यत्न
स्वतःची सुस्तावस्था सोडून काही करायला जाणं हे किती कठीण काम आहे याचा प्रत्यय मला यायचा होता.
मी मनावर तर घेतलं होतं. सुस्तता सोडून आता मी सकाळी लवकर उठून पळायला जाणार होतो. असं ठरवलंही होतं. पण...
मी सकाळी उठून खिडकी बाहेर डोकवायचो. बाहेरचा अंधार आणि थन्डी ही प्रतिकूल परिस्थिती बघायचो. घरातली उब बघता परत अंथरून जवळ करायचो. सगळं स्फूरण मातीत जाऊ लागलं होतं. मग दिवसभर चुटपुट लागून रहायची. त्या स्थितीत आठवडा वाया गेला.
सुनी आली होती घरी त्यादिवशी संध्याकाळी.
" जाडू..!! मी लाठी काठी संपूर्ण शिकले. आता मला गुरुजींनी फक्त प्रॅक्टिस करायला सांगितलंय. लाठी मारता येते, अडकवता येते आणि बचाव पण करता येतो.. टॉईंग कण कोणाच्या पण डोक्यात घालू शकते मी." ती उत्साहात म्हणत होती.
" बापरे!! तू आली की घरातली कपडे सरकवायची काठी लपवून ठेवावी लागेल आता मला. " मी थोडा लांब सरकत म्हणालो.
" गप रे!! मी माझी घेऊन फिरत जाईन आता." ती मिश्किल हसत बोलली.
"अगं ए लठधारी पैलवान.. ते तू स्वतःच्या सरक्षणासाठी शिकलीये. विसरू नकोस. निघाली लाठी घेऊन डोकी फोडायला." मी म्हणालो.
" आणि ना माझ्याकडे तीन छोटी मुलं पण दिलीयेत ट्रेनिंग द्यायला. " ती पुढे म्हणाली.
"अरे वाह!! छान." सुनी वेगळं काही करतीये बघून मला छानचं वाटलं.
" हे सगळं सचिनमुळं झालं. त्याने सुचवलं नसतं आणि मी गेले नसते तर नवं काही कळलं नसतं. अरे त्यादिवशी गडावरची गोष्ट तर तुला सांगायचीच राहिली की. " ती म्हणाली.
मला थोडंसं का होईना पण अस्वस्थपण जाणवलं.
" काय गं? " मी विचारलं.
तिने एक सेकंद पॉज घेतला. श्वास भरून ती बोलू लागली.
"अरे मी त्या किल्ल्यावर कडेलोट कड्या जवळ गेले. मला तो देखावा वरून पहायचा होता. पण बघायला जाम भीतीही वाटत होती. मी भीत भीत एक एक पाऊल टाकत होते. पण वीस पावलांवर थांबले. नको पुढे जायला असंच मला वाटत होतं. सगळेजणं इकडे तिकडे पांगले होते. सरांनी आधीच बजावलं होतं. की कोणी जास्त जवळ जायचं नाहीये कड्याच्या. पण मला माझ्या भीतीवर मात करायची होती. बघायचंच असं ठरवत होते पण धीर होईना. तेवढ्यात तिथे सचिन आला.
मला म्हणाला. घाबरलीस तर परत हा अनुभव घ्यायला मुकशील. आत्ता मन घट्ट कर. काहीतरी केल्याचा जबरी आनंद मिळेल. मी येतो तुझ्यासोबत घाबरू नकोस. मी आहे.
त्याने मला हाताला धरून तिथे नेलं. नशीब कोणी बघत नव्हतं. मी त्याला घट्ट धरून खाली डोकवलं. आईशपथ सांगते जाडू. काय वर्णन करावं रे त्या दृश्याच!! अप्रतिम !! अजून मनातून पुसलं गेलं नाहीये. सचिनने जर मला हाताला धरून नेलं नसतं तर कदाचित मी गेले नसते पुढे. बरं तर बरं तो होता, म्हणून मी धाडस केलं.
तो बोलला मला. अशी एखादी गोष्ट करायची, पण जपून. मला खूप छान वाटलं. त्याने मला थांबवलं नाही. उलटं प्रोत्साहन दिलं. शिवाय माझ्या त्या वेडात सामील झाला. मी ते पाहून झाल्यावर आनंदाने वेडी झालेली अरे. फार वेगळा आहे ना सचिन? बघ ना मला नेहमी प्रोत्साहन देतो. शिवाय स्वतः पण किती निडर आणि धाडसी आहे ना? मला माहिते तू असतास तिथे तर काळजीपोटी मला असं काही करू नकोस म्हणाला असता. पण यार, एक अनुभव घेण्यासाठी थोडं साहस करावंच माणसाने. होना जाडू?"
" हम्म..!" मी एवढंच बोलू शकलो.
तुलना? सुनिकडून हे पहिल्यांदा आलं होतं. तीला का वाटलं की मी तिच्या वेड्या हट्टा आड येईल. माझी क्षमता कमी आहे असं तिच्या मनात आलं असेल कदाचित आणि म्हणून, मी नेभळट आणि माझे सल्ले ही. आताही मी तीला दोष देऊ शकत नव्हतो. कारण तीला तो अनुभव मिळवून द्यायला तिथे मी नव्हतो. तो होता. माझ्या कमतरतेने मला परत टोचलं होतं. यावेळी जास्तच जोरात.
