सुनी
त्यावर्षीची आमची वार्षिक परीक्षा दहावीच्या परीक्षेचा पाया होती. माझा नववीचा अभ्यास नीट उरकल्यामुळे मला पेपर परीक्षेत उत्तम गेले. यावेळी तर गणितात पैकीच्या पैकी पडतील असा माझा आत्मविश्वास होता. आमचे निकाल लगेचच लावण्यात आले. यावेळी मी तिसरी आले होते आणि रामदास दुसरा. जाडू परत अव्वल आला होता.. सचिनने खूप अभ्यास करतं आणि ठरवलेले गुण मिळवत सरपंच तालीम संघाच्या शिष्यवृत्तीसाठी स्वतःला पात्र केले होते. त्यावर्षी कोणीही कुठेही जाणार नव्हते कारण, दहावीचे उन्हाळी वर्ग सुरु झाले होते.
बालपण संपून आम्ही सगळे आता किशोरवयाकडे वाटचाल करत होतो. शारीरिक आणि मानसिक बदलाबरोबरच सगळेजण आता आपलं आपलं ध्येय गाठण्यासाठी धावायला सुरुवात करणार होते.
हो.. मी सुनी.🍁🍁
आतापर्यन्त आमचं सगळंच जाडूच्या मनातून तुम्ही ऐकलंत. पण हा प्रवास आमचा होता... आणि पुढेही असणार तेव्हा केवळ एक दृष्टिकोन जाणून घेणं बरोबर नाही. माझं पण काही वेगळं म्हणणं असू शकतं ना?.. नाही.. जाडूच्या विचारांशी काहीच फारकत नाहीये माझी. तो खूपदा, म्हणजे अगदी नेहमीच बरोबर असतो. माझ्या लक्षात येत राहायचं. पण माझे विचार त्याला सुसंगत होत असले तरी माझा स्वभाव वेगळा होता. त्याचं मला सगळं पटायचं. पण मी त्याच्यासारखी वागू शकत नव्हते. त्याच्या सारखं वागणं तोच जाने. संयम, चिकाटी, नियंत्रण आणि सुबुद्धीचा एकत्र मिलाफ आहे त्याच्यात. त्याच्यासारखा तोच.. त्याच्यावर इतका जीव असूनपण कधी कधी ईर्षा उत्पन्न झाल्यागत व्हायचं. इतका तो गोड आहे.
माझा जाडू भले बंद शिंपल्यागत होता. आत खूप साचलेलं असायचं त्याच्या. पण जेव्हा कधी मी त्याच्यात डोकावून पाहिलंय, तेव्हा मला नेहमी तिथे चांगल्या विचारांचे मोतीच मिळालेत. त्याच्या अंतरंगात डोकवायची परवानगी त्याने मला न विचारता दिली होती. माझ्या आयुष्यात त्याचं असणं माझ्यासाठी श्वासाइतकीच सहज गोष्ट होती. तो कधी दिसला नाहीतरी जाणवत रहायचा.
"सुनी!" म्हणून त्याची हाक मला सदैव आश्वस्थ करते कि मी कधीच एकटी नाही.
आम्ही तेरा चौदा वर्षांचे होईपर्यंत जाडू बावळट म्हणण्याइतपत वेंधळा राहायचा. गुबगुबीत तब्येत, कसेही कोंबलेले कपडे, कोंणी काही पाजी पणा केला तर त्याला विरोध न करण्याची सुस्त वृत्ती. काही करू म्हणलं कि, "कशाला? नको ना?" हे दोन शब्द सतत त्याच्या तोंडात. मला मात्र ऍक्टिव्ह रहायला आवडायचं. कुठेही पळायला मी सदैव तयार. अभ्यास करुन वरचा नंबर सोडायचा नाही हे पण सतत ठरलेलं असायचं माझं. जाडूचे आईबाबा त्याला माझ्यावरूनच बोलायचे.
"सुनीला बघ.. शिक जरा तिच्याकडून. " हे वाक्य मी कितीदा काकूंकडून ऐकलंय.
"सुने लक्ष देत जा बाळा याच्याकडे." ही त्यांची गोष्ट मी जबाबदारीने करायचे. आमचे वर्ग वेगळे होते. पण माझं त्याच्याकडे लक्ष असायचं.
तो बोलायचा कमी आणि विचार जास्त करायचा. शांतपणे ऐकून घ्यायचा. हे माझ्या बाबांना आवडायचं. बडबड करणारे थोडे चंचल वृत्तीचे असतात. त्यामुळे निर्णय घेताना त्यांचं नुकसान होऊ शकत असं त्यांचं मत होतं. शांत राहणाऱ्या जाडूला म्हणूनच ते खूप जीव लावायचे.मला त्यावेळी वाटायचं कि हा ढोलू आहे म्हणून शांत आहे. पण त्याची वैचारिक खोली समोर यायची होती. माझी आई पण सतत त्याला किंवा त्याचं मला विचारत रहायची.
