Kondan Parva One - Part 23 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 23

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 23

जोड 


प्रार्थना झाल्यावर मी वर्गात येऊन बसलो. सुनीपण येऊन तिच्या जागेवर बसली होती. तिने माझ्याकडे बघितलं मी बारीक हसलो. तिने पटकन पुढे बघितलं. तिचा फुगा झालेला.


सरांनी शिकवायला सुरुवात केल्यावर मात्र मी माझ्या ज्ञान ग्रहण करायच्या कोषात गुरफटून गेलो. पनामा कॅनॉलबद्दल शिकवून झाल्यावर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. कुठल्या दोन समुद्राना जोडतो? उपयोग काय? वैगरे.. मी 2-3 प्रश्नाची उत्तरे दिली. सुनी माझ्याकडे जरा कपाळाला आठी पाडून बघत होती. मला कळेना हिला नेमकं काय वाटतंय?

पुढले तीन पिरियड झाले आणि मधल्या सुट्टीची घन्टा झाली. सगळे डबे घेऊन उठले. सुनी जागेवर बसून होती. पल्लवी, स्नेहा तीला चल म्हणाली तर, ती नाही उठली. मी ही बसून होतो. तिने मागे बघितले. मी तिच्या दिशेने बघत असलेला पाहून तिने परत पुढे बघितले.

" नेत्रा जेवायचं नाही का?" मागणं सचिन येऊन विचारु लागला. 

" जेवेन मी. जा तू. " ती म्हणाली.

त्याच्याशी बोलल्यावर तिने परत वळून माझ्याकडे बघितले, मी हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होतो. सचिनने माझ्याकडे बघितले आणि तो गेला. मी उठलो. तिच्याकडे गेलो. तिच्या बेंचवर माझा डबा ठेवला. 

"डबा काढ सुने." मी म्हणालो.

तिने मुकाट्याने डबा काढला आणि उघडला. मी पण उघडला.
तीला "जेव" म्हणताच ती जेऊ लागली आणि मी ही.

माझ्या डब्यात तिने तिची सुरणाची भाजी टाकली आणि माझ्या डब्यातून बटाट्याच्या काचऱ्या खाऊ लागली. तिच्या डोळ्यातून टचकन पाण्याचा एक थेंब अळवावरून सटकल्यागत गालावरून घसरला आणि खाली पडला. हातरूमालाने तिने डोळे पुसले. पुढे आम्ही आठ दहा मिनिटात शांतपणे जेवण उरकलं. बाटलीतलं पाणी प्यायलो. दोघेजन डबे दप्तरात ठेऊन वर्गातून बाहेर आलो. ती व्हारांड्यातल्या खांबाला टेकून उभी राहिली. 

"आपलं पहिलंच ना परवाच भांडणं? " तिने विचारलं.

"हो. पण त्याचा अजून त्रास होतोय." मी म्हणालो.

" खरं की काय? वाटत तर नव्हतं. वर्गात छान पैकी उत्तरे देत होतास की." सुनी म्हणाली.

"ते काहीही झालं तरी मी देतोच. आपल्यासाठी नॉर्मल आहे ते." मी म्हणालो.

"मला तर तुझ्या त्या नॉर्मल असण्याचा पण त्रास होतोय. मला वाटलं आज शाळेत यायच्या आधी मला गाठशील. तर साहेब त्यांच्या त्यांच्यातच गुंग. सुनीला इतकं ओरडून बोललास. मी कित्ती घाबरले माहिते. एकतर मी चुकीची मागणी करत होते की बरोबर? ते कळेना मला. त्यात तू मला नीट समजावून सांगायचं सोडून मलाच शेकटवलीस. रडत घरी गेले. आईने विचारलं तर बोलले की जाडू ओरडला. ती म्हणाली. तू काहीतरी केलं असणार. मग तर मला सहनच होईना. म्हणजे माझं चुकलंच होतं. मी कितीवेळ रडत होते माहिते. अजुनपण मधनं, मधनं तसंच भरून येतंय. " ती म्हणाली.

" सुने! चूक तुझी नव्हती. मी शान्तपणे वागायला हवं होतं. पण मी हललो. का माहिते का? कारण मला असं वाटलं होतं की तू मला समजून घ्यावं. आणि हे चुकीचं आहे. मी सतत तुझ्यावर असं दडपण टाकणं बरोबर नाही. तू आधीच खूप करतेस माझ्यासाठी. " मी म्हणालो.

"अच्छा आणि तू? मी म्हणाले म्हणून जिंकता जिंकता हरलास ना?" ती म्हणाली.

"नाही. सचिन ने हरवलं मला." मी बोललो.

" जाडू!! पल्ली नावाची डोळे आणि कानाची जोडी इथे ग्राउंड वर सोडली होती मी. मला नको सांगू. सचिनची अवस्था बघितलीये तिने. ती म्हणाली. तूला त्याला हरवण्यापेक्षा पळवण्यात जास्त interest होता असं वाटत होतं. " सुनी तिरका कटाक्ष टाकून बारीक हसत म्हणाली.

"पल्लवी वाढवून सांगते काहीपण. " मी म्हणालो.

"आणि इतर लोकं?" तिने विचारले.

"ते जाऊ देत तू का नाही आलीस बघायला? मला आवडलं असतं मी रेस धावताना तुझं तिथं असणं. माझा पाहिला प्रयत्न आणि सुनी नाही. कसं वाटलं यार. " मी म्हणालो.

