स्वर आले जुळूनी भाग 3
आता दिवसभर नुसती त्रेधा तिरपट व्हायची पण माझ्या पेटीच्या छंदात व्यत्यय आला नाही हाआनंद कष्टापेक्षाही मोठा वाटायचा मला. आपटे बुवा नामांकित गवई आणि वादक. गायनाच्या जोडीला पेटी, तबला, सारंगी वादनातही त्यांनी व्यासंग. अगदी नेमस्त मोजक्याच शिकवण्या त्यांनी घेतलेल्या.
बुवांचा संपर्क मोठा आणि संपन्न विश्वनाथ बागूल, रामदास कामत, प्रभाकर कारेकर, बकुल पंडित,वासुदेव चंद्रचुड, प्रसाद घांग्रेकर अशा दिग्गज मंडळींची बुवांकडे उठबस. मुंबई आकाशवाणी केंद्रावर बुवांचे शास्त्रीयसंगीताचे कार्यक्रम नियमीत व्हायचे. बुवांच्या मार्गदर्शनाखाली पेटी वादनात मला प्रभुत्व मिळणार याची खूण गाठ मी बांधली. रोज आठ ते साडे दहा अडीज तास शिकवणीचालायची. बुवा गळ्यानं सुरांची छाननी करायचे अन् ते स्वरमंडल मी गिरवून घोटूनघोटून आत्मसात करायच अशी शिकवणी चालायची. बुवांची शिकवणी सुरु झाली आणि माझं रागदारीचज्ञान किती तोकडं आहे हे माझ्या लक्षात आलं. कितीही तल्लख तत्पर राहिलं तरी बुवांनी गायिलेला तुकडा पेटीच्या सुरांमध्ये चपखल पकडताना खूप गल्लत व्हायची.स्वरांची तीव्रता त्यांच आवर्तन आखूड लांब टप्पा... श्रवणातून त्याची जाण होणं आणित्या बारकाव्यांसह एका मात्रेचाही फरक न करता संवादिनीच्या सुरांमधुन व्यक्त करणहे मोठं दिव्यच वाटायच मला.
केदार रागाची स्वरमाला मला मुखोद्गत. पण बुवांनी मारलेली तान पेटीतून उमटवताना माझी फें ss फें उडाली. बुवांनी सलग चार-पाच वेळा संशलयीत बारकावे उलगडून दाखवले पण माझी बोटं काही वळेनात; दरवेळी नवीन चुका व्हायच्या तेव्हा मात्र बुवा उखडले आणि मला खडीफोड्याची, शालजोडीतली चपराक देत बुवांनी शिकवणी थांबवली. नाराज झालेल्या अवस्थेतच मी कांदिवलीकडे चालत सुटलो. विचारांच्या तंद्रीत, भग्न विमनस्कअवस्थेत दामू नगरला जाणारा फाटा मागे पडला याच भानच राहिल नाही. पूर्वीच्यारिवाजाप्रमाणे मी डोंगरीत शर्माजींच्या क्लासच्या ठिकाणापर्यंत पोहोचल्यावर माझी तंद्री भंग पावली.
मी रोज बोरीवलीचा क्लास संपवून बिऱ्हाडी येईपर्यंत निजानीज झालेली असायची.आजतर तंद्रीत डोंगरी पर्यंतचा हेलपाटा झाल्यामुळे आणखीनच उशीर झालेला. पणकाकांच्या बिऱ्हाडाचं दार उघडं दिसलं. जरा पुढे गेल्यावर बघितलं तर दारातच खुर्च्या टाकून काका आणि भाऊ गप्पा मारीत बसलेले. मी नाराजी दाबून टाकीत तोंडावर उसनी खुशी आणायचा प्रयत्न केला... "भाऊ SS आज मध्येचअकस्मात कसे काय आलात?" पानाची पिंक टाकीत भाऊ म्हणाले,"तसा कालच मुंबईत आलो मी. आमच्याकडे किर्तनाला ते जानशीचे पटवर्धन बुवा येतात ना.... त्यांच्या धाकट्या मुलाच लग्न झाल काल. कार्यातच पडेलचेशंकरराव बोडस भेटले. जेवणावळ उरकल्यावर त्यांनी आग्रह करुन गिरगावला नेलं. काल कांदेवाडीत त्यांच्या बिऱ्हाडी ऱ्हायलो. सकाळी रेल्वेला कोण गर्दी ... म्हणून जेऊनखाऊन दुपारनंतर कमी गर्दीचा टाईम धरुन आलो कांदिवलीत...."
मी पाय धुवून जेवायला बसलो. भाऊ भेटल्यामुळे माझी विषण्णता खूप कमी झालेली.जेवण झाल आणि मी बाहेर जाऊन भाऊंच्या कडेला बसलो. कातरलेली सुपारी मला देण्यासाठी हात पुढे करीत भाऊ बोलले, "अशोक ss तुझी तब्बेत बरी आहे ना? तुझा चेहरा जरा उतरलेला दिसतो म्हणूनम्हणतो...." त्यांनी एकदम असं कां विचारलं या विचाराने मी सटपटलो..."नाही बा.... दिवसभर जरा दगदग होते... क्लास सुटल्यावर तासाभराची चालं....त्यामुळे...." माझं बोलण तोडीत माझ्याकडे रोखून बघीत भाऊ म्हणाले,"अशोक रे ss मी बाप आहे तुझा ! तू सैरभैर झालेला दिसतोहेस. नेमक काय झाल ते सांग. माझ्याकडे लपवू नकोस." आता माझानाईलाज झाला. कसलाही आडपडदा न ठेवता बुवांनी माझा केलेला पाणउतारा सगळं काही एकशब्दही न गाळता त्यांना सांगून यापुढे पेटी शिकवण्याचा फंद बंद करण्याचा माझाविचार असल्याचं मी त्यांना सांगितलं.
