असू नये अशी कथा !
ती दोघे आहेत. नवरा-बायको. दोघेही वृद्ध आहेत. काठीच्या आधारे जगणारी. दोघे मिळून कोठे तरी जात आहेत. कोठे ? तो पुढे चालत आहे. ती त्याच्या हातात हात देवून मागून चालत आहे पण, तिचे लक्ष्य चालण्यात नाही! दुसरी कडेच आहे! सारखी मागे वळून पाहत आहे. कदाचित तिचे काहीतरी मागेच राहिले आहे! नाती-आठवणी? कोणीतरी कदाचित मागून येइल?
"आई,थांब ना !" म्हणेल?
" आजी, जावू नाकोस ना !" म्हणेल ?
म्हणून तर, ती मागे वळून पाहत नसेल?
पण त्याला खात्री आहे .....
कोणी येणार नाही.
कोणी 'थांबा ' म्हणणार नाही!
आता आपली गरज संपलीय. आपण काही कामाचे उरलो नाहीत.आपले अस्तित्वच नाही! आपण आता 'पिकलो ' आहोत. या जगाला, --हो --याच जगाला --ज्यात आपण जन्मलो, वाढलो, इतरांना वाढवले, नसांगता मन मारले, त्याग केला, सगळ्याचे 'सुख' पहिले --त्याच जगाला, आता आपण 'सडल्या ' सारखे वाटतोय. कोणी काही बोलत नाही, पण या वयात सर्व जाणवते! आपल्याला चेहेरा नाही, नावगाव नाही, ओळख नाही, 'म्हातारा-म्हातारी ' असाच आपला उल्लेख असतो!
म्हणूनच तो तिला म्हणतोय .
"मागे वळून काय बघतेस ? कोणी येणार नाही!"
कदाचित हि तुमची -आमची कथा असेल !
आजची किवा उद्याची !
पण अशी "कथा " कोणाचीच असू नये !
----सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.