Rudhirarambh - 10 in Marathi Thriller by Dr Phynicks books and stories PDF | रुधिरारंभ - 10

Featured Books
  • મારા અનુભવો - ભાગ 63

    ધારાવાહિક:- મારા અનુભવોભાગ:- 63શિર્ષક:- ભૂતપ્રેત છે ખરાં?લેખ...

  • ચક્રવ્યૂહ - સત્તાનો ખેલ - 10

    નાસિક સેન્ટ્રલ જેલની હવા અત્યારે બારુદ અને લોહીની ગંધથી ભારે...

  • એકત્વ

    એકત્વ   "स एकाकी न रमते, स द्वितीयमैच्छत्।" બૃહદારણ્યકોપનિષદ...

  • એક સ્ત્રીની વેદના

    એક અબળા,નિરાધાર, લાચાર સ્ત્રીને સમજવાવાળું કોઈ નથી હોતું. એક...

  • Icecream by IMTB

    આ રહી આઈસ્ક્રીમનો ઇતિહાસ + ભારતની ત્રણ દિગ્ગજ બ્રાન્ડ્સ (Hav...

Categories
Share

रुधिरारंभ - 10

अध्याय १०
---------------
नवीन अंधाराची साक्ष
-----------------------------

आदित्य देसाईने शिंदेला आणि देशपांडेला बाजूच्या सेलमध्ये बंद केले होते. शिंदेच्या चेहऱ्यावरचे ते क्रूर हसू आणि अंतिम धमकी आदित्यच्या मनातून जाईना.
"रुधिरारंभ गेला नाही! तो तुझ्या रक्तासोबत तुझ्या शरीरात प्रवेश करेल! आणि मग तूच या शहराचा नवा अंधार असशील!"

इन्स्पेक्टर आदित्य देसाई भूयारी चौकशी कक्षातून बाहेर पडला. त्याच्या खांद्यावरची जखम आता नुसती वेदना देत नव्हती, तर तिच्यातून उष्णतेची एक भयानक लाट संपूर्ण शरीरात वेगाने पसरत होती. ही वेदना नाही, तर अचानक येणारी, अमानवी ऊर्जा होती. त्याच्या स्नायूंमध्ये अशी ताकद भरली होती, जी त्याने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती.

त्याला चालताना थोडे चक्कर आल्यासारखे झाले म्हणून त्याने कॉरिडॉरच्या भिंतीला आधार दिला. चालता चालता त्याने भिंतीला असलेला एक लोखंडी पाईप हातात आधार म्हणून पकडला, त्याने नीट निरखून पाहिले तर जो लोखंडी पाईप त्याने जिथे पकडला होता तो पाईप अशा प्रकारे चेमटला होता जसे एखाद्याने स्ट्रॉ चेमटून फेकून दिला आहे. आदित्यला शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. 

क्षणार्धात, त्याच्या डोळ्यांसमोरच्या वस्तू विस्कळीत झाल्या. भिंतीवरचे सिमेंटचे ठिपके त्याला रक्ताचे थेंब दिसले आणि त्या रक्ताच्या थेंबांभोवती रुधिरारंभचे वर्तुळ व तिरकस रेषेचे प्रतीक कोरल्याचा भास होऊ लागला. त्याला स्पष्टपणे जाणवले की तो एकटा नाही; त्याच्या आत्म्यावर कोणीतरी कब्जा करत आहे.

त्याच्या कानात हजारो किंकाळ्यांचा गोंगाट सुरू झाला. तो कॉरिडॉरमधून चालत होता, पण त्याच्या पावलांखाली भिंत थरथरत असल्याचा भास होत होता. बाजूला उभे असलेले कॉन्स्टेबल त्याला सेवक वाटू लागले—'हे सर्व माझ्या आदेशाची वाट पाहत आहेत. मी या शहराचा नवा स्वामी आहे!'—असा विचार त्याच्या मनात विजेच्या वेगाने चमकून गेला.

