Kondan Parva One - Part 12 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 12

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 12

स्फूर्ती 


"जे आपल्याला करता येत नाही, ते करायला पडणारे प्रयत्न आपले खरे शत्रू असतात, असं मला वाटायला लागलं होतं."



गड किल्ले चढणं वैगरे माझ्याच्यानी त्यावेळी फारसं झालं नव्हतं. माझं खेळणं पण माझं यथातथाच होतं. शिवनेरीचं चढणं तसं फार काही अवघड नव्हतंच. पण ती चढाची वाट, माझी वाट लावायला पुरे होती. अतिरिक्त वजनामुळे माझा श्वास सारखा फुलत होता. गडाचा अर्धाच भाग चढून झाला होता. शेवटी शेवटी तर मला अगदीच नको झालं.


मग मी आमच्या PT च्या सरांना विनंती करुन जिथे होतो तिथेच थांबलो. आमच्या सोबत आलेले एक उप- प्राचार्य त्यांनाही पुढं पुढं श्वसनाचा त्रास होऊ लागला. मग मी आणि ते तिथंच बसलो. सगळे निघून गेले. त्यांना थकायला झालेलं म्हणून मग त्यांनी एक झाड आणि त्या खालचा कट्टा बघून ताणून दिली. सगळीकडे धीर गंभीर शांतता होती. सकाळचे नऊ वाजले असावे. कोवळं ऊन होतं. 


मी त्या वातावरणाला शांतपणे अनुभवू लागलो. हलका हलका वारा मन प्रसन्न करत होता. वाटेच्या बाजूला पन्नास पावलावर गडाच्या डोंगराची उतरण दाखवणारी दरी होती. मी तिकडे गेलो. कड्यावरून लांब बघत क्षितिज रेषेपर्यंत नजर लावली. विचारांच्या धुंदीत आत्ममग्न असताना काहीतरी खळखळ असा आवाज आला. मी मागे वळून पाहिले तर. एक भगवी कफनी घातलेला वैरागी गडाच्या वाटेने खाली चालला होता. त्याच्या खांद्याला झोळी होती आणि हातात दंड होता. गळ्यात जाड जुड रुद्राक्षाच्या माळा आणि अर्धा फुटाची छातीवर रूळणारी दाढी. अष्टगंधाच्या उटीचा दरवळ वारा भरून त्या परिसरात फिरवू लागला.


" इथे एकटा काय करतो रे!!" मला एकटा कड्यापाशी बघून तो वैरागी गंभीर आवाजात म्हणाला.


" काही नाही, वरती आमच्या वर्गाची सहल गेलीये. मला नाही चढता आलं म्हणून थांबलोय." मी म्हणालो.


तो पोटावर हात ठेऊन खांदे उडवत हसू लागला. माझ्याकडे येत त्याने कमरेवर हात ठेवला. मला नीट बघितलं. नंतर माझ्या चेहऱ्याकडे परत एकदा नीट पाहिलं. 


"तू जसा दिसतोस तसा वाटत तर नाहीयेस. मनोबल लाख जाणवतंय तुझं. वर जायची ईच्छा पण खूप आहे, पण प्रयत्न शरीराच्या कमी बळामुळं पूर्ण होत नाहीये. काय रे?? होना?" त्याने विचारले.


" हो!! हे तरी मला नाही जमणार. " मी म्हणालो.


" तू आत्ता जे बोलला ते वाक्य त्याचं चालीवर मी बदलतो.
हे मी नाही तर कोण करणार..? हे कसं वाटतंय? " तो म्हणाला.


" हे मी नाही तर कोण करणार?" खरंतर आहे. सकारात्मकतेचा आणि आत्मविश्वासाचा एक स्फूल्लिंग पेटवणारं ते वाक्य मनात घुमू लागलं. 


"चल जरा कट्ट्यावर बसू. न्याहरी करायचीय मला." तो म्हणाला.


आम्ही आमचे सर पडले होते त्या जागी गेलो. ते आता घोरत होते. मी पण माझ्या बॅग मधून नाश्त्याचा डबा काढला.

बटाटाच्या भाजी सोबत पुरी होती आणि बाकरवडी सुद्धा.
" घेणार? " मी विचारले.


" न शिजवलेलं खातो आम्ही. तू खा. " तो म्हणाला. असं म्हणत त्याने झोळीतून दोन कच्चे पेरू काढले आणि खाऊ लागला.