तो त्याच्या वर्गात त्यावर्षी पहिला आला. सुनीसारखं आपण पण संस्कृत शिकायचं ठरवून त्याने अभ्यास केला असावा असं मला वाटलं. त्याला माहित सगळं असायचं पण पेपर मध्यें लिहायचा कंटाळा करायचा. हे त्याने त्यावर्षी मात्र टाळलं. तो आला आणि त्याच्यासोबत सचिन ही.
सचिन.. हे एक सेपरेट प्रकरण माझ्या आयुष्यात आलं... पण तेव्हा नाही जेव्हा जाडू वर्गात आला. आधीही माझी त्याची काही ओळख नव्हती. पण शाळेत मी त्याला बऱ्याचदा पाहिलं होत. त्याचं वेगळेपण मला त्याच्या खेळात आणि मित्रांमध्ये असण्यात जाणवायचं. माणसे धरून रहायची त्याची वृत्ती असावी असं मला वाटलं. त्याचं खेळणं, त्यातलं प्रविण्य, सराईत हालचाली आणि सदैव कार्यरत असणं तो किती ऍक्टिव्ह आहे हे दाखवायचं. उंच आणि सावळा पण तजेलदार चेहऱ्याचा सचिन मला छान वाटायचा. मी त्याला बघितलं कि कधी तो ही बघायचा. तेव्हामात्र एक अनामिक लहर जाणवायची मला. पण मी कधी बोलले वैगरे नाही त्याच्याशी.
तो वर्गात आला आणि ट्युशनची वही घेण्याच्या बहाण्याने माझ्याशी स्वतःहून ओळख करुन घेतली. त्याचं हे स्वतःहून पुढे येऊन ओळख करुन घेणं मला भावलं. कोंणी आपल्यासाठी दारं उघडत नाहीत. ती एकतर आपल्याला ठोठावी लागतात किंवा तोडावी लागतात या वृत्तीचा तो होता. त्याला धाडस आवडायचं. मला शिवनेरीचा कडा दाखवणे, लाठी काठी शिकायला सुचवणे हे त्याच्यामुळे घडलं. त्या लाठीच्या प्रशिक्षण वर्गाला मी जायचे, त्यावेळी संध्याकाळी तो ही तिथे असायचा. तिथल्या गुरुजींनी मला त्याच्या ओळखीमुळे खूप चांगलं प्रशिक्षण दिलं. सचिनच्या खूप ओळखी होत्या.
"माणसे मदत करतात, माणसे कधी कधी त्रास पण देतात. पण ओळखीच्या माणसांशिवाय आणि मित्रांशिवाय आयुष्यात काही मिळवणं खूप कठीण असतं नेत्रा!" असं तो मला म्हणायचा.
" नेत्रा!" सगळं जग मला सुनेत्रा किंवा सुनी म्हणायचं. पण सचिने माझ्या सुनेत्रा मधून "सू" काढून टाकलं.
त्याला मी विचारलं पण, "नेत्रा का म्हणतोस? माझं नाव सुनेत्रा आहे."
तर तो म्हणाला. "सू म्हणजे चांगलं आणि जगात फार चांगलं असू नये. लोकं फायदा घेतात. तू खूप चांगली राहशील तर कुठेतरी तुझं नुकसान होईल आणि तूला कळणार नाही. तेव्हा थोडी वाईट बनायला हरकत नाही. म्हणून तुझ्या नावापासून सुरुवात करू."
अशी त्याची वास्तववादी तत्वे होती. घरचा गरीब पण परिश्रमाणे सगळं मिळवू पाहणारा सचिन मला वयापेक्षा खूप समजूतदार वाटू लागला होता. त्याच्या माझ्यात मैत्री बनली होती. पण ती जाडूच्या मैत्री इतकी सहज नव्हती. त्यात एक मुलगा आणि मुलगी असण्याची जाणीव होती. आम्ही त्या रेषा लंघत नव्हतो. जाडूशी माझं सहज वागणं सचिनच्या बाबतीत मात्र काहीप्रमाणात संकुचित व्हायचं.