त्याने डोळे बंद केले, पण अंधारातही त्याला भयानक प्रतिमा दिसल्या. त्याची बहिण माधवी आणि सोनलचे चेहरे विकृत झाले होते. ते क्रूर हसू हसून त्याला चिडवत होते: "तू हरलास, आदित्य! आता आमच्यावर राज्य कर! आम्ही तुझे गुलाम आहोत!"

त्याच्या मनात रुधिरारंभचा आवाज घोंगावत होता: "गोळी मार त्यांना! या कमजोर लोकांना नष्ट कर! तू आता शक्तिशाली झाला आहेस!"

आदित्यच्या डोळ्यांच्या कडा लाल झाल्या. त्याने ताकदीने स्वतःच्या कानांवर हात ठेवला, तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे शरीर रुधिरारंभच्या अंशाच्या ताकदीने थरथरत होते. तो स्वतःला आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांना इजा करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता.

त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी जाळी निर्माण होऊ लागली. त्याला त्याच्या मनातील एक आवाज त्याला सांगत होता: "तू आता शक्तिशाली झाला आहेस, आदित्य! तू या शहरावर राज्य करू शकतोस! देशपांडे आणि अजय अयशस्वी झाले, पण तू..."
हा आवाज रुधिरारंभचा होता.

आदित्यने दोन पाऊले मागे घेतली आणि आपल्या सेलकडे पाहिले, जिथे शिंदे आणि देशपांडे बंद होते.

सेलमध्ये:
शिंदे हसत होता, तर देशपांडे वेड्यासारखा रुधिरारंभचे मंत्र पुटपुटत होता.

आदित्यने आपल्या पिस्तुलाची नळी आपल्या डोक्यावर ठेवली. त्याला वाटले, रुधिरारंभचा नवा धारक बनण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे.
पण त्याच क्षणी, त्याला सोनलचा शांत आणि घाबरलेला चेहरा आठवला. आणि माधवीचा निर्दोष आणि शांत आत्मा आठवला.
"तू माझा बदला घेणार होतास, आदित्य! स्वतःला मारून तू रुधिरारंभला जिंकू देणार नाहीस!"
माधवीचा आवाज त्याच्या मनात घुमला.

आदित्यने पिस्तूल खाली केले. त्याला लढायचे होते. स्वतःच्या आत्म्यासाठी आणि शहराच्या मुक्तीसाठी.

त्याने त्वरीत डॉ. नीनाला (मानसोपचार तज्ज्ञ) गुप्तपणे बोलावले आणि तिला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली: "माझ्या खांद्यावरच्या जखमेवर लक्ष ठेवा! जर मी 'असामान्य' वागू लागलो, तर मला ताबडतोब औषधोपचार करा!"
आदित्यने डॉ. नीनाला सांगितले की शिंदे हा रुधिरारंभचा अंतिम मानवी धारक होता. आणि शिंदेच्या रक्ताचा अंश त्याच्या शरीरात गेला आहे.
डॉ. नीना भयभीत झाल्या, पण प्रोफेशनल होत्या. त्यांनी आदित्यच्या जखमेची तपासणी सुरू केली. आणि तात्पुरते त्याला एक इंजेक्शन दिले.

आदित्यच्या मनात रुधिरारंभचा अंश प्रवेश करत असताना, त्याने शिंदेला पुन्हा चौकशीसाठी बोलावले.
शिंदेला सेलच्या बाहेर काढले. त्याचे पाय गोळी लागल्यामुळे लंगडत होते.
"शिंदे! रुधिरारंभला सूर्यप्रकाशाची भीती वाटते, तर मग तो शहराच्या खाली का लपला होता? आणि तू या भुयारी कक्षात येताना का हसत होतास?" आदित्यने रुधिरारंभच्या अंतिम रहस्यावर प्रहार केला.


