थंड झाल्यार खावचा अंतिम भाग ७
भगवान जेवायला लागल्यावर शेठाणीच्या उशा जवळचा माल आपण कसा आणला ते बैजंतीने सांगितलं. तिच्या उशाशी दोन बोचकी आहेत ही गोष्ट झाडूवाली, कपडेवाली धोबीण आणि जेवण करणारी बाई माहिती असणार नी उद्या तिथे काहीही नाही म्हटल्यावर गोष्ट बैंजताच्याअंगलट आली असती. " मिळाला म्हनून प्वॉट फुगासर खाल्ल्यार तां पचत नाय. मान्सान कदीपन तळां राखूनपानी खावचा आसतां." त्याने बैजंतीला तिची चूक पटवून दिली. झूट पण नीट वागायचं निम्मेशिम्मे माल होता तसा शिल्लक ठेवला की शंकेला कारणच उरणार नव्हतं. तिचं जेवण झाल्यावर दोघानी बराचसा माल भगवानाच्या क्वार्टर मध्ये ठेवला. थोडासा ऐवज मात्र परतनेवून शेठाणीच्या उशागती पूर्ववत ठेवला . कोचाआड ठेवलेलं पोतं भगवानआपल्या क्वार्टरवर ठेवून बंगल्यात आला नी मग़ ठरल्याप्रमाणे बैजंता मोठ मोठ्याने रडायला लागली. रात्रीचे साडेआठ झाले होते. लेनमधली दुकानं उघडी होती. भगवानने पार्शिणगेल्याची वर्दी दिल्यावर माणसं बंगल्याकडे धावली.
ग्यानुला सांगून सोराबजीच्या बहीणीकडे वाळकेश्वरला टॅक्सी रवाना केली. दोन तास गेल्यावर मेहरू आली. तीच्या सोबत शेठाणीचा भाऊ नी भावजयही आलेली. बाकी त्यांचे सगेवाले असे कोणी नव्हतेच. बारा वाजले नी आलेली सगेवाली मंडळी उठली . गल्लीतले चारपाच दुकानदारनी पाच सहा अन्य माणसं मात्र सोबतीला थांबली . सहा वाजता हॉस्पिटल मध्ये सोराबजीला भेटून यायचं निमित्त करून भगवानबाहेर पडला. त्याने गुपचूप क्वार्टर मधलं ऐवजाचं पोतं कंपाऊंड वॉलवर ठेवलं. बाहेर जावूनभाड्याची टॅक्सी केली नी डोंगरी गाठली. येसू पुजारी मशेरी लावीत होता नी पांडू संडासला गेला होता. रात्री शेठाणी गेल्याची बातमी सांगता सांगता आतल्या खोलीचं टाळं उघडून त्याने सामानाचं पोतं आत ठेवलं. पांडू आल्यावर त्याला सोबत घेवून तो जे.जे.हॉस्पिटल मध्ये सोराबजीला भेटायला गेला.नर्स त्याला कॉफी पाजीत होती. पाच मिनिटं गेल्यावर त्याने शेठाणी रात्री गेल्याचं सांगितलं. रात्री मेहरूआणि शेठाणीचा भाऊ येवून गेल्याच ही तो बोलला. सोराबजीने उजवा हात डोक्यावर मारून घेतला. जीभ लुळी पडलेलीअसल्यामुळे तो काय बोलला ते मात्र कळलं नाही,
सगेवाले , व्यापारी मित्र नी जात भाई जमेपर्यंत अकरा वाजले . सोराबजीलाही स्ट्रेचरवर घालून आणलेला होता. साडेअकराला शेठाणीचं प्रेत बंगल्याबाहेर गेलं.सोराबजीलाआता घरीच ठेवायचं ठरलं. सोराबजीच्या व्यवस्थेला दिवसपाळी आणि रात्र पाळी साठी दोन स्वतंत्र नोकर त्यांच्यावर देखरेख ठेवायला भगवान नी बाकीची व्यवस्था पूर्वीसारखीच ठरली. अर्थात आताबैजंता ला काही काम उरले नव्हते आणि तिनेही भरल्या घोसात बाहेर पडायचेअसा भगवानाचाही डाव होता. रोख बक्षिसी आणि शेठाणीच्या इच्छे प्रमाणे दोन तोळ्याचा हार देऊन मेहरूने बैजंतीची संभावना केली. दोनतीन दिवस खेपा घालून मेहरूने बंगल्याचा कोपाऱ्यान कोपरा तपासून आर्थिक मोजदाद केली. तसेच पेढीची बारकाईने तपासणी करून सगळा ऐवज गोळा केला. सोराबजीला लकवा मारल्यावर महिनाभराचा संपूर्ण हिशोब भगवानाने चोख ठेवल्यामुळे त्याच्यावर मेहरूचा भल ताच विश्वास बसला होता. मेहरूच्या हातीलागलेला ऐवजही तसा कमी नव्हता . त्यामुळे भगवानाचा घपला सहजपणे जिरून गेला. पेढीची इमारत गुरनामसिंगनी वीस हजाराला घेतली.
