Bolka Vruddhashram - 3 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | बोलका वृद्धाश्रम - 3

Featured Books
Categories
Share

बोलका वृद्धाश्रम - 3

३.
           *********************

          त्याचा जन्म ग्रामीण भागातीलच. आज तो शहरात स्थावर झाला होता. तसा तो सुखी होता. कारण शहरात फार मोठं काम नव्हतं. ना काही समस्या होत्या. ना कोणतीच भीती होती. तरीही त्याचा जीव शहरातील गर्दीत घुसमटच होता. ती असह्य जीवघेणी गर्दी त्याला चांगली वाटत नव्हती. 
         त्याचं नाव स्वानंद होतं. स्वानंदाला शहरातील वातावरण न आवडायचं कारण होतं, ते प्रदुषण. शहरात वेगवेगळ्या प्रकारचं प्रदुषण होतं. कधी कारखान्यातून धूर निघायचा तर कधी वाहनातून धूर निघायचा. कधी कारखान्यातून निघणारा भोंग्याचा आवाज त्याला त्रस्त करायचा तर कधी त्याला वाहनांचा येणारा कर्णकर्कश आवाजही त्याला त्रासच द्यायचा. वाटायचं की ग्रामीण भागात आपण राहायला जायला हवं होतं. परंतु जाणार कसं. कारण आता तो हेच विचार करीत करीत म्हातारा झाला होता व तो आता वृद्धाश्रमात होता. स्वानंदचा तो विचार. परंतु त्याला गावालाही जायची हिंमत होत नव्हती. जरी त्याची मुलं त्याची सेवा करीत नसतील तरी. 
          स्वानंदला दोन मुलं होती व दोन्ही मुलांचे विवाह झाले होते. ती मुलं आपआपल्या संसारात खुश होती. आईवडिलांकडे त्यांचं जास्त लक्ष नव्हतं. त्यातच कामावरुन आलेल्या त्याच्या दोन्ही मुलांना स्वानंद काही बोलल्यास ते आवडत नव्हतं. शिवाय मीच का आईवडिलांचा ठेका घेतला काय? असं दोन्ही मुलांना वाटत होतं. वाटत होतं की अशी आईवडिलांची कटकट ऐकण्यापेक्षा त्यांना वृद्धाश्रमातच टाकून द्यावं. परंतु ते शक्य नाही. असं त्यांना काही दिवस वाटत होतं. कारण समाज आपल्याला काही बोलेल. अशीही भीती त्यांना वाटत होती. अशातच मोठा मुलगा विदेशात नोकरी करायला गेला व स्वानंद आणि त्याच्या पत्नीची जबाबदारी धाकट्या मुलावर आली. ज्यातून मीच त्यांचं करु काय, असं त्याला वाटल्यानं त्यानं त्यांना वृद्धाश्रमात टाकलं होतं. 
           वृद्धाश्रमात टाकणं हे पापकर्मच. तसे ते मुलंही मानत होते. परंतु त्याच मुलात तद्नंतर द्वेष सुरु झाला. ज्याची परियंती स्वानंदला वृद्धाश्रमात टाकण्यात झाली. 
           वृद्धाश्रम....... वृद्धाश्रम म्हणजे तुरुंगच असतं त्या म्हाताऱ्या लोकांसाठी. कारण तिथं मायेचं पाखरु कोणीच दिसत नाही. ना स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळविलेला मुलगा दिसत, ना स्वतःचं फोट फाडून काढलेला गर्भ दिसत. तो गर्भ, जो बालपणात हरवला असल्यास किंवा डोळ्यासमोरुन ओझल झाल्यास त्या गर्भाला उदयास आणणारी मंडळी तिनही लोक एकत्र करीत असतात नव्हे तर पिंजून काढत असतात. एक असाच व्हिडिओ सोशल मिडीयावर येवून धडकला. ज्या व्हिडिओतून मुलामध्ये असलेला संस्कार दाखवला होता. तो संस्कार की वडिलाला विसरायचा आजार असतांना व वडील हरवले असतांना त्या मुलानं त्यांच्यासाठी बराच परीसर पिंजून काढला. शेवटी वडिलाला शोधलंच. त्यावर विचार मांडणारा एक विचारवंत म्हणाला की त्या वडिलाला तसा जर आजार आहे तर त्यांना वृद्धाश्रमात का टाकू नये. ते वृद्धाश्रम की ज्या वृद्धाश्रमात वृद्धांची पुरेपूर काळजी घेतली जाते. 
          तो विचारवंत आपले मत मांडून मोकळा झाला. कारण त्याची आईदेखील त्यानं त्याच वृद्धाश्रमात ठेवली होती व तिची फार काळजी घेतली जात होती त्या वृद्धाश्रमात. म्हणूनच त्याचं ते सुचवणं. परंतु त्यावर वडिलांना शोधणारा मुवगा म्हणाला, "ज्या आईवडिलांनी माझ्यासाठी पावसाळे शोषले. मला मुळीच त्रास होवू दिला नाही. त्या वडिलांना मी कसे काय वृद्धाश्रमात पाठवू." असे म्हणताच विचारलंताचे डोळे उघडले व त्यानं लागलीच आपल्या आईला वृद्धाश्रमातून घरी आणलं. 