🍁🍁🍁🍁
"काय रे? कुठे निघाला सकाळी सकाळी. " मला पळायचे बूट घालताना बघत माझी आई म्हणाली.
" पळायला सुरु करणार आहे आजपासून. " मी म्हणालो आणि सटकलो.
मनाला मिळणारे कष्ट शरीराला जाचतात बऱ्याचदा. पण व्यायामाने शरीराला मिळणारे कष्ट मनाला तजेला पुरवतात आणि शरीराला तंदुरुस्ती. मला आता वेध लागले होते. सुरवन्टाच्या पुढल्या उद्दिष्टाचे. मला कोष तोडायचा होता. माझी ईच्छा बळावली होती. त्या इच्छेच्या पूर्तीसाठी मी माझ्या शरीराचा होम पेटवला होता. व्यायाम केवळ शरीरासाठी नाही तर मानसिक बळ वाढवण्यासाठी पण उपयुक्त असतो असं मला बाबांनी सांगितलं होतं. मी ते अजमावत होतो.
विज्ञान माझा छन्द असल्यामुळे शारीरिक बदल घडताना ते नुसतेच ढोबळ नसावेत याकडे मी लक्ष देत होतो. माझा आहार नियंत्रित करण्यासाठी मी आईला मला जे हवे त्याची यादीच दिली. चरबी कमी करुन स्नायूची वाढ होण्यासाठी मला जे काही खावं लागेल अशा गोष्टींचा समावेश मी आहारात हळूहळू केला. माझं मानसिक युद्ध मी लढत होतो. आजवर सुखासीन जगलेल्या या देहाला हा बदल मानवणं तसं खूप त्रासदायक होतं. पण बऱ्याच अवघड गोष्टी गरजेच्या असतात.
यातलं मी कोणाला काहीही सांगू नये असं आई बाबांना सांगितलं होतं. सुनीला कळू नये म्हणून पहाटेच मी आमच्या गावाबाहेरच्या टेकडीकडे पळत जात होतो. सुरुवातीला खूपच दमायला होत असे. श्वास फुलून घसा छाती दुखायची. पाच मिनिटे पण एका गतीने पळणं मुश्किल होतं. पाय जड होत. दुखत. रात्री पायाला पेटके यायचे. माझं हे रुटीन सुरु होऊन एक महिना होत आला होता. रोज स्वतःशी ठरवत, जेवढं पळालो त्या ठिकाणी खुणेचा दगड ठेवत दुसऱ्यादिवशी चार पावले जास्त पळण्याचा ध्यास मी मनी घेतला होता. पण माझ्यात थोडाफारच बदल घडला होता.
एकदा सकाळी मी नेहमीच्या रस्त्यावर माझी फुसकी रनिंग करत होतो. मनात येत होतं.
"का करतोय मी हे सगळं? कसली शर्यत लावलीये? साध्य काय होणारे यातून? आणि ह्या गतीने माझ्यात काय बदल घडणारे? काही होईल असं वाटत ना....ही...!!"
सटकन.... माझ्या मागून एक जण पुढे पळत गेला. बाणासारखा.. त्याची गती कमालीची आणि सातत्यपूर्ण होती. शरीर स्नायूयुक्त आणि काटक होतं. वयाने मोठा वाटत होता. उंच आणि प्रमाणबद्ध शरीराचा तो युवक पळताना बघून मला पण त्राण आलं. मी त्याचा पिच्छा करण्यासाठी गती घेतली. श्वास फुलला पण त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी तोंडाचा वापर करू लागलो. मला लय सापडली. तो पुढे धावत होता जरा लांबवर. पण मी त्याची पाठ सोडत नव्हतो. मला तो दिसेनासा होणार नाही याची मी खबरदारी घेत होतो. बघता बघता मी टेकडीवर आलो. टेकडीच्या पठारावर आत्ता तरी कोणी नव्हते. तो पण नव्हता. मला धाप लागली होती. मी गुढग्यावर हात रोवून वाकलो.
घामाची धार भर थन्डीत कपाळातून जमिनीवर पडू लागली. स्वतःला बदलवण्याच्या त्या लढाईमध्ये माझे कुचकामी प्रयत्न चालणार नव्हते. मला दृतगतीने वाटचाल करायची होती. स्वतःला असले नकारात्मक प्रश्न विचारायचे नव्हते. तर सकारात्मक उत्तरे शोधायची होती.
आज भविष्यातला मी, मलाच उदबोध घडवण्यासाठी आलो होतो. मी मला प्रयत्नांची तीव्रता वाढवायला लागणार हे समजवायला स्वतःलाच पाहत धावलो होतो. मी प्रयत्नांची तीव्रता वाढवली होती. माझं साध्य मला दिसलं होतं.
🍁🍁🍁🍁
उत्तरे अवघड असतात की
त्यामागचे प्रश्न अवघड असतात?
खरंतर सोपे दोन्ही असतात पण,
अवघड त्यांना जोडणारे प्रवास असतात..
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