यश
सुनी आणि मी एका off पिरियडला अंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेची तयारी करत होतो. सुनीने मला भाग घ्यायला भाग पाडलं होतं.
"मेरे घर मे टॉपर है तो.. दुसऱ्या कोणाला कशाला घेऊ सोबत?"
असं तिचं म्हणणं पडलं.
तर.. त्या पिरियडला कोणीच शिक्षक आले नव्हते. पण शेजारच्या वर्गातल्या कावरे ताई येऊन दंगा करू नका म्हणून तंबी देऊन गेल्या होत्या. 96-97 चं GK चं पुस्तक होतं आमच्याकडे, ज्याचा आम्ही फडशा पाडला होता. 97-98 चं शाळेच्या लायब्रेरितून आणण्यासाठी सुनी उठली आणि गेली. "
मग पाचेक मिनिटांनी मला लक्षात आलं की भूगोलाच दहावीच पुस्तक पण आणायला सांगायचं विसरलो तीला. त्या आठवड्यात मला आणि तीला लायब्रेरितून काय हवं ते उचलण्याची परवानगी प्रचार्यांनी दिली होती.
म्हणून मी पण कावरे ताईंची परवानगी, आणि
"सगळ्यांनाच बरं लायब्रॅरीत जायचंय आज? " असा त्यांचा शेरा घेऊन लायब्रॅरीकडे निघालो.
लायब्ररी आणि शाळेची केमेस्ट्रीची लॅब यांच्यामध्यें एक छोटा पॅसेज होता. तो जरासा अंधारा असायचा. त्या पॅसेजच्या शेवटी एक छोटी स्टोर रूम होती. तिथं काळे सर म्हणून स्टोर कीपर नसायचे. "नसायचे" म्हणजे ते फार क्वचित दिसायचे म्हणून आम्ही ते तिथं नसतात असंच म्हणायचो. आताही नव्हतेचं. तिथून मला सुनीचा बारीक आवाज आला. मी लायब्रॅरीत घुसायच्या ऐवजी तिकडे सरकलो आणि दाराशी थांबलो.
" इथं का उभा होतास? " सुनी म्हणत होती.
" मला बोलायचंय तुझ्याशी." सचिन(?) म्हणाला.
" मला लायब्रेरितून पुस्तक घ्यायचंय. जाडू वाट पाहतोय माझी." ती म्हणाली.
" तू मला टाळतीयेस का? बोलत नाहीयेस माझ्याशी. मी असं काय केलं ज्यामुळे तू रागावलीये माझ्यावर. प्लिज काय झालं सांग तरी. " तो रडवेला होऊन विनंती करत होता.
"सचिन.. मला ना खोट्याची फार चीड आहे. जाडू दुनियाभराचे उपदव्याप करेल, हाणामारी करेल, डोकं फोडून येईल एखाद्याच. पण तो सुनीशी खोटं कधी बोलणार नाही आणि तू त्याला माझ्यापाशी खोटं ठरवत होतास? तू म्हणालास तो तूला लायकी आहे का वैगरे बोलला. दळभद्री बोलला. हे शब्द त्याच्या तोंडून येणं अशक्य आहे. मी मान्यच नाही करू शकत. त्याच्याशी बोलल्यावर तर अगदी लक्ख साफ झालं. एक लक्षात ठेव. त्याच्याबद्दल माझ्या मनात विष कालवायला जाशील, किंवा माझ्याबद्दल त्याच्या मनात.. तर ते विष तुलाच बाधेल." सुनी त्याला झापत होती.
" चुकलं माझं. मी तुमची मैत्री नीट ओळखू शकलो नाहीये.. खरंच मला माफ कर.. परत मी तुमच्या मैत्रीत कसलीही लुडबुड करणार नाही. पण नेत्रा.. मला असं दूर करू नको. ज्या काही आयुष्यात चांगल्या व्यक्ती आहेत त्यात तू खूप महत्वाची आहेस... प्लिज इथून पुढे असं नाही होणार. मनापासून बोलतोय." तो म्हणाला.
