मी रस्त्याच्या कडेला थांबवून तलतचे मधुर आर्त स्वर कानात साठवीत राहीलो. त्यांच्या सुरातला कंप, थरथर आणि आर्तता हृदयाचा ठाव घेणारी.... गाण्याचा मुखडा ऐकून मी केलेला अंदाजही पुढची ओळ ऐकल्यावर साफ चुकलेला. ते गीत प्रेमांच साफल्य सुचीत करणारं नव्हतचं मुळी कारण पुढच्याच ओळीत कवी म्हणतो, "बदले में हमको गम दिया ssशुक्रिया ss" वैफल्यातही आनंद असतो.... मला नंदाची प्राप्ती नक्कीच होणार नाही पण तिच्या संगतीत सुरांचा साक्षात्कार होऊन माझ्या कौशल्यात पूर्णत्व येईल हे नक्कीच नाहीतर आयुष्यात समोर दिसणारी प्रत्येक चांगली वस्तू तुमच्या उपभोगासाठी विधात्यानं निर्मिली आहे असं थोडचं असणार आहे?
नकळत तलतचा आणि त्या गीतकाराचा शुक्र गुजार होत मी गुणगुणायला लागलो... एप्यार तेरा शुक्रिया ss योग्य वळणावर योग्य दिशा मिळावी हा सुद्धा शुभ संकेतच म्हणायला हवा.... बेट्या अशोक सावध हो.... तेरा मक्सद सिर्फ प्यार नहीं है....सम्हल बेटा... सम्हल गिर गया तो प्यार नहीं और सुर भी नही.... नसत्या भूलभुलैयात सापडलास तर फक्त दगडफोड्याच राहशील... तुला संगमरवरातुन सुंदर मुर्ती घडवायची आहे.भाऊंच स्वप्न पुर करायचं आहे. शीतल छाया देऊन उष्मा निवारण्यासाठी आम्रवृक्षाची फळं चाखायचा किंवा त्यांच्या ढलप्या जाळून अन्न शिजवायची इच्छा करण हा अतिरेक आहे.
बुवांकडे क्लासला जाताना रोज न चुकता तलतचं ते गीत मला हमखास आठवायचं. त्या गीतामुळे माझी साधना निर्वेध झालीच पण मी अलिप्त वागल्यामुळे नंदाची साधनाही भंगलीनाही. दिवस जात राहिले. जे. जे. मधला कोर्स करुन अॅडव्हर्टाईज ब्युरोत मला चांगला जॉब मिळालेला. चांगल स्केल, मनाजोगतं आणि ठराविक तास काम... माझ्या आयुष्यातलं सुखमय पर्व सुरु झालेल, पहाटे चारला उठून रात्री अकरा वाजेपर्यंत उरी फुटेतो जीव घेणे कष्ट करायचा परखड काळ संपला. बुवांकडच्या शिकवणीमुळे संवादीनीच्या सुरांवर माझी बोटं वीजेच्या चपखलतेन फिरु लागली... श्रवण तल्लख झालं... बुवांच्या परिवारात कुठे कुठे साथ संगत करायाची पर्वणी ही मिळायला लागली.
खरंतर शिक्षणाला पूर्ण विराम द्यायचाच माझा विचार ! पण आठ दहा महिने गेले अन् काकांनी धोशा लावला. पोस्ट ग्रॅज्युएशन करच असा त्यांचा आग्रह मला मोडता आला नाही. जे.जे.मध्ये तशी व्हेकेशन बॅचची सोय असल्यामुळे कोणतच कारण पुढे करता येणारं नव्हतं. आताआठवड्यातुन दोन दिवस पोस्ट ग्रॅज्युएशनच्या क्लाससाठी पेटीच्या शिकवणीत खाडे व्हायचे. पण उरलेल्या पाच दिवसात मात्र एक दिवसही क्लासला दांडी मारायची नाही असा दंडक मी ठेवला. रियाझ केल्याशिवाय, नंदाचे सुर कानात पडल्याशिवाय दिवस सार्थकी लागल्या सारख मला वाटायचंच नाही. आता तर बुवांकडे माझ्या अस्तित्वाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली. संगीत क्षेत्रातला कुणी जाणकारबुजुर्ग आला तर बुवा त्याला माझी ओळख अभिमानाने करुन द्यायचे.
