थंड झाल्यार खावचा भाग २
पार्वतीची नड ओळखून भटणीने आपल्या गोठ्यातली हत्ती सारखी दांडगी ,वेळेला अडीच शेर दूध देणारी ढवळी गाय तिने सोडून दिली नी रत्नूला बजावले, “ सोयन् बाळगलस तर तुजो झील अन्नाक लागासर दुद काय कमी पडणार नाय. कासेकक पाडो हा.... तीन चार वर्सान जोताक उजवता येयत्... धारेरच्या पडणात आयन, बिवळे,हसाणी नी धमणी हत.... रोज येंगाटभर हिरवोपालो घतलस तर गाय येक्या धारेन् दुद देयत नी पाडोदुकु उजवारात. सोयन् बाळगलस तर माज्या ढवळीचा जायपा तुजो गोटो भरीत.....”
रत्नू ने भटणीने सांगितलेले बोल काळजात साठवून ठेवले. त्याची पानाची बियं होती. बीयात केळी होत्या.तसंच शिंपण्याच्या पाटाकडेने कडेने हिरवा करपील वाढायचा. तो रोज पडणातून ओझंभर पाला, कधि वेंगाटभर केळीची पानं आणुन गायीला खायला घालायचा .पाड्याला रोज करपिलाची मूठ चुकायची नाही.गाईच्या दुधावर पोरगा बोंबड्या नी गोठ्यात ढवळीचा पाडा दोघेही दृष्ट लागेलअसे अंगापिंडाने भरू लागले. पोरगा तीन चार दिवसाचा असताना चुलतीचं दुर्लक्ष झालं नी पोराचं बेंबाट असोल्या सुपारी एवढं सुजून पुवळणाला आलं .त्याकाळी बाळतीची खोली एका बाजूला, भिंतीला बारी नसायची म्हणून खोलीत कायम मिट्ट अंधार असायचा. अंधारात पोराचं बेंबाट टिळटिळीत हो ई पर्यंत कोणाच्या लक्षातच आलं नाही. बोंबी सुजून ठणका यला लागली नी पोर चळीला येवून रदायचा थांबेना तेंव्हा भटणीला बोलावून न्हेलेनी. तिने पोर उचलून उंब-यात उजेडाला धरलं. बेंबाट हलक्या हाताने पिळून हळदीचं कुडं उगाळून लेप काढला. पुढचे दोन तीन दिवस सकाळ संध्याकाळ जातीनिशी खेपा घालून कसले कसले लेप लावले. बेंबटाची जखम सुकली पण बोंबीचा फुगीरपणा आळला नाही. तो हिडता फिरता झाल्यावरही त्याची आंगठ्या सारखी टळटळित बोंबी चटकन नजरेत भरायची. म्हणून मग भगवान हे नाव मागे पदले घरी दारी माणसं त्याला बोंबड्या म्हणायला लागली नी तेच नाव रूढ झालं.
ढवळीचं महामूर दुध दुवक्त घरात यायला लागल्यावर घरण चहात दुध घालायला लागली. नेमाने दही, ताक व्हायला लागलं. बोंबड्या तर एक दोन दिवसाआड भांडून दहिभात खायचॎ. चुलती,आज्जी कातावून म्हणायच्या, “रोज रोज तुका येकल्याक अच्चेराचा इरजाण खांवक् घालून बाकिच्यांक ताक कसा मिळनार? तू काय येकलोच आबाळातसून पडलंस कायरे सोकॎजी ?” त्यावर बोंबड्या बोट रोखून सुनवायचा, “आज्ज्ये लय शानपान माकां सांगो नुको..... माका जगव साटनां उगवतच्या भटणीन् ढवळी माज्या बापसाक् दिलली हा.... तेच्यार पयलो माजो हक हा, व्हयां तर भटणिक इच्यारून खरां खोटां करूया ...... माज्या ढवळिच्या दुदाचो ठेंबो पन कोनाक द्येवचय नाय ..... लय रांडवा इली ताक नी कडी खानारी..... लय क्येलास तर भटणीक त्येची ढवळी परत न्हेवक् सांगान .... ”
बोंबड्या रोज भटणीकडे जायचा. भटणीच्या दोन्ही मुली लग्न होवून मुंबईत स्थायिक झालेल्या. ती पोटच्या पोरासारख़े बोंबड्याचे लाड करी. त्या काळी पोर हिंडता फिरता झाला की तो काष्टी लावी.दोन हात औरस चौरस पांढरा सुती कापडाचा नाहीतर मांजरा पाटाचा कडणी दुमडून टीप मारलेला तुकडा. त्याचे एक टोक करगोट्यातून खोवून ते ढुंगणातून पाठीमागे ओढून मागच्या बाजुला करदोट्यात ओवून त्याची गाठ मारीत नी पुढचा कापडाचा भाग कमरेभोवती गुंडाळून घेत. बापयाच अर्धं ढुंगण झाके नी अर्धं उघडं राही, ह्या नेसूच्या प्रकाराला काष्टी म्हणत. भटीण मुलीनासांगून बोंबड्याला पाटलोणी नी गंजीफरास आणून द्यायची. त्यामुळे त्याला कधिच काष्टी लावावी लागली नाही.
