ती
उन्हाळी तास सुरु असताना शाळेत फक्त दहावीची मुले येत होती. त्यामुळे शाळा अशी मोकळी मोकळी वाटायची. जाडू आणि मी घरून एकत्रच निघायचो आणि घरी पण एकत्रच जायचो. दोन आठवडे झाले होते तास सुरु होऊन सकाळी साडे नऊला पाच दहा मिनिटे कमी असताना जाडू माझ्याकडे यायचा. मग मी त्याच्यासोबत निघायचे.
त्यादिवशीही तो आला. पण एकटा नाही.
"सुने! ही श्वेता. आपल्या शाळेत यावर्षी ऍडमिशन घेतलंय. बाबांच्या ऑफिसमध्ये हिचे बाबा बदली होऊन आलेत. आपल्या घराजवळच आलेत हे सगळे रहायला. पहिला दिवस आहे म्हणून माझ्यासोबत आलीये. आणि हो.. आपल्या क्लास मधेच ऍडमिशन बरं का. आधी पण संस्कृत असल्यामुळे preference मिळाला तीला." जाडू सायकलवर बसून म्हणाला.
मी श्वेताकडे पाहिले आणि पहातच राहिले. चाफ्यासारखी गोरी, उंच. पण नाजूक बांध्याची. गोल चेहऱ्याची आणि सोनेरी तांबूस केसांची अशी मुलगी आमच्या शाळेतच काय, पण अख्या गावात नव्हती. डोळ्यावर चष्मा होता म्हणजे, अभ्यासू असणार. केसांचा बॉब होता, पण ते एकाच पोनीमध्ये बांधले होते. युनिफॉर्मचं compulsion नव्हतं आम्हाला उन्हाळी तासांना. म्हणून आम्ही casual कपडेच घालत होतो. तिने जीन्स आणि टॉप घातला होता. खूप स्मार्ट दिसत होती. नवी कोरी गुलाबी लेडीबर्ड सायकल वापरणारी आणि दिसायला देखनी होती कितीतरी.
" हाय श्वेता.. Welcome!!" मी म्हणाले.
" हाय सुनेत्रा!! हा बोलला मला आधी तुझ्याकडे, मग शाळेत जायचंय. रस्ताभर तुझंच सांगत आलाय." ती म्हणाली.
" जाडूपण ना!! विसर..त्यातलं 99% खोटं आहे. " मी म्हणाले.
ती हसली आणि म्हणाली, " जाडू??! Why you call him that? हा कुठे जाड आहे?"
"अगं होता पहिले जाडू गोलमटोल. म्हणून मला लहानपनापासून त्याला तसं म्हणायची सवय आहे. Like a pet name." मी सांगितलं तीला.
" अगं.. Pet name नाही silly.. Its nickname. ए पण छान आहे हा..!! मग मी पण म्हणते त्याला जाडू आजपासून." श्वेता म्हणाली.
श्वेता असेल छान बिन, गोड बीड, cute shut पण जाडू आणि माझ्यात असलेल्या नियमात मी बरी घुसून देईन तीला.
हे नाही चालायचं. तीला लगेचच कळलेलं बरं असं वाटून मी सहेतूक सांकेतिक नजरेने जाडूकडे पाहिले.
" श्वेता ते rights फक्त तिच्याकडे आहेत. इतर कोंणी मला तसं नाही म्हणत." जाडुने क्लिअर केले.
प्रश्न आहे का? जाडू काही कोणाच्या कह्यात जाणारा नव्हता.
" oops!! ok. Sorry. निघायचं का? " ती म्हणाली.
" हो चला." असं म्हणत जाडू ने सायकल दामटली.
