एकच वर्ष हवं आहे
आनंदाच्या गावाला जायचं आहे
कोर्या पुस्तकांच्यात हरवायचं आहे
अक्षरांच्या समुद्रात पोहायचं आहे
आयतं जेवण मिळालं तर फारच होईल भारी
चहाचे घोट रिचवत रिचवत मज्जा येईल न्यारी
पुस्तकं वाचणं पाठोपाठ काम नाही बाकी
नाही करायची मला दिवसांची बेरीज वजाबाकी
रात्री पडल्या पडल्या लागेल मस्त डोळा
साहित्याची राणी येईल अक्षरांची फुले करत गोळा
नाही करायचा स्वयंपाक नाही जायचय आॅफिसला
स्वतःबरोबर घ्यायचाय मला साहित्याचा धांडोळा
भली मोठी यादी करून ठेवीन आधीच
पुस्तकांच्या गावात शिरल्यावर गप्पा माझ्या स्वतःशीच...
आली सकाळी जाग तेव्हा कळलं हे नव्हतं खरं
स्वप्नातल्या गावाला स्वप्नातच भेटलेलं बरं!!!