अध्याय ३
--------------
भूतकाळ कॅमेऱ्यात कैद
-----------------------------
आदित्य ती हूडी हातात घेऊन परत निघाला. पाटील आणि शिंदेंनी तो मृतदेह ताब्यात घेतला. ते सर्व परत रणगाड्या जवळ जायला निघाले. रणगाड्यात बसून आदित्य तिथल्याच जवळच्या पोलिस ठाण्याकडे जायला निघाला. जवळ पास साडेतीन वाजता ते पोलिस ठाण्याजवळ पोहोचले. गाडीतून उतरून ते तिघेही आता पायवाटेने चालत जुनाट, अर्धवट मोडलेल्या जंगलाच्या हद्दीवरील पोलीस चेकपॉईंटवर परत आले होते. त्याच्यासोबत सोनलची रक्ताने माखलेली हुडी आणि रमेश कदमचा चिखलाने माखलेला डिजिटल कॅमेरा होता. त्याच्या डोळ्यांतली आग इतकी तीव्र होती की पाटील आणि शिंदे यांनी त्याच्याकडे बोलण्याची हिंमत केली नाही. त्यांनी फक्त मृतदेह आणि रक्ताचे नमुने सीलबंद केले होते.
"पाटील, शिंदे," आदित्यचा आवाज कठोर आणि निर्भीड होता. "रमेश कदमचा मृतदेह आणि रक्ताचे नमुने अत्यंत गोपनीय पद्धतीने पुणे हेडक्वार्टरला पाठवा. 'अदृश्य प्राण्याने हल्ला केला' किंवा 'गिर्यारोहण अपघात' इतकेच सांगायचे. 'प्रतीक' किंवा 'अघोरी विधी' यापैकी एक शब्दही बाहेर जाता कामा नये. हा माझा आदेश आहे, समजल....."
त्यांना माहीत होते की आदित्य देसाई जेव्हा इतका शांत होतो, तेव्हा नक्कीच तो खूप रागात असतो.
आदित्यने कॅमेरा घेऊन बाजूच्या जुन्या पोलीस चौकीत प्रवेश केला. ही चौकी पंधरा वर्षांपूर्वी माधवीच्या केसवेळी वापरली गेली होती, आणि तेव्हापासून ती निर्जन होती. चौकीच्या आत, वातावरणात बंदिस्त हवा आणि जुनेपणाचा वास होता. एक जुने टेबल आणि एक तुटलेली खुर्ची होती. चौकीत फाईल, डॉक्युमेंट्स असे काहीही नव्हते.
त्याने खुर्चीवर बसून कॅमेरा समोर टेबलावर ठेवला. त्याचा हात थरथरत होता. त्याला माहीत होते की या कॅमेऱ्यात तोडलेली पाऊलखूण, दफन झालेला मृतदेह आणि कदाचित कुठल्यातरी अघोरी भयानक शक्तीची पहिली साक्ष असेल.
तो कॅमेऱ्याची माती साफ करू लागला. त्याच वेळी, त्याच्या वॉकी-टॉकीवर वरिष्ठ अधिकारी देशपांडेचा कर्कश आवाज आला.
"आदित्य! लगेच रिपोर्ट कर! सोनल बेपत्ता झाली, आणि आता त्या जंगलात दुसरा एक मृतदेह मिळाला आहे अशी बातमी मिळाली आहे. हे काय चालले आहे?"
देशपांडेचा आवाज संशयास्पद आणि धमकीवजा होता.
आदित्य ने वॉकी-टॉकी उचलला, पण त्याला लगेच सोनलच्या कागदावरील शेवटचे अस्पष्ट शब्द आठवले: 'आदित्य सरांना सांगा...'
आणि माधवीच्या केसमध्ये झालेला वरिष्ठांचा हस्तक्षेप त्याला आठवला.
"सर, मी रेडिओ ब्लॅकआऊट झोनमध्ये आहे," आदित्यने शांतपणे खोटे बोलले. "रमेश कदम हा अपघात होता. गिर्यारोहण करताना पाय घसरला असावा. सोनलचा शोध अजून सुरू आहे. मी तुम्हाला सकाळी डिटेल रिपोर्ट देतो."
"ऐक, आदित्य! जर तू केसच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केलास, किंवा कोणतीही अंधश्रद्धा किंवा अघोरी गोष्ट मिसळण्याचा प्रयत्न केलास, तर मी तुला सस्पेंड करेन! ही केस लवकरात लवकर बंद झाली पाहिजे," देशपांडेने अंतिम धमकी दिली आणि कनेक्शन कट केले.