"जाडूच्या बाबांशी तिच्या बाबांची ओळख असल्यामुळे साहजिक होतं कि त्यांनी जाडूवर तीला शाळेत संभाळून घ्यायची जबाबदारी दिली असणार. त्यात जाडू हुशार आणि नावाजलेला, गुणी विद्यार्थी. त्यामुळं जाडू तिची जबाबदारी घ्यायला समर्थ होता. पण त्याने पल्लीसारखं तीला वागवू नये म्हणजे मिळवलं. असं मला वाटत होतं. तसं श्वेता आणि पल्ली काही comparision तरी आहे का? कुठे ती यडी गंगू आणि कुठे ही पॉश मॅनर्स वाली खटाखट श्वेता??
आणि जाडूला कुठे माहिते सुनिसोडून इतर कुठल्या मुलीशी कसं वागायचं. बिचारा.. त्याला चार गोष्टी समजवायला हव्या. उगाच नाही ते बोलायचा चिडून आणि दुखवून ठेवायचा तीला.. मीच बघते जरा..
"जाडू.. तू तीला संस्कृतच्या ट्युशनच सांगितलंस का?" मी म्हणाले.
"..."
दोघांचा काही आवाजच नाही. कुठे गेले?? बघते तर पन्नास एक मीटर मागे होते. मीच विचारांच्या तंद्रित त्यांना सोडून पुढे आले. थोडं स्लो होतं सायकल थांबवली. जाडू आणि ती हसत हसत खिदळत येतायत. बाई गं जाडू तर चांगलाच मिसळलाय कि तिच्यासोबत. त्या पल्लीला वाऱ्याला उभं करतं नव्हता आणि इथं...
" so funny यार...तुझी सांगण्याची पद्धत मजेशीर आहे त्यामुळं खरंतर किस्सा रंगतदार वाटतो. " श्वेता उत्साहाने त्याला म्हणत होती.
" का गं थांबलीस सुने चल ना? " जाडू म्हणाला.
" हो.. " एवढंच बोलून मी त्यांच्या मागे स्लो सायकलिंग करतं आणि त्यांची रंगतदार बडबड ऐकत निघाले.
आम्ही तिघे शाळेत पोहोचलो. जाडू तसा कुणात मिसळायचा नाही. त्यामुळे कुठल्या ग्रुपचा भाग नव्हता. श्वेताला इतर मुलींशी ओळख करुन घ्यायला मला न्यावं लागणार होतं.
सायकल लावून आम्ही ग्राउंडवरून बिल्डिंग कडे निघालो होतो.
" श्वेता.. चल तूला क्लासमेट्स ची ओळख करुन देते. " मी तीला म्हणाले.
" हो..ते काम सुनी भारी करेल. लीडर आहे ती आपल्या क्लास b ची." जाडू कौतुकाने म्हणाला.
" होईल गं हळूहळू.. Hour सुरु व्हायला वेळ आहे ना? तोवर मला शाळा दाखवशील का?" श्वेता जाडूला म्हणाली.
" चल सुनी येतेस का? " जाडुने विचारले.
" अरे नाही.. मी जाते जरा घोळक्यात.. बघते कोणाचं काय म्हणणं आहे. या तुम्ही जाऊन. " मी म्हणाले.
" बरं.. श्वेता.. सुरुवातीपासून सुरु करू.. ते आपलं गेट तिथून आपण आत येतो. " जाडू पी जे मारत होता??
"शी ss काहीही!!" ती खिदळत म्हणाली.
हसत, खिदळत, चालत, बोलत जाडू आणि श्वेता शाळेत फिरायला निघाले होते. जाडू गाईड हह.. बघतेच याला.
" ए सुने!! कोण गं ती? त्याच्या सोबत काय करतीये?" पल्लीने विचारलं.
" श्वेता.. जाडूची नवी शेजारीण. नवं ऍडमिशन आहे. आपल्या शाळेत आणि वर्गात पण." मी म्हणाले.
" आणि त्याच्या मैत्रीत पण." सेन्ही म्हणाली.
मी थोडं खुन्नस ने बघितलं तिच्याकडे.
" बघितलं त्यावरून वाटतंय. " ती म्हणाली.
" स्नेहे.. तिचा पहिला दिवस आहे. म्हणून ती म्हणाली शाळा दाखव. उगाच अकलेचे तारे नको तोडूस." मला तिचा रागच आला. माकडीण कुठली.
