पावसाशी मारलेल्या गप्पा
प्रिय पाऊस,
वर्षातून फक्त काही दिवसच तुझी भेट होते. तेवढ्याच दिवसांत सर्वाना हवेहवेसे करून निघून जातोस. तुझ्या आगमनाची प्रतीक्षा पशू, पक्षी, झाडे, वेली, प्राणी आणि मनुष्य सारेच करतात. तुला जरासे उशीर झाला तर मग सारेच हैरान ही होतात. तुझा प्रवास नेहमीच जमिनीकडून आकाशाकडे आणि आकाशाकडून परत जमिनीकडे असा चालू असतो. कधी कधी तू असा येतोस की नकोसा वाटतोस आणि कधी कधी असा रुसून बसतोस की तुला साकडं घालावं लागते. तुझे रूप खरोखरच विलक्षण आहे. तुझ्या येण्याने बालगोपाळाना खूप आनंद होतो. ते आपल्या आईला म्हणतात, ए आई मला पावसात जाऊ दे, चिंब चिंब भिजू दे. पण आई काही पावसात जाण्याची परवानगी देत नाही. लहान मुले नेहमी एक प्रश्न विचारतात सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? शाळेची सुरुवात आणि तुझे येणे हे दोन्ही एकदाच घडतात. कागदी होडी सोडण्याचा आनंद आणि भिजत भिजत लहान मुलांच्या उड्या लक्षवेधी असतात. तुझे आणि छत्री व रेनकोटचे ही नाते खूप जुने आहे. तू कोसळणार म्हणून छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊन बाहेर पडावे लागते. पण असा ही एक वेगळा अनुभव येतो की, छत्री किंवा रेनकोट सोबत असतांना तू कधी कधी येत नाहीस आणि नेमकं छत्री किंवा रेनकोट विसरलो की भिजवून टाकतोस. तुझ्या सोबत येणारे दोन मित्र आहेत एक वारा आणि दुसरे म्हणजे वीज. हळुवार वारा असेल तर अंगावर शहारे आणतो तर तेच वारा वादळाचे रूप घेतलं की अंगाला काटा आणतो. अनेक झाडं उन्मळून पडतात, अनेक घरावरची पत्रे उडून जातात, अनेकांना बेघर करून टाकतात. तुझ्या सोबतचा दुसरा मित्र म्हणजे लखलखणारी वीज, याची नेहमीच भीती वाटते. तु येणार आहेस याचे संकेत तुझे मित्र देऊन जातात आणि जाताना घरातील लाईट घेऊन जातात, हे ठरलेलं समीकरण आहे. तुझ्या येण्याने भकास झालेली सृष्टी हिरवीगार होऊन जाते. नवीन पिकांना जीवनदान देण्याचे काम तुझ्याकडूनच होते. तुझे वेळेवर येणे सर्वानाच आवडते मात्र जेंव्हा तू अवेळी येतोस तेंव्हा तुझ्या नावाने सारेच बोटं मोडतात, तुला शिव्याशाप देतात. रात्रभर तुझी उपस्थिती म्हणजे माळीण सारखं अख्ख गाव गडप होऊ शकते याची प्रचिती येते. 2005 वर्षातील 26 जुलैची तारीख मुंबईकराना कायम स्मरणात राहते. तुझी दिर्घकाळाची उपस्थिती साऱ्या मुंबईकराना परेशान करून सोडले होते. आज ही तो दिवस आठवला तर अंगावर काटा येतो. तुझ्याजवळ गरीब श्रीमंत, उच्च नीच असा कोणताच भेदभाव नाही. म्हणून तर मला तू खूप आवडतोस. नदी, नाले, ओढा, धरणे विहीर हे सारे तुझ्या येण्याने तुडुंब भरून जातात. तुझे येणे लांबले की पिण्यासाठी पाणी देखील मिळत नाही. म्हणून तर एका वर्षी लातूरला रेल्वेने पाणी न्यावे लागले. आज ही अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावे लागते. वृक्षांची लागवड केली तर तू आनंदात दरवर्षी येतो असे संदेश देतोस पण तेवढ्यापुरतेच लक्षात ठेवले जाते. आम्ही पुन्हा विसरून जातो. खरंच, तुझे स्वागत करण्यासाठी जागोजागी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणे आवश्यक आहे. हे वेळीच कळणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीत जसा फायदा असतो तसे नुकसान देखील असतो. नुकसान होते म्हणून फायद्याकडे दुर्लक्षून चालणार नाही. म्हणूनच तुझ्या येण्याने काही नुकसान होत ही असेल पण नवनिर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होते. तुझ्याशिवाय नवीन अन्नधान्य उत्पादन करणे अवघडच नाही तर अशक्य आहे. म्हणूनच तुझे महत्व खूप आहे. फक्त ये रे ये रे पावसा असे म्हणण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नको एवढीच एक कळकळीची विनंती.
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769