Kondan Parva One - Part 29 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 29

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 29

अंतर्नाद 


"गारवा... वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा.. "


ह्या अल्बम ची गाणी कानावर पडली आणि मी तल्लीन झालो.
बाबांनी नवा टेपरेकॉर्डर आणला होता. काही भक्तीगीते, मराठी भावगीते आणि नव्या मराठी अल्बमच्या कॅसेट्स पण आणल्या होत्या. त्यातलं सौमित्रने लिहिलेल्या गारवा मधल्या गीतांच वेड मला लागलं होत. 

कवी कल्पना आणि त्यांच्या शब्दांचे खेळ कसे अचंबित करणारे असतात. ते शोधण्याचा मला नाद लागला होता. मराठी च्या पाठय पुस्तकातल्या कविता मला आवडायच्या पण त्यांचं रूप खूप अलंकारिक आणि जड शब्दांनी सजलेलं असायचं. हे वेगळं होतं. साध्या सोप्या शब्दात पण तितकंच प्रभावी.

"आकाश सारे मांडून तारे 
आता रुपेरी झालेत वारे " 

हे ऐकलं कि वाटायचं या उपर ते काय? पण पुढं परत..

"कधी सांज वेळी मला आठवूनी 
तुझ्या भोवताली जराशी वळूनी 
पाहशील का??"

हे यायचं... आणि मन असं दुथडी भरून वहायचं. अशा कल्पना यांना सुचायला कुठले अनुभव कारणीभूत असतात. हे नुसतंच कल्पना रंजन वाटत नाही. अनुभवाशिवाय असं लिखाण कसं शक्य होईल असा प्रश्न मला पडत. किती काही बघितलंय या लेखकांनी आणि जगलेत. त्याशिवाय त्यांना हे सुचणं कठीण आहे. वाटू लागलं आपल्याही मनात काही वेळा विचारांचा पूर येतो. आपणही करूयात का प्रयत्न एखादी कविता करायचा?

शाळेतल्या नोटीसबोर्डाशेजारी "कला व्यासपीठ" नावाचा आणखी एक बोर्ड होता. तिथं कोणीही एखादं चित्र, कविता, बारीकसारीक लेख, शायरी वैगरे लावायचे. बऱ्याचदा शिक्षकचं कवितेत आपला हात अजमावायचे. पण मला थोडा संकोच वाटत होता. आधी लिहून तर बघू.. बरी वाटली तर लावू तिथे. असं स्वतःशीच ठरलं. एकदा वाटलं होतं सुनीशी बोलावं कि काय? पण माझा संकोच आडवा आला.

सध्या करुन बघू प्रयोग असं ठरवत, मग माझी पहिली कविता कागदावर उतरली.. ज्यात स्वतःशीच स्वतःचं बोललो होतो - 

"मी जसा आज आहे,
उद्याला कदाचित तसा नसेन.
आज वाऱ्यावर लहरतो आहे.
उद्या तळ्याच्या तळाशी दिसेन.

वाऱ्यावरती लहरत असलो.
पाण्याखाली डुंबत बसलो.
आयुष्याचा हिशोब करता
सगळं देऊन जरी फसलो

एक गोष्ट पक्की आहे.
मनाशी केले नक्की आहे.
आयुष्य माझं सुखाने भरेन.
अन सर्वाना प्रेमाचं आंदण करेन."

लिहिल्यावर मी माझ्याकडचा extra असलेला एक जुना एअरमेल शाईचा पेन घेतला. त्याच्या निबला 45 अंशांत तोडली. घराच्या बाहेर जाऊन एका काळ्या दगडावर छान घासली आणि त्याचा बोरु बनवला. ही गोष्ट मी आमच्या आर्टस् च्या सरांकडे बघितली होती. तो पेन मी तिरका धरत हळूहळू देवनागरी लिपीच्या स्ट्रोक्स ने लिहू लागलो. जरा जरा प्रॅक्टिस केली. आणि मग काही वेळाने मस्त जमू लागलं. एक कोरा कागद घेतला. त्यावर माझी पहिली कविता लिहून काढली.