         वृद्धाश्रम...... वृद्धाश्रमात सर्व सोयी असतात वृद्धांना. त्यांना वेळोवेळी औषधोपचार दिला जातो. जेवणाखावण्याचे वेळापत्रक असते. दर आठ दिवसानं त्यांच्या मनोरंजनासाठी काही कार्यक्रम राबविण्यात येतात. जेवनातही दररोज बदलाव असतो व खमंग जेवन मिळत असतं. परंतु सुख असतं का? सुखाचा विचार केल्यास सुख नसतंच. याबाबत उदाहरण म्हणून एक कथा सांगता येईल. कथा जुनीच आहे. सर्वांनाच माहित आहे व इथं उदाहरणादाखल देत आहे. 
         कहाणी अशी की एक राणी. ती फार दुःखी होती. तिला झोपेचा आजार होता व तिला झोपच येत नव्हती. राजानं तिला झोप यावी म्हणून बरेच प्रयत्न केले. ज्या प्रयत्नात एकदा तिच्यासाठी राजानं आपल्या राजवाड्यात खास व्यवस्था केली. एकदा तिच्या अंथरुणावर फुलं अंथरली. वाटलं की मऊशार फुलांच्या सुगंधानं तिला झोप येईल. परंतु रात्र जाताच व सकाळ होताच जेव्हा राजा तिच्या कक्षात गेला व विचारलं की तिला झोप आली का? त्यावर तिचं उत्तर नाही असंच होतं. त्यावर कारण विचारलं असता तिनं उत्तर दिलं की मला एक कळी टोचत होती.
           समाजात दोन गट असतात. एक श्रीमंत व दुसरा गरीब. गरीबांना कितीही धन दिलं तरी त्याचं राहणीमान कधीच बदलणार नाही. तो गरिबांसारखाच राहिल. तेच ते फाटके कपडे अंगावर परिधान करेल आणि त्याला झोपही साध्या जमीनीवरच येईल. याउलट श्रीमंतांचं आहे. श्रीमंत व्यक्ती जर गरीब झालाच तर जगतांना त्याला जीव घुटमळून जाईल. वाटल्यास त्याची आत्महत्याही घडेल. हेच तत्व वृद्धांबाबतीही लागू पडते. वृद्धांना जेव्हा वृद्धाश्रमात टाकलं जातं, तेव्हा त्यांचं सुख हरवतं. स्वातंत्र्यही तेवढंच हरवतं. कारण वृद्धाश्रमात पाहिजे तसं व तेवढ्या प्रमाणात स्वातंत्र्य नसतं. आनंदही मुळातच नसतो. म्हातारपणातील आनंद हा वृद्धाश्रमातील विविध उपक्रमात वा वृद्धाश्रमात राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमात नसतो. आनंद असतं, ती नातवंड खेळविणं. त्यांच्या मागं लागून त्यांच्याशी वटवट करणं. त्यांची वटवट ऐकून घेण्यात आनंद असतो. ज्याचा मुलांना व खासकरुन सुनांना राग येतो व सुनांना राग आलाच तर तिच्या इशाऱ्यावर चालणारे तिचे पती नाईलाजास्तव तिनं आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाक म्हणताच तो व्यक्तीही नाईलाजास्तव आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकतो. त्यावेळेस असा विचार करीत नाही की मी जेव्हा लहान होतो, तेव्हा याच पाखरांनी माझं रक्षण केलं. मला त्यागलं नाही वा मला सोडून दिलं नाही. उन्हातून सावलीत नेलं. अन्न भरवलं. शिक्षण शिकविलं. मला माझ्या लायक बनवलं नव्हे तर आत्मनिर्भर बनवलं. आज जो काही मी आहे, ते माझ्या आईवडिलांमुळेच आहे. 
         सेवा...... म्हणतात की दीन, दलीत, गरीब, अनाथ, अपंग व वृद्ध यांची सेवा करावी. त्यांचा आशिर्वाद बहुमोल आहे व तो मिळावा. बरेच लोकं सेवा करतात व जे सेवा करतात, ते बोलून दाखवत नाहीत. आज मुलं मुली समान आहेत व या समानतेच्या काळात मुलगीही मायबापांना तेवढीच प्रिय असते. जेवढा मुलगा असतो. तसंच मुलांना आईवडीलही तेवढेच प्रिय असतात. परंतु ते प्रिय असतात, त्यांचे विवाह होईपर्यंत. एकदा का विवाह झाला आणि मायबापांना थोडं म्हातारपण आलं की मुलांचे विचार बदलतात. मुलगी असेल तर ती आपल्या पतीच्या विचारानं चालते. स्वतः सक्षम असूनही ती पतीच्याच आज्ञेत वागते. पती जसं म्हणेल तसं. त्यानं पश्चिमेला पुर्व दिशा म्हटली की ती पुर्व. तेच घडतं मुलाच्याही बाबतीत. मुलगाही विवाह होताच आपल्या पत्नीच्याच आज्ञेत वागते. ती जे म्हणेल ते. कारण त्यांना धाक असतो. धाक असतो की त्या त्या घटकानं काही कमीजास्त केल्यास वा सांगीतलेली आज्ञा न मानल्यास वा न पाळल्यास ते जोडीदाराला सोडून जातील. अन् तसं घडतंही. कारण अलिकडील काळात संस्कार हे तुटत चाललेले आहेत. आजच्या काळातील संस्कारात मी, माझी पत्नी वा पती व माझी मुले. एवढेच अभिप्रेत आहे. आईवडील आजच्या काळात प्रत्येकाला नकोच आहेत. आईवडील असले तर प्रचंड त्रासच वाटतो. यामुळेच वृद्धाश्रमाची संख्या वाढते आहे. अन् समजा वृद्धाश्रमात जर आपल्याच मुलांनी पाठवलं तर त्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही आपल्यासाठी.
