शाळेत येताना रामदास भेटला. सायकल चालवत बोलत आम्ही येत होतो.
" यार तू भाषणकार आहेस खरंच. काय बोललास रे तू. असं वाटत नव्हतं आठवीतला आहेस. या वर्षी दोनदा प्राचाऱ्यांची शाबासकी मिळवलीस तू. खतरनाक. " तो म्हणाला.
" अरे एवढं काही नाही. थोडी डेरिंग केली की सगळं जमतं. तू पण करू शकतोस." मी म्हणालो.
" नाही पण सगळ्यांना सगळं जमतच असं नाहीये. तूझ्याकडे ते आहे बाबा. मी करूच शकेन असं नाहीये. " रामदास म्हणाला.
" का चांगला हुशार आहेस की, इतकी वर्षे नंबर काढतोयस ते का कमीये? " मी त्याला म्हणालो.
" अरे पण तू कुठे होता इतके दिवस?? असं बघ... त्या स्पर्धेला खूप मुलांचे आईवडील आलेले. माझ्या बाबांनी पण मला विचारलं तुझ्या बद्दल. ते म्हणाले असा मुलगा मित्र म्हणून ठेव. सगळ्यांना जाम कौतुक वाटलं तुझं. अचानक एवढं सगळं तू गाठत चाललाय. भारी वाटलं रे पाहून. " तो मनापासून बोलला.
आम्ही सायकल स्टँडला आलो होतो. सायकली लावतच होतो तेवढ्यात मला सचिन दिसला. सायकल लावून कोणाचीतरी वाट बघत होता. बहुतेक सुनीचीच.
" अरे रामदास सगळ्यांनी ओरडून घोषा केला आणि कौतुक केलं की फक्त स्वतःला भारी वाटतं, पण आपण आपल्या विचारांनी खूप लोकांना एकत्रित प्रभावित करू शकलो ना तर ते आपण सर्वाना भारी वाटून देऊ शकतो. ही बुद्धीची कमाल असते. माकडाची चपळता आणि बैलाची ताकत कोणपण मिळवू शकतो. पण चांगलं घडवण्याची बुद्धी उपजत असते. त्याचं काय करणारं ना??" मी रामदासला सायकल लावता लावता सचिनला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणालो. मला त्याच्या त्या टोमण्याची परतफेड करायची होतीच.
त्याने माझ्याकडे पाहिलं. माझ्या बोलण्याचा रोख त्याला कळला होता. मागल्या आठवड्यात त्याने दिलेल्या टोमण्याची परतफेड मी मिळवलेल्या वत्कृत्व स्पर्धेतल्या बक्षीसामुळे त्याला कळली असावी. आता मी हा शाब्दिक फटका त्याला मुद्दाम दिला.
त्याच्या बाजूने रामदास आणि मी निघालो.
"जरा थांब रे! रामदास तू जा मला बोलायचंय याच्याशी." सचिन म्हणाला. रामदास गेला. बहुतेक आज पहिल्यांदा स्पष्ट बोलण्याची वेळ आली होती.
"काय बोलत होता तू?" तो म्हणाला.
" ऐकलं नाहीस का नीट? " मी म्हणालो. त्वेश तर मलाही होता. पण फक्त त्याने थोडीच काम भागतंय.
त्याने भरकन माझा हात पकडला आणि पिरगळला. भयंकर सनक डोक्यात गेली.
" जाड्या तुझ्यात उपजत काय नाहीये ना ते दाखवतोय मी तूला. एक झटका मारला तर हात बाहेर निघेल खांद्यातून. हुशारी करतो का जास्त? आ..!!" असं म्हणत त्याने माझा हात आणखी पिरगळला.
" तूला असं वाटतंय का, की फार जोर आहे तुझ्यात. एक वर्षाचं चॅलेंज देतो मी. पुढल्या वर्षी दाखव तुझा जोर." मी त्या दुखण्यातून कळ दाबत म्हणालो.
"अच्छा?!!" त्याने माझा हात सैल केला.
"असंय तर मग, पुढच्या वर्षी धावण्याच्या शर्यतीत तू मला हरवलं ना तर परत मी तूला आडवा येणार नाही. " तो म्हणाला.
