चाळीतले दिवस भाग 9.
माझे बंधू कुवेतवरुन बऱ्यापैकी पैसे कमावून आले होते.त्या काळी त्याचे बँकेचे खाते वगैरे नव्हते त्यामुळे तिकडून आणलेले दोन अडीच लाख रुपये घरातल्या बॅगेतच ठेवले होते.
त्याने येताना एक मोठा कॅसेट प्लेअर आणला होता.1979-80च्या त्या काळात आमच्या घरात पॅनासॉनिक कंपनीचा टेपरेकॉर्डर असणे म्हणजे फार मोठी गोष्ट होती.त्याने एक भारीतला कॅमेराही आणला होता,कॅमेरा रोल टाकून ब्लॅक व्हाईट फोटो त्यात निघायचे.लवकरच मी टेपरेकॉर्डर आणि कॅमेरा हाताळायला शिकलो.
माझ्यासाठी आण्णाने तिकडून तीन चार टी शर्ट आणले होते.एक रिको कंपनीचे मोठ्या निळ्या डायलचे घड्याळही मला मिळाले.आयुष्यात तेव्हढे भारी कपडे आणि घड्याळ मी प्रथमच वापरू लागलो.कॉलेजला जाताना मी ते इंपोर्टेड कपडे आणि घड्याळ वापरायला लागल्यावर फारच भारी वाटत होते.
कुवेतवरुन आल्यानंतर आण्णा पुन्हा पुण्यात नोकरी करेल असे मला वाटत होते,पण आखाती युद्ध संपल्यावर पुन्हा कुवेत किंवा दुबईला जायची तो स्वप्न पहात होता.आधीच छानछोकीत रहायचा त्याचा स्वभाव होता.परदेशात जाऊन आल्यावर त्याच्या राहणीमानात खूपच बदल झाला होता.पूर्वी तो चारमिनार किंवा ब्रीस्टॉल शिगारेट पिणारा आता फाय फाय फाय शिगारेट पिऊ लागला होता.उंची अत्तरांचे स्प्रे आपल्या इंपोर्टेड कपड्यावर मारून तो सगळीकडे वावरायचा.
दररोज घरातल्या बॅगेतून काही नोटा काढून तो घराबाहेर पडायचा तो संध्याकाळी ते खर्च करूनच यायचा.शिगारेट पिणे छानछोकीत रहाणे,टॅक्सी किंवा रिक्षाने फिरणे या गोष्टी सोडल्या तर त्याला दुसरे कोणतेही व्यसन निदान माझ्या माहितीत तरी नव्हते.
त्या काळी त्या मानाने स्वस्ताई होती.दहा हजार रुपयात रिक्षा मिळायची,टिंगरेनगर लोहगाव भागात चार पाचशे रुपये गुंठा दराने जमीन मिळायची.मी तसा लहान होतो,पण ज्या पद्धतीने आणि वेगाने आपला भाऊ खर्च करतो आहे त्याचा मला मानसिक त्रास होत होता.नोकरी करायची नसेल तर त्याने एखाद्या व्यवसायात पडावे,असलेले पैसे कुठेतरी गुंतवावेत असे मला वाटायचे,पण ते ऐकायच्या मनस्थितीत आण्णा नव्हता.त्याला पुन्हा आखाती देशातच जायचे होते.घरातले पैसे वेगाने खर्च होत होते.आण्णाने एका परदेशात नोकरी देणाऱ्या एजंटकडे नोंदणी केली होती.आपले काम होत नाही आणलेला पैसाही संपत आला होता त्यामुळे त्याची चिडचिड व्हायची.ज्या एजंटला त्याने काही हजार रुपये भरले होते तो एजंट एक दिवस याच्यासारख्या अनेक लोकांना टोपी घालून गायब झाला. दोन वर्षात जे कमावले होते ते एका वर्षात संपवले गेले होते.