         म्हातारपणात म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवून द्या. सुखी राहतील. असं म्हणणं सहज सोपं आहे. बोलायला काय जातं. ते आपल्यासाठी तात्पुरतं चांगलं असतं. आपल्या तरुणपणाचा काळ त्यानं चांगलं कटतं. तरुणपणात वाटतं की मीही वृद्धाश्रमात जाईल व मजेनं राहिल. परंतु जेव्हा म्हातारपण येतं व आपण म्हातारे होतो आणि जेव्हा अशीच वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आपल्यावर येते ना. तेव्हा आपल्याला ब्रम्हांड आठवतं. जुन्या आठवणी येतात. वाटतं की मी माझ्या तरुणपणात माझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकायला नको होतं. विशेष सांगायचं म्हणजे वृद्धाश्रमात आपल्या आईवडिलांना नक्कीच टाका. टाकायला मनाई नाही. कारण तुम्ही स्वतःच आपल्या स्वतःच्या विचारांचे मालक आहात. परंतु थोडा विचार करा. खरंच याच वृद्धाश्रमात जाण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांनी जन्म दिला काय? यासाठीच आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवलं काय? यासाठीच आपल्याला आपल्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं काय? उन्हातून सावलीत नेलं काय? अन् हाही विचार करता येत नसेल तर हा विचार नक्कीच करा की जर मी म्हातारा होताच मला माझ्या मुलानं वृद्धाश्रमात टाकलं तर..... तर माझे काय होणार? कारण आजची परिस्थिती पाहता भविष्यात वृद्धाश्रमाची संख्या निश्चितच वाढणार आहे. संस्कार आजही तुटत चालले आहेत. पुढे जास्त तुटणार आहेत. त्यातच आज ज्या सुखसोई आहेत वृद्धाश्रमात. त्या सुखसुविधा निश्चितच उद्याच्या वाढत्या वृद्धाश्रमातील संख्येनं अपुऱ्या होतील. त्यातच आपलं स्वातंत्र्यही हिरावलं जाणार आहे. तिथंही त्रासच होणार आहे. हा त्रास 'जावे त्याच्या वंशा' असाच असणार आहे. हे तेव्हाच घडू शकेल. जेव्हा आपण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकू. जे आपलं आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकणं आपली मुलं पाहतील. तेच अनुभवतील व आपल्या म्हातारपणी ते आपलं काही एक न ऐकता आपल्याला वृद्धाश्रमात टाकतील. महत्वपूर्ण बाब ही की वृद्धाश्रम हे म्हातारपणातील आधारवड नसून ते तुरुंग आहे. त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना टाकणं म्हणजे एकप्रकारची हत्याच आहे. जीवच घेण्यासारखी हत्या, असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. अशा ठिकाणी म्हाताऱ्या मंडळींना पाठवणं म्हणजे त्यांच्या मनातील संपुर्ण स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे तर हत्याच आहे. अशी हत्या कोणत्याच जन्मदात्या मुलाने करु नये. कारण आपल्याला आपल्याच जन्मदात्याने एवढं आत्मनिर्भर बनवलंय की त्याच आधारावर आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकायलाही मागपुढं पाहात नाही. असं टाकून आपण पापाचं भागीदार बनत चाललोय. जे पापकर्मच पुढे जावून आपलीही रवानगी वृद्धाश्रमात करायला मागंपुढं पाहणार नाही.
          स्वानंदच्या मुलांची झालेली लग्न. त्या लग्नातून त्यांना नोकरी करणाऱ्या मुली मिळाल्या होत्या. तसं पाहिल्यास घरात दोन मोलकरणीही होत्या. एक विशेष म्हणजे मुलं सांभाळायला होती तर दुसरी घरची सर्व कामं करायला. 
          स्वानंदाच्या दोन्ही मुलांची झालेली लग्न. दोघांनाही मिळालेल्या उच्चशिक्षीत मुली. त्या मुली सासूसासऱ्यांची सेवा करणाऱ्या नव्हत्याच. अशातच मोठा मुलगा हा अमेरिकेत आपल्या पत्नीला घेवून स्थावर झाला होता. तो आपल्या पत्नीत खुश होता. तो साध्या हालचालींवर विचारणा करणारा होता. तो फोनही करायचा नाही. 
