मानस..?मानस!! काय करतोयस?" मानस बसलेला दिसला कॉलेज समोरच्या गवतावर, म्हणून त्याच्याकडे गेले.
सतत काही ना काही करत असतो. तो तसं करताना कित्ती तल्लीन असतो. एकदम स्वयंमग्न. आणि तल्लीन असताना त्याच्या चेहऱ्यावर असणारा गंभीर भाव आणि कपाळावर मध्ये तानलेली शीर.. उफ्फ काय रुबाबदार दिसतो त्यामुळे.
पुन्हा त्याचे ते मऊ केस. कसे हलक्या वाऱ्यावर हलत कपाळावर घुटमळत असतात. थंडीतल्या कोवळ्या उन्हाने पण चेहरा लाल झालाय. मला राहवतच नाही अशावेळी. मी सरळ त्याला जाऊन डिस्टरब करते. तो सुद्धा कधीच माझ्यावर रागवत नाही तसं करण्यान. उलटं माझ्या प्रश्नांना किती समंजस पणे स्वतःची एकाग्रता न ढळू देता उत्तरे देतो.
"काही नाही गं.. रेवदंडे सरांनी उद्याच्या व्याख्याणासाठी मला निवेदन करायला सांगितलंय. त्याची तयारी करतोय. तू काय काम काढलंय माझ्याकडे?" मला विचारताना गालात हसतोय. त्याला माहिते मी विनाकारणच जाते त्याच्याकडे. तरीपण, माहित असून उगाच करतो असं.
"तसं काही काम नाही.. असंच." मी तरी काय उत्तर देणार. ह्म्म्म.. तुझ्याजवळ यायची संधी शोधत असतं मन. असं म्हणू का?
"असंच? हम्म.. मॅडम मला आठवलं पण. तुझं एक काम असू शकतंय माझ्याकडे. इंग्लिशच्या नोट्स कॉपी करुन झाल्या असतील तर दे आता माझी वही परत." खुशाल वही मागतोय. किती खडूस असेल ना? त्याला काय माहित, त्याचं अक्षर कसं निरखून निरखून पहात असते मी. कितीतरी वेळ. कसलं वळणदार, नीट्स आणि स्वच्छ लिहितो मानस.
"नाही झाल्या अजून थोडं राहिलंय. देईन ना नंतर."
"बरं ठीक. चल येऊ मी? सरांना हा निवेदनाचा ड्राफ्ट दाखवून येतो.
"ए थांब ना! लगेच का निघालास?" मला याच्या सोबतच असावं वाटतं आणि हा नुसता दूर दूर पळत असतो.
"अगं तपासून फायनल करुन घेतो ना एवढं. तुझं अजून काही महत्वाचं काम असेल तर सांग. नाहीतर जाऊ देत गं मला."
गेला सुद्धा एवढं बोलून. हह! खडूस कांदा.
🍁🍁🍁🍁
प्रिय मानस.... उम्म्म नको नको... नुसतं... मानस... न.. नाही
असं पण नको. मग काय लिहू? एवढं धाडस करतीये खरं पण सुचतच नाहीये त्याला पत्र देताना काय लिहू. कसं उलगडू स्वतःला? हं सुचलं. उम्म्म...
"माझ्या मनात उमटलेल्या प्रेमस्वरास माझ्या हृदयाच्या तारेचं झंकारून वदंन. प्रेमस्वर.. हॊ म्हणजे तूच. तुझ्याशिवाय प्रेमाची कल्पनाच अशक्य आहे माझ्यासाठी. कारण जेव्हापासून कळू लागलंय तेव्हापासून तूच आवडतोस. इतर काही पर्याय असूच शकत नाही. तू मला भारलयस. जिकडे तिकडे तू हवा असतोस. तू सोबतच असावास म्हणून मन आशावादी असतं. तू सोडून निघालास की मन दुखतं. तू असा कसा निष्ठुर? असं हक्काने वाटू लागतं.
