१बोलका वृद्धाश्रम कादंबरी
या पुस्तकाविषयी
मी सध्या वृद्धाश्रम नावाची कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरी लिहिण्याचा हेतू म्हणजे ती तरुणमंडळी आहेत की जी शिकतात. उच्च शिक्षण घेतात. मोठमोठ्या पदावर जातात. लोकांना ज्ञान वाटत फिरतात. वृद्धाश्रमावर व वृद्ध अवस्थेवर मोठमोठी भाषणं ठोकतात. परंतु त्यांच्या घरात थोडंसं झाकून पाहिलं तर त्यांचे आईवडील हे वृद्धाश्रमात असतात. एक असाच प्रसंग. मी वृद्धाश्रमाविषयी लिहिलं व तो लेख एका ग्रुपवर पोष्ट केला. ज्यात मोठमोठे अधिकारी होते. त्यातील एका अधिकाऱ्यानं बहुतेक ती पोष्ट वाचली असेल. त्यानुसार त्यानं प्रतिक्रिया दिली. म्हटलं की अशी पोष्ट इथं टाकू नका. त्यानंतर त्यानं तशी प्रतिक्रिया का दिली. हे पडताळून पाहात असतांना कळलं की त्यानं आपले आईवडील वृद्धाश्रमात टाकलेले आहेत.
प्रसंग..... प्रसंग उच्च शिकण्याचा वा शिकण्याचा नाही. शिक्षणाचा उद्देश तसा नाही. परंतु आज उच्च शिकलेल्या लोकांत अशा आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ असा की अडाणी व्यक्ती आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवत नाहीत काय? कदाचीत तेही ठेवत असतीलच. परंतु ते माझ्या पाहण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे शिक्षणाचा उद्देश हा केवळ स्वतःला आत्मनिर्भर करणे नाही तर त्या शिक्षणातून सेवेचे मुल्य विकसीत व्हायला हवे. शिकलेल्या लोकांनी जाणीव ठेवायला हवी की आपले आईवडील आपल्याला शिकवतात. आपला अभ्यास घेतात. आपलं दुखलं खुपलं पाहतात. आपल्याला आजारात मदत करतात. आपल्याला उन्हातून सावलीत नेतात. आपले लाड पुरवतात. बदल्यात आपण काय करतो? आपण मोठे झालो. आपल्याला पत्नी आली की आपण तिच्या म्हणण्याला दुजोरा देत आपल्या स्वतःच्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत असतो. हेच का आपलं शिक्षण? याला शिक्षण तरी म्हणता येईल काय? यासाठीच आपले आईवडील आपल्याला शिकवतात काय? याचं उत्तर नाही असंच येतं. जर हाच शिक्षणाचा उद्देश असेल तर प्रत्येक आईवडीलांनी आपल्या मुलांना शिकवूच नये. कारण शिक्षणातून संस्कार वाढायला हवेत. परंतु ते वाढत नाहीत. याऊलट जे शिकलेले नसतात. ती मंडळी आपल्या आईवडीलांना सांभाळतांना दिसतात. त्यांचे लाड पुरवतांना दिसतात. ते केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतांना दिसतात. याचाच अर्थ असा की अज्ञानी लोकांजवळ संस्कार आहेत व तीच मंडळी संस्कार जोपासतांना दिसतात. म्हटलं जातं की आम्ही पाश्चात्य विचारसरणीनं जगतो. पाश्चिमात्य देशात अशीच पद्धती आहे. तिथं वयोवृद्धासाठी अशीच व्यवस्था आहे. तिथं जे काही आहे, ते घ्यायला हवं. कारण परीवर्तन ही काळाची गरज आहे. ते परीवर्तन स्विकारायला नको का? होय, परीवर्तन स्विकारायलाच हवं. परंतु कोणतं? ज्या गोष्टी चांगल्या असतील, त्याच