          मोठा मुलगा अमेरिकेत स्थावर झालेला. त्यानं आपल्याला आईवडील आहेत. हे सोडूनच दिलं होतं. त्यामुळं साहजीकच आईवडिलांची जबाबदारी लहान मुलावर येवून ठेपलेली होती व त्याचीही पत्नी कुरकूरच करीत होती. तसा तो एक प्रसंग घडलाच. ज्याला तात्कालिक प्रसंग म्हणता येईल. तो प्रसंग होता मोबाईल हिसकावून घेणं. 
          स्वानंदला एक नातूही होता व तो नातू सतत मोबाईल पाहात असे. त्यातच त्याच्या डोळ्यालाही मोठ्या भिंगाचा चष्मा लागला होता. तसं स्वानंदला वाटत होतं की नातवानं मोबाईल पाहू नये. मोबाईलनं त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. तसा तो त्याबद्दल कुरकूर करायचा आणि ते सांगणंही बरोबरच होतं. परंतु ते बोलणं व खासकरुन नातवाला बोलणं. ते काही स्वानंदच्या सुनेला आवडत नव्हतं. अशातच आज स्वानंदनं तोच नातू मोबाईल पाहात असतांना त्याचा मोबाईल हिसकला. ज्यातून स्वानंदचा नातू रडू लागला होता. 
         आपला मुलगा का रडतोय. हे जपणारी स्वानंदची सून. त्याची शहानिशा न करता तिनं त्याचा बाऊ केला व त्याच दिवशी त्याला आपल्या पतीकरवी वृद्धाश्रमात पाठवले. ज्या वृद्धाश्रमात जिव्हाळा होता. परंतु ते वृद्धाश्रम तुरुंगच वाटत होतं स्वानंदला. ते वृद्धाश्रम सर्व सुखसोयीनं युक्त होतं. सततची कटकट नको म्हणून स्वानंदच्या मुलानं म्हणजेच अमरीशनं स्वानंदला वृद्धाश्रमात टाकलं होतं व आयुष्याचा उत्तरार्ध तो वृद्धाश्रमात काढत होतं. ज्याचे शुल्क अमरीश स्वतः देत असे.
           स्वानंद म्हातारा झाला होता. आज त्याचेनं काहीच काम करणं जमत नव्हतं. तरीही तो वृद्धाश्रमात कामे करायचा. तसं पाहिल्यास त्याच्या वृद्धाश्रमातील वेळा ठरलेल्या होत्या. त्याला स्वैरपणे फिरता येत नसे. जेवनाचीही वेळ ठरलेली असायची. शिवाय स्वतःची कामं स्वतःच करावी लागायची. ज्यातून त्याच्या अवयवाची हालचाल व्हायची. परंतु त्याला नातवंडांची आठवण यायची व आठवायची त्याला ती दोन्ही मुलं. ज्या मुलांसाठी त्यानं अख्खं आयुष्य खर्च केलं होतं. रक्ताचं पाणी केलं होतं. काबाडकष्ट केले होते. ते कष्ट आज त्याला आठवत होते. 
         स्वानंदाला आठवत होता तो तरुणपणाचा काळ. तो तरुण होता, त्यावेळेस त्याला शेती अजिबात आवडत नव्हती. तसं पाहिल्यास त्याचे वडील त्याच्या बालपणातच म्हणजे दुधाचेही ओठ सुकले नसतांना मरण पावले होते. ज्यातून त्याच्या घरी असलेली अल्प शेती त्याच्या वाट्याला आली होती. जी शेती करता करता तो शिकतही होता. 
          शेती...... शेती करीत होता स्वानंद. परंतु त्या शेतीत पाहिजे त्या प्रमाणात पिकत नव्हतं. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ हा त्याच्या पाचवीलाच पुजलेला होता. तसं पाहिल्यास त्या शेती दुष्काळाचा त्रास हा त्यालाच नाही तर त्याच्या आजुबाजूच्या शेतकऱ्यांनाही होता. शिवाय शेतात नेहमीच त्याला साप, विंचू दिसायचे. ज्यात त्याला ते दिसताच भीतीही वाटायची. परंतु प्रारब्धच ते. त्यावर उपाय नव्हताच. 
        स्वानंद शिकतही होता व शेतीचं बाळकडू पीत होता. त्यातच आता तो बारावी पास झाला होता. तसं त्यानं शिक्षण सोडून शेती करुन पाहिलं. परंतु त्यावर त्याची आई म्हणाली की त्यानं शिकावं. उच्च शिक्षण घ्यावं. परंतु कसं घेणार? प्रश्न होता. कारण आपलं पोट हे महत्वाचं होतं. उदरनिर्वाहाचं पुरेसं साधन नव्हतं. पोटंच भरणं कठीण होतं. मग शिकणार कसं आणि शिकतो जर म्हटलं तर महाविद्यालयात जायचं कसं? हाही एक प्रश्न होता. तशी आई त्याला शिकायला सांगत होती. त्यानं उच्च शिक्षण घ्यावं अशी खुणावत होती.
