चाळीतले दिवस भाग 10.
कुठेतरी पार्ट टाईम का होईना नोकरी मिळावी म्हणून मी प्रयत्न करत होतो.भावाने आधार काढून घेतला तर आयुष्यात आपण काहीच करू शकणार नाही, शिकायची कुवत असूनही केवळ आर्थिक कारणाने आपल्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागणार अशा विचाराने मला रात्र रात्र झोप लागत नव्हती.खाण्यापिण्यात किंवा अभ्यासात लक्ष लागत नव्हते. मंडळाच्या पोरांच्यातही थांबावेसे वाटत नव्हते. संध्याकाळी जेवण उरकले की लगेच मी आणि मित्र बाळू बाहेर पडायचो.चालत चालत गोल्फ ग्राउंडवर एखादा खडक बघून बसायचो.त्या काळात बाळू नितनवरे हा एकमेव मित्र सावलीसारखा माझ्याबरोबर असायचा.मी मंडळाच्यावतीने सुरु केलेल्या वाचनालयात दररोज जाऊन सगळ्या वर्तमानपत्रातल्या नोकरीच्या जाहिरातीही बघायचो.जिथे माझ्यायोग्य वाटेल अशा ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करायलाही मी सुरुवात केली.
कॉलेजला जाऊन पुढच्या सेमिस्टरच्या लेक्चर्सला जरी मी जाऊन बसत असलो तरी आता अभ्यासापेक्षा नोकरी कशी मिळेल याचीच चिंता लागलेली असायची.
माझ्या आयुष्यात आतापर्यंत जेव्हा काही ना काही समस्या आल्या तेव्हा काहीतरी मार्ग निघून समस्या थोडी का होईना सुसह्य होते असा अनुभव मी अगदी लहानपणापासून घेतला आहे.आत्ताही काहीतरी मार्ग निघेल असे वाटत होते,पण माझा हा विश्वास अंधविश्वास तर नाही ना, असाही विचार मनात यायचा.
एक दिवस असाच वर्तमानपत्र चाळत असताना मला पोस्ट आणि टेलिफोन खात्याची अर्थात पुणे टेलिफोन्सची एक जाहिरात दिसली.
टेलिफोन ऑपरेटर पदाची ती जाहिरात होती.त्याच पानावर पुणे ग्रामीण विभागाचीही तशीच एक जाहिरात होती.
मी सरळ ‘सकाळ’ पेपरचे ते पान काढून घेतले आणि खोलीवर येऊन त्या जाहिराती नीट वाचल्या.
जाहिरातीत शालांत परीक्षेत प्रथम वर्गात पास झालेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवले होते.अर्जाचा नमुना जाहिरातीत दिला होता.जर अर्ज स्वीकारला गेला तर एक लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार होती.मी ताबडतोब अर्ज तयार केले आवश्यक ती कागदपत्रे जोडून दोन्ही ठिकाणी अर्ज पोस्टाने पाठवून दिले.
पुणे टेलिफोन्स शहर आणि ग्रामीण विभाग दोन्हीकडूनही मला लेखी परीक्षेसाठी बोलावले गेले. प्रथमच नोकरीसाठीचा कॉल आल्याने मला खूप आनंद झाला होता.
तोपर्यंत मी कधीच टेलिफोन हाताळलेला नव्हता. आपल्याला निदान टेलिफोनच्या कोणत्या भागातून ऐकतात आणि कोणत्या भागात बोलायचे असते हे माहीत असावे म्हणून मी स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये असलेलेल्या पब्लिक टेलिफोन बूथ च्या बाजूला जाऊन उभा राहून बूथ रिकामा असताना जाऊन टेलिफोन हाताळून बघितला.
चाळीत आमच्या बाजूला रहाणारा अशोक शिर्के पुणे टेलिफोन्समध्ये सिव्हिल ड्राफ्टसमन म्हणून नुकताच नोकरीला लागला होता त्याच्या बाजीराव रोडला असलेल्या ऑफिसात मी दोनतीन वेळा जाऊन आलो.
पंधरा दिवसाच्या अंतराने मी दोन्ही परीक्षा दिल्या.