(शिंदने सांगायला सुरुवात केली)
शिंदे पुन्हा हसला. "सूर्यप्रकाश? तो तर फक्त एक मोहरा होता! रुधिरारंभला सोन्याची खाण आणि भुयार हवे होते, कारण तिथे १७ व्या शतकात त्याचा पहिला बळी दफन केला होता! तो बळीचा आत्मा त्याला अंतिम सामर्थ्य देणार होता!"

"रुधिरारंभची कथा १७ व्या शतकात, पुणे शहराच्या पायथ्याशी असलेल्या त्या सोन्याच्या खाणीत सुरू झाली. ती खाण सोन्यासाठी नव्हे, तर एका अज्ञात, क्रूर आणि शक्तिशाली 'अघोरी साधनेसाठी' वापरली जात असे.

'रुधिरारंभ' (रक्ताची सुरुवात) हा शाप एका अत्यंत क्रूर साधकाने निर्माण केला होता. तो स्वतःला या भूभागाचा 'रुधिर उपासक' मानत असे. या साधकाला विश्वास होता की, भूगर्भातील सोन्याच्या धातूमध्ये आणि वंशजांच्या 'शुद्ध रक्तामध्ये' प्रचंड ऊर्जा असते. त्याने या खाणीचा उपयोग 'अमानवी सत्ता' मिळवण्यासाठी केला आणि आपल्याच कुटुंबातील 'शक्तिशाली' लोकांना बळी दिला.

जेव्हा त्या 'रुधिर उपासकाने' स्वतःच्याच वंशजांना बळी देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याच्यावर त्याच खाणीत दफन केलेल्या बळींच्या आत्म्यांचा आणि भूगर्भातील नकारात्मक शक्तीचा 'शाप' बसला.

या शापातून 'रुधिरारंभ' ही एक 'अंधारी चेतना' (The Dark Consciousness) जन्मली. ती चेतना उपासकाच्या इच्छेनुसार वंशजांना 'सत्ता' देऊ इच्छित होती, पण ती सत्ता देण्यासाठी त्यांना त्याच क्रूर मार्गाने 'रक्तबळी' द्यावा लागत असे. ही चेतना एका शरीरातून दुसऱ्या शरीरात लोभाने प्रवास करते.

१७५० च्या दशकात, स्थानिकांनी या हत्या थांबवण्यासाठी या खाणीवर हल्ला केला. त्यांनी त्या क्रूर उपासकाला ठार मारले, पण त्याची 'रुधिरारंभ' चेतना खाणीच्या अंधारात अडकून पडली.

त्यांनी खाणीचा मुख्य दरवाजा 'सील' केला आणि त्यावर 'सूर्यप्रकाशात या अंधाराचा नाश होईल' असा मंत्र कोरला. यामुळे रुधिरारंभची शक्ती अंधारात (भुयारात) लपून राहिली आणि केवळ मानवी लोभ किंवा वंशजांच्या माध्यमातूनच बाहेर पडू शकली.

"त्या 'रुधिर उपासकाने' भूगर्भातील शक्तीला बांधून ठेवण्यासाठी हे प्रतीक कोरले. वर्तुळ हे सोन्याच्या खाणीतील भूगर्भाचे आणि दोन तिरकस रेषा या रक्ताच्या आणि बळीच्या कराराचे प्रतीक आहेत. हे प्रतीक शापाच्या अखंडतेचे आणि रुधिरारंभच्या अटळ नियमांचे दर्शवते."

आणि मी इथे भुयारी कक्षात येताना हसत होतो, कारण मी तुला फसवले आहे!" असे म्हणून शिंदे पुन्हा हसायला लागला.

"काय फसवले?" आदित्यने पटकन विचारले.

शिंदेने कबूल केले: "मी तुला मारलेल्या चाकूवरील रक्त माझे नव्हते! ते रक्त मी जंगलातील पहिल्या विधीच्या जागेवरून गोळा केले होते—माधवीच्या बळीच्या ठिकाणापासून आणलेल्या अशुद्ध प्राण्याचे रक्त! मी ते रक्त फक्त तुझ्यावर हल्ला करण्यासाठी वापरले. रुधिरारंभचा अंश तुझ्या शरीरात गेला आहे, तो आता तुला वेडा करेल! मी तर फक्त 'विषाचा वाहक' होतो!"