" आदल्या दिवशीची ती गोष्ट झाल्यावर मला कसं जमलं असतं. त्यात मला वाटलं की तू गोंधळशील. माझ्यासमोर माझं म्हणणं डावलणं तूला जड जाईल. त्यापेक्षा नकोच जायला. तूला मोकळा सोडला होता मी. तू काहीही केलं असतं तरी मला चाललं असतं. तर तू.. खूप वेगळंच काही केलंस रे! कुठून येतं तुझ्यात हे शहाणपण? तुझं स्वतःचं म्हणणं ही राखलस आणि माझं मन पण. तुझ्या विचारांची पातळी गाठण मला तरी अशक्य आहे." ती म्हणाली.

"सोपं असतं सुने.. फक्त स्वतःला समोरच्याच्या जागेवर ठेऊन बघायचं. त्या सचिनला स्कॉलरशिप हवी होती. त्याला ती मिळावी अशी तुझीही प्रामाणिक ईच्छा आहे. आणि मला दिलेल्या चॅलेंजपासून मी.... " मी बोललो आणि जीभ चावली.. हा उल्लेख नव्हता करायचा मी.

"कसलं चॅलेंज?..कोणी दिलं तूला? " सुनी विचारू लागली.

"अगं मी स्वतःला दिलेलं चॅलेंज. रनिंगमध्यें पहिलं येणार म्हणून. " मी बोललो.

"जाडू!!? " ती म्हणाली.

"काय?? " मी गडबडलो होतो.

"तू माझ्याशी खरं बोलतोस ना?" तिने विचारले.

"बऱ्याचदा!!" मी म्हणालो.

"अरे तूला काही लाज." ती मला दंडावर फटका मारत हसत म्हणाली.

"आऊच!! दगड झालायस. तूला मारलं तरी मलाच लागतंय." वरून म्हणाली.

" सुने, आणि तूला लागलं तर मला दुखतं. त्यामुळं एक लक्षात ठेव. मी भले चुकेन.. तू चुकशील.. आपण भांडू.. मला राग ही येईल..पण तुझ्याबाबतीत कधीही मी कायमचा राग धरणार नाही. अगदी कसलीही कंडिशन असू देत, मी तूला सोडून कुठेही जाणार नाही. तूला केव्हाही वाटलं की तू एकटी आहेस आता. तर जाडूचं घर तुझी सेफ प्लेस आहे हे कायमचं डोक्यात भरून टाक? काय? " मी तीला खात्री देत बोललो.

"ते माहित आहे मला. माझा जाडू मला कधीच अंतर नाही द्यायचा. आणि मी पण एक प्रॉमिस करते. मी पुन्हा तूला अशी चुकीची मागणी कधी कधीच करणार नाही. काल मी बाबांशी या सगळ्या गोष्टींवर बोलले. तर त्यांनी मला समजावून सांगितलं. प्रत्येकाचा स्वतःचा असा एक स्ट्रगल आहे. तो ज्याचा त्याने पूर्ण करावा. सचिनने तूला भरीस घालून त्याला थांबवू पहाणे संपूर्ण चुकीचं आहे. ही मानसिकताच चांगली नाही. असं मागून यश मिळवणं कमकुवतपणाचं लक्षण आहे. असं ते बोलले. मला खूप लाजल्यागत झालं रे. तुझं रागावणं मग मला योग्य वाटलं." ती म्हणाली.

सचिनचा कालचा तो भिकारीपणाचा ओन्गळवाणा अवतार क्षणात डोळ्यासमोरून सरकला. मला ते डोळ्यासमोर परत आणू वाटेना. मी ते मनातून झटकलं.

"बरं सुने!! मला एक सांग. तू माझ्याशी खरं बोलतेस ना?" मी तीला विचारलं.

" हो!!" ती म्हणाली.

" मग त्यादिवशी सचिन भेटला तुला स्टोररूममध्यें. पण तू कुलकर्णी ताई भेटल्या असं म्हणून का लपवलंस?" मी विचारलं.

"ए तूला कसं कळलं? " तिने चकित होतं विचारलं.

" कळलं मला. सांग की लपवत का होतीस? " मी म्हणालो.

" जाडू.. तू नुकतच त्याला ते मारण्याचं प्रकरण घडलं होतं. त्यात तो मला असा आडमार्गी अडवतोय हे तूला कळलं तर तू आणखी काही केलं असतंस असं वाटून.. मी.. " सुनी गोरिमोरी होत म्हणाली.

" सुने!! तू मला काय मारका बैल समजलीयेस का? त्याने तूला त्रास दिला किंवा चुकीचं वागला तर मी तसं काही करायला धजेन. उगाच वाकड्यात जायला मला नाही आवडत... हा पण तू त्याला जे झापलंस ते जाम आवडलं आपल्याला." मी हसत बोललो. 

" तू गप.. चोरून ऐकलंस सगळं. चोरा!!" ती म्हणाली.

"चला वेळ झाली." बेल ऐकून मी म्हणालो.

"पल्ली म्हणत होती की तुझ्या कपाळावरचा घाम पुसावा वाटत होता तीला." सुनी खोडील सारखी बघत म्हणाली.

" सुनेss!! तू आता तिच्यावरनं परत मला चिडवशील ना तर, तू झोपेत चालते ते मी तीला सांगेन. गावाला मामाची फटफटी स्वप्नात आलेली तुझ्या, ती समजून पार गोठ्यात जाऊन म्हशीवर चढायला गेली होतीस झोपेत. सांगू का तीला तो किस्सा? " मी म्हणालो.

" आईशपथ जाडू!! गपतो का? " ती खवळली.

" आता तर नाहीच. पल्लवी!!" मी ओरडत पळालो आणि माझ्यामागे सुनी मला पकडायला धावली.

🍁🍁🍁🍁

आभाळ मळभानी भरलेलं असो.
किंवा चमकणाऱ्या विजानी निनादलेलं
सारं क्षणात कसं निरभ्र होतं.
पडता तुझं एक हास्य लकाकलेलं.


- क्रमशः


शब्दभ्रमर 🍁🍁