ते झाल्यावर खाली नाव लिहायचं होतं? मला सुचेना काय लिहावं. माझं तर टाकणारच नव्हतो. निनावी लिहावं असं वाटेना. मग अचानक सुचलं आणि लिहिलं "गुळजाड"
हिंदी आणि उर्दूत गुलजार गाजले होते. इथं आमच्या शाळेत गुळजाड निपजला होता.

त्यादिवशी शाळेत लवकर जाऊन त्या बोर्डावर कोंणी मला बघायच्या आत माझं पान खोचून आलो. नंतर दिवसभर येणारे जाणारे ते बघत जात होते. ते पाहून मला वेगळं काही केल्याचे समाधान मिळाले. ठरलं तर मग. फावल्या वेळात सुचेल तशी कविता मी लिहायचो आणि शक्यतो दर दोन तीन दिवसांनी लवकर शाळेत येऊन जुनी काढून नवी लावायचो. हा लपवा लपवीचा उद्योग खरंतर अजून चालला असता. पण...

एका सोमवारी मी माझं कविता खोचायचं काम केलं. निवांत होतो. खूप जणं आता माझं वाचत होते असं दिसायचं मला. गुळजाड आता शाळेत माहित झाला होता. मधल्यासुट्टीत मी आणि रामदास जेवण झाल्यावर बॉल catch खेळत होतो. तितक्यात तिथं सुनी आली.

"जाडू.. शाईचा पेन आहे का रे? शाई संपली माझ्या पेनातली." ती म्हणाली.

"आहे. सॅक मधून घे." मी तीला म्हणालो. ती गेली. दहा मिनिटांनी मी बेल झाल्यावर वर्गात आलो. माझ्या जागेवर बसलो. सुनीने वळून माझ्याकडे बघितले आणि तोंड दाबून पुढे बघू लागली. तिच्या हलण्यावरणं कळत होतं कि ती हसत होती. 

मला समजलंच नाही तीला काय झालंय. तिने परत वळून माझ्याकडे बघितले. माझ्याकडे बघून अंगठा आणि अनामिकेचा गोल करत "छान" अशी खूण केली. परत तोंड दाबून त्रासदायक पद्धतीने हसू लागली.

" सूनेत्रा!! काय चाललंय? का हसतियेस?" शिर्के ताई ओरडल्या तीला.

तीने नुसतीच नकारात्मक मान डोलवली. शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. पण तीला जमत नव्हतं बहुतेक. तास संपला तशी माझ्याकडे आली. 

"तुझ्या त्या बोरुने लिहिता नाही आलं मला. पण तुला चांगलं येतं हा जाडू. बाकीचं लिहिलेलं सगळं घेऊन तयार रहा बरं का? शाळा सुटल्यावर सरळ चलायचं आज तुझ्या घरी. गुळजाड काय?? शी ss जाडू कसलं नाव दिलंय असलं." सुनी खूप हळू आवाजात म्हणाली. आणि परत दबकं हसत जागेवर गेली.

मला दरदरून घाम फुटला. माझं गुपित सुनीला कळलं. मी पटकन सॅक मध्यें पाहिलं. माझी आधीची कविता लिहिलेला कागद गायब होता. मी डोकयावर हात मारला. ती माझ्याकडे बघून अतिशय नाटकी पद्धतीने हसत होती. 

पल्लवी तीला "काय झालं? काय झालं?" करत होती. पण सुनी तीला हसत हसत टाळत होती.

माझ्या शेजारचा पम्या मला विचारत होता. 
"काय झालं रे? काय म्हणाली ती असं?"
त्याला काय सांगणार? कपाळ??

🍁🍁🍁🍁

रस्ताभर तिने एकच घोषा लावलेला. 
कधीपासून लिहितोय?
का लिहितोय?
तुझंच आहे ना?
कि ढापलय?
कुणासाठी लिहितो..? 
जाड्या माझ्यापासून लपवलंस??