         स्वानंदचे वडील मरण पावले. तेव्हा स्वानंद लहान म्हणजे बाराच वर्षाचा होता. परंतु त्याची अंगकाठी चांगली असल्यानं तो धिप्पाड वाटायचा. त्याच्या वडिलांचीही इच्छा होती की त्यानं चांगलं शिकावं उच्च शिक्षण घ्यावं. परंतु काय करणार. प्रारब्ध आड आलं व शेतात त्याच्या वडिलांना एके दिवशी सापानं दंश केला. ज्यात त्याची प्राणज्योत मालली. 
         स्वानंदचे वडील मरण पावले, तेव्हा तो सातवीत होता. तसं पाहिल्यास गावची शाळा. त्या शाळेत त्याला फारसा त्रास नव्हताच. ज्यातून तो दहावीपर्यंत शिकू शकला. परंतु तेही काम करीत करीत.
          स्वानंदचे वडील जेव्हा मरण पावले. तेव्हा ते स्वानंद आणि परीवारासाठी सर्वकाही सोडून गेले होते. बैलजोडी होती. ज्या बैलजोडीच्या साहाय्याने त्याचे वडील शेती करीत होते. शेती ही लाभाची नव्हती तरीही. 
         ती बैलजोडी. त्या बैलजोडीच्या साहाय्यानं ट्रॅक्टरचा खर्च वाटायचा. तसा आज वडील गेल्यानंतर प्रश्न पडला. या बैलजोडीचं करायचं काय? कोणी त्याच्या आईला सल्ला दिला की ती बैलजोडी विकून टाकावी. पैसे येतील. त्या पैशानं पोट भरेल.
           बैलजोडी विकून टाकावी. लोकांचा सल्ला. तो सल्लाही बरोबरच होता. तसा स्वानंद लहान असल्यानं सर्व निर्णय आईलाच घ्यावे लागत होते. मुलगा शिक्षणाचा असल्यानं त्याला बैलाच्या मागं व शेतीत कसं टाकावं? हाही विचार होता. काय करावं सूचत नव्हतं. स्वतः ती कास्तकारी करु शकत नव्हती. अन् मुलालाही कास्तकारीत शिरवू शकत नव्हती. अशातच चार महिने बरे गेले. आता उन्हाळा लागला होता व त्या उन्हाळ्यातच तिनं बैलजोडी विकायचा निर्णय घेतला. 
          आज ती अस्वस्थ होती. तो दिवस बुधवार होता व शुक्रवारी बैलबाजार होता. शुक्रवारला बैल बाजारात न्यायचे होते. ते शुक्रवारी विकले जाणार होते. तशी ती विचारच करीत होती. दोन दिवस विचारातच गेले होते. अशातच शुक्रवार उजळला व तिनं स्वतः बैलजोडी बाजारात नेली. ज्यातून त्या बैलजोडीला गिऱ्हाईक लागले.
         स्वानंदच्या आईनं आलेल्या गिऱ्हाईकाकडून पैसे मोजून घेतले. त्यानंतर करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हातातील दावण गिऱ्हाईकांना सोपवली व जवळ असलेल्या भाकरीचा तुकडा ती त्या बैलाला चारु लागली. तोच बैलाला वाटलं की आपल्याला आपल्या धन्यानं विकलेलं आहे. 
         ती बैलं....... त्या बैलांनाही कळत होतं की त्यांचा सौदा केलेला आहे. ज्या मालकानं आतापर्यंत आपल्याला सांभाळलं. ती मालकीण तरी काय करणार? तिच्यापुढंही प्रश्न आहे. ती आपल्याला विकणारच. म्हणूनच तिनं विकलं. कदाचित त्या मालकीणीनं आपल्याला विकायला नको होतं. 
          तो बैलांचा विचार. त्यानंतर मालकीणीनं तोंडासमोर धरलेली भाकर. मालकीण म्हणजेच स्वानंदची आई ते सर्व पाहात होती. ती भाकर बैलं खात नव्हती. त्यातच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. त्यांनाही रडणं येत होतं. तेच टिपलं स्वानंदच्या आईनं. अचानक तिचं मन भरुन आलं. तिनं त्या बैलाच्या गळ्याला गळा लावला. अन् तिही ओक्साबोक्सी रडायला लागली. अन् रडतांना म्हणायला लागली की काय करु मी. माझ्याकडे काहीच उपाय नाही. 
          ते तिचं रडणं व ते तिचं बोलणं. ते पाहून आजूबाजूची शेतकरी मंडळी ते दृश्य पाहायला तिथं गोळा झाली. तो पहिलाच प्रसंग ती मंडळी अनुभवत होती. आतापर्यंत त्यांनी तो प्रसंग कधीच पाहिला नव्हता. तो प्रसंग म्हणजे त्यांच्यासाठी कुतूहलाचा विषय होता. 