नाकळत्या वयात बोंबड्या भटणीच्या दारात गेल्यावर कसला खमंग वास आला की तडक चुलीपर्यंत जाई नी , “भटणी काय ग्ये रांदलस? काय मस्त वास येताहा ... येकल्यांच खांव नुको हां माका दी... ” मग भटीण त्याला दटावीत म्हणे, “रे वांदरा ... आमी भटा नी तू मराठो .... असा भटाच्या होवऱ्या पावत जातत काय परबा? जा आदी दोणीर जावन् चोळूनचोळून हात पाय धोव , त्वांड धोव नी लोट्यार बस , मग्ये तुका खांवक् देतय. ” मग ओशाळून बोंबड्या हात पाय धुवायला जाई. भट मराठा हा जातीभेद कळण्या एवढी त्याची उमर नव्हती पण घरी आई, आज्जी,चुलती नी आक्कॎ, बायो ह्या बहिणी तो भटणीकडे जायला निघाला की त्याला कायम बजावीत, “आपून मराठा हाव, आपून भटाच्या वसरी वर थांबायचा तेच्याफुडे जांवचा नाय.... भटणीन काय काम सांगलान तर नाय म्हनायचा नाय.”
नवऱ्याच्या माघारी उगवतच्या आज्जीने आगर विठू घाड्याला अर्धलीने दिलेले . तो एक दोन दिवसा आड चेडवाना किंवा आयशीला शिंपण करायला घेवून येई. ऱ्हाटाला बैल जुंपून आगरातले पन्नास माड नी पाऊणशे पोफळीचं शिंपणं करी पर्यंत दुपार व्हायची. कधी नारळ पोफळीचं पाडप असलं की आज्जी त्याना दुपारी जेवायला घाली. पाडप असलं की ती लक्षात ठेवून दहा बारा कोवळी शहाळी काढून घेई. तिच्या वखलातल्याच दोन भाऊ बंदांची घरं अगदी हाकेच्या अंतरावर. वेगळेचार झालेले असले तरी तिन्ही घरानी जिव्हाळा जपलेला. मावळतची नी मधल्या घरातली पाच सहा पोरं कायम उगवतच्या घरात हुदूदू घालीत असू. आबा आजोबा वारल्यावर रोजची देवपूजा आम्हीच आळी पाळीने करायचो. आज्जी शहॎळ्याची भाजी करायची नी रात्री आम्ही पोरं आज्जीच्या झोपाळ्यावर गाणी म्हणत भाजीचा फन्ना उडवीत असू. कळत्या वयाचा झाल्यावर बोंबड्याही आमच्या सोबत असायचॎ.
दुपारी, संध्याकाळी आज्जी गाणी शिकावायची, रामायण – महाभारतातल्या गोष्टी सांगायची.बऱ्याच वेळा बोंबड्या हट्ट करून वस्तीला थांबायचा. “ भटणी आज हरीन कासवाची (म्हंजे हिरण्यकश्यपूची) गोस्ट सांग...” तो म्हणायचा नी आम्ही फिदी फिदी हसू नी बोंबड्या कानकोंडा व्हायचा. मग आज्जी समजावीत म्हणायची, “ तो लहान आहे. जरा मोठा झाला की भटांसारखा शुद्ध बोलायला शिकेल.” बोंबड्या जेवायला बसला की आम्हाला बघायला मजा वाटायची. (क्रमश:)