बऱ्याचदा सचिन ने मला हे बोलून ही दाखवलं. त्याचा स्पष्टवक्तेपणा थोडा टोचणारा असला तरी, मला त्याचं वावगं वाटत नव्हतं. उलटं त्याच्या तशा तक्रारी मला जाणीव करुन द्यायच्या कि माझ्यात काही विशेष आहे ज्यासाठी सचिन एवढा धडपड करतो. स्वाभाविकच त्याच्या मनात जाडूबद्दल काहीशी अढी बसणारं होती. पण जाडूला तो काही नुकसान पोहोचवेल असं मला अजिबात वाटलं नाही. त्याने तसं केलं असतं तर जाडू मला बोलला असता. मग मी त्याची खबर घेतलीच असती. पण जाडूकडून तसं कधी आलं नाही. सचिन माझ्यासमोर थोडे टोमणे वैगरे मारायचा. पण ते तितकं मनावर घेण्यासारखं मला वाटलं नाही.
अचानक जाडूला काय झालं नाहीत नाही. पण तो बदलू लागला. सहामाहीत सहजपणे मलाच काय पण सगळ्या इयत्तेला मागे टाकत तो पुढे आला. स्वतःची मानसिक स्थूलता सोडून अंग झटकत मेहनत करू लागला. त्याचं भाषण, शिक्षकांसमोर आत्मविश्वास दाखवत उत्तरे देणं, त्याने मला वेळोवेळी योग्य सल्ले देत स्वतःचं मतप्रदर्शन करणं. त्याचं असं सगळं चौफेर स्वतःला घडवणं मला चकित करतं होतं. व्यायाम करुन खपून त्याने शारीरिक बदल ही घडवला. सचिनला मारण्याइतकं बळ त्याने आणल्यावर तर मला धक्काचं बसला होता.
जाडू जो आजवर खोल खाणीत सुस्त पडलेला कोळश्याचा दगड असं सगळे समजतं होते. त्याने ती काळीक झटकत स्वतःची लकाकी दाखवली होती. पण स्वतःचं अस्तित्व अधोरेखित करताना त्याने एकही क्षण मला एकटं पडू दिलं नाही.
मला सचिन म्हणाला होता, स्कॉलरशिप बद्दल. त्याने जाडूला रेस मध्यें न धावण्याच सांगायला मला गळ घातली होती. मलाही ते पटलं कि, "हा कशाला धावतोय जर याला गरज नाहीये तर."
पण माझं जाडूला तसं विनवणं चूक आहे आणि स्वतः हरूनही तोच चॅम्पियन आहे. हे जगाला कृतीतून ठणकावून सांगणं हे जाडूच करू शकला. मी तर आतून हदरले होते. मी मूर्खासारखी त्याला समजवत होते. पण त्याचं मोठं मनं समजून नाही घेतलं याची खंत पदरात पाडून बसले.
नंतर एकदा मी खोटा बहाणा करुन सचिन, पल्ली, स्नेहासोबत सिनेमाला गेले. ते ही त्याच्यापासून लपलं नाही. पण माझे आईबाबा नाही म्हणतील. हे सचिनने मला सांगितलेलं अजब तत्वज्ञान जाडुने चूक ठरवलं. कुठून आणत होता ही प्रगल्भता तो.
त्यात त्याने त्याच्या लपत छपत लिहिलेल्या कविता. ते अपघातानेच मला समजलं. पण जे समजलं ते माझ्या विचारांच्या पलीकडचं होतं. त्याचे विचार मांडण्याची प्रतिभा कसलेली होती.
आजवर ही सुनी स्वतःला आमच्या दोघात थोरली समजतं होती. पण जाडू.. तो बदलला. ध्येय आणि उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन वागू लागला. तेव्हा पासून मला त्याचं एक वलंय माझ्याभोवती जाणवू लागलं. त्याचे विचार, त्याची कृती. त्याचं माझ्या कुटुंबाला आपलं समजणं.. हे सगळं माझ्याभोवती काहीतरी घडवू पाहत होतं.. एक मायेची उब. एक कोंदण.
पण परिस्थिती, नियती, स्वभाव, नेमक्या वेळेला न सुचणारी सूबुद्धी हे माणसाच्या कंट्रोल मध्यें नसणारे घटक आहेत. त्याचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात. असंच झालं असावं का? वास्तवाच्या निखऱ्यातून सतत पोळत कठीण झालेला सचिन, कि चांगल्याच तत्वाना अंगी बाणवत प्रचंड उंचीला पोहोचलेला जाडू, ही गोष्ट इतकीच नाहीये. हे एक तात्विक द्वंद्व आहे. मी पण याचा माग काढत चालणारे.. तुमच्यासोबतीने...
🍁🍁🍁🍁
तुझी थंड सावली जहाल ग्रीष्मात मिळते.
अन तुझ्या अस्तित्वाची उब शरदात कळते.
इतका नको जीवाशी बांधील होऊ माझ्या,
सर्वा कळेल, कि मी कोंदनात तुझिया राहते.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