        स्वानंदची आई बैलाच्या गळ्यात गळे टाकून रडत होती. ती बराच वेळ रडली. शेवटी तिनं डोळे मिटले. तसं तिला आठवलं. ती घरच्या गाईची बैलं. लहानपणापासून आपल्या अंगाखांद्यावर खेळली. ती लहानाची मोठी आपल्याच घरी झाली. जणू लेकरागत राहिली आपल्याच घरी. आज वेळ आली म्हणून ती विकावीत काय? कोणती आई आपलं लेकरु विकते काय? तशी ती विचार करु लागली. का बरं विकावीत आपण बैलं? आपल्याला ही बैलं काय एवढी जड झालीत? प्रसंगी आपण भीक मागावी. परंतु बैलं विकू नयेत. 
         स्वानंदच्या आईचा तो विचार. विचार करता करता तिनं विचार बदलवला. विचार बदलवला की आपली बैलं विकू नयेत. पैसे परत द्यावेत आणि आपली बैलं आपण आपल्या घरी घेवून जावीत.
          स्वानंदच्या आईचं नाव सुभद्रा होतं. सुभद्रेनं बैलजोडी न विकण्याचा विचार केला व तिनं बैलाच्या गळ्याच्या पाशातून आपला गळा मुक्त केला व ती गिन्हाईकाला म्हणू लागली की त्यानं आपले पैसे परत करावेत. तिला बैलजोडी विकायची नाही. परंतु तो गिऱ्हाईक ती गोष्ट ऐकेल तेव्हा ना. तो म्हणत होता की त्यानं सौदा केलेला आहे व तो केलेला सौदा तसाच कायम ठेवणार. पैसे परत घेणार नाही. 
         तो बैलाचा सौदा. बघ्यांची तिथं गर्दी झालेली. ही पहिलीच घटना होती. काय होणार ते माहित नव्हतं. तशी गर्दी वाढतच चालली होती व सुभद्रेच्या नयनातील अश्रू थांबता थांबत नव्हते. तसे बघ्यांच्या गर्दीतील काही मंडळी म्हणत होते की असं होवू शकते काय? विकलेल्या बैलजोडीचा सौदा रद्द होवू शकतो काय? आता या बाईला न्यायालयातूनच दाद मिळेल. त्याशिवाय बैलाचा सौदा रद्दच करता येणार नाही. अन् त्यात तिची हयात जाईल. शिवाय जेवढ्या पैशाला बैलं विकलीत ना. तेवढेच पैसे न्यायालयीन प्रकरण भांडायला जातील. अन् समजा केसचा निकालही लागला आणि कोर्टानं बैलं परत करण्याचा आदेश जरी दिला. तरी त्यावेळेस त्या बैलाचा उपयोग नसणार. कारण बैलं म्हातारी झालेली असणार. तर कोणी म्हणत होतं की बाई पुष्कळ दुःखी आहे. तिला बैलं परत करुन द्यावीत. त्यावर काही म्हणत होते की सौदा हा भावनेवर चालत नाही. अशानं तर प्रत्येक जण सौदा करेल व प्रत्येकच जण सौदा मोडेल. शेवटी जे व्हायचं, तेच झालं. ते प्रकरण पोलीस स्टेशनला गेलं व पोलीस स्टेशन माध्यमातून न्यायालयात. ज्या न्यायालयानं तुर्त त्या प्रकरणावर स्थगिती देवून बैलजोडी गिऱ्हाईकाकडे सुपूर्द केली व ते प्रकरण न्यायप्रविष्ट झालं.
          बैलजोडी गेली होती. मात्र शेती अजूनही होतीच. त्यातच बैलजोडी नसली तरी सुभद्रेनं हिंमत हारली नाही. ती हिंमत धरुन होती. आता ती सतत रडत असे व ट्रॅक्टरनं शेती करीत असे. मात्र आज तिचं रडणं तिच्या धन्यासाठी नव्हतं तर ते तिच्या बैलजोडीसाठी होतं. 
         सुभद्रा आजही नित्यनेमानं शेतात जात असे. तिलाही कधीकधी शेतात साप, विंचू दिसायचे. परंतु ती घाबरायची नाही. कधी तिला हिंस्र श्वापदही दिसायचे. त्यावरही ती मात करीत असे. त्यातच आता बैलजोडीची तारीखही मागं लागली होती.
          त्या तारखा व ती बैलजोडी. तेच तिचं लक्ष होतं. ज्यातून तिला बैलजोडीची केस जिंकावी असं वाटत होतं. त्यातच तिचं आज जे उदरनिर्वाहाचं साधन होतं. त्या शेतीकडंही तिनं दुर्लक्ष होवू दिलं नाही. तिनं शेती तसंच बैलजोडीच्या केसकडं लक्ष दिलं. त्यातच तिनं आपल्या बाळाच्या शिक्षणावरही लक्ष दिलं होतं. 