"तूला तुझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे माहिते का? " त्याने विचारलं.


" ध्येय म्हणजे काय ते माहित आहे, पण माझं काय आहे ते अजून तरी माहित नाही. " मी म्हणालो.


" ध्येय म्हणजे काय माहित आहे तूला? काय असतं सांग जरा?" त्याने विचारले.


" उम्म्म.. चांगलं शिक्षण घ्यायचं.. आणि मोठी नोकरीं मिळवायची.. आई बाबांना बरं वाटेल असं सगळं करायचं." मी त्यावेळच्या समजेप्रमाणे बोललो.


" हा तर उद्देश झाला तुझ्या जगण्याचा. हे उद्देश असतात जे एकापेक्षा जास्त असतात. ते एक एक मिळवतं तुझ्या आणि तुझ्या आईवडिलांच्या इच्छांचं फलीत तूला घडवायचं आहे. ते खरं ध्येय नाही. शिक्षण, नोकरीं, मरातब, पैसा, सुविधा ही छोटी छोटी उद्दिष्टे असतात. ध्येय काय? ते शोध. त्याचा शोध लागला की वाट निवड. त्यापर्यंत पोहोचायची वाट. एक सुरवन्ट जेव्हा पाने खात सुटतो तेव्हा त्याचा उद्देश काय असतो? स्वतःभोवती कोष बनवून घेण्यासाठी स्वतःमधेच तंतू जमा करने. तो गाठला की मग त्या तंतूचा उपयोग करुन तो कोष बनवतो. हे पण त्याचं एक उद्दिष्ट आहे. पण त्याचं ध्येय काय असतं? " त्याने विचारलं.


" कोष फोडून स्वतःचं झालेलं रूपांतर जगाला दाखवत दिमाखात आकाशाच्या फैरी झाडणे. वेगवेगळ्या फुलातला मकरंद शोषणे आणि त्या धुंदीत मुक्ततेत विलीन होणे." मी म्हणालो.


" सुरेख!! म्हणालो होतो मी, जसा दिसतोस तसा वाटत नाहीस. विचारी आहेस. अजाणत्या वयात प्रगल्भ होत चाललायस. पण या प्रगल्भतेला चांगली दिशा दे. तीला चांगल्या विचारांचं खाद्य पूरव. हवं ते उद्दिष्ट मिळवण्याचा चंग बांधून ते मिळवणं सोपं... पण ते मिळवलेलं उद्दिष्ट टिकवण्यासाठी असलेली मानसिक स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न कर.. ते स्थैर्य तुझं ध्येय असू देत.. बाकी सगळं शुभ होईल.." तो म्हणाला.


" मानसिक स्थिरता कशाने मिळते? " मी विचारले.


" योग्य ज्ञानाने आणि सामंजस्याने जेव्हा तू अलिप्त राहून मोहविरहित निर्णय घेऊ शकण्याची क्षमता मिळवशील. त्यावेळी तूला मानसिक स्थिरता मिळेल. ती मिळते प्रयत्नांती. पण, लगेच जाऊ पाहते, टिकवून ठेवणं हीच खरी वर्षानुवर्षांची तपस्या आहे. तेव्हा जागरूक रहा. मनस्वास्थ्य उत्तम ठेव. गोष्टी पारखून वाग. जगण्याच्या प्रवासात कुठे लढाईला तोंड फुटत असेल तर ते युद्ध डोळस पणे निवड. स्वतःला कशात ही झोकून देण्यात स्वतःच्या क्षमतेचा ऱ्हास असतो. तो टाळ. " तो म्हणाला.


बोलत बोलत त्याने एक पेरू खाऊन संपवला. त्याने दुसरा मला दिला. तो उठून निघाला.


" तुम्हाला लागेल की रस्त्यात?" मी पेरू पाहून म्हणालो.


" मी ज्या रस्त्यावर प्रवास करतोय तिथं असं साठवणूक करुन चालत नाही बाळा. हात आणि मन मोकळे ठेवावे लागतात. कल्याण होईल तुझं. बरं वाटलं मला तुझ्याशी बोलून." तो म्हणाला आणि मागे न वळता चालू लागला. माझे हात नकळत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून जोडले गेले होते.