आदित्यला प्रचंड धक्का बसला. शिंदेने स्वतःच्या रक्ताचा उपयोग न करता, त्याला विषारी रक्ताचा अंश दिला होता!
रुधिरारंभला शुद्ध धारक मिळाला नाही, तर तो अशुद्ध धारक तयार करून आदित्यला मानसिकदृष्ट्या नष्ट करणार होता.

"तू अंतिम राक्षस आहेस, शिंदे!" आदित्य रागाने ओरडला.

"राक्षस? नाही! मी या शहराचा भविष्य आहे!" शिंदेने अंतिम, तीव्र हसू केले.


आदित्यने शिंदेला बेड्या ठोकल्या आणि तो तीव्र वेदना दाबून त्याला पाहत होता आणि त्याला पुन्हा सेल मध्ये बंद केले. त्याच क्षणी बाजूच्या सेलमध्ये बंद असलेला वरिष्ठ अधिकारी देशपांडे वेड्यासारखे अगदी मोठमोठ्याने रुधिरारंभचे मंत्र पुटपुटत होता. अचानक त्याने ते हसणे थांबवले. सेलमध्ये एक तीव्र, कर्कश हाडे मोडल्याचा आवाज घुमला. तो इतका भयानक होता की कॉरिडॉरमधील इतर पोलीस थरथरू लागले.

"आदित्य! तू मला मोहरा बनवलेस! तू माझ्या मुलाला मारलेस! पण रुधिरारंभचे सामर्थ्य फक्त मलाच हवे आहे! मी अजयचा बाप आहे! मीच खरा धारक आहे!" देशपांडेने गर्जना केली.

त्याची छाती वेगाने फुगू लागली. त्याच्या शरीराने लोखंडी सेलच्या भिंतीला एका प्रचंड ताकदीने धडक दिली. त्याचे अंगावरचे कपडे कागदासारखे फाटले, आणि त्याचे स्नायू कठीण, काळसर आणि जाड, भुयारातील दगडांसारखे झाले. त्याची मान एकदम जाड झाली आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वाळांसारखे लाल झाले, आणि नंतर पांढरेशुभ्र आणि रक्ताच्या नसांनी भरलेले. त्याच्या तोंडातून काळसर लाळेसह तीक्ष्ण, मानवाच्या नसलेले, शिकारी प्राण्यांचे दात बाहेर आले. त्याचे शरीर पाठीत वाकले, उंचीने वाढले आणि तो चार पायांवर उभा राहिला. हा त्याचा रुधिरारंभचा अंतिम, अत्यंत विकृत आणि क्रूर अवतार होता. त्याचे नखे भुयाराच्या धारदार दगडांसारखी होती. त्याने आपल्या अमानवी ताकदीने सेलच्या लोखंडी गजांना वाकवून बाहेर पडायला सुरुवात केली.


शिंदेने पायातील गोळीची वेदना विसरून वेड्यासारखे हसून म्हटले, "तो तुझ्या रक्ताच्या स्पर्शाने जागृत झाला आहे, आदित्य! तो तुझा बाप आहे, आणि तोच तुझा अंतिम बळी आहे!... तू आता वाचणार नाहीस!"

देशपांडे सेलचे दार अक्षरशः तोडून, एका नरभक्षक पशूच्या वेगाने आदित्यच्या दिशेने धावला. भुयारी कक्षाच्या फरशीवर त्याच्या भुयाराच्या दगडांसारख्या नखांचे ओरखडे उमटले.

आदित्यच्या खांद्यावरची जखम अग्नीसारखी पेटून उठली. रुधिरारंभचा अंश त्याच्या आत आरडाओरडा करत होता: "याला मार! तुझ्या शरीराची परीक्षा घे! तू आता अंतिम स्वामी आहेस!" आदित्यने त्याच्या जखमेच्या वेदना बाजूला ठेवत, स्वतःच्या मनातील अंशाशी आणि बाहेरील अंतिम धारकाशी लढायला सुरुवात केली. त्याचे मन आणि आत्मा यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले.

