म्हणतात ना,पणती सदैव दुसऱ्यांना प्रकाश देते पण त्या खाली अंधकार असतो,पण खरंच मुळात असं तिच्या बाबतीत घडू शकतं ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता !आज तिला असं वाटतं होतं, की फार अडाणी आहे ती ! खरंच, मला काहीच येत नाही का ? मी कुठे कमी पडतेय का ? मला घरचे समजुन का घेत नाहीत ? माझ्या ऐवजी दुसरी कोणी व्यक्ती असती तर ? ती, ह्या अश्या गंभीर आजारातून लवकर बाहेर येऊ शकली असती का ? असे अनेक का ,तिला छळत होते.छे ! छे ! काय भलते सलते विचार येत आहेत मनात ! ज्योती स्वतःशीच म्हणाली !
नाही,नाही ! मी जो मुर्खपणा आधी केला ना,तो परत नाही करणार.मी ह्या घरातली पणतीच आहे. मी स्वतःवर प्रेम करायला शिकेन.स्वतःला खुश ठेवणे ही सर्वस्वी माझीच जबाबदारी नाही का ? मी नेहमी दुसऱ्यांनी मला खुश ठेवावं ही चुकीची अपेक्षा ठेवून असायचे.खूप केलं मी सर्वांसाठी आता स्वतःसाठीही करेन,स्वतःचे खूप,खूप लाड आणि कोडकौतुक करेन ! माझ्या आवडी निवडीं विषयी जागरूक राहीन.माझे छंद जोपासेन,माझी स्वप्नं पूर्ण करेन. मी खुश राहिले तर अख्ख घर आनंदी राहील.मीही ताज,गरमागरम अन्न खाणार.शिळपाक खाणार नाही,ते खाल्ले तर ताज अन्न शिळं होतंच की परत...!
मनाशी तिने खूप नवे करार केले,आणि ती उठली!आज देवाला तिने प्रसन्न मनाने पणती लावली .हो,पणती जणू तिचं मनापासुन लख्ख उजळलेलं नवं रुपच ! तिने एक नवीन पण केला देवाला मनापासुन हात जोडत ! ज्योतीने तिच्या घरासाठी प्रकाशमान पणती व्हायचं ठरवलं .आणि ती देवाला म्हणाली,देवा ! बघ ही पणती आता हे घर कस सुख समृद्धीने भरभराटीला आणते ते ! पण तु नेहमी माझ्या बरोबर रहायचं हा देवा !अशी धमकीवजा तंबी देखील दिली तिने देवाला. आणि काय आश्चर्य एक प्रकारची शितल हवेची झुळूक तिच्या दिशेने आली. त्या झुळुकेत तिला खूप सकारात्मक असं काहीतरी विशेष वेगळेपण जाणवलं,आणि तिला जाणवलं की ते,प्रेमच आहे,तिलाच, तिच्या विषयी निर्माण झालेलं.आणि ज्योती नावाची पणती अंतर्बाह्य तेजाने प्रकाशित झाली ,कायमचीच !