बुवांच्या आणि नंदाच्या प्रयत्नामुळे, त्यांच्याआग्रहा खातर मुंबई रेडिओ केंद्रावरुन माझे सोलो वादनाचे २/३ कार्यक्रम प्रसारीत झाले. हुकमी प्रसिध्दीसाठी आकाशवाणी ही मोठी पर्वणी खरी पण मला मात्र तिथे गुदमरायला व्हायचं. एकतर रेकॉर्डिंग होईपर्यंत तासंतास तिष्ठंती... आपण संधी दिल्यामुळे या माणसाला प्रसिद्धी मिळतेय् असं सूचित करणाऱ्या संबंधितांच्या नजरा.... कितीही जीव तोडून सादरीकरण झालं तरी 'असे किती बजवैय्ये आम्ही पाहिलेत' असं तुच्छता दर्शक नजरेने सूचित करुन मानधनाच्या व्हावचर वर सही घेणारी चाबरट कारकूनी होती... मला ते नकोसं व्हायचं.... माझ्या कार्यक्रमात साथीदार तालरक्षक स्टाफ आर्टिस्ट तो तर केवढ्या तोऱ्यात.... मी कोण आहे काय आहे हे त्याला एकदा सुनवाव... "मी जे.जे.चा डिप्लेमा होल्डर आहे.... गळ्यात पेटी बांधून पैसे गोळा करणारा बहुरुपी नाही."अस खूपदा वाटायच. झालच तर मला मिळालेला अरगण.... अरगण कसला सूरांची पेटीच ती....सूर मिळवायला झालेले भाता मारताना तर चढणीला सायकल मारल्यासारखे पोटरीत गोळे यायचे.... मी बुवांच्या तालमीत तयार झालेला म्हणूनच निभावून नेलं... इतकच.
रेडिओ केंद्रावरुन प्रसारीत झालेला कार्यक्रम ऐकल्यावर भाऊंचं पत्र आलं. पत्र कसलं मानपत्रच ते .... भाऊंनी मला दत्तजयंतीच्या उत्सवात कीर्तनाला पेटीची साथ द्यायला येण्यासाठी दिलेल ते आवतणच जणु ! मी मग शिस्तीत प्रोग्रॅम चॅर्टर केला.मित्राची स्पेशल गाडी (जातं येतं फक्त पेट्रोल टाकायच.... चालक म्हणून दुसरा एक मित्र फुकट कोकण बघण्यासाठी यायचा होता.) करुन बुवा,नंदा, तबलजी प्रदीप बर्वे आणि माझ्या कमाईतून घेतलेला ऑर्गनअसा सगळा लवाजमा घेऊन मी कुंब्रलला गेलो. कामतेकर बुवा वृद्धापकाळामुळे हल्ली बाहेर जाणं बंद केलेलं. त्यामुळे देशपांडे नावाचे दुसरे कुणी बुवा आलेले. कामतेकर बुवांची उणीव असती तरी देशपांडे बुवा सुद्धा कामतेकर बुवां एवढेच तरबेज असल्याच मला जाणवलं. मुंबई आकाशवाणीवरुन कार्यक्रम सादर झालेला (?) अन्त्याही पेक्षा भाऊंचा मुलगा अशा ग्लॅमर मुळे दशक्रोशीतली झाडून सगळी मंडळी जमलेली.