दोनेक महिन्यानंतर दोन्हीही परीक्षेत पास झाल्याचे पत्राने समजले आणि कागदपत्रे तपासणी आणि तोंडी मुलाखतीला बोलावणे आले.
पुणे टेलिफोन्सच्या मुलाखतीसाठी मी गेलो.पुणे कॅम्प मधील सदर्न कमांडच्या बाजूच्या पुणे टेलिफोन्सच्या जुन्या बिल्डींगमध्ये एक टेलिफोन एक्सचेंज होते त्या ऑफिसात माझी मुलाखत होती. मला आठवते की आर एच देशपांडे नावाच्या साहेबांच्या केबिनमध्ये एका एकाला कागदपत्रे घेऊन बोलावले जात होते.मला आत बोलावले गेले. शरीराने बारीक अंगकाठी असलेल्या त्या साहेबांनी मला खुणेने बसायला सांगितले. माझी कागदपत्रे बघून ते म्हणाले...“ अभी तो आप पढाई कर रहे हैं, बी एस्सी पुरा करने के बजाय आप नौकरी क्यूँ करना हैं? ”
झाले...नको तो प्रश्नच साहेबांनी विचारला.
माझा चेहरा रडवेला झालेला असावा.मी कसाबसा बोललो. .“सर, पैसे की कमी से आगे पढना मुश्किल हैं इसलिये आज मुझे नौकरी करना जरुरी हैं “
मंद स्मित करत साहेब बोलले.
” अरे, बी एस्सी पुरा करके ज्युनियर इंजिनयर बनके आओ. ..अभी सिर्फ ऑपरेटर बनोगे?“
हाता तोंडाशी आलेली नोकरी जाते की काय अशी मला शंका यायला लागली...
” सर नौकरी के बिना मैं बी एस्सी पुरा नहीं कर सकता “ माझ्या आवाजात विनवणी होती.
” ठीक हैं. ..आपको सिलेक्शन हुआ या नहीं इसके बारेमे पत्र आयेगा. ..आप जा सकते हैं “
मी तिथून बाहेर पडलो.
आठवडाभराने सिटीओ कंपाउंडला ग्रामीण विभागासाठी मुलाखत होती.तिथे मुलाखत न घेता फक्त कागदपत्रे जमा करून घेतली गेली.दरम्यानच्या काळात पुणे टेलिफोन्सची टेक्निशियन पदासाठी एक जाहिरात आली.तिथेही मी अर्ज पाठवून दिला.
टेलिफोन ऑपरेटर काय किंवा टेक्निशियन काय दोन्हीही पदांचे नक्की काम काय असते या बाबतीत मी पूर्ण अज्ञानी होतो त्यामुळे या बाबतीत कुणाचे तरी मार्गदर्शन घेणे आवश्यक होते.माझ्या लांबच्या नात्यातला दिलीप हिंगणे सहा महिन्यापूर्वी टेलिफोन ऑपरेटर म्हणून खात्यात लागला होता त्याच्याकडे जाऊन मी शंकानिरसन करायचे ठरवले.
दिलीपही खात्यात नवीन होतात त्याने अगदी सोप्या भाषेत मला माहीती दिली. ..
“ हे बघ पुणे शहरी भागात ऑपरेटर म्हणून लागलास तर पाहिले तीन महिने एकशे तीस रुपये स्टाईपेंड व पुढे साधारण पाचशे रुपये पगार मिळेल आणि पुणे शहराच्या बाहेर बदली होणार नाही, ग्रामीणला ऑपरेटर झालास तर पुणे सातारा सांगली जिल्ह्यात कुठेही बदली होईल, ग्रामीण भागात पगार कमी मिळेल. टेक्निशियन झालास तर एक वर्षभर एकशेतीस स्टाईपेंडवर आणि नंतर पगार सुरु होईल ”
‘काम काही का असेना,कोणत्या पदाचा पगार किती आहे हे तर समजले!’ अशी स्वतःची समजूत करून घेऊन मी पुढच्या पत्राची वाट पाहू लागलो.
(क्रमश:)
- प्रल्हाद दुधाळ