स्विकारायला हव्यात. वाईट गोष्ट त्यागायला हव्यात. याबाबत उदाहरण देतो. जशी सतीप्रथा वाईट गोष्ट होती. ज्यात एका स्रिचा विनाकारण जीव जात होता. देवदासीप्रथा वाईट गोष्ट होती. ज्यात एका स्रिची देवाच्या नावावर अब्रू लुटली जात होती. बालविवाह प्रथा वाईट प्रथा होती. ज्यात एका स्रिची ती वयात येण्यापुर्वी रितसर राजरोषपणे तिची स्वतःची परवानगी नसतांना अब्रू लुटली जात होती. केशवेपण प्रथेनं एका स्रिचा सन्मान हिरावला जात होता. या सर्व वाईट प्रथा आपण काळाच्या ओघात व पाश्चिमात्य देशातील प्रभावानं नष्ट केल्यात व आपल्यात सामाजिक परीवर्तन घडवून आणलं. यात जे योग्य होतं, ते आपण केलं. परंतु याचा अर्थ असा नाही की आणखी पुढं जावं. आणखी पुढं जावं म्हणजे तोकडे कपडे वापरणे. पाश्चिमात्य देशात दमट हवामान असल्यानं तिकडे तोकडे कपडे वापरणे साहजीकच आहे. अशा दमट वातावरणात पाश्चिमात्य देशात सेक्सचे प्रमाण वाढत असल्यानं व ती भावना संबंधीत एकाच घटकात जास्त प्रमाणात वाढत असल्यानं व दुसऱ्या घटकाची तीच भावना खुंटावत असल्यानं एकाची वाढलेली उत्तेजना नियंत्रित होत नाही. म्हणूनच तेथील स्त्री-पुरुष एकाच जोडीदाराजवळ टिकत नाहीत. साधारणतः यातूनच मुलं ही सोडली जातात व त्यात मुलांचा दोष नसल्यानं त्यांचं संगोपण व्हावं म्हणून तेथील मुलांसाठी अनाथालये उभारली जातात. तसंच वृद्धाश्रमाचंही आहे. तेथील स्री पुरुष एकाच जोडीदाराजवळ टिकत नसल्यानं त्यांच्या मायबापाची सेवा करणारं कोणीही नसतं. म्हणूनच त्यांच्यासाठी वृद्धाश्रम असतं. तसं पाहिल्यास आज पाश्चिमात्य संस्कृती आपलं अनुसरण करीत आहे. मानत आहे की येथील संस्कृती प्राचीन आणि चांगली असून त्यात मानसन्मान आहे. मानत आहे की तेथील विवाह पद्धती चांगली आहे व ती विवाह पद्धत मुलांमध्ये संस्कार वाढीस लावते. अन् हेही मानत आहे की ज्या जीवाला जन्म दिलाय, त्या जीवांचं पालनपोषण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ती संस्कृती ह्याही गोष्टी मानायला लागली आहे की एक प्राणी आपल्या मुलाला आत्मनिर्भर करेपर्यंत त्याला सोडत नाही. मग आपण का सोडावं आपल्या लेकरांना. ते आता आपल्या आईवडीलांनाही वृद्धाश्रमात पाहू शकत नाहीत आणि आता त्यात बराच बदलाव आलेला असून तेथील अनाथालयाची व वृद्धाश्रमाची संख्या कमी होत आहे. ही वास्तव परिस्थिती आहे. आता तेथील बरेचसे विवाहही करार पद्धतीनं लागत नाहीत तर त्यात संस्कार शिरलेला आहे. त्या विवाह पद्धतीत भारतीय संस्कृती आलेली आहे. कारण भारतीय संस्कृती ही खरंच महान आहे, हे तेथील लोकांनाही कळलेलं आहे. फक्त पोशाख वापरण्यातच तेवढा बदलाव झालेला नाही. कारण तेथील वातावरण. ते वातावरण दमट आहे व त्या वातावरणात अंगावर कपडे सहन होत नाहीत. म्हणूनच त्यांच्यात तोकडा पोशाख. शिवाय अशा दमट वातावरणात कपडे लवकर फाटतात. म्हणूनच ते फाटलेलेही कपडे