सुनी किती त्रास देऊ शकते याचा प्रत्यय मला त्यादिवशी आला. ती पिच्छा सोडत नव्हती. शेवटी मी सायकल जोरात दामटली. भरभर घरी निघालो. सुनी पण जोरात आली माझ्या मागे. मी सायकल कशीबशी अंगणात ढकलली. ती पडली कि काय ते बघायला पण थांबलो नाही. बूट कसेबसे काढले आणि जोरात घरात घुसलो. सुनिपण तेवढ्याच जोरात माझ्या मागे आली. बूट फेकून माझ्या रूमकडे धावली. 

"जाड्या थांब..." सुनी ओरडली. 

माझी आई आम्हाला दोघांना ओरडत होती.
"कार्ट्यानो.. काय चाललंय..? "

पण आमचं लक्षच नव्हतं. मी रूम मध्यें येताच रॅक वरची माझी कवितांचे कागद लपवलेली फाईल काढली आणि माळ्यावर फेकू लागलो. पण ती खाली पडली. मी घ्यायच्या आत सुनीने उचलली. मी तिच्या हातून फाईल ओढू लागलो.

" सुने सोड!!"मी म्हणालो.

" तू सोड.. फाटेल नाहीतर. " ती पण ओरडून म्हणाली.

" सुने नको ना प्लिज.." मी गयावया करू लागलो.

" सोडतो का? कि उद्या तुझी ही कविता पल्लीला दाखवू तू लिहितो म्हणून? आधीच इम्प्रेस झालीये कविवर.. तू तो आहेस कळलं तर काय खरं नाही. " सुनी जवळ येऊन हळू आवाजात म्हणाली.

तेवढ्यात आई आली.
"अरे काय लावलंय? दे बरं सुनीला काय हवंय ते का छळतोय पोरीला." आई उलटंच बोलत होती. होना.. विसरलोच होतो..  माझी आई होती ना? सुनीची कड घेणारच.

"अरे बापरे!" माझ्या मागे बघत सुनी जोरात ओरडली. तसा माझा हात तिकडं लक्ष गेल्यामुळे ढिला पडला आणि सुनीने फाईल खेचली माझ्या हातातून. ती पटकन पळाली रूममधून. बूट पण न घालता तशीच सायकल वर पळून गेली. आणि इथे मला आमच्या मातोश्रीनी धरून ठेवलं होतं.

🍁🍁🍁🍁

संस्कृतच्या ट्युशन नंतर घरी येताना सुनी म्हणाली, " पारायण चालूये. नंतर भेटू."

त्यादिवशी ती काही आली नाही. मला खूप लाजल्यासारखं होत होतं. दुसऱ्या दिवशी शाळेचं लवकर आवरून सुनीचे बूट घेऊन मी तिच्या घरी गेलो.

सुनी सगळं आवरून बसली होती. बुटच घालायचे राहिले होते. मला बघताच खूप गोड हसली. माझी वाटच बघत होती.

"घे. घाल लवकर आणि चल." मी म्हणालो.

" हो.. हो कविराज घालते हं.. आपण आणलेल्या आमच्या जोड्याना." नाटकी सुरात सुनी म्हणाली.

तिच्या आईला बाय करत आम्ही निघालो.

"काय जाडू उर्फ गुळजाड?" सुनी म्हणाली.

"सुने!!? असंच बोलत राहणारेस का? "

"बरं नाही. आता serious.. काल रात्री पर्यंत तीन तीन वेळा एक एक कविता वाचून काढली तुझी. खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. माझा जाडू अशा खोल खोल अर्थाच्या कविता लिहितो.  आपली तर कॉलर tight. माझं झालं तू सांग आता..कविता वैगरे मधेच. " ती म्हणाली.