देशपांडेने जंगली वाघाच्या क्रौर्याने आदित्यवर उडी घेतली. आदित्यने स्वतःला बाजूला झोकले, पण देशपांडेची धारदार नखे त्याच्या छातीच्या जॅकेटला ओरखडून गेली आणि देशपांडेची नखे भिंतीतून आरपार गेली. देशपांडेने आपली अमानवी ताकद वापरून भिंतीतून नखे काढली आणि त्या सिमेंटच्या ढिगाऱ्याने आदित्यला मारण्याचा प्रयत्न केला. आदित्यला माहीत होते, या राक्षसाला गोळी मारून काही उपयोग नाही.

आदित्यने पिस्तूल बाहेर काढले आणि पिस्तुलाचा फायर देशपांडेच्या डोक्याच्या दिशेने केला. गोळ्या आदळताच देशपांडेच्या चेहऱ्यातून काळा, दुर्गंधीयुक्त रक्तस्राव झाला, पण गोळी त्याला वेदना न देता आत गेली. रुधिरारंभच्या अंशाने देशपांडेचा देह अभेद्य बनवला होता. संपूर्ण हेड क्वार्टर मध्ये हाहाकार माजला होता. बाकी सर्व पोलीस घाबरले होते. ते सर्वजण वेड्या सारखे देशपांडे वर गोळीबार करत होते. त्या गोळीबारामुळे रुधिरारंभ च्या शरीरातून काळा दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव चालू झाला. त्याच्यावर झालेल्या गोळीबारामुळे तो आणखी चवताळला. देशपांडे सर्वांना मारत होता. सर्वांना उडवून लावत होता.
देशपांडेने सेलचे लोखंडी गज उपटून काढले आणि ते शस्त्रासारखे आदित्यच्या दिशेने फेकले. आदित्य टेबलच्या आडोशाला लपला. त्याला समजले, या राक्षसाला शस्त्राने हरवता येणार नाही, केवळ त्याचे 'तत्वज्ञान' वापरूनच नष्ट करावे लागेल.

आदित्यला आठवले, 'सूर्यमृत्यू' आणि 'अशुद्ध रक्त'. त्याने त्वरीत आपल्या जॅकेटमधून रुमाल बाहेर काढला ज्यात पाटीलने गोळा केलेल्या राखेचे (ज्यात अशुद्ध रक्ताचा अंश होता) मिश्रण होते. तिकडून देशपांडे आदित्यकडे धावत येऊ लागला. त्याने जवळ येऊन टेबल लांब फेकून दिला आणि आदित्यला एका हाताने गळ्याला पकडून उचलले. आदित्यच्या गळ्यावर त्याची पकड इतकी मजबूत होती की आदित्यचे डोळे पांढरे पडायला लागले, आदित्य हातपाय झाडू लागला. त्याला काय करावे सुचेना. त्याच्या हातात अजूनही तो रुमाल होता. त्याने ते मिश्रण असलेला रुमाल एका क्षणात देशपांडेच्या तोंडावर आणि डोळ्यांवर फेकले. राख आणि अशुद्ध रक्त देशपांडेच्या त्वचेला स्पर्शताच त्वचेला फोड येऊन तिखट, लाल-काळसर धूर बाहेर पडला. आदित्यच्या गळ्यावरील त्याची पकड ढिली पडली. आदित्य त्याच्या जीवघेण्या पकडीतून निसटला. देशपांडे जोरजोरात ओरडू लागला. देशपांडेने अमानवी, वेदनेची किंकाळी मारली. ही किंकाळी एवढी भयानक होती की, या किंकाळीने कक्षातील सर्व काचा तुटल्या. 

