Swar aale Jululi - 1 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | स्वर आले जुळूनी - भाग 1

Featured Books
Categories
Share

स्वर आले जुळूनी - भाग 1

                           स्वर आले जुळूनी

 

 

 

 

     अहमदाबाद हायवेवरुन बिऱ्हाडाकडे परतताना बुवांचे शब्द ईश्वराच्या देवळातील धडाम् ss धुडूम् ss वाजणाऱ्या नगाऱ्यासारखे माझ्या कानात घुमत राहिलेले....! “कलेची साधनाम्हणजे मोठं दिव्य असतं.... खर्डेघाशी करण्याइतकी सवंग-सोपी गोष्ट नाही ती. एकवेळ गायकी जमेल. ईश्वराने गोड नरडं दिलेल असेल तर थोड्याफार प्रयत्नाने गायक बनणं फारसंअवघड नाही.... पण संवादिनीवर कब्जा मिळवणं भलतं जटिल... सगळ्या संवेदना कर्णपटलात केंद्रित करुन गायकाचा नेमका सूर अचूक पकडायचा आणि तो मनात साठवित बोटांच्या माध्यमातून संवादिनीच्या स्वरमंडलातून उमटवायचा म्हणजे बजवैया अष्टावधानी, सावधचित्त असावा लागतो. स्वराची दीर्घ-त्रोटक लांबी, तीव्रता बोटांच्या कसबाने नियंत्रित करायची असते. एककल्ली सराव करुन रागदारीची मांडणी अवगत होते. तालाची समज ही प्रयत्नाने साध्य होते चट्कनशी.... पण साथ करणं भारी अवघड गायकी स्वैर-बेबंद असते. स्वराचे अनंत असंख्य भेद, छाननी नरड्यातून उमटेल त्याप्रमाणे संवादिनीच्या सुरावटीत पकडणं दुस्तर.... अतीदुस्तर... ती साधना आहे. ईश्वराचा साक्षात्कार जसा व्यक्तीगत पातळीवर जाणीवेच्या तरलतेनुरुप होतो तद्वत संवादिनीचे स्वर गायकाच्या नरड्यातून उमटणाऱ्या ध्वनींशीजुळवणं हा सुरांचा साक्षात्कार असतो... तो व्यक्तिगत पातळीवर ज्याला त्यालाच व्हायला हवा...."

              अशोक ! तुला कदाचित कटू वाटतील माझे बोल.... पण मी सांगतोय ते सत्य आहे. गेली चाळीस वर्ष मी पेटी वाजवतोय,पण अजूनही एखाद्या नवख्या गायकाला सूर साथ द्यायला संवादिनी उघडतो ना मी तेव्हा मनावर खूप मोठं दडपण येतं. न जाणो मिंड चुकेल.... एखादा बारकावा-हरकत चकवा देईलअन् कुणीही दीड दमडीचा गवैय्या भर सभेत माझी साधना कवडी मोल ठरवील, मला ते भर सभेत जाहिररित्या मान्यच कराव लागेल. कारण गायक स्वतंत्रअसतो... तो आपल्या मस्तीत स्वरमंडल उलगडीत जाईल तसं त्याच्याशी बरोबरीनं पळायच असतं. पेटीवाल्याला... भुकेल्या वाघानं मत्त सांबराची पाठशिवणी करावी तव्दत... सांबरालाजणु चहुदिशा मोकळ्या... पण वाघाला मात्र सांबरावर कब्जा करीपर्यंत त्याच्यातल आणिआपल्यातल अंतर कमी करीत पाठलाग करायचा असतो. जाऊ दे... खूप बोललो मी...

       अशोक, कलेची साधना ज्याची त्यानेच करायचीअसते.... ही वाटचाल एकाकी असते, ज्याचा मार्ग त्याने शोधायचाबस्स ! संगमरवर तोच पण प्रत्येकाची मूर्ती वेगळी... तुझा सराव म्हणजे खडी फोडणाऱ्या बेलदारासारखा बिनडोक... मूर्ती घडवणं दूरच, संगमरवरआणि साधा पत्थर यातला भेदही अजून तुला नीटसा उमगलेला नाही...." अन् बुवा उठूनआत गेले. मी घड्याळाकडे नजर टाकली.... साडेनऊ म्हणजे शिकवणीची वेळ संपली. मी पेटी मिटून अस्तर चढवलं. तबलजीनेही हत्यारांवर आच्छादनं घालून आवरा आवरी सुरु केली. पाचमिनिटात सगळं आवरुन मी बाहेर पडलो. पायात चपला अडकवीत बिऱ्हाडाच्या दिशेने पायपीट सुरु झाली.

                 इतकी वर्ष केलेली माझी मेहनत आज कवडीमोल ठरली. जो पैलू पाडील अशी अपेक्षा केली त्यानेच आज फटकारलं....मला प्रकर्षाने आठवण आली ती भाऊंची... कामतेकरबुवा रंगात येऊन गाताहेत.... आज कीर्तनाचा दुसरा दिवस. आजूबाजूच्या तीनचार गावची मंडळी जमलेली. मंदिराचा सभामंडपगच्च भरला म्हणून काही माणसं दोन्ही बाजूच्या मंडपात बसलेली. श्रोतृवृंद भरगच्चअसला की मग बुवांना अधिकच हुरुप यायचा. दोन अडीच तास नाना ढंगांची, नाना रागांची स्वरमालाच कामतेकरबुवा उलगडीत जायचे. भाऊ तल्लीन होऊन पेटीची साथ द्यायचे. भाऊंचे कान तल्लख, एका स्वराचा फरक व्हायचा नाही.