घालतात. ती मंडळी ते कपडे वारंवार घेत नाही आणि आपण तसे फाटलेले कपडे आपल्याकडे वातावरण चांगलं असतांनाही घालतो फॅशनच्या नावाखाली. खरंच आपली संस्कृती महान असतांना, तसेच विदेशी लोकं आपल्याच संस्कृतीला महान समजत असतांना, त्यातच आपल्या संस्कृतीला महान मानून ह्याच संस्कृतीचा ते अंगीकार करीत असतांना आपण आपल्या महान संस्कृतीला महान का समजत नाही? हा प्रश्न पडतो. खरंच आपली संस्कृती महान आहे व याच संस्कृतीला धरुन आपण चालावं. या संस्कृतीला मोडून कोणीही नेस्तनाबूत करु नये. हं, फॅशनच्या नावाखाली कमी कपडे घालणे ठीक आहे. कारण ती आपली आवडनिवड आहे. त्यात कोणीही कोणाला बोलू शकत नाही. परंतु आपल्या स्वतःचीच मुलं अगदी लहान असताना बेवारस सोडून भलत्याच व्यक्तीसोबत पळून जाणं ही आपली संस्कृती नाही. तसाच विवाह केल्यानंतर याच नादात आपली चांगली पत्नी वा चांगला पती सोडणं ही काही आपली संस्कृती नाही. तसंच ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिला. आपल्याला लहानाचं मोठं केलं. त्या मायबापाचं म्हातारपण येताच त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवता त्यांना वृद्धाश्रमात टाकणं. ही काही आपली संस्कृती नाही. विदेशी संस्कृतीत असेलही हे सुरु. परंतु भारतात सध्यातरी ते सुरु करु नये. आता कोणी म्हणतील की तो आमचा प्रश्न आहे. आम्ही स्वतंत्र आहोत. तुम्ही कोण बोलणार. यामध्ये स्वतंत्र्यता असावी. परंतु अशी स्वतंत्रता नसावी की ज्यातून आपण सोडून गेल्यावर व प्रेमासाठी दुसऱ्यासोबत पळून गेल्यावर आपल्याच जन्म दिलेल्या लेकरांचे हालहाल होतील. अशी स्वतंत्रता नसावी की ज्यातून आपल्याला उन्हातून सावलीत नेणारे व शिक्षण शिकवून आत्मनिर्भर करणारे आपलेच मायबाप वृद्धाश्रमात पडतील. बिचाऱ्या आईवडीलांनी आपल्याला जन्म दिलाय. लहानाचं मोठं केलंय. आपल्याला शिक्षण शिकवून आत्मनिर्भर केलंय. कशासाठी? म्हातारपणात आपली मुलं आपला आधार बनावा म्हणूनच ना. अन् जर ती मुलं विदेशी संस्कृतीच्या नादानं आपल्या मायबापाची सेवा करीत नसतील तर अशा मुलांनी जन्मच घेवू नये. त्यापेक्षा प्रत्येक मायबापानं वांझ असलेलं बरं. विशेष सांगायचं झाल्यास आपली संस्कृती महान आहे पुरातन काळापासून. आपल्या संस्कृतीत पुर्वी संयुक्त कुटूंब पद्धती होती व त्या पद्धतीत फार मोठा आधार असायचा कुटूंबातील सदस्यांना. त्यातच अगदी लहानपणापासून आपल्याच लेकरांवर आबालवृद्धांचे संस्कार पडत. त्यातच आबालवृद्ध जरी म्हातारे झाले तरी त्यांना त्यांची लेकरं हाकलून देत नसत. उलट त्यांचा एखाद्यावेळेस कठीण प्रसंगी सल्ला घेत. ज्यातून स्वतःला सावरायला मदत होत असे. परंतु जसा काळ बदलला. तसा पाश्चिमात्य संस्कृतीचा संपर्क आला. मग विभक्त कुटूंब पद्धती आली. ज्यातून मुल्य व नीतीमत्ता नष्ट झाली. माणूसपण हरवलं व एक फार मोठा झपाट्यानं बदल झाला. ज्याला परीवर्तन