माझं बोलण संपल्यावर खोल सुस्कारा टाकीत भाऊ म्हणाले,"हात्तिच्या... एवढंच ना? त्यात काय एवढ मनाला लावून घ्यायचं....? या दिव्यातुन मी सुद्धा गेलोयएकेकाळी. नशीब समज... माझ्यापुढे दिशाच नव्हती. विद्येचा फंद या नादापायी मी सोडलेला आणि दाखणारा- समजावणारा कोणी नसल्यामुळे पेटीच ज्ञानही अर्धवट... भरीसभर म्हणजे संसाराची चिंता.... एक एक सोन्यासारखा जमिनीचा तुकडा कुळकायद्यात कुळानी गिळंकृत केला....विद्या नाही मधली रास देणारी जमिनही गेली... त्यात देवस्थानच्या वार्षिकाचा फास...एवढी सोंग सांभाळताना उधारी-उसनवारी करायची म्हटलं तर खानदान आणि स्वाभिमान आडवायायचा. पण डरलो नाही रहाटाचा बैल सोडून जोताला जुंपायचा, जोत ओढून झाल्यावर त्याच बैलाला पुन्हा घाणा ओढायला बांधायचा तव्दत कष्ट उपसले... पेटी अवगत केली नी संसारही सांभाळला...."
डोळे मिटून आवंढा घोटून भाऊ पुढे बोलले, "अरे ssअडीजशे रुपयात मुंबईसारख्या महागाईच्या खाईत सुद्धा चार पाच माणसांच्या महिना चैनीत जातो. माझा मुलगा पेटीच्या छंदासाठी एवढी रक्कम शिकवणीसाठी मोजतो याने माझा उर भरुन येतो. केवढी तुझी हिंमत... पेटी शिकण्यावरच तुझ मन उडालअसेल तर सोडून दे तो फंद ! माझ काही म्हणणं नाही. पण प्रयत्नाला घाबरुन कच खाल्लीस तर तू वाघापोटी कोल्हा आलास जन्माला असं म्हणेनं मी...! साक्षात हिमालयासारखा गुरु लाभलाय् तुला ! झालचं तर साक्षात श्री दत्तगुरुच कृपा छत्र माझ्यावर आपल्याघराण्याच्या तुझी तपश्चर्या कमी पडतेय् ... प्रतिमेच्या परीस स्पर्श व्हायचा क्षणअजून यायचा आहे तुझ्या आयुष्यात.... अष्टसात्विक भावाने गुरुला शरण जा.... मगपहा.... तुझं श्रवण थिट पडतय.... एखाद्या गायकाचा सूर हृदयाला भिडतो तेव्हा आपोआपवीज उतरते बोटात.... तसा क्षण येईल तुझ्या आयुष्यात मग सगळ सोप होईल आपोआपच...त्या विजयाच्या क्षणापर्यंत चिकाटी सोडू नकोस...."
भाऊंच बोलणं ऐकून मला चांगलाच हुरुप आला. कलेची साधना माणसात काय परिवर्तन करुशकते याचा साक्षात्कारच भाऊंच बोलणं ऐकल्यावर मला झाला. एरवी भाऊ म्हणजे मोजकंबोलणारे.... इतक गहन तत्वज्ञान त्यांनी पचवल असेल अस यापुर्वी कधी प्रत्ययाला आलं नव्हतं माझ्या ! त्यांच्या शब्दांनी जादू झाली, चैतन्याचीजणु लाटच माझ्या शरीरभर खेळली प्रभुत्व मिळेपर्यंत हा फंद न सोडण्याच वचन भाऊनात्याच क्षणी मी दिलं. दुसऱ्या दिवशी पासुन शिकवणीला बसताना स्वत्व, अभिमान, अहम् ची कवच कुंडल बाजूला ठेऊन एकलव्यासारखीसाधना करायच्या निश्चयाने मी सतर्कता वाढवायला लागलो. माझ्यातल परिवर्तन, माझ्यात जागृत झालेली विनम्रता बुवांनाही जाणवली असावी. कारण त्यानंतर एखाद्या वेळी दहा दहा खेपाना मी पुन्हा पुन्हा तीच चुक करायचो पण बुवा माझ्यावर नाराज झाले नाहीत.
“अरे अशोक भैय्या....” बुवा खुशीत आले की इंदुरी ढंगात मला अशोक भैय्या संबोधायचे. “माझे एकस्नेही आहेत...त्यांची मुलगी नंदा... ती संगीत शिकायला येतेय् माझ्याकडे तिची प्री-डिग्री झालेलीआहे. इथे डालमिया कॉलेजमध्ये एफ. वाय्. साठी तिला अॅडमिशन मिळवून द्यायच काम माझ्यासाठी तू करायचं... ती पदवी शिक्षण आणि संगीत दोन्ही शिकणारेयू जरा कॉलेज मध्येजाऊन सगळी चौकशी कर... कागदपत्र फी.... काय काय लागेल ते विचारुन घे...” मी दुसऱ्याच दिवशी कॉलेजवर गेलो. क्लेरिकल स्टॉफमध्ये कुंब्रलचा मनु पुजारी दिसल्यावर मला हायसं वाटलं. (क्रमश:)