"आमच्या मैत्रीत लुडबुड कोणीही करू शकत नाही हेच मला तूला दाखवायचं आहे. दुसरं असं तसा प्रयत्न तु परत केलास तर मग मात्र सुनी माफ करणार नाही. आता हे सगळं तुझ्यावर डिपेंड आहे सचिन. तू कसा वागतोस त्यावर आहे." ती म्हणाली.
मी लायब्रॅरीत गेलो. दोनेक मिनिटांनी सुनी तिथे आली.
" अरे तू कधी आला इथे? " तिने विचारले.
" 10वी भूगोलाचं पुस्तक आण सांगायचं विसरलोच की तूला. पण तू कुठे होतीस? मला वाटलं माझ्या आधी आली असशील." मी मुद्दाम तसं विचारलं.
" मी मधेच संस्कृतच्या कुलकर्णी ताई भेटल्या त्यांच्यासोबत.."
" ते जाऊ देत !! पुस्तक शोध लवकर, वेळ वाया जातोय." मी म्हणालो.
छातीतून पोटात कळ जाऊन खड्डा पडणे कशाला म्हणतात खरंतर ते पहिल्यांदाच अनुभवत होतो मी. कारण सुनी कदाचित आज पहिल्यांदाच माझ्याशी खोटं बोलली होती. का? असं का करावं वाटलं तीला? पण मी सुद्धा कुठं सरळपने तिच्याशी उघड बोललो होतो. लपूनच तर सगळं ऐकलं होतं आणि काही माहित नसल्याचा आव आणला होता. त्या बोलण्यात तिचं माझ्याबद्दलच नातं तिने परत ठासून सांगितलं होतं. पण हे माझ्याशी लपवण्याची काय गरज तीला? असा प्रश्न मला सतावत होता. सुनी फार काळ नाही लपवणार. सांगेल आज उद्या असं वाटून मी परत काही वेळाने नॉर्मल झालो.
🍁🍁🍁🍁
"आंतरशालेय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा करंडक 1998 चे विजेते सुनी आणि जाडू. ये sssss!!!" सुनी ओरडत करंडक घेऊन वर्गात घुसली. केवढा धिंगाणा घातला तिने. तिच्यामुळे सामील झालेल्या इतरांनी मिळून सगळा वर्ग डोक्यावर घेतला होता. त्यावेळी सुनीमुळे मी पहिल्यांदाच अशा सामूहिक जल्लोशात सामील झालो.
आम्ही दोघांनी मिळून पुढल्या तीन शाळांच्या दांड्या गुल केल्या होत्या. प्रश्न विचारल्यावर सुनीला मी वेळेवर बझर मारण्याचा इशारा केला की सुनी वीज धावत नसेल इतक्या चलाखीने बझर ठोकायची. सोपं उत्तर लवकर पकडण्याचं काम ती करायची आणि थोडं पॉजिटीव्ह वाटत असलेलं पण विचारांती द्यावं लागणारे उत्तर जमवले तरी बझर तिने पहिला ठोकलेला असायचा. आमच्या एकत्र एकदम चालणाऱ्या टाळक्याने आमच्या शाळेला पहिल्यांदाच हे बक्षीस मिळवून दिलं होतं. त्यादिवशी आम्हा दोघांना करंडकासोबत स्टेजवर बोलवून सर्वांसमोर शाबासकी देऊन कौतुक करण्यात आलं. आमचा फोटो ही काढून नोटीस बॉर्डवर लावला गेला. सुनी आणि मी शाळेत आता चांगलेच फेमस झालो होतो. घरीपण दोघांच्या आईबाबांनी मिळून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. सुनी दृष्ट लागेल अशी आनंदी होती. मलाही तेच हवं होतं.
यावेळी आमच्या वर्गाची ट्रिप गावापासून तिसेक किलोमीटरवर शहरात असणाऱ्या सायन्स पार्कला गेली होती. सुनीने मला गाडीत अजिबात एकट्याला बसू दिलं नाही. ओढत ओढत मला तिने मागे नेऊन टाकला.
