दुःख
ह्या वर्षी पण नेहमीप्रमाणे सुनीचा डान्स अप्रतिम झाला. सुनी कुठल्याही पेहरावात सुंदरच दिसते. तशीच दिसत होती. सर्वानी तिचं भरभरून कौतुक केलं. ग्रुप डान्स असला तरी ती लीड असल्यामुळे तिचं उठून दिसणं स्वाभाविक होतं. मी सुद्धा तीला कौतुकाची दाद दिली. सुनीचं असं गुणप्रदर्शन बघताना सुनी फार वेगळी वाटायची.
गॅदरिंग झाल्या नंतर चार पाच दिवस झाले असतील. दुपारच्या सुटीत सचिन आणि सुनी कुठेतरी गेलेले मी बघितले. मी काही माग वैगरे काढणार नव्हतो. पण येताना तिच्या हातात एक वही होती. एवढंच निरीक्षण मी नोंदवलं. ती सांगतीये किंवा नाही या कडेही मी लक्ष देणार नव्हतो. शेवटी घट्ट मित्र असलो तरी तिच्या खाजगीत डोकवायची माझी कक्षा आता मी काही प्रमाणात मर्यादित ठेवायचं मनातच ठरवलं होतं. तिने काही सांगितलं तर ठीक. पण ती माझ्याकडे तरी गप्प बसणारं नव्हती. हा तिच्यावरचा माझा विश्वास मला आणखी दृढ ठेवायचा होता. शेवटी आमचा भावबंध सरस ठरतो की कोणाची खेळी हेही दिसणार होतं. पण हे सगळं मी एकट्याने ठरवलं तरी सुनी काय करते ते महत्वाचं होतं. दोन दिवस असेच गेले पण सुनी त्यावरून तरी काही बोलली नाही. मी माझा संयमीत होतो.
एकदा मी टेकडीवरचा व्यायाम आटोपून सकाळी घरी येत होतो. येताना मागून सायकलची बेल ऐकू आली. मी दुर्लक्ष केलं. परत दोन तीन वेळा ऐकू आली. मग वळून पाहिलं तर पल्लवी होती.
"एवढ्या सकाळी ही इकडे काय करतीये?" मला प्रश्नच पडला.
"मागे बघ तरी.. कधीची बेल वाजवतीये मी. " पल्लवी म्हणाली.
" तू आहेस होय? मला वाटलं कोणीतरी बेलचा रियाझ करतंय सकाळी सकाळी." मी बोललो.
"तू नेमकं कसं रे फटकन बोलू शकतोस?" ती म्हणाली.
"हे विचारायला बेल दिलीस?" मी विचारलं. आम्ही चालत बोलत निघालो.
" अर्रे..आज सकाळी लवकर माझे बाबा गेलेत बाहेरगावी. मग दूध आणि पूजेची हारफुले आणायचं काम मला पडलं. रस्त्यात तू दिसलास. म्हटलं जरा थांबूयात वर्गमित्राशी बोलायला. आत्ता सात वाजलेत. तू किती रे पहाटे उठतोस? व्यायाम करुन निघाला पण घरी." माझ्या घामाने ओल्या झालेल्या टी शर्टकडे बघत पल्लवी म्हणाली.
"हो सवय झालीये आता. झोप येत नाही पहाट झाली की. " मी बोललो.
"तूला स्वतःला कशी काय सवय लावता येते? मला घरचे किती ओरडतात तेव्हा कुठे मी करते काही जमलं तर. आई तर सकाळपासून झांझा वाजवत असते माझ्या मागे." ती म्हणाली.
मला हसायलाच आलं. पल्लवी कितीही मूर्खासारखं बडबडत असली तरी तिची एखादी सरळ बोललेली गोष्ट गंमत आणायची.
"काही करायचं किंवा मिळवायचं हे आपण ठरवलं तरच होतं. दुसरे फारतर दिशा देऊ शकतात. सायकलचंच बघ. पेडल नाही मारलं तर पुढे जाईल का?" मी म्हणालो.
"पण उतार असला तर तशीच जाते की?" ती म्हणाली.
" पल्लवी.. रस्त्यात उतार असतो म्हणजे चढ पण असतात. जोर लावावाच लागतो. सगळेच उतार मिळण्यासारखं नशीब असतं का कोणाचं? " मी म्हणालो.
" खरंय. सुनीसारखं. " ती म्हणाली.
" तिचं काय मधेच? " मी म्हणालो.
" तू आहेस की तीला. चढ आला तर जोर लावून तिचा स्पीड वाढवायला. " ती म्हणाली.
"असं काही नाही ती स्वतः खूप खमकी आहे. " मी बोललो.