आदित्यने वॉकी-टॉकी टेबलावर आदळला. त्याचा संशय आता खात्रीत बदलला होता. देशपांडे! पंधरा वर्षांपूर्वी माधवीच्या केसची फाईल देशपांडेच्या हातातून बंद झाली होती. आणि आज तोच अधिकारी त्याला थेट जंगलात हस्तक्षेप न करण्याची धमकी देत होता.
या अघोरी शक्तीचा हा मानवी धारक (Human Host) वरिष्ठांमध्ये तर नाही ना? हा विचार त्याच्या मनात तीव्र धडकी भरवून गेला.
त्याने कॅमेरा हातात घेतला. कॅमेऱ्याची बॅटरी तपासली. ती अजूनही थोडी चार्ज होती. त्याने कॅमेरा ऑन केला. कॅमेरा हळूच सुरू झाला. त्याने गॅलरी उघडली.
पहिला फोटो: रमेश कदमचा आनंदी चेहरा, तो एका उंच कड्यावर उभा होता. सामान्य ट्रेकिंग फोटो.
दुसरा, तिसरा...: जंगलातील विविध पक्षी, नैसर्गिक दृश्ये.
आदित्य पुढे सरकला. त्याचे हृदय धडधडू लागले होते.
फोटो क्रमांक ४७:
आदित्य खुर्चीतून उठून उभा राहिला. त्याच्या शरीरातून एक थंड लहर गेली.
फोटो क्रमांक ४७ मध्ये रमेश कदम एका उंच झाडाच्या खोडावर तीव्र ताकदीने गूढ प्रतीक कोरताना दिसत होता. त्याचा चेहरा भयभीत होता, जणू तो कोणाच्यातरी आदेशाने ते कृत्य करत होता. त्याच्या डोळ्यांत अमानवी भीती होती.
"तो बळी नव्हता... तो शिकारीच्या तयारीला मदत करत होता!" आदित्य पुटपुटला.
त्याने पुढील फोटो पाहिला.
फोटो क्रमांक ४८:
रमेश कदम जंगलातील दोन शिपायांना काहीतरी अस्पष्ट निर्देश देत होता. शिपायांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते, पण त्यांच्या गणवेशावरून ते पोलीस असल्याचे स्पष्ट होते. या घटनेत पोलीस सामील होते!
आदित्यने परत फोटो झूम केला. त्यापैकी एका शिपायाच्या खांद्यावरच्या खुणेकडे (Badge) त्याचे लक्ष गेले. ती खूण महाराष्ट्राच्या विशेष तपासणी दलाची (Special Investigation Unit - SIU) होती.
आणि देशपांडे SIU मध्ये होता!
फोटो क्रमांक ४९:
हा फोटो अत्यंत अंधारात काढला होता, पण फ्लॅशमुळे रमेशचा चेहरा स्पष्ट झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम होता आणि तो एका विहिरीकडे टॉर्च दाखवत होता. तीच विहीर! सोनलने उल्लेख केलेली ती विहीर!
विहीर जुनाट, दगडांनी बांधलेली होती आणि तिच्या तोंडावर गूढ प्रतीकाची नक्षी कोरलेली होती. विहिरीच्या बाजूला, जमिनीवर, प्रचंड मोठ्या आणि गोल पाऊलखुणा स्पष्टपणे दिसत होत्या—त्याच अमानवी पंजाच्या पाऊलखुणा!
फोटो क्रमांक ५० (शेवटचा फोटो):
हा फोटो रमेश कदमच्या मृत्यूच्या किंवा हल्ल्याच्या क्षणापूर्वीचा असावा. कॅमेरा जमिनीवर पडलेला दिसत होता.
फोटोत: चिखल, रक्त आणि जंगलातील फांद्या. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये एक अस्पष्ट, पण भयानक प्रतिबिंब पडलेले होते.
ते प्रतिबिंब होते: एक मानवी आकृती, पण त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे आणि शरीर विकृत झालेले. त्या आकृतीचा एक हात चार बोटांचा दिसत होता आणि ती आकृती एका उंच झाडाच्या खोडातून बाहेर येत होती, जणू ती लाकडापासूनच बनलेली होती.