"मैत्रिणींची request आहे बाबा आज तर तूला इथे यायलाच लागणारे." असं म्हणत सगळ्या गदारोळात सामील व्हायला लावत तिने मला गाणी म्हणायला लावली. मस्ती घालायला लावली. मला आजवर न झेपणाऱ्या गोष्टींमध्ये तिने मला घुसायला लावलं.
सायन्स पार्क मध्यें विज्ञान, भूगोल आणि इतर बऱ्याच शाखांची भरपूर माहिती मिळाली. तिथे माहिती देणाऱ्या लोकांना मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लावत इतरांना माहिती मिळवायला मदत केली. मला सचिन यावेळी जास्त जाणवला नाही. तो लांब लांब समर आणि अभिजित सोबत रहात होता असं एकदोन वेळा दिसलं. त्याला चरफडण्याशिवाय इतर काहीही करणं अवघड होतं.
एकंदर या ट्रीपला माझा सहभाग सुनीसोबत सुनीइतकाच प्रभावी होता. सुनीने अजुनपण मला त्यांच्या त्या भेटीबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. मी वाट बघत होतो असं नाही. पण हलकी सल जाणवत होती हे नक्की.
🍁🍁🍁🍁
चार वेळा ऑलिम्पिक विजेता आणि आठ वेळा जगज्जेता स्प्रिंटर असलेला मायकल जॉन्सन माझ्या चांगलाच डोक्यात बसला होता. त्याच्या पळण्याच्या तंत्राचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत मी खोत सरांनी हकलल्यापासून माझी एकाकी आराधना सुरु केली. बघू कुठवर जाता येतंय. मला एकतर एवढं कळलं होतं की नशिबाने मला एक चांगलं शरीर मिळालंय ज्यावर चांगल्या वाईटाचा परिणाम लवकर दिसतो. म्हणजे, काही महिन्यापूर्वी पर्यंत आळशी पणाचे परिणाम दाखवणारे माझे शरीर, आता कष्टाचा परिणाम सुद्धा झोकात दाखवत होते.
एक महिना उरला होता. मी दणकून प्रॅक्टिस करत होतो. माझं आहार नियमन, झोप अगदी नीटपणे पाळत होतो. सुनीशी माझं या विषयावर बोलणं झालं तर ती मला छान प्रोत्साहित करत होती. माझी गती वाढली होती. स्नायू बळकट होऊन माझी ताकत वाढली होती. 200 मीटर एका नियमित जलद गतीने धावू शकत होतो. वाटलं तर गती वाढवू शकत होतो. मी अजून कोणाशीही पद्धतशीर शर्यत केलीच नव्हती. मला फक्त पळणं एवढंच माहित होतं. त्यामुळे माझा स्पीड नेमका कसा आहे मला माहित नव्हतं.
तो दिवस आलाच. आदल्यादिवशी कबड्डी आणि खोखो सांघिक खेळामध्ये सचिनने भरपूर गुणांची बेरीज मिळवत स्वतःला अव्वल ठेवलं होतं. आता धावण्यात वैयक्तिक गुण मिळवत त्याला स्वतःला ती स्कॉलरशिप मिळवण्याचा दावेदार बनायचं होतं. मला माहित नव्हतं की मी जिंकणार आहे की नाही. पण मी प्रयत्न करणार होतो. सचिनला दिलेलं आव्हान मी असच सोडणार नव्हतो.
आमच्या शाळेच्या ग्राउंडवर फक्की मारून 200मीटर रेस साठी रिंगण बनवलं होतं. 21 जणांच्या एंट्रीज आल्यामुळे पाच जणांचे तीन आणि सहाचा एक असे ग्रुप केले. अंतिम शर्यतीसाठी चार शर्यतीमधून पाहिले येणारे चार निवडण्यात येणार होते. मी ग्राउंडवर तर आलो होतो. पण...
आदल्यादिवशी रात्री सुनी घरी येऊन मला भेटून गेली होती...
मनभराचं ओझं मनावर देऊन गेली होती..
🍁🍁🍁🍁
सगळं सहज जमलं असतं तर
प्रयत्न नावाचा जीव जगलाच नसता
तू म्हणाली असतीस तर
मी मला शोधलाच नसता.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