         आज चार वर्ष होत आले होते. सततचा न्यायालयीन त्रास. त्यातच सुनवण्या व वकिलांचे पैसे देणं. प्रवासात पैसे जाणं. म्हणजेच बैलजोडीचे जे पैसे मिळाले होते. त्यातील निम्मा पैसा हा न्यायालयीन प्रकरणात खर्च झाला होता. परंतु सुभद्रेनं तो पैसा न्यायालयीन प्रकरणासाठी वापरला नव्हता. तो पैसा जसाच्या तसाच ठेवून राखला होता. वाटत होतं की जर केस जिंकलीच व न्यायालयानं म्हटलं की तो पैसा भरा. तर तो पैसा भरावा लागणारच. अन् शेवटी तेच घडलं. न्यायालयीन साक्ष व पुरावे लक्षात घेवून न्यायालयानं निकाल दिला व सांगीतलं की बैलजोडीची जी राशी आहे, ती राशी तिनं न्यायालयात भरावी व आपली बैलजोडी घेवून जावी. 
          ते न्यायालयीन प्रकरण. ज्या प्रकरणात सुभद्रेचा विजय झाला होता. न्यायालयीन प्रकरणातून जो निकाल आला, त्यानं बैलजोडी परत मिळाली होती. तिनं ताबडतोब बैलजोडीची रक्कम न्यायालयात भरली व आपली बैलजोडी आपल्या घरी परत आणली. 
         आज तिला अगदी हायसं वाटत होतं. तसे ते विकल्यानंतरचे दिवस तिला आठवायला लागले होते. तो ट्रॅक्टरसाठी तकादा लावणं तिला आठवत होतं. शिवाय वेळेवर ट्रॅक्टर मिळत नसल्यानं व वेळेवर पेरणी न झाल्यानं जे शेतीचं नुकसान होत होतं. ते कधीच भरुन निघणारं नव्हतं. 
         ती घरच्या गाईची जित्रुबं होती. ज्यासाठी सुभद्रा खटला लढली होती. ज्यातून खटला जिंकल्यानं तिला आनंद झाला होता. जो आनंद असीम असा आनंद होता.
           घरची बैलजोडी घरी आली होती. सुभद्रेला आनंद झाला होता. परंतु आता एक नवीनच प्रश्न तिच्यासमोर उभा झाला होता. या बैलांचं करायचं तरी काय? एक महिला वखरण, नांगरण करु शकत नाही. कोणी माणूस भाड्यानं वखरण, नांगरणाला लावला तर त्याला द्यायला पैसे नाहीत. शिवाय आपल्याला नांगरण, वखरण करायची सवय नाही. ते तंत्र आपण शिकलेलो नाही. साधं नांगर, वखर कसं जुंपायचं ते आपल्याला माहित नाही. 
          काय करायचं? कसं करायचं? या प्रश्नात सुभद्रा गुंफली होती. तसं पाहिल्यास आता तिच्यासमोर आणखी एक काम आलं होतं. ते म्हणजे बैलांना चारापाणी करण्यासाठी रानावनात न्यायचं. तेच काम ती सतत करीत होती. 
          सुभद्रेच्या मनात तोच तो विचार. बैलांचा उपयोग कसा करायचा. बाईची जात वखर कसा चालविणार. तशी ती शरमेची गोष्ट. तसं तिला आठवलं. एक महिला अंतराळात गेली. एक महिला गाडी चालवतेय. एक महिला नोकरी करतेय. वखर, नांगर चालविणंही एका गाडी चालविण्यासारखंच. काय झालं आपल्या घरी माणूस नाही तर..... आपण स्वतःच माणूस बनायचं. वखर, नांगर चालवायचं. वखरण, नांगरण करायचं. सुरुवातीला थोडासा त्रास होणारच. तो शोषायचा. शेवटी तसा विचार करुन तिनं ठरवलं आणि तो बेत तडीस नेण्यासाठी घरी असलेलं वखर, नांगर शोधू लागली. जे आजही सुरक्षीत ठेवलेलं होतं. परंतु त्याला आता धूळ चढली होती. त्याची थोडीशी डागडुगी करणं बाकी होतं.
           विचार करताच व मनाशी निश्चय करताच सुभद्रेनं वखर बाहेर काढला. त्याला भिरुड लागला होता. काही त्याचे भाग सडले होते. तिनं तो बाहेर काढताच त्याची डागडुगी केली. ज्यातून तुटलेले भाग विलग केले. त्यानंतर त्या वखराला तिनं ते दुरुस्त करणाऱ्याकडं नेलं. त्याचेकडून ते वखर दुरुस्त करुन घेतलं. त्यासोबतच नांगरही दुरुस्त केलं. घरी असलेली बैलगाडीही दुरुस्त केली. त्याला तेलपाणी दिलं व त्याला बैलं जुंपून ती माणसासारखी शेतात गेली. 
        तो ग्रामीण भाग. त्या भागात महिलेनं वखर, नांगर चालवणं म्हणजे लाजेची गोष्ट होती. तशी सुरुवातीस सुभद्रेला लाजच वाटत होती. तसा सुभद्रेला अनुभवही नव्हता. काही लोकं तिला नावबोटं ठेवत होती. म्हणत होते की आता बाईनं शेतीही करावी काय. ही लाजेची गोष्ट आहे. हे काम बाईनं करु नये. परंतु लवकरच सुभद्रेनं त्यावर मात केली व ती शेतीत स्वतःच नांगरण, वखरण करु लागली होती. सुभद्रा शेतीच्या कामात तरबेज झाली होती. आता ती नांगरण, वखरण करु लागली होती. 