आदित्यच्या शरीरातील प्रत्येक स्नायू ताठ झाला. ही फक्त अंधश्रद्धा नव्हती. ही एक वास्तविक, अमानवी शक्ती होती. आणि ती शक्ती मानवी साथीदारांच्या मदतीने काम करत होती.
अघोरी शक्तीआणि त्याचे मानवी धारक!
आदित्यने पटकन कॅमेरा बंद केला. त्याला माहीत होते, या कॅमेऱ्यात 'त्या' शक्तीच्या मानवी धारकाचे रहस्य दडलेले आहे. पण त्याला वेळ नव्हता. त्याला सोनलला वाचवायचे होते आणि त्यासाठी त्याला 'ती विहीर' शोधायची होती.
त्याने लगेच आपले रिव्हॉल्व्हर तपासले आणि त्याच्याकडील गोळ्या मोजल्या.
त्याने टॉर्च घेतला आणि बाहेर पडला.
"पाटील! टीमला 'रणगाड्या' जवळ घेऊन ये! आम्ही जंगलाच्या उत्तर दिशेने निघत आहोत," आदित्य ने कठोरपणे आदेश दिला.
पाटील आणि शिंदे गोंधळले. "उत्तर दिशा? सर, तिथे फक्त काटावाडी नावाचे जुने गाव आहे, जे आता पूर्णपणे निर्जन आहे."
"तेच! तिथेच जायचे आहे, त्याच गावात ती विहीर आहे. चला!" आदित्यचा आवाज आता कसलाही प्रश्न विचारू देणारा नव्हता.
ते 'रणगाड्या' जवळ पोहोचले. आदित्यने 'रणगाड्याचा' इंजिन सुरू केला.
त्याच क्षणी, आदित्यच्या डोक्यात एक विचार आला. 'अघोरीशक्तीचा' मानवी धारक टीममधील सदस्य असू शकतो. पाटील आणि शिंदे. त्या दोघांपैकी कोण?
आदित्यने पाठीमागे पाहिले. पाटील आणि शिंदे जीपमध्ये चढले.
"तुम्ही दोघे मला आता एकच गोष्ट सांगाल," आदित्यने गंभीर आवाजात विचारले. "पंधरा वर्षांपूर्वी माधवीच्या हत्येच्यावेळी तुम्ही कोठे होता?"
शिंदे पटकन म्हणाला, "सर, मी तेव्हा अल्पवयीन होतो. मी तेव्हा शाळेत होतो. मला केसबद्दल काहीच माहीत नाही."
पाटीलचे ओठ थरथरले. "सर, मी तेव्हा सिंधुदुर्ग पोलीस प्रशिक्षण केंद्रात होतो. मी इथे नव्हतो."
आदित्यने दोघांकडे पाहिले. ते खोटे बोलत नव्हते, पण त्याचा संशय अजूनही मिटला नव्हता.
त्याने जीप वेगाने निर्जन रस्त्यावरून उत्तर दिशेने हाकली.
सुमारे तीस मिनिटांनंतर, 'रणगाडा' एका डोंगराच्या उतारावर थांबला. त्यांच्यासमोर काटावाडी नावाचे गाव होते. गावात मातीच्या आणि दगडांच्या २०-२५ तुटलेल्या इमारती होत्या. मध्यभागी एक जुना, काळसर झालेला वडाचे झाड उभे होते.
आदित्यने टॉर्च घेतला आणि गावात प्रवेश केला. पाटील आणि शिंदे त्याच्या मागे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य होते.
गावात प्रचंड शांतता होती. ते गाव पूर्णपणे निर्जन होते. फक्त त्यांच्या बुटांखाली सुकी पाने आणि काचेचे तुकडे चरचरत होते.
त्यांना दूरवर, वडाच्या झाडाजवळ काळसर रंगाचे एक बांधकाम दिसले.
ती विहीर!
आदित्यने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीच्या आजूबाजूला जळलेल्या लाकडाची राख होती, आणि वातावरणात मंद धूप आणि कुजलेल्या मांसाचा वास येत होता. आदित्यने ती राख पाहिली, त्याने खाली वाकून त्याच्या खिशातील रुमाल काढला आणि ती राख रुमालात बांधली.
विहिरीच्या तोंडावर काळसर, दगडाची नक्षी कोरलेली होती आणि त्यावर गूढ प्रतीकाची चित्रे कोरलेली होती.
आदित्यने टॉर्चचा प्रकाश विहिरीत टाकला. विहीर खोल होती. पाण्याऐवजी, तळाला चिखल आणि रक्ताचे डाग पसरलेले होते. आणि त्या चिखलात...