मी मला का लिहावं वाटलं ते तीला सांगितलं. 
"सुने...साध्या शब्दात गहन अर्थ घेऊन येणाऱ्या कवितांमध्ये जाम मजा असते. त्यांचे अर्थ समजून त्या ऐकताना कुठेतरी वाटलं आपण सुद्धा लिहावं. पण मग लिहितोय तर सर्वांना वाचायला देऊ. काय उलट सुलट ऐकायला मिळतंय ते ही बघू. अस पण वाटलं. पण सुने माझ्यात तेवढी हिंमत नाही कि मी हे माझं म्हणून मी जगाला सांगू शकेन. मला "हा असा आहे?" असा ठपका नको आहे. " मी म्हणालो.

" पण सुनिपासून लपवायची हिंमत कशी झाली तुझी?" ती म्हणाली.

" अगं एखादी गोष्ट असतेच ना जी आपण आपल्यासाठी करतो.. तशीच ही पण. " मी म्हणालो.

" पण माझ्यापासून लपून राहू शकत नाही तुझं काही हे पण खरंय." ती म्हणाली.

" तुझं सुद्धा काहीच लपून नाही राहत माझ्यापासून. " मी बोललो.

"असं?? काही गोष्टी तूला कळल्या तर कसं वाटेल याचा विचार करुन मला गप्प बसावं लागतं. तुझा राग मी बघितलाय. भीती वाटते मला जाम त्याची. " सुनी म्हणाली.

"सुने माझा तुझ्यावरचा राग म्हणजे वळवाचा पाऊस असल्यागत आहे. येतो, बरसतो, जातो.. थांबत नाही. तेव्हा काळजी नको करत जाऊ. " मी तीला क्लिअर केलं.

" मग एक गोष्ट सांगायची राहिलीये तूला. " ती म्हणाली.

" गॅदरिंग नंतरचं फोटो प्रकरण? जाऊदे शिळं झालं ते." मी म्हणालो.

" आईशपथ!! जाडू तूला माहित होतं? काहीच बोलला नाहीस मला तू त्याबद्दल." तिने विचारलं.

" सुने.. एवढं काय गं त्यात? मला नं सांगण्यासारखं काय आहे त्यात? मी का तूला रागवेन? म्हणजे असं तूला का वाटलं?" मी म्हणालो.

" आधीच सचिन बद्दल तुझं मत चांगलं नाही. त्यात तो जे काही करायला बघतो त्यामुळं... " ती बोलू लागली.

" तू म्हणालीयेस ना मला? सुनीवर विश्वास ठेव ती मजबूत आहे. मग मी त्या गोष्टीची इतकी काळजी नाही करत. तूझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील त्यामागे नक्की योग्य कारण असणार? फक्त पटत नसेल, आणि तरीही करावं लागतं असेल तर, मात्र मी आहे आणि आपल्या समोरची परिस्थिती. परत सांगतोय सुनी लक्षात असू देत." मी तीला कट करत म्हणालो.

ती चालता चालता एकटक माझ्याकडे बघू लगली. 

"काय झालं? नाकाला काही चिकटलंय का माझ्या? असं का बघतीये?" मी विचारलं.

" काही नाही.. सांगता नाही यायचं.. आत्ता तरी नाही. चल लवकर. आज कविता नाही लावायची का गुळजाड साहेबाना? " तिने विचारले.

" काल लिहिलं नाही काहीच. बघू आता पुढल्या आठवड्यात." मी म्हणालो.

" माझ्यावर लिहू शकशील? " ती म्हणाली.

"बघतो जमतंय का?" मी म्हणालो

"जमव!" ती म्हणाली.


🍁🍁🍁🍁


"सगळं तुझ्यासाठी तर घडवलंय.
माझं आयुष्य तुझ्यासाठी सजवलंय.
तू काही अंगठीतला हिरा नाहीस.
तुझ्यासाठी हृदयाला कोंदण बनवलंय."


- क्रमशः


शब्दभ्रमर 🍁🍁