आण्णाकडील पैसे संपल्यावर त्याने गावाकडे जाऊन मोठे बंधू आणि आईकडे जमीन गहाण ठेऊन त्याला परदेशी जायला पैसे मिळावेत म्हणून आग्रह धरला.सहा हजार रुपयात कुठल्याशा कागदावर आईच्या सह्या घेऊन सासवडच्या एका सावकाराकडून पैसे घेऊन आण्णा पुण्याला आला.आता या पैशातूनही हळूहळू खर्च होऊ लागला.परदेशात जायची संधी त्याला हुलकावणे देत होती.नाही म्हटले तरी त्याचा परिणाम त्याच्या बोलण्या वागण्यावर होत होता.
माझ्या बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षातल्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा चालू असताना मला खर्चासाठी काही पैसे हवे.मी आण्णाकडे पैसे मागितले माझ्या हातात वीस रुपये ठेऊन त्याने मला सांगितले की “माझ्याच्याने तुझ्या शिक्षणाचा खर्च होऊ शकणार नाही त्यामुळे तुझी तू सोय कर..” त्याचे ते शब्द ऐकून मी हादरून गेलो.मी बीएस्सी करून अजून पुढे शिकायची स्वप्ने बघत होतो,आता तर चालू असलेले शिक्षणसुध्दा पूर्ण करता येईल का असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता.सेमिस्टरच्या पेपर्सवर माझे लक्ष लागेना.कशीबशी परीक्षा देऊन मी गावाला गेलो.माझ्यासमोरची समस्या आईला व मोठ्या भावाला सांगितली,पण त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते.गावाकडून आर्थिक मदत मिळणे तसेही अवघड होते.आता मलाच काहीतरी करणे भाग होते.मंडळाच्या पोरांबरोबर मी बऱ्याचदा काँग्रेससेवादलात जायचो.आमच्या भागाच्या शरद रणपिसे या नगरसेवकाकडेही मंडळाच्या कामानिमित्त जाणे व्हायचे.माझा मित्र बाळू नितनवरे जो त्या काळात राजकारणी लोकांच्या संपर्कात असायचा त्याला मी माझ्यासाठी पार्ट टाईम का होईना नोकरी मिळवून द्यायला मदत कर म्हणून सांगितले.मी आणि बाळू अनेकदा रणपिसे यांच्या ऑफिसात त्यांनी काम मिळवून द्यावे म्हणून चकरा मारल्या.रामभाऊ मोझे यांच्याकडेही चकरा मारल्या,पण नोकरी देणे त्यांच्याही आवाक्यात नव्हते.एकतर अर्धवट शिक्षण,कामाचा कोणताही अनुभव नाही,अशा परिस्थितीत मला कोण काम देणार? “तुझी सोय कर” असे जरी सांगितले होते तरी आण्णाने मला अजून घर सोडून जायला सांगितलेले नव्हते त्यामुळे मी तिथेच राहून कॉलेज करता करता नोकरीही शोधू लागलो.मंडळाच्या सार्वजनिक लायब्ररीत सहा सात वर्तमानपत्रे यायची त्यातल्या छोट्या जाहिराती वाचून मी नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली.माझ्या किरकोळ तब्बेतीमुळे कोणतेही अंगमेहनतीचे काम मला जमणे शक्य नव्हते.मी कोणतेही व्यवसायिक शिक्षण घेतलेले नव्हते.त्या काळात सामान्यपणे लोक शिकत असताना टायपिंग शॉर्टहॅन्ड वा तत्सम स्किल आत्मसात करायचे तसेही काही माझ्याकडे नव्हते त्यामुळे मला कितीही हवी असली तरी नोकरी मिळवणे माझ्यासाठी सोपे नव्हते,पण मला माझे शिक्षण चालू ठेवायचे तर काम शोधणे आवश्यक झाले होते.
(क्रमश:)
प्रल्हाद दुधाळ