" तुझ्या आडवं येण्याची भीती कोणाला आहे इथं. तुझ्या डोक्यात जे आहे ना ते मात्र शंभर टक्के काढणार मी." हात झटकत मी पण त्याचं आव्हान स्वीकारत म्हणालो.
" लायकी आहे का तुझी तेवढी" तो माझ्यावर हसत म्हणाला.
" बघशील ना." एवढंच बोलून मी वळलो.
" काय बघशील?! काय दाखवतोय रे त्याला. " सुनी आली होती.
"अगं काही नाही. तो म्हणतोय की, सहल आहे पुढच्या रविवारी वर्गाची तर ये. मी बोललो बघतो आईशी बोलून. म्हणून म्हणाला ये.. टाळू नको बघशील तेवढं." सचिन म्हणाला.
"अरे वाह!! ये बरं का?" मी पण म्हणतीये.
"आता जमवावं लागेल असं दिसतंय." तो तिच्याकडे बघून हसत म्हणाला.
"या वर्षी धमाल यार जाडू, आपण परत सहलीला एकत्र. शेवटचं चौथीत गेलो होतो अप्पूघरला. त्या नंतर आत्ताच?" ती म्हणाली.
" अगं त्या प्राथमिकच्या सहली काही सहली असतात का? दोन दोन च्या जोड्या करुन चाला. इकडे तिकडे पळू नका. शिक्षकांसोबत रहा. खरी मजा तर आता असते. " तो तीला म्हणाला.
" आठवणी तयार करणं महत्वाचं असतं सुनी.. आपल्या खूप आहेत आणि नव्या नव्या तयार होत राहतील. " मी म्हणालो.
" भाषणकार.. सुरु झाले.. चला वर्ग भरेल आता. नेत्रा पुढल्या वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतोय मी running मध्यें. तयारी सुरु करणारे संध्याकाळी आजपासून मी." तो मला थांबवत आणि शेखी मिरवत म्हणाला.
"अरे वाह.. मस्तच की. All the best सचिन. चला रे वर्गात." सुनी म्हणाली.
सचिनचं शाळेतल आव्हान तर मी घेतलं होतं. शारीरिक तयारी करणं जटील होतं. पण मानसिक तयारी झाली होती.
🍁🍁🍁🍁🍁
"ऐका बस मध्यें चित्रपटांची गाणी गायची नाहीयेत. देशभक्तीपर किंवा संतांची गाणी चालतील. " जगताप सर म्हणत होते.
"ओ सर ssssss!!! असं काय करता?!!" सगळे ओरडले.
"अरे अरे मस्करी करतोय!! म्हणा काय म्हणायचं ते." ते हसत म्हणाले.
"फक्त गाडीच्या बाहेर डोकवणे. ड्रायवरला खूप त्रास होईल असं काही करने आणि महत्वाचं म्हणजे जागा सोडून इतरत्र उड्या मारणे. चालणार नाही. आपल्या आपल्या जागी बसायचंय. काय? जागेवर बसून घाला काय धुडघूस घालायचा आहे तो." ते पुढं म्हणाले.
"हो sssss!!!
गणपती बाप्पा मोरयास्स्स्स्स्स
जय जय जय जय.. जय भवानी..sss
जय जय जय जय.. जय शिवाजी..sss च्या गजरात आमची ट्रिप सुरु झाली.
पहिले ठिकाण जुन्नरमधला प्रसिद्ध गड... किल्ले शिवनेरी.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला तो गड बघायला जाणार होतो. तिथून पुढे महादेवाच्या ज्योतीने तेजाळलेला भीमाशंकरचा विलोभनीय परिसर.
गोंगाट, गाणी, गडबड धिंगाणा चालला होता. मी पुढून दुसऱ्या सीटवर खिडकीकडे बसलो होतो. शेजारी वर्गातला रोहन बसला होता. तो पण काही वेळाने उठून मागच्या गलक्यात सामील झाला. सुनी पण तिकडेच कुठेतरी होती. पूर्वीपासूनच मी प्रवासात अलिप्त होत असे. कुठेही जातना st बस मध्यें बसलं की बाहेर दिसणाऱ्या दृश्यांसोबत माझ्या मनाचा वेग समान होत असे. मनातल्या मनात काहीतरी रचत जात, मी गोष्टी साचवत त्यांचा माग काढत राहायचो. मी त्या धिंगाण्यात नव्हतो. सचिन, सुनी आणि आणखी कोणाकोणाचे आवाज येत होते. मी बाहेर बघत होतो. तंद्री लागली... मन विचारांचं रोप लावू लागलं...