टुमरीला जुळे मुलगे झाल्याची बातमी कळल्यावर मेहरूने चांदीची बाळ लेणी आणि सोन्याचे एकेक तोळ्याचे दोन गोफ़ अशी भेट दिली. आता भगवानाला बंगल्यावर हजेरी शिवाय काही कामच उरलेले नव्हते. शेठाणी गेल्यावर मेहेरू सोराबजीच्या बंगल्यावरच रहायलाआली. म्हताराही फार दिवस काढील अस वाटत नव्हतं. हाताशी एवढा ऐवज मिळाल्यावर बैजंताला पण आंगभर दागिने घालण्यासाठी लकडा लावायची पण त्यातला धोका भगवान ओळखून होता. “पदरचा खांवचा पन नदरेरचां खाव नये आशी कोकणात म्हण आसा, उकाळतो पदारथ थण्ड होवच्याआदी तव्यार हात घतलंस काय शिरा पडलीच समज..... कदीपन थंड झाल्यार खावचा म्हंजे बोटाव पोळत नायनी त्वांड पन भाजत नाय ......तू वांयच धीर धर, काचका बोचका घेवन मुलुकात जायसर हुबलाक पान करून गोत्यात येवया नुको,माज्ये बाय माजां येवडा म्हन्ना ध्यानात धर.” मिळालेलं डबोलं घेवून कधी एकदा गाव गाठतो असं झालेलं पण अधिरेपणाने आततायी निर्णय घेतला तर सगळ्याचा विस्कोट होणार हे तो जाणून होता. ठुमरी बाळंत झाली ही गोष्ट त्याच्या चांगलीच पथ्यावर पडली.आता महिना पंधरादिवसाचा वायदा करून गाव गाठायचा बस्स.....पुढचं पुढे. त्याने मेहरू दीदीकडे महिनाभर गावी जायची परवानगी काढली नी तो तयारीला लागला.
त्यावेळी मुंबई कोकण ये जा बोटीने व्हायची. सोबत मोठा नी जोखमीचा ऐवज असल्यामूळे बोटीचा प्रवास फार सांभाळून करायला हवा होता. सामानाचे फक्त बावीस डबे होते. त्यावेळी कोकणात जाणारे लोक डाळ , तांदूळ, कांदे -बटाटे,बटर-बिस्किटं, चहापत्ती, तंबाखू, मिठाई अशा वस्तू मुंबईवरून गावी नेत . क्वचित कस्टमची जुजबी तपासणी झाली तरी फारशी अडचण येत नसे. कोकणातल्या जत्रांना मुंबईहून ओझ्यावारी मिठाई स्थानिक व्यापारी न्यायचे. मित्रमंडळींशी शिस्तवारचर्चा करून त्याने पध्दतशीर बेत योजला. त्या काळी चहापावडर आतून बेगड लावलेल्या देवदारी खोक्यातून विक्रीला येत असे. भगवानाने थोडेसे चहा पावडरचे खोके विकत घेतले.दोनतीन दिवस खपून नवरा बायकोने तळी ऐवज नी वर मिठाई, बटर बिस्कुटं नी इतर वाण सामान भरून सोळा डाग केले.
मुंबईत रहाणारे बारा गाववाले सोबतीला जमवले. भाऊच्या धक्क्यावर बोटीत बसून विजयदुर्ग बंदर गाठी पर्यंत एकमेकांशी फार सलगी करायची नाही म्हणजे सगळे एकामेळान प्रवास करीत आहेत असा संशय येणार नाही. ही खबरदारी घ्यायचं ठरलं. जुळे मुलगे झालेले असल्यामुळे एवढं सामान घेवून बोंबड्या गावी निघाला तरी सोबत्यानीही शंका घेतली नाही. बोटीची तिकिटं काढायच्या दिवशी या बेताचा सुगावा आणखी सहा सात झिलगे यायला मागे लागले. ठरल्या दिवशी सगळा लवाजमा बोटीत बसला.त्यांच्या सोबत बोंबड्या नी त्याची दुसरेपणाची मागारीण लक्षुमी(लग्नात तिचं तेच नाव ठेवलेल) गोठपाटल्या, लफ्फेदारमंगळसूत,मोहनमाळ, नथ बुगडीअशी दागिन्यानी लगडून गावी निघाली. त्यावेळी बोटीत दारू राजरोस मिळायची. सगळेच घेणारे, पण सोबत जोखमीचा माल असल्यामूळे जाताना सगळ्यानी मिळून नेमस्त चार बाटल्या घ्यायच्या. विजयदुर्गात उतराताना तर कोणीही दारवेची बाटली सोबत ठेऊन आफतओढवून घ्यायची नाही. मुंबईत परतजाताना प्रत्येकाला चार चार बाटल्या माझ्या खर्चाने देईन अशी बोंबड्याने ताकिदच दिली होती.
सगळ्या सामाना सहीतमंडळी विजयदूर्ग बंदरात उतरली. त्यावेळी बोटीच्या पॅसेंजराना न्यायला आजूबाजूच्या गावातले दहावीस बैलगाडीवाले बंदरावर आलेले असत. त्या रात्री सगळ्याना चढ्या दराने बोंबडोजी शेठचं भाडं मिळालं. देखणी गोरीपानभरल्या अंगाची नी दागिन्यानी मढलेल्या बायको सोबत डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा लावून तीन वर्षानी भगवान अकस्मात दारात उभाराहिल्यावर अगोदर घरच्या माणसानी त्याला ओळखलेनीच नाही. “ ही लक्षुमी, मी दुसरी मागारीण करून आणलेली हा…… ” असं बोलल्यावर मात्र घरच्यानी त्याला ओळखलेनी आणि मग लगबगीने बाहेर येवूनआयेने भाकरीचा तुकडा ओवाळूनटाकून नव्या सुनेला घरात घेतली. (समाप्त )
※※※※※※※※