भाऊ समोर असताना वाजवायचं म्हणून माझ्यावर भलतं दडपण आलेलं. भाऊ डोळे मिटून माझं वाजवणं (की मी काय चुका करतो त्या टिपणं) ऐकत बसलेले. कीर्तन पूर्ण होईपर्यंत भाऊ निर्विकार. कीर्तन संपलं... घरगुती घसण असलेल्या नेमक्या माणसांच्या वर्तुळातगप्पांच्या ओघात भाऊ म्हणाले, “आज माझं स्वप्न साकार झालं.... दत्तात्रेयाच्या सेवला ऑर्गन आला आणि माझ्या माघारी बिनचूक वाजवणारा हक्काचा पेटीवालाही मिळाला.” मला प्रेरणा देऊन पेटी शिकायचा व्यासंग सुरु ठेवण्यासाठी भाऊनी केलेलं वक्तव्य आठवून मला हसू आल. त्यावेळेसारखाएकतरी धारदार शब्द भाऊनी माझं कौतुक करण्यासाठी उच्चारायला हवा होता असं मला उगीचच वाटून गेल.... अन् दुसऱ्या क्षणीच माझी चूक मला उमगली. बिनचूक वाजवतो यावरती आणखी काय तारीफ कोणता प्रतिभावंत करील?
त्या दत्तजन्मोत्सवात बुवांचं, नंदाचं गायन हे खास आकर्षण ठरलं. त्याना साथ केल्यामुळे माझ्या ऑर्गन वादनाला मध्यंतरात माझ्या कसबाला खरा सोन्याचा मुलामा चढला. बुवांशी बोलताना भाऊ म्हणाले, “तुमचं गायन ऐकलं आणि माझे कान तृप्त झाले.” त्यावर बुवा म्हणाले, “आता आमचे कान तुम्ही तृप्त करा... नंदाची दोन तीन पदं झाल्यावर मी एक चीज पेश करणार आहे, त्यावेळी मला तुम्ही साथ द्यायची.” बुवाना साथ देताना भाऊनी स्वतःची पेटी उघडली. हल्ली खरंतर भाऊंची बोटंकापायची.... पण पेटीवर बसल्यावर ते कापणं बंद झालं.... भाऊंनी अशी बहारदार साथ दिली, त्यांच्या बोटांच लाघव पाडून मी पुरता खजिल झालो. गाणं संपल्यावर बुवानी भाऊंच्या चरणाला स्पर्श केला... “प्रतिमेचाआविष्कार उत्स्फूर्त असतो.... त्यासाठी कुणी गुरु लागत नाही.... देऊन असा कलाकार घडत नाही अन् मार्गदर्शक नाही म्हणून प्रतिभेचा आविष्कार खुंटत नाही... तुमच्या साथ देण्यात कलेचा स्वयंभू प्रत्यय मला आला.” बुवांचे शब्दऐकून भाऊंच्या नेत्रात आनंदाश्रू आले. त्यांच्या आयुष्यातला तो सर्वश्रेष्ठ सन्मान होता. मी सुद्धा न राहवून दत्तात्रेयांच्या साक्षीनं त्या स्वयंभू कलाकाराच्या चरणावर मस्तक ठेवलं.
उत्सव करुन मुंबईला गेल्यानंतर एक दिवशी बुवा म्हणाले,“अशोकजी आता तुमचं शिकण संपल. तू इथे ये.... आता शिकायला नव्हे साथकरायला म्हणून ये.” त्यानंतर दरमहा प्रमाणे मी शिकवणीचे पैसे द्यायला लागल्यावर तेही बुवानी नाकारले. मला कस सुचल कोण जाणे... मी म्हणालो,“बुवा ss ही शिकवणी नव्हे... ही कृतज्ञता भेटआहे. इतकी वर्ष तुम्ही ज्ञान भांडार खुलं केलंत माझ्यासमोर.... मला चांगला पगार मिळतो. आता काही कमी नाही. तुमच्या कडून जे मिळालं त्याच मोल शिकवणी दाखल दिलेल्या पैशात नाही होणार.” एवढं बोलून पैसे त्यांच्या पायाशी ठेऊनमी उठलो. (क्रमश:)