"विचारांच्या रोपांना बहरायला वेळ लागत नाही. एक रुजलं की त्याच्या पुढचं रुजतच. मग आणखी रोपं रुजत जातात... मग त्या रोपांचे वृक्ष होतात आणि अनेक वैचारिक वृक्षांचं भलं मोठं वन होतं. कोलाहल बाहेर किती ही असला तरी अंतर्मनात चाललेल्या गोंधळापेक्षा कमीच असतो. आपण फक्त आतलं ऐकत त्यावर मन्थन करत गेलो की बाह्य जगाशी आपला संपर्क तुटतो... माझं तसंच व्हायचं. मी मला त्या गोंधळात झोकण्यापेक्षा मिळालेल्या वेगळ्या वातावरणाचा आणि एकांताचा वापर स्वतःसाठी करायचो.. अजून ही काही अंशी ती सवय माझ्यात आहे. स्वतःला स्वतःचं पुरणे हे खूप मजेशीर असतं. आपलं आपलं आपल्याशीच..."
" भों!!" सुनी कानापाशी ओरडली. मी दचकलोच.
" जाडू!! एकटा का बसलायस रे शांत? चल की मागे." तिने बसत विचारले.
" एकटा आहे.. पण शांत नाही. आणि मागे नको इथे बरं आहे." मी म्हणालो.
" नाही कळलं.. हल्ली तू मला कळतच नाही. खोल खोल होत चाललायस, की उंच उंच ते पण कळत नाही. " ती म्हणाली.
" ए सुने.. काही कळलं नाही की विचारून मोकळी होत जा की मग.. एवढं काय त्यात.. बरं ते जाऊ दे.. जा तू मजा कर.. इथे बोर होशील. " मी जवळजवळ तीला कटवत होतो.
" जाड्या!! हकलतोयस मला सरळ सरळ.. " ती लटकं चिडत म्हणाली.
" अगं नाही.. तुझा मजा करायचा मूड आहे आणि मी बसलोय शांत.. इथे तुझ्या कामाचा नाही मी, म्हणून म्हणालो.. जा.. " मी बोललो.
" खडूस कांद्या.. बरं तर बरं सुनी आहे .. एखादी दुसरी असती तर आली पण नसती विचारायला. " ती म्हणाली.
" सुने तूला माहिते ना मला नाही धिंगाणा घालता येत.. तू चालू देत की गं तुझं." मी बोललो.
" नेत्रा..!! चल. अंताक्षरीचे ग्रुप पाडायचेत..इथं काय करतेस?बोर होशील..किल्ला चढायला दम खातोय तो खाऊ देत त्याला. नको disturb करुस." सचिन नेहमीसारखंच बोलत होता.
" नाही रे असं काही नाही.. तो प्रवासात शांतच असतो.. सवय आहे त्याची आधीपासून.. तू चल मी आलेचं... चल जाडू.. तू बस.. मी जाते..अंताक्षरी ये ss. " सुनी गेली.
सुनीच्या आणि माझ्यात काही प्रमाणात तफावत तर नक्कीच होती.
ती मनमोकळी, बिनधास्त होती..
तर मी कुलूपबंद होतो..
ती उधळलेली हरिणी होती..
मी जडावलेला गज होतो..
पण आमच्या मैत्रीसमोर ही परिमाने थिटी होती हे खरं.. एकत्र दिसण्यापेक्षा.. मनाने सोबत असणं आमच्यात घडायचं. मी आलो नाही तरी ती विचारायला आली होती. एवढं मला पुरे होतं. खिडकी बाहेर बघत, मी परत माझं माझ्याशी सुरु केलं..
🍁🍁🍁🍁
"प्रवास म्हणजे आपण पूढे जाणं की,
समोरून येणाऱ्या गोष्टीने मागे पडत जाणं?
खरंतर प्रवास म्हणजे मागे पडत जाणाऱ्या गोष्टींना,
न विसरता मनात भरून सोबत नेणं."🍁🍁
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