त्याच क्षणी, डॉ. नीना धावत आल्या, ज्या अँटीडोट घेऊन आल्या होत्या. आदित्यने पिस्तुलाच्या बाजूला असलेल्या हँडलमध्ये (ज्यामध्ये तो अँटीडोट घेऊन आला होता) डॉ. नीनाने आणलेले अँटीडोट भरले आणि देशपांडे जो अजूनही आदित्यने फेकलेल्या मिश्रणामुळे कमकुवत झाला होता. आदित्यने पळत जाऊन संपूर्ण ताकद लावून देशपांडेंच्या पाठीवर चढला. देशपांडे त्याला उडवू पाहत होता पण तो कमजोर पडला होता. आदित्यने पटकन देशपांडेच्या मानेतील धमनीमध्ये अँटीडोट टोचले. जसे ते अँटीडोट देशपांडेंच्या मानेत शिरले तो अजून बिथरला, त्याने आदित्यला हात उलटा करून पकडले आणि एक जोरदार ठोका मारला. आदित्य उडून भिंतीवर आदळला आणि खाली पडला. त्याला जबरदस्त मार लागला होता. तरी तो कसाबसा स्वतःला सावरून उभा राहिला. सगळे पोलिस घाबरले होते, त्यांनाही बराच मार लागला होता. देशपांडे जोरजोरात आरडाओरडा करू लागला. भिंतीवर हात मारू लागला.

अँटीडोट शरीरात गेल्यामुळे त्याचा परिणाम होऊ लागला. देशपांडेच्या डोळ्यांतली पांढरी क्रूरता क्षणात विरली. त्याने भयावह किंकाळी मारली. देशपांडे चे शरीर हवेत वर उचलले गेले. रुधिरारंभचा अंश त्याच्या शरीरातून लाल-काळसर धुरासारखा बाहेर पडू लागला. तो धूर बाहेर पडताना देशपांडे चे शरीर वेडे वाकडे होऊ लागले. त्याचे डोळे गळून बाहेर पडले. डोळ्यांची जागा निकामी झाली. डोळ्यांच्या जागी फक्त खोल खोबणी राहिल्या ज्या एकदम लाल काळसर रक्ताने भरलेल्या होत्या. त्याचे दोन्ही हात मोडल्याचा जोरदार आवाज आला. त्याचे दोन्ही पाय मोडून उलटे पाठीकडे झुकले. पाठीचा कणा मधून तुटला आणि शरीरातून बाहेर आला. देशपांडेला हे सहन होत नव्हते. तो जोरजोरात ओरडत होता. रुधिरारंभ चा अंश त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागातून बाहेर पडू लागला. संपूर्ण कॉरिडॉर मध्ये लाल काळसर धूर लागला. शेवटी त्याच्या डोक्याची कवटी फुटल्याचा जोरदार आवाज झाला व सर्व कॉरिडॉर मध्ये लाल काळसर रक्त उडाले. देशपांडे ने एक इतकी जोरदार मानवी किंकाळी मारली की तिथे असलेले सर्वजण घाबरले. कॉरिडॉर क्षणात शांत झाला. 
देशपांडे चे शरीर कॉरिडॉरच्या छतावर आदळून एका क्षणात जमिनीवर केवळ निर्जीव मानवी देह बनून कोसळला. देशपांडे चा देह निष्प्राण पडला होता. त्याचा देह इतका छिन्न विच्छिन्न झाला होता की त्याकडे कोणालाही बघू वाटत नव्हते. सर्वजण घाबरले होते.



सर्वांना वाटले की रुधिरारंभ चा शेवट झाला.



त्याच क्षणी, आदित्यच्या डोळ्यांसमोरच्या अंधाऱ्या प्रतिमा वास्तविक वाटू लागल्या. त्याला वाटू लागले की शिंदेला गोळी मारावी, आणि सोनलला घेऊन शहरावर राज्य करावे. 
त्याच्या शरीरात अजूनही शिंदेने मारलेल्या चाकूचे रक्त होते.
डॉ. नीना धावत आल्या. त्यांनी आदित्यला तपासले, "आदित्य! तुझा ताप वाढत आहे! तुझ्या रक्तातील अशुद्ध घटक मानसिकतेवर परिणाम करत आहेत!"