" अगं पण तू होतीस कि, आपण होतो. त्यालाच का म्हणाली?आपल्याशी ओळख करुन घेण्यात interest नाहीये का तीला? " स्नेहा परत पचकली. चोमडीला फार ऊत आणायचा असतो एखाद्या गोष्टीत.
" माहित नाय मला. मी काय कोणाची assistent नाहीये. शाळा बिळा दाखवत बसायला. चला वर्गात. तास सुरु होईल." मला काय झालं होतं कळेना.
वर्ग भरल्यावर. ते दोघे आले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. हलकी चुळबुळ झाली. श्वेता मागे जाऊन बसली. जाडू त्याच्या जागेवर बसला. त्यांच्यामागेच सर आले आणि तास सुरु झाला. त्यांनी श्वेताला उठवून स्वतःची ओळख सांगायला लावली.
"Hello freinds, myself Shweta Sharangpani. New admission in the school and this class. I have shifted with my family from another city to here." ती म्हणाली.
" छान नववीला किती मार्क्स होते गं तूला? " सरांनी विचारलं. तसे सर्वानी कान टवकारले.
" सर मला 95% होते नववी मध्यें. " ती म्हणाली.
तशी बारीक कुजबुज सुरु झाली. म्हणजे जाडू इतकेच. ही तर त्याच्या तोडीची होती. त्याच्याइतकीच हुशार.
" छान.. आणखी एक गुणी आणि हुशार मुलगी मिळाली शाळेला. बरं. तू तिकडे मागे नको बसू. इथे सुनेत्रा पाशी बस. पल्लवी तू दोन नंबरच्या बेंचवर बस." सरांनी सांगितलं.
श्वेता माझ्यापाशी येऊन बसली. आम्ही दोघी एकमेकींकडे बघून हसलो. तिने मागे वळून जाडूकडे बघितलेलं मी नोटीस केलं.
क्लास सुरु झाल्यावर मात्र ती इकडे तिकडे बघेनाशी झाली. संपूर्ण लक्ष शिकण्याकडे. जणू काही जाडूच शेजारी बसला होता असं वाटत होतं. पण माझं मनं मात्र कमालीचं विचलित झालं होतं. माहित नाही का पण आतून बारीकस धुमसत होतं.
श्वेताने जाडूच्या शेजारी राहणं.. त्याच्यासोबत शाळेत जाणं येणं.. त्याच्या घरी जाणं, जाडूसोबत शाळेत फिरणं. त्याच्याशी मोकळेपणाने गप्पा मारणं. त्याला फणी म्हणणं. त्याच्याकडे बघून हसणं.. त्याच्याशी मैत्री करणं.. आमच्या मैत्रीमध्यें येणं.. माझ्या जाडूवर संपूर्णपणे व्यापणं... नाही नाही...
" अगं काय नाही नाही? मादागास्कर एक बेट असलेला देश नाहीये का? " सर म्हणत होते.
" अं!!?? " मी उदगारले.
"लक्ष कुठंय सुनेत्रा?? इथे आहेस, कि गेली मादागास्करला फिरायला. " सर ओरडले. तसे सगळे हसायला लागले.
" नाही.. म्हणजे हो.. तो एक बेट असलेला देश आहे. " मी स्वतःला सावरत म्हणाले.
सर एक आकृती काढत होते. तेवढ्या वेळात मी हळूच वळून जाडूकडे पाहिलं. त्याने भुवया उडवून "काय गं? " असा प्रश्न केला.
मी नकारात्मक मान डोलवत त्याचा प्रश्न टाळला. एवढ्या लांबून उत्तर देणं शक्य नव्हतं आणि जाडू लांब होणं मला परवडणारं नव्हतं.
🍁🍁🍁🍁
हलकी झुळूक पण घाबरवते.
तूला हरवून बसेन असं भासवते
माझ्या मनाला घट्ट धर तू
तुझी गरज त्याला सतत जाणवते.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