         कामतेकरबुवा गाण्यातले दर्दी. कीर्तनकाराकडे हटकून असणारा हजरजबाबीपणा आणि तिरकस खडूसपणा तर त्यांच्याकडे ठासून भरलेला. तबलजी, पेटीवाल्याना अजमावणं, चकवा देणं, उघडं पाडणं बुवा हमखास करणार ! एखादं प्रसिद्ध पद बुवा प्रचलित चालीमध्ये गायला लागायचे...अर्धी ओळ गाऊन बुवा थोडा विराम घ्यायचे आणि ते पद मूळची चाल आणि ताल दोन्ही बदलून,पट्टी बदलून बुवा गायला लागायचे. साथीदार बेसावध असेल तर हटकून गडबडायचा. मग गायन खंडीत करुन टाळीवर ठेका धरीत धाऽधिन् तिरकिट ss तिरकीट ss धिन् धा तिरकीट असे बोल बुवा तबलजीला समजून सांगायचे. पेटीवाला चुकला तर स्वरावली तोंडाने उच्चारुन दाखवायचे. क्वचित पेटीवाल्याची बोटं उचलून नेमक्या स्वरावर ठेवीत 'इथून वाजवा' असं म्हणायचे. हे इथेच थांबत नसे. साथीदाराना थांबायची खूण करुन बुवा म्हणायचे, “चूक दाखवून दिली म्हणून रागावू नका बरं का ss! साथ जमली तर कीर्तन.... नाहीतर बुवा साथीत गावले... म्हणजे दोनप्रकार आहेत श्रोते हो. साथ चुकली तर बुवा साथीत गावला आणि साथ जमली तर बुवा साथीतून बचावला...... "बोला सीताकांत स्मरण ss जय जयराम ss "

                साथीदार बिचारे शरमेनअर्धमेले व्हायचे. श्रोतृवृंद हेटाळणीच्या सूरात हसायचा. एखादा किंचित कानसेन शेजाऱ्याला म्हणायचा, “किर्तनाला साथ करण भारी अवघड ! कामतेकरबुवा म्हणजे भारी तयारीचे.... आंडू-पांडूला त्यांची साथ करण जमायचं नाही."एकदा साथीदाराचा कच्चा दुवा मिळाला की मग बुवा हमखास किर्तन संपेपर्यत तीन चारवेळा तरी त्याला धोपटून काढायचे. अर्थात भाऊंचा व्यासंग दांडगा....! असे कित्येक कामतेकर बुवा त्यांनी कडोसरीला खोचलेले! बुवांच्या चकव्यात ते सापडत नसत. भाऊ शास्त्र शुद्ध शिकलेले नव्हते. पण गवयाच्या तोंडून जे स्वर उमटतील ते बिनचूक पेटीतून उमटवायच हे कसब त्यांनी आत्मसात केलेलं.

                 मी कीर्तन ऐकायला बसायचो.... माझ सगळ लक्ष भाऊंच्या पेटीकडेच असायच. बुवा गात असताना कुठच्या शब्दाला पेटीतले कुठले सूर भाऊ वाजवतात इकडे माझं बारकाईने लक्ष असायचं हवेतल्या हवेत काल्पनिक स्वरांवर बोट फिरवीत भाऊंची गत मी मनात साठवून ठेवायचो. विशेष करुन 'जय जय रामकृष्ण हरी' आणि 'बालकृष्ण चरणी लक्ष लागोरे' ही दोन्ही पद प्रत्येक कीर्तनात हमखास गायली जायची. मला ती मुखोद्गतच झालेली. उत्सवाच्या काळात पेटी-तबला सगळं साहित्य पाच-सहा दिवस देवळातच ठेवलेलं असायचं. दिवसा देऊळ रिकामंच... मी संधी साधून देऊळ गाठायचो आणि पेटी उघडून मनात साठवलेली स्वरावली पेटीवर वाजवून बघायचो.अशी तुकड्या तुकड्यांनी साठवून दोन्ही पद मी वाजवायला शिकलो.

                    उत्सवात मलापेटीवर चांगलाच हात मोकळा करायची संधी मिळायची. अधून मधून भाऊ कामासाठी बाहेर गेलेकी, पेटी वागवायचा चान्स मिळे. एरवी पेटी म्हणजे भाऊंचाप्राण.... हत्यार ते प्राणापलिकडे जपायचे. आजूबाजूच्या गावात भजन, कीर्तन, नाटक असल्या कार्यक्रमांना कुणीना कुणी पेटी मागायला यायचं. वाजवणारा कोण-कुठचा.... चौकशी करुन भाऊ पेटी न्यायला द्यायचे.(क्रमश:)