Marathi Quote in Motivational by Hari Alhat

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. आताशा एसटीचा फारसा प्रवास होत नाही पण लहानपणीच्या कितीतरी आठवणी एसटीभोवती गुंफल्या आहेत. एसटीचं रुपडं तरी किती सुंदर. अगदी लांबून उठून दिसणारा तिचा खास लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा. खिडक्यांचा रंग. सीटांचा हिरवा रंग. अगदी नऊवारी नेसणार्‍या प्रेमळ आजीची आठवण यावी. ज्या कोणी ही रंगसंगती शोधली त्याला सलाम.

लहानपणी एसटीचं सगळं जगच अदभूत वाटायचं. प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक टक आवाज करत तिकीटं विकणारा तो कंडक्टर. त्याची ती अल्युमिनियमची तिकीटपेटी. त्यावरचे वेगवेगळे तिकीटाचे पांढरे गठ्ठे. त्याचं ते तिकीट पंच करायचं ते यंत्र ! गळ्यात अडकवलेली पैसे ठेवायची कातडी बॅग. आपण गाव सांगितल्यावर पटापट दोन चार गठ्ठ्यातून तिकीटं फाडून ती योग्य ठिकाणी पंच करून ती आपल्या हातात जेव्हा तो द्यायचा तेव्हा जाम आदर वाटायचा त्याचा. सगळा हिशेब कसा करत असेल हा. बरं तिकीटावर नुसते पाढे लिहिल्यासारखे दोन रांगेत आकडे छापलेले असायचे. नेमकं कुठे पंच करायचं हे कसं कळत असेल याचं अजूनही कुतूहल आहे.

कंडक्टरचा सगळ्यात जास्त हेवा वाटायचा जेव्हा तो घंटी वाजवायचा ! एसटी सुरु करायची आणि थांबवायची पावर त्याच्याकडे आहे हे पाहून त्याचा आदर अधिकच दुणावायचा. दोन घंट्या दिल्या की एसटी सुरु आणि एक घंटी दिली की एसटी थांबणार म्हणजे थांबणारच ! कधीतरी आपल्यापण ती दोरी ओढून घंटी वाजवायला मिळावी ही एसटीने प्रवास केलेल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असायचं. कंडक्टर तिकीटं काढून झाली की आपल्या जागेवर जाऊन हिशेब जुळवत बसणार. कधी कधी हिशेब जुळला नाही तर पुन्हा शिरगणती करायला लागायची. एवढं काम झालं तरी कधी कधी एसटी च्या टपावर सामान चढवायला पण त्याला मदत करावी लागायची.

पुर्वी एसटीला एकच दरवाजा असायचा तो मागच्या बाजूला. त्या एसट्यांना ड्रायव्हरच्या मागे एक लांब पाच माणसं बसेल अशी मोठी सीट असायची. ड्रायव्हरकडे पाठ करुन बसावं लागे. लहानपणी बराच प्रवास त्या आडव्या बाकावर गुढग्यावर बसून वरच्या जाळीत बोटं अडकवून आणि तासनतास ड्रायव्हरकडे आणि समोरच्या रस्त्यावरची वाहतूक पहात केला आहे. आता विमानाच्या कॉकपीटचं जेवढं कुतूहल वाटतं तेवढच कुतूहल मला एसटी च्या कॉकपीटचं वाटायचं. ड्रायव्हरचं सीट, त्याच्यासमोरचं ते भलं मोठं व्हिल ! त्याच्या समोरचा तो अगम्य डॅशबोर्ड. उजव्या हाताला वरच्या बाजूला अजुन काही बटणं असायची. आणि साईड इंडीकेटर म्हणून चक्क एक बाण लटकवलेला असायचा. आतून एक दोरी ओढली की तो बाण काटकोनात वर जायचा ड्रायव्हरच्या डाव्या हाताला असणारा दोन फुटाचा आणि विचित्र कोनातला तो गिअर एसटी स्टँड ही एक वेगळीच परिसंस्था ! तिथली ती गर्दी. वेगवेगळे फलाट, तिथल्या त्या स्पिकर वर होणार्‍या घोषणा, स्टँडवर असलेली रसवंती गृहे आणि त्याचा तो घुंगरु लावलेला आवाज. एसटीच्या बाहेरुन विविध पदार्थ आणि वर्तमान पत्रे विकणारी मंडळी, बुकस्टॉल्स, तिथली उपहार गृहे सगळंच खास ! त्या बुक स्टॉल वर चांदोबा हे मासिक खूपच आकर्षक वाटायचं. आयुष्यातलं पहिलं पॉपीन्स मी या एसटी स्टँडवर खाल्लं. किंबहुना एसटी आणि पॉपीन्सच्या गोळ्या हे समीकरण माझ्या घट्ट डोक्यात बसले आहे. कुठल्या एसटी स्टँड वर एसटी थांबली की सोललेल्या आणि कापून मीठ लावलेल्या काकड्या घेऊन विक्रेते गाडीत यायचे त्या काकड्या खाताना खूप थंडगार वाटायचं. पुर्वी गाड्या फलाटाला रिव्हर्स करुन लागत. स्टँडवर बसलेल्या माणसाला कुठली गाडी लागली हे पहायला पुढे जावे लागायचे. गावातल्या महत्वाच्या दुकानांच्या जाहिराती एसटी स्टँडवर पहायला मिळायच्या. एशियाड यायच्या आधी रातराणी नावाचा एक प्रकार होता. रात्रीचा प्रवास करणारी रातराणी ! त्याचे नावच फार भारी वाटायचे.

Marathi Motivational by Hari Alhat : 111765922
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now