एक आई
तिचा मुलगा जगावेगळा
तरी तिच्या मनात
त्याचा अपरंपार लळा
समजत नाही त्याला जगरहाटी काही
बोललेलं ऐकलेलंही त्याला उमजत नाही
तरीही आई घेते त्याच्या मनाचा धांडोळा....
कसं होणार याचं, काळजी तिला सतत
बसते कायम त्याच्या भविष्याचा विचार करत
तरीही तिच्या मनात कायम त्याचा घुंगुरवाळा....
मोठा होईल इथेच राहील आईच्या मायेत
कारण त्याला लोटणे नाही फसव्यांच्या छायेत
तिच्या आणि त्याच्या नात्याचा भावबंधच निराळा....