" मला कळलं सुनिकडून.. त्यादिवशी आम्ही पिक्चर बघायला गेलो ते सगळं तूला माहित झालं म्हणून. सुनीने मला पुढचा किस्सा पण सांगितला. तू कसं सगळं हॅन्डल केलंस ते. मला तूला सॉरी म्हणायचं होतं खरंतर. इतके दिवस डेअरिंगच नाही झाली. मी स्वतः सुद्धा खरंतर विरोध करायला हवा होता. पण नाही जमलं. परत नाही होणार असं. स्नेहा कडून पण सॉरी म्हणते मीच. " ती बोलली.
"जाऊ दे सोडा तो विषय आता. घरच्यांना विचारून केलं तर काही बिघडत नाही. नाही बोलतील फारतर. पण उगाच नसती रिस्क घेऊन केलेलं हे असलं काही अंगलट येऊ शकतं. " मी बोललो.
" खरंय.. बोलले ना सुनीचं लक आहे तू आहेस तिच्याकडे. पण तिने सुद्धा किंमत ठेवायला हवी ना तुमच्या नात्याची. " ती म्हणाली.
"म्हणजे? काय म्हणायचंय तूला नेमकं? " मी बोललो. तिची ही टिपणी मला नाही आवडली.
"हल्ली त्या सचिनसोबत उगाच काहीपण करत असते. त्या दिवशी गॅदरिंग नंतरचं तूला माहित असेल ना? " ती म्हणाली.
" मला? मला काय माहित असायला हवं? " मी बोललो.
" ऐय्या तूला नाही माहित??! अरे.. त्या समरने सचिनच्या सांगण्यावरून कॅमेरा आणला होता. सुनी आणि सचिनने एकत्र फोटो काढला त्यादिवशी डान्स झाल्यावर. हा सचिन दहा दहा वेळा किती सुंदर दिसतीये ची आरती ओवाळत होता तीला. सुनी पण जरा लाजत बिजत होती. मला तर काही कळतच नाही तिचं. परवा तिचा एकटीचा एक फोटो आणि सचिन सोबतचा एक फोटो असे दोन फोटो दिले की त्याने तीला मधल्यासुट्टीत तो सचिन आता डोक्यात जायला लागलाय माझ्या. तूला नव्हतं माहित हे? " ती म्हणाली.
"अच्छा त्यासाठी ते दोघे वर्गाबाहेर कुठेतरी गेले होते. सुनी नाहीच बोलली काही. पल्लवीने सांगितलं. पण आता तिने मला ही गोष्ट कळवली हे स्वतः आगाऊपणे सुनीला नको सांगायला. उगाच तीला अपराधीपणा वाटेल. मला बाहेरून कळलं वैगरे म्हणून..
पण मी एवढा का विचार करावा? साधी गोष्ट आहे. तिने केलं तिच्या मनाने.. नाही वाटलं तीला मला सांगावं. असू देत सहजतेने घेऊ." असं मला वाटलं.
"पल्लवी! तो तिचा पण मित्र आहे. त्यांनी काढला एकत्र फोटो तर काय फरक पडतो? मला माहित असणं का गरजेचं आहे?त्यांचा प्रश्न आहे तो." मी म्हणालो.
" ऐय्या!! म्हणजे!!? तूला नाही फरक पडत आपल्या गर्लफ्रेंड ने दुसऱ्या कोणाशी अशी मैत्री केली तर? " ती म्हणाली.
" गर्लफ्रेंड? म्हणजे? अगं ती मैत्रीण आहे माझी. हे गर्लफ्रेंड वैगरे कुठून आलं. काही पण?" मी बोललो.
"पण.. तुम्ही एकत्र असता तेव्हा.. असंच वाटतं." ती जरा जास्तच बोलत होती असं मला वाटलं.
"गप गं!! असं काही नाही. सुनी आणि माझं अगदी घरोब्याच नातं आहे. असलं काहीही लेबल लावू नको हा त्याला. तीला कळलं तर झिंज्या ठेवणारं नाही तुझ्या डोक्यावर." मी जरा बोललो.
"बरं.. बरं सॉरी.. चुकून बोलले. पण सचिनचे मात्र तेच प्रयत्न चालू असतात असं दिसतंय. त्यादिवशी थिएटर मध्यें पण सारखं नेत्रा नेत्रा चाललं होतं त्याचं. म्हणे या पिक्चर मधून एक कळलं की मैत्री प्रेमाची पहिली पायरी असते." ती म्हणाली.
"पल्लवी.. सकाळी सकाळी नको तो विषय. शाळेची आवरा आवर करायचीय घरी जाऊन. समाजशास्त्राचे चार स्वाध्याय एकदम दिले होते शिर्के ताईनी. झाले का? आज द्यायच्यात वह्या." मी म्हणालो.
" काही खरं नाही. दोन राहिलेत." ती जीभ चावत म्हणाली.
