चाळीतले दिवस भाग 8
माझ्या वहीनी त्यांच्या तीन मुलांना घेऊन माहेरी रहात होत्या.मोठा पुतण्या लोणंदला नव्यानेच सुरु झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीत जायला लागला होता.मी माझाखिसा रिकामा झाला की पुणे स्टेशनवरुन मिरज पॅसेंजरमधे बसून लोणंदला वहिनींच्याकडे पैसे मागायला जात असे,तिथे सगळा कारभार भावाचे सासरे -भाऊंच्याकडे असायचा.‘वायफळ खर्च करू नको’ ‘अभ्यास कर’ असे उपदेश ऐकून त्यांच्याकडे एखादा दिवस राहून वीसेक रुपये घेऊन मी पुन्हा मिरज पुणे पॅसेंजर पकडून पुण्याला यायचो.या वीस रुपयात माझा महिन्याचा खर्च सहज निघायचा.सायकलच्या दोन तीन महिन्याच्या भाड्यासाठी वेगळे पैसे एकदम मागून घ्यायचो.एकंदरीत खर्चाला पैसे मिळवणे खूपच अवघड असायचे.
आमच्या कॉलेजचे इलेक्शन आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व्हायचे.इलेक्शनला आधीच्या वर्षांपर्यंत दोनच पॅनल असायचे,पण आम्ही गावाकडून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांनी त्या वर्षी गँग ऑफ गांववाले ही संघटना सुरु करून तिसरे पॅनल उभे केले.आम्ही खूप प्रयत्न केला पण प्रस्थ्यापीत शहरी विद्यार्थ्यांसमोर आमचा निभाव लागला नाही आणि आम्ही इलेक्शन हरलो.
कॉलेजचे त्या वर्षीचे स्नेहसंमेलन आमच्यासाठी पहिलेच संमेलन असल्याने सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या.संमेलनातला फिशपॉंड नावाचा उपक्रम मला आवडला होता.मी आणि विकास लोंढे दोघांनी मिळून कॉलेजमधे नव्याने ओळखी झालेल्या अनेक मुलांवर फिशपॉंड लिहिले आणि त्यासाठी ठेवलेल्या बॉक्समधे टाकले.विशेष म्हणजे सगळे फिशपॉंड निवडले गेले आणि व्यसपीठावर वाचले गेले.फिशपॉंडमधून अनेक मुलामुलींच्या वागण्याबोलण्यावर परखड भाष्य छोट्या छोट्या कविताच्या ओळीतून केल्याने सभागृहात प्रचंड हशाटाळ्या वाजत होत्या.एवढे भारी फिशपॉंड कुणी लिहिले म्हणून सगळे चर्चा करत होते.त्या प्रतिक्रिया आम्ही प्रकाशात न येता दोघे मस्त एन्जॉय करत होतो!
त्या वर्षीच्या कॉलेजच्या वार्षिकात माझी एक कविता प्रसिद्ध झाली होती.प्रथमच माझी कविता एखाद्या छापील मासिकात आली याचा अर्थातच मला खूप आनंद झाला होता. त्या एकमेव वर्षी प्रथमच मी कॉलेज जीवन खऱ्या अर्थाने जगत होतो.
मधल्या काळात भावाचा मेहुणा- बापू माझ्याबरोबर खोलीत राहायला आला होता.कुठल्याशा वर्कशॉपमधे त्याला काम मिळाले होते.गावाकडून अजून एकजण काम शोधायला तिथे रहायला आला होता.माझ्याबरोबरच आता त्या दोघांचा स्वयंपाकही मला करायला लागत होता.त्या दोघांकडून मी भांडी घासून घ्यायचो!
माझी दोन्ही सेमिस्टर संपली आणि मी बी एस्सीच्या दुसऱ्या वर्षात गेलो.सुट्टीसाठी थोडे दिवस गावाकडे राहिलो आणि त्याच कॉलेजात दुसऱ्या वर्षाची ऍडमिशन घेतली
कॉलेजातले आणि वस्तीतल्या मंडळातल्या मित्रमंडळीत त्या वर्षी तरी मी खूप मजा केली होती.मात्र जेव्हा जेव्हा मी एकटा बसलेला असायचो तेव्हा डोक्यात प्रचंड विचारांची वादळे असायची.भविष्यात आपले नक्की काय होणार याबद्दल मी साशंक होतो.
नुकतेच इराक इराण युद्ध सुरु झाले होते.कुवेतमधे असलेल्या माझ्या भावाची पत्रे यायची तेव्हा त्यात कुवेतमधील युद्ध आणि त्यामुळे बदललेले वातावरण याचा उल्लेख असायचा.
माझे कॉलेज सुरु होऊन दोन तीन महिनेच झाले असतील आण्णाने -माझ्या भावाने कुवेत सोडून पुन्हा पुण्याला यायचा निर्णय घेतला आणि काही दिवसातच तो पुन्हा पुण्याला आला.वहीनीही मुलांना घेऊन पुन्हा पुण्याला आल्या,त्याचा मुलगा चंदन लोणंदच्या शाळेत शिकत होता.
आत्तापर्यंत मी एकटाच रहात असल्याने जमेल तसा जगत होतो.आता मात्र माझे घरातले स्थ्यान बदलले होते.
मी कॉलेजला जात होतो आणि फावल्या वेळेत मंडळाच्या मुलांच्यात वेळ घालवायचो.वहीनी आणि आण्णाकडून मला दळण आणणे,दुकानातून माल आणणे,पाणी भरणे अशी कामे गरजेप्रमाणे सांगितली की ती करायची असा माझा दिनक्रम सुरु झाला.घर अगदीच छोटे असल्याने मी जास्तीत जास्त वेळ घराबाहेर काढायचा प्रयत्न करायचो.त्यात गावाकडून कुणी ना कुणी मुक्कामाला यायचे त्यामुळे अजूनच गर्दी व्हायची.नागपूर चाळीत असेल तेव्हा मी माझा मित्र सुरेश गायकवाडचे दुकान,आसिफची पानपट्टी,राजू गुप्ताचे दुकान किंवा साईबाबा मंदिरचौक यापैकी कुठे तरी टाईमपास करत रहायचो.बऱ्याचदा कॉलेज सुटले की राजेंद्र ढवळे रहातअसलेले कचरे होस्टेल किंवा दुसरा मित्र विकास लोंढे याच्या आंबेडकर होस्टेलच्या खोलीवर बराच वेळ घालवायचो.कधी कधी त्यांच्या मेसवर गेस्ट म्हणून जेवायलाही मी थांबायचो.कॉलेजच्या लायब्ररीतही मधून मधून बसायचो,पण तिथे माझे मन लागत नसायचे.सायकलवर पुण्याच्या पेठातून अकारण अगदी थकेपर्यंत फेरफटका मारत बसणे हा एक माझा वेळ घालवायचा उद्योग मी करायचो.आपण कुणावर तरी ओझे होऊन जगतो आहोत अशी भावना मनात आजकाल सारखी यायची.
.(क्रमश:)
- प्रल्हाद दुधाळ