कासावीस झाला
बरसून गेला
निरोपाचा क्षण
आता जवळी आला!
कल्लोळ उठला
मनी चमकली वीज
धरतीने आभाळाला
सांगितले गुज!
पुढच्या वर्षाची
वाट मी पाहीन
तुझ्या येण्याने मी
पुन्हा सुखावेन!
पुरे झाले आता
विभ्रम प्रेमाचे
जपून ठेवावे उरी
अंतर प्रेमाचे
दिशा आणि काळ
यांचे नसे हे अंतर
धरा आणि आभाळाचे
पाऊस घरदार!
सलणारे दुःख
विरही झाले मन
दिसमाजी दिसू नये
म्हणुनी
रात्रीचे पांघरूण!
दोघेही ल्यायले
अंधार शालीला
प्रेमाची ऊब सोबती
वीज पसरे मायेला!
वर्षभर आता
आपापले राहू
एकमेकांना थोडे
तपासून घेऊ!
पुढच्यावर्षाला
पुन्हा भेटूच खात्रीने
आकाशने धरतीला
दिले वचन प्रीतीने!