आदित्यने पिस्तूल उचलले, पण ते शिंदेच्या दिशेने नाही, तर डॉ. नीनाच्या दिशेने रोखले. तो डॉ. नीना ला गोळी मारणार होता.
रुधिरारंभचा अंश त्याच्यावर प्रभावी होत होता. कारण त्याला तो चाकू लागला होता ज्यावर अशुद्ध प्राण्याचे रक्त होते.

"तू शांत हो, डॉ. नीना! मला कोणाचेही बोलणे ऐकायचे नाही! मी सत्ताधारी आहे!" आदित्यचा आवाज जाड आणि घोगरा झाला.
शिंदे विजयाच्या आनंदाने हसू लागले. त्याचे कार्य यशस्वी झाले होते.

डॉ. नीना भयभीत झाल्या, पण त्यांनी हिंमत ठेवली. "आदित्य! तू इन्स्पेक्टर आहेस! तू न्याय आणि सत्यासाठी उभा राहिलास! रुधिरारंभला विजयी होऊ देऊ नकोस!"

आदित्यचे मन आणि आत्मा यांच्यात भीषण लढाई सुरू झाली. 
आदित्यला माधवीचा शांत आणि प्रेमाचा चेहरा आठवला. तिने डायरीत जे लिहिले होते—'आदित्य! तू माझा बदला घेणार होतास! तू सत्य आहेस!'

आदित्यने पिस्तुलाचा ट्रिगर दाबण्याऐवजी, त्याने ते पिस्तूल जमिनीवर फेकले.

आदित्य जमिनीवर कोसळला. अंतिम वेदनेची एक तीव्र किंकाळी त्याच्या शरीरातून बाहेर पडली.
त्याच्या आतल्या रुधिरारंभच्या अंशाने आत्मसमर्पण केले होते. त्याला शुद्ध धारक मिळाला नाही, आणि अशुद्ध धारकाने त्याला झिडकारले.

डॉ. नीना आणि शिंदे दोघेही आश्चर्याने पाहू लागले.
आदित्यने वेदना दाबून ठेवली आणि डॉ. नीनांना मंद आवाजात सांगितले: "मला शुद्ध करा! त्याच्या रक्तातून आणि विचारातून मुक्त करा!"
डॉ. नीनाने तात्काळ त्याला अत्यंत शक्तिशाली अँटीडोट (Antidote) आणि शामक औषधे दिली. आणि आदित्य बेशुद्ध होऊन खाली पडला. डॉ. नीना त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या पण आदित्य जराही हलला नाही. डॉ. नीनाने त्याच्या मानेवर हात ठेऊन त्याची नस तपासली. त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडू लागले होते. डॉ. नीना घाबरल्या त्या पटकन ओरडल्या, "ॲम्ब्युलन्स ला बोलवा लवकर...."
आदित्यचे हृदय बंद पडत होते. ॲम्ब्युलन्स आली, त्यांनी ऑक्सिजन मास्क लावला आणि आदित्यला उचलून हॉस्पिटलला घेऊन गेले.

अखेर 

दोन दिवसांनंतर, इन्स्पेक्टर आदित्य देसाई हॉस्पिटलच्या एका शांत खोलीत रिकव्हर (Recover) होत होता.

शिंदेला अजय सावंतच्या हत्येमध्ये आणि रुधिरारंभच्या विधीतील मानवी सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वरिष्ठ अधिकारी देशपांडे आणि त्याचा मुलगा अजय सावंत यांचा भुयारी कक्षात झालेल्या संघर्षात मृत्यू झाला. त्यांच्यावरील मानसिक विकृतीचा ठपका पोलीस खात्याने स्वीकारला.