" जा उरक मग. इथे नको नसत्या गोष्टीत वेळ घालवू. " मी म्हणालो.
"एकतर तुझ्यासोबत बोलणं ही नसती गोष्ट नाहीये. आणि अजून एक.. सुनी आणि तुझी मैत्रीचं आहे, हे कळलं मला आपल्या बोलण्यातून." ती म्हणाली.
" मग? " मी विचारलं.
" मग काही नाही.. असंच.. " एवढं बोलून ती सायकलवर बसून निघाली. थोडं पुढं गेल्यावर परत वळून माझ्याकडे बघत हलकं हसली. मी खांदे उडवले आणि घराकडे पळत निघालो.
🍁🍁🍁🍁
आठ पंधरा दिवस गेले होते. नवं वर्ष सरकलं. संक्रान्त आली. त्यादिवशी संध्याकाळी मी नवे कपडे वैगरे घालून आईबाबांसोबत गावातल्या भैरोबाला जाऊन आलो. आल्यावर सुनिकडे गेलो. तिळगुळ द्यायला. सुनीने त्यादिवशी पण छानपैकी साडी नेसली होती. गोड दिसत होती.
मी गेल्या गेल्या तिच्या आई वडिलांना तिळगुळ दिले आणि त्यांच्या पाया पडलो. सुनीला पण तिळगुळ दिले.
" सुने तिळगुळ घे गोड बोल..आणि खूप अभ्यास कर, परत वर्गात पहिली ये. " मी म्हणालो.
" तू येऊ देशील तर नक्की येईन." ती पण हसत म्हणाली.
तेवढ्यात सचिन आणि अभिजित तिथे आले.
त्यांनी सर्वांना तिळगुळ दिले. आम्ही पण एकमेकांना फॉर्मॅलिटी म्हणून दिले.
" बरं. काका काकू.. चलतो मी." मी म्हणालो आणि निघालोच होतो.
" ए नाही हा.. थांब! असा कसा निघालास?" तितक्यात काकू म्हणाल्या.
" काकू आणखी काहीं ठिकाणी पण जायचंय. " मी म्हणालो.
" जाशील की.. तूला केळीच्या पानावरच्या पुरणपोळ्या आवडतात ना माझ्या हातच्या. त्या न खाताच निघणारेस? चल आत. खाल्याशिवाय सोडायची नाही मी." त्या म्हणाल्या.
मला त्यांनी किचनमध्ये नेलं आणि डायनिंग टेबलवर बसवलं.
नको नको म्हणताना. त्यांनी माझं तिथंच जेवण उरकायला लावलं. मी जेवेपर्यंत काकू माझ्याशी गप्पा मारत बसल्या. दहा पंधरा मिनिटांनी माझं उरकलं. मग मी तिघांचा निरोप घेतला. पण सुनीची चर्या मला जरा मालवलेली जाणवली. माहित नाही का?
घरी पोहोचल्यावर लक्षात आलं. माझ्या आईने हळदीकुंकवाचा निरोप सुनीच्या आईला द्यायला सांगितला होता. तो द्यायचा राहिलाच. मग परत वळलो. सुनीच्या घरी आलो. दार उघडं होतं. पण सुनी आणि तिचे आईबाबा हॉल मध्यें नव्हते, आतून त्यांच्या बोलण्याचा आवाज आला.
" सुने त्याची बरोबरी तू इतरांशी नकोस. माझा मुलगा समजते मी त्याला." सुनीची आई तीला म्हणत होती.
" अग कर की त्याचे लाड मी कुठे काय म्हणते. पण इतरांसमोर त्यालाच असं स्पेशल वागणूक देणं. ते कसं वाटलं असेल दुसऱ्याला ?" सुनी म्हणत होती.
"काही फरक पडत नाही. ज्याला त्याला आपली पायरी कळते. मी त्या दोन पोरांना इतकं ओळखत सुद्धा नाही. तू मला शिकवू नकोस. कोणाशी कसं वागायचं ते. " तिची आई परत तीला ओरडली.
मी घरातून बाहेर आलो. श्वास अडकून उर गच्च भरून आला होता. तिथं थांबणं अशक्य होतं.
"सुनीने??!!...
आज सुनीने तिच्या घरातल्या माझ्या जागेवर आक्षेप घेतला होता?
तिची माझी मैत्री आणि माझा तिच्यावरचा जिव्हाळा?
इतक्या वर्षांच गोड नातं?
त्याची लेव्हल?
तिच्या मनात आता घसरली होती?
सुने तू मला कंटाळली होतीस??"
🍁🍁🍁🍁
एकच घाव घाल आणि संपव.
तुकड्या तुकड्यात मारू नकोस.
हृदय चिरशील माझं तर ते इतकंच म्हणेल,
माझ्या भावनांच्या रक्तात न्हाऊ नकोस.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