चांगला स्वभाव हीच माणसाने कमावलेली स्वतःची सर्वात मोठी संपत्ती असते . कोणाचा सरळ स्वभाव ही त्याची कमजोरी समजू नका तर ते त्याचे संस्कार असतात .ज्याच्या जवळ शक्ती बरोबर सहनशक्ती सुद्धा असते अशा व्यक्तीच्या शक्तीचा कधीही मुकाबला होऊ शकत नाही .
चांगला माणूस कधीही मतलबी नसतो , तो फक्त अशा लोकांपासून दूर रहात असतो ज्यांना त्याची कदर नसते . अशा चांगल्या , माणसाची निंदा तेच लोक करत असतात जे त्याची बरोबरी करू शकत नसतात .
आयुष्यात निरंतर चांगले बनून रहा . कोणी तुमचा सन्मान करेल तर कोणी तुमचा अपमान करेल परंतु तो परमपिता परमेश्वर तुमचा सन्मान अवश्य करेल . कारण ज्या लोकांजवळ साधी राहाणी , उच्च विचारसरणी , धैर्य आणि दया हे गुण असतात ते लोक खूप भाग्यशाली असतात आणि परमेश्वराला प्रिय असतात .
चांगलं व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं ही आईवडीलां कडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते . मात्र एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते . फक्त माणूस होणं पुरेसं नसतं . माणसात माणूसकी असणं हे देखील आवश्यक असतं .
व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जेव्हा त्याची आवश्यकता असते . नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात . म्हणून कधीही हा अभिमान नको की मला कोणाची गरज नाही . आणि हा देखील अभिमान नको की माझी गरज सर्वांना आहे .
लक्षात ठेवा अहंकार कधीच सत्य स्वीकारीत नाही . सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते . अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला न स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार
जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थ होणं असं नाही तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थक होणं होय . हवेत काय पक्षीही उडतो आणि माशीही उडते पण उडून कोण कुठे बसतं यावरच त्याची लायकी ठरते .
तुम्हाला जी व्यक्ती बनायची आहे त्यासाठी जर तुम्ही मेहनत घेत नसाल तर तुम्ही अशी व्यक्ती बनाल जी बनायची तुमची इच्छा नाहीये . फक्त काबाडकष्ट करणारा प्रत्येक माणूस यशस्वी होईलच असे नाही परंतु कष्टा बरोबर कामाचे योग्य नियोजन करणारा माणूस नक्की यशस्वी होतो .
एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कधीही नवीन सुरूवात करायला घाबरू नका . त्यासाठी मुहूर्त नाही तर जिद्द महत्त्वाची असते . दुसऱ्याचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरिक्षण केलेले कधीही चांगले....
हरि आल्हाट...