तूझं बोलणं मला नादावतं. पिसं करतं. तुझ्या लिहिलेल्या कविता, ललित मी मन लावून वाचते त्यांचे अर्थ माझ्याशी जुळून येतात का ते शोधते. तुझ्या विचारांमध्ये मी आहे का याचा माग काढत राहते. मानस! जितका तू स्वतःला हवा नसशील तितका तू मला हवा आहेस. तुझ्या विचारांशी मनाशी हृदयाशी एकरूप होण्यासाठी मी खूप आर्ततेने वाट बघतीये रे.
या पत्राचं उत्तर देण्याकरता मी तुला बांधील करणार नाहीये. पण माझी खुळी आशा मला स्वस्थ बसू देत नाही. मला माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवणं नितांत गरजेचं आहे तेच या पत्राद्वारे करतीये.
तू हॊ म्हणालास तरी..
आणि नाही म्हणालास तरी..
तुझीच
नीलांबरी.
🍁🍁🍁🍁
आता मला सगळं मिळालं. कशाची म्हणजे कशाची कमी नाही. मानसने मला स्विकारलं. मानस ने मला होकार दिला. माझं मन त्याला कळलं.. नव्हे तो ही आधीपासूनच मनात हे सगळं ठरवून होता.. अगं आई गं..काय सांगू किती आनंद झालाय. खरंच मी मानसला पहिल्यापासून आवडते. मूर्खच आहे मी कित्ती उशीर केला स्वतःला उघड करण्यात. पण तोही म्हणू शकला असता ना? असू देत नाही बोलला तर काय? कोणीतरी बोललं आमच्यात पहिलं हे महत्वाचं मला. प्रेमाच्या नात्यात असं मी तू मी तू करायचं नाही आधीच ठरवायला हवं. रविवारी फिरायला जायचंय छानसा ड्रेस निवडून तयार ठेवते. साहेव अगदी हरखून जायला हवेत.
🍁🍁🍁🍁
टोचलं हाताला काहीतरी... हम्म काटा असणार.. बाभुळीचा.. आमची मोटरसायकल घसरली... तिथे.. बाभळ.. होती... अं... मानस.... खाली चालला.. गेला... गेला.. खाली गेला...मानस.. वर ये मी... मी पकडते तू... तुला.. ये.. येना... अं.. ये.. ना.. अं...
🍁🍁🍁🍁
"12 वर्षे होत आली पोरीला. अजून सुधारणा नाही. बडबडत राहते. झोपेत जागी असताना नुसतं मानस मानस करते आणि त्याच्याबद्दलच्या आठवणी काढत बसते. तो असं बोलला तसं बोलला. असा दिसतो. असा वागतो. हॉस्पिटल मधल्या सगळ्यांना देवाघरी गेलेला मानस संपूर्णपणे माहित आहे ते हिच्या तोंडून हजार वेळा ऐकल्यामुळे. तू नवी आलीयेस तुलाही होईल सवय."
पण झालं काय होतं ओ?
अगं कॉलेजात असताना मानससोबत फिरायला गेली आणि अपघात झाला गाडीला. तो मुलगा दरितून सरळ खाली गेला नाही वाचला. हिला शरीराला नाही लागलं..पण मनाला लागलं. अजून ती जखम तशीचे. काहीच सुधारणा नाही. सकाळी उठल्यापासून मानस मानस करत असते. रात्री असं झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवावं लागतं नाहीतर चार चार रात्री जागी राहते. कविता करत बसते. म्हणत बसते. इतकी सुंदर, गुणी पोरगी, पण स्वतःच्या उध्वस्त स्वप्नासोबत तीपण उध्वस्त झाली.
एक दोन कडवी गुणगुणताना ऐकलंय मी तिला. छान आहेत.
🍁🍁🍁🍁
"निद्रा नको मजला,
जाग हवी तुझ्यासवे
अशी जशी चंद्राची
सोबत करण्या रात्र वसे.
आणखी सोबतीला गन्धभरीत
ती रातराणी दरवळून हसे
आलीच जरी निद्रा कष्टाने
माझ्या स्वप्नी मात्र तूच दिसें... तूच दिसें."
🍁🍁🍁🍁
- शब्दभ्रमर