त्याला एका कोपऱ्यात एक चकाकणारी वस्तू दिसली.
आदित्यने विहिरीत उतरायचे ठरवले. त्याने पाटील ला एक दोरी आणायला सांगितली. पाटील पटकन जाऊन रणगाड्यामधून दोरी घेऊन आला. त्याने दोरी वर एका दगडाला बांधली मग आदित्यने दोरीचा आधार घेतला आणि हळूच विहिरीच्या आत उतरू लागला. पाटील आणि शिंदे बाहेर घाबरून उभे होते.
जसजसा तो विहिरीच्या आत उतरत होता तसा त्याला हवेत दमटपणा आणि कुजण्याचा वास जाणवत होता. तो त्या चकाकणाऱ्या वस्तूजवळ पोहोचला.
ती वस्तू म्हणजे सोनलचा दुसरा लॉकेट होता. त्याने लॉकेट उचलले, पण लॉकेट उचलताना त्याला लॉकेटच्या बाजूला, चिखलात कोणीतरी ओढत नेल्यासारखे दिसले. त्याने पाहिले तर ओढत नेल्याचे निशाणच्या पुढे त्याला एक भुयाराचे तोंड दिसले. भुयारातून मंद, पण वेगळी हवा येत होती.
आदित्यने भुयारात टॉर्च टाकला. भुयार खोल आणि अरुंद होते.
त्याने सोनलचा कागद आठवला: "...मला इथे... ती जागा शोधावी लागेल."
'ती जागा' ही विहीर नव्हती, तर या विहिरीतून जाणारे हे भुयार होते!
त्याने पाटीलला आवाज दिला.
"पाटील! शिंदे! मी आत जात आहे! जर मी वीस मिनिटांत परतलो नाही, तर मला फॉलो करू नका! सरळ हेडक्वार्टरला कॉल करा आणि सांगा की मी गूढ भुयारात प्रवेश केला आहे. माझ्या जिवाला धोका आहे!"
आदित्यने पिस्तूल लोड केली. त्याने कॅमेरा आणि सोनलचा कागद सुरक्षित ठेवला.
त्याने भुयारात हळूच प्रवेश केला. अंधार आणि मांसाचा कुबट वास त्याला गिळून टाकत होता. भुयार हळू हळू आणखी खोल आणि अरुंद होत गेले.
जवळजवळ दहा मिनिटांनंतर, तो भुयारातून रांगत रांगत एका मोठ्या, नैसर्गिक गुहेत पोहोचला. त्याने पूर्ण गुहेत एक नजर फिरवली. दगड व मातीने बनलेली ती गुहा केव्हाही पडेल अशी होती.
गुहेच्या मध्यभागी, एक मोठी वेदी (Altar) होती. वेदीवर जळत्या मेणबत्त्या आणि सूक्ष्म धूप होते. आणि त्या वेदीवर त्याला सोनल बांधलेली दिसली होती. तिच्या डोळ्यांवर काळसर पट्टी बांधली होती.
"(Altar) वेदी म्हणजे विधी, पूजा किंवा अर्पण करण्यासाठी वापरले जाणारे एक टेबल किंवा उंच केलेला मंच)"
पण वेदीच्या बाजूला, एक माणूस उभा होता. त्याने काळी झगा परिधान केला होता आणि त्याच्या हातात तेच गूढ प्रतीक असलेले एक खंजीर होते.
तो माणूस आदित्यकडे पाठ करून उभा होता.
आदित्यने पिस्तूल रोखले.
"हात वर कर! सोनलला सोड!" आदित्य गरजला.
तो माणूस हळूच वळला.
त्याचा चेहरा विकृत आणि रक्ताने माखलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर जखम झालेली होती.
"तू आलास, आदित्य... मला माहीत होते तू येशील," तो माणूस शांतपणे म्हणाला. "मला तुझ्यासाठी १५ वर्षांपासून वाट पाहावी लागली."
आदित्यला त्याला पाहताच एक तीव्र धक्का बसला. कारण तो माणूस आदित्यच्या ओळखीतला होता.
तो माणूस म्हणजे:
.
.
.
.
(तिसरा अध्याय समाप्त)
ही कथा काल्पनिक असून केवळ कथेची गरज म्हणून काही ठिकाणांचा आणि व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. वाचकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.
#भयकथा#रहस्यकथा#थरारकथा