उद्दिष्ट आणि ध्येयामधलं अंतर मला दाखवत त्याने मला जे गाठायचं आहे त्याचा पत्ता दिला होता. वाट मला निवडायची होती.


🍁🍁🍁🍁🍁

बारा वाजता सगळे खाली आले. थन्डीचे दिवस असल्यामुळे एवढं काही ऊन वैगरे लागत नव्हतं. 


" महाराजांची जन्माची जागा, घोड्यांची पागा, कडेलोट कडा, बदामी तलाव. खूप छान गोष्टी पहिल्या आम्ही जाडू.. तू जरा हिंमत दाखवली असती तर आला असता वर... काय यार तू? " सुनी म्हणत होती.


" यावेळी नाही जमलं, पण पुढल्यावेळी नक्की सुने. " मी तीला निर्धाराने म्हणालो. 


" बघ हा जाडू!!" ती मला निक्षुण म्हणाली होती.


" पण माझं इथं खाली असनही वाया गेलं नाही सुने. जे वर येऊन मिळवलं असतं तेच नशीब थोर म्हणून इथं मिळालं." मी म्हणालो.


" काय मिळालं इथे? जे वर मिळणार होतं? " तिने विचारलं.


" स्फूर्ती." मी उत्तरलो.

गाडी आता भीमाशंकर कडे निघाली होती.


🍁🍁🍁🍁🍁


गर्द हिरव्या वनराईचा प्रदेश, भीमा नदीचं उगम स्थान, जी पुढे पंढरीत चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. त्या चंद्रकोरीला मस्तकावर धारण करणाऱ्या जटाधारी शिवशन्कराचे एक तेजस्वी ज्योतिर्लिंग.. आम्ही दिडेक तासात तिथे पोहोचलो.


आत्तासारखी त्यावेळी तिथे गर्दी नव्हती. पण त्या सात्विक आणि विश्व् व्यापून उरलेल्या महायोग्याच्या सानिध्यात प्रसन्न वाटत होतं. मी गडावर स्वतः भारावून गेल्यामुळे आता तर अगदी समाधी अवस्थेच्या जवळ गेल्याची भावना मनात येऊ लागली होती. आम्ही रांगेने दर्शन घेतले. सरांनी गर्भगृहाबाहेरच्या सभामंडपात आम्हांला सर्वांना शांत बसायला लावलं.


मी डोळे मिटून बसलो होतो.


"समस्त ब्रम्हाण्ड अगणित अणू रेणुनी बनलेलं आहे. त्या अनुरेणू पासून वेगळं काही असेल तर ती फक्त आपल्या कुडीत असणारी दिव्यात्मा. तिचं मटेरिअल कुठल्याही आवर्त सारणीत मिळणं अशक्य आहे आणि म्हणूनच तीला जगात सर्वत्र संचार करण्याची मुभा आहे. पण तो संचार करण्यासाठी जे बळ लागत ते बळ म्हणजे योग, ध्यान.. ज्याची त्यावर सत्ता तो सदैव मुक्त असतो. सर्व पाशातून..." 


असे विचार एका घनगंभीर आवाजात त्या शांततेत मला येऊन धडकणं. याचं मला आश्चर्य वाटत होतं. त्या वैराग्याच वाक्य नंतर मनात घोळू लागलं. "मानसिक स्थैर्य मिळव." मला एका तंद्रीने घेरले.


" जाडू.. चल.. उठ. निघाले सगळे.. अरे ए.. झोपलास की काय. " सुनीच्या आवाजाने आणि हलवण्याने मी डोळे उघडले.


माझ्याभोवती आठ दहा जणांचं कोंडाळं उभं होतं. 
मी डोळे उघडले तसे सगळे हसायला लागले. त्यात सचिन, समर आणि अभिजित पण होते.


" बसल्या बसल्या कसा झोपलास?" सुनीने विचारले.


" झोपलो नव्हतो सुने... जागा होत होतो." मी म्हणालो.


"म्हणजे?" तिने प्रश्नार्थक चेहरा केला.

" काही नाही..चल घरी.." प्रसन्नतेने मी तीला म्हणालो.
खांदे उडवून तीही माझ्यासोबत चालू लागली.

🍁🍁🍁🍁


"एका एकांती 
स्वतःला स्वतः गवसणं
याउपर काय असतं,
विलोभनीय असणं."🍁🍁

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