सोनल मानसिक आघातातून बाहेर पडली आणि तिने नवीन आयुष्याची सुरुवात केली.
माधवीच्या डायरीतील आणि रमेश कदमच्या कॅमेऱ्यातील माहिती गोपनीय ठेवण्यात आली, कारण अघोरी शक्तीचे सत्य उघड केल्यास समाजात भय निर्माण होईल, असा वरिष्ठांचा निर्णय झाला.

आदित्यने हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर पाहिले. सूर्यप्रकाश पुण्यावर शांतपणे पसरलेला होता.
रुधिरारंभ शांत झाला होता.
आदित्यच्या मनात एक नवीन आवाज आला. तो आवाज शांत आणि आत्मविश्वासाचा होता:
"मी जिंकलो."

त्याने माधवीच्या डायरीचे शेवटचे पान वाचले. 'सूर्यप्रकाशात तुझा विनाश निश्चित आहे.' माधवीचा शांत आत्मा जिंकला होता.

आदित्यला माहीत होते, शहरातील अंधार मानवी लालसेतून आणि मोहातून पुन्हा जन्म घेईल. पण तो नवीन अंधाराचा सामना करण्यासाठी तयार होता. तो आता अधिक शक्तिशाली होता, कारण त्याने स्वतःच्या मनातील आणि बाहेरील सर्वात मोठ्या राक्षसाला हरवले होते.

त्याने हळूच आपल्या जखमेकडे पाहिले. जखम भरली होती, पण त्वचेखाली एक गूढ, सोनेरी रंगाची बारीक रेषा उमटलेली होती. ती रेषा रुधिरारंभच्या अंशाची अंतिम साक्ष होती, जी त्याला भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अंधाऱ्या शक्तीची चाहूल देणार होती. इन्स्पेक्टर आदित्य देसाई आता 'अंधारातील साक्ष' देणारा आणि 'शापाचा सूक्ष्म वाहक' (Subtle Carrier of the Curse) बनलेला एक अंतिम साक्षीदार होता.

इन्स्पेक्टर आदित्य देसाई आता 'अंधारातील साक्ष' देणारा एक अंतिम साक्षीदार बनला होता.
रुधिरारंभच्या भयावह कथेचा हा भाग संपला होता.


-----



"रुधिरारंभ हा केवळ एक आत्मा किंवा एखादा भूताचा प्रकार नाही. सह्याद्रीच्या खोल भुयारात, जिथे मानवी लोभ आणि अज्ञात, अघोरी शक्ती एकत्र आल्या, तिथे हा शाप जन्मला. 'रुधिरारंभ' म्हणजे 'रक्ताची सुरुवात'. ही एक अशी 'अमानवी चेतना' (Inhuman Consciousness) आहे, जी स्वतःला या जंगलाचा आणि पर्यायाने, या शहराचा 'सत्ताधारी' मानते.

या चेतनेला मानवी शरीरात प्रवेश करण्यासाठी 'वंशजांच्या' शुद्ध रक्ताची गरज असते. एकदा धारकात प्रवेश केल्यानंतर, तो धारक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकृत होतो—डोळे पांढरेशुभ्र होतात, मानवी स्नायू क्रूरपणे फुगतात आणि त्याची उंची असामान्यपणे वाढते. धारकाच्या मनात 'सत्ता आणि अमरत्वाची' अशी लालसा निर्माण होते, जी त्याला अंतिम क्रौर्याकडे नेते. रुधिरारंभला 'सूर्यप्रकाशाची' भीती वाटते, कारण तो 'लोभ आणि अंधारातून' जन्मलेला एक जीवंत शाप आहे.

जी व्यक्ती याच्या मोहात पडते, तीच त्याची पहिली शिकार आणि त्याचे पहिले माध्यम (Medium) बनते. रुधिरारंभची खरी भीती ही आहे की, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत राहतो—जोपर्यंत त्याच्या वंशजांचे रक्त शिल्लक आहे."



कथा समाप्त


ही कथा काल्पनिक असून केवळ कथेची गरज म्हणून काही ठिकाणांचा आणि व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. वाचकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.