हे नाव दिल्या गेलं. स्वतंत्रतेच्या कल्पना मांडल्या गेल्यात. जी स्वतंत्रता पाश्चिमात्य लोकांची वेगळीच होती. भारताची वेगळीच. तरीही भारतानं त्यांची स्वतंत्रता स्विकारली व देश बरबाद झाला. आज आपल्या भारतात कितीतरी मिनीटागणिक घटस्फोट होतात. कारण असतं, तो वा ती दुसऱ्यासोबत लटकून आहे. पळून गेलेला/ गेलेली आहे. याच प्रकारानं आज वृद्धाश्रम व अनाथालयाचीही संख्या वाढत आहे व हा चिंतेचा प्रश्न आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास पाश्चिमात्य संस्कृतीचं आपण जे अनुसरण करीत आहोत. ते करु नका असं मी म्हणत नाही व माझं तसं मानणंही नाही. फक्त एकच विनंती असेल की पाश्चिमात्य संस्कृतीतील चांगल्या गोष्टी तेवढ्या घ्याव्यात. वाईट गोष्टी कृपया घेवू नयेत. त्या सोडाव्यात. परीवर्तन नक्कीच करावं. परंतु ते चांगल्या गोष्टीचं करावं. वाईट गोष्टींचं नाही. शेवटी हेही आवर्जून सांगणं राहिल की हवसेसाठी कुणासोबत पळून जावून आपली कामवासना पुर्ण करण्याचा विचार करीत असतांना तसेच घटस्फोटाचा विचार करीत असतांना आपल्या लेकरांचा नक्कीच विचार करावा. त्यांना अनाथालयात पाठवू नये. अन् तसं करायचंच असेल तर कोणीही लेकरांना जन्मास घालू नये. शिवाय ही देखील गोष्ट लक्षात घ्यावी की कोणीही म्हातारपणात आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकू नये. त्यांना ते वयोवृद्ध होताच अंतर देवू नये. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही घडले. ते जर नसते तर तुमचा जन्मही नसता आणि तुम्ही कधीच आत्मनिर्भर झाले नसते. त्यातच तुम्हाला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार नसता. हे तेवढंच खरं. माझी कादंबरी यावरच आधारीत असून या कादंबरीतील नायक व नायिकेनं आपल्या तरुणपणात अनेक हालअपेष्टा भोगल्या. त्यांना वाटत होतं की म्हातारपणात तरी सुख येईल. आपली मुलं पोषतील. परंतु जेव्हा म्हातारपण आलं. तेव्हा सुख हरवलं. कारण त्या काळात त्यांच्याच शिकलेल्या मुलांनी आपल्या जन्मदात्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकलेलं होतं. वृद्धाश्रम नावाची माझी एकशे आठवी पुस्तक वाचकांच्या हातात वाचायला देतांना आनद होत आहे. ही कादंबरी आहे, त्या वृद्धांच्या जीवनावर लिहिलेली. बिचाऱ्यांनी आयुष्यभर सुख पाहिलं नाही. अपेक्षा केली की आम्हाला म्हातारपणात सुख मिळेल. आमचीही मुलं आमचा आधार बनतील. परंतु असं घडलं नाही. ज्या मुलांना त्यांनी शिकवलं. उन्हातून सावलीत नेलं. आत्मनिर्भर बनवलं. त्याच मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात टाकलं. पुढं काय काय घडलं? तसेच त्यांच्या एकंदर जीवनात काय काय घडलं? हे माहित करुन घेण्यासाठी ही पुस्तक वाचणे गरजेचे. आपण ती वाचावी व एक फोन प्रतिक्रिया म्हणून मला अवश्य करावा ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०