनिंगला येणे आवश्यक असल्याने मला कॉलेजमधे लेक्चर्सला बसणे अशक्य झाले.ट्रेनिंग सुरु झाल्यावर दर आठवड्याला एक परीक्षा असायची,
मी धड ना कॉलेजचा अभ्यास करू शकत होतो ना ट्रेनिंगकडे नीट लक्ष देऊ शकत होतो. शेवटी माझ्या दृष्टीने नोकरी महत्वाची असल्याने बी एस्सीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मी ट्रेनिंगकडे लक्ष देऊ लागलो.मार्च मधे ट्रेनिंगची फायनल परीक्षा आणि माझे बी एस्सी दुसऱ्या वर्षीची परीक्षा एकाच दिवशी आल्या आणि मला कॉलेजची परीक्षा देता आली नाही.
ट्रेनिंगचा पहिला एकशे तीस रुपये स्टाईपेंड मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.मी भाड्याची सायकल वापरत होतो.पाहिला पगार झाल्या झाल्याबरोबर मी नुकत्याच ओळख झालेल्या एका सिनियरबरोबर फडके हौद चौकातल्या सिंग सायकल दुकानात जाऊन हिरो कंपनीची तीनशे रुपये किंमतीची नवी कोरी सायकल तीस रुपये दर महिना हप्त्यावर घेऊन आलो.स्वतःच्या कमाईतून केलेली ही माझी पहिली खरेदी होती आणि त्याचा आनंद शब्दातीत होता!
तीन महिन्याचे ट्रेनिंग संपले आणि मला रेग्युलर पोस्टिंग चिंचवड टेलिफोन एक्सचेंजला मिळाले.
नागपूर चाळीतून वीस किलोमीटर सायकल मारत सकाळी सातच्या ड्युटीला पोहोचणे खूप मोठे दिव्य होते,पण या दिव्यातून जाणे अपरिहार्य होते.आता नोकरी मिळाली होती,पण शिक्षणाची जिद्ध सोडावी लागते की काय असे वाटू लागले होते.
रेग्युलर नोकरी सुरु झाल्यावर एक महिन्याचा पगार रुपये पाचशे पाच हातात आले तेव्हाचा झालेला आनंद शब्दात नाही सांगता येणार.
आमच्या खानदानातला मी पहिला सरकारी नोकर झालो होतो!(क्रमश:)
- प्रल्हाद दुधाळ
9423012020