          तिचा मुलगा स्वानंद शिकत होता. तो आता दहावीच्या वर्गात गेला होता. तसा तो अभ्यास करु लागला होता. परंतु त्याचं मन काही अभ्यासात लागत नव्हतं. 
         वडिलांचा अल्पावधीत झालेला मृत्यू. त्याचा धसका स्वानंदनं घेतला होता. आता त्याचं अभ्यासात व शिकण्यात मन लागत नव्हतं. परंतु काय करणार? त्याची आई त्याला नित्य सांगत होती. त्यानं शिकावं. उच्च शिक्षण घ्यावं. तसं पाहिल्यास स्वानंद कसा बसा नववी पास होवून दहावीला गेला होता. 
        हे दहावीचं वर्ष होतं. स्वानंदचं याही वर्षी अभ्यासात मन लागत नव्हतं. तरीही तो थातूरमातूर अभ्यास करीत होता. कसंतरी पास व्हावं एवढीच त्याची इच्छा होती. तसं पाहता त्यालाही शेती कराविशी वाटत होती.
        ती आई शेतात काबाडकष्ट करीत होती त्याची. तो आपल्या आईसोबत कधी शेतातही जात असे. आई कधी त्याला ट्रॅक्टर वाल्याच्या घरी जायला सांगत असे व तोही स्वखुशीनं आईचा निरोप घेवून ट्रॅक्टरवाल्याकडे जात असे. तसाच तो आईसोबत शेतात जावून आई जी कामं करायची. त्या कामात तिला मदत करीत असे. तसंही त्याच्या मदतीशिवाय दुसरं तिला मदत करणारं तरी कोण होतं. त्यातच तो शेजारच्या शेतातही जावून पाहात असे. त्या शेजाऱ्यांचं वखर चालवणं. नांगर चालवणं पाहात असे. 
        हे शालांन्तचं वर्ष होतं. तसे ते उन्हाळ्याचेच दिवस होते. शाळा अजून सुरु व्हायची होती. अचानक स्वानंदची आई आजारी पडली. तिला उठणं बसणं जमेनासं झालं. त्यातच तिचा औषधोपचार सुरु होता. डॉक्टरांनी सांगीतलं होतं की तिनं काही दिवस घरीच राहून आराम करावा. 
         डॉक्टर बोलून गेले होते सुभद्रेला. तिनं घरी आराम करावा. परंतु बैलं? त्यांना चारा कुठून देणार? घरी काही त्यांच्यासाठी वैरण नव्हतंच. त्यातच त्यांच्या उपासमारीची चिंता तिला सतावायला लागली. वाटलं की ते आहेत. म्हणून तिला अन्न मिळतंय. दोन पैसे गाठीला उरतात. ते जर नसते तर संपुर्ण पैसा वायाच गेला असता आणि जात होता. आज त्याच बैलांची काळजी तिला सतावत होती.
          ती बैलजोडीची चिंता. आपल्याला जसं खायला अन्नं लागतं. ती जित्रुबं कुठं जातील? काय खातील? कसे खातील? ही सर्व चिंता. क्षणातच तिचं लक्ष तिच्या बाळाकडं गेलं. स्वानंद आठवला तिला व ती त्याला बैलजोडी रानात चारायला नेण्याविषयी म्हणाली.
         आईनं म्हटलेले शब्द. तो आईचा आदेशच. तोच आदेश ऐकून स्वानंदनं बैल सोडले. तसे ते बैलं रानातल्या दिशेनं चालते झाले. तसं पाहिल्यास ती सकाळचीच वेळ होती. 
         सकाळी सकाळी बैलं रानात आली होती. सकाळी त्यांना चारुन दुपार झाली की त्यांना पाणी पाजून बांधावं. असा तिचा विचार. त्याच विचारानं तिनं बैलाला सकाळीच न्यायला लावलं व स्वानंदनही सकाळीच बैलाला नेलं.
        ते दहावीचं वर्ष. आज स्वानंद पंधरा वर्षाचा झाला होता. त्यानं बैलं रानात आणले होते. तसे ते बैलं त्याच्या शेतात पोहोचले आणि ते चरायला लागले होते. तोच त्याचं लक्ष रानातील वखराकडे गेलं. वखर जुंपलेलाच होता. तसा त्याच्या मनात विचार आला. आपण वखराला बैल जुंपून वखर चालवून पाहिलं तर..... विचारांचा अवकाश. त्यानं बैल वखराला जुंपले व तो शेतात वखर हाकलून पाहू लागला. तसे ते बैलंही शिकविल्यागत तासावर चालू लागले होते. 
          सकाळचे अकरा वाजले होते. बैलं थकले होते. परंतु त्याच्या मनात उत्साह होता. त्याला वाटत होतं की बैलं सोडूच नयेत. परंतु बैलं तहानलेही होते व फेस टाकत होते. तशी त्यांना भूकही फार लागली होती. 
          अकरा वाजले होते व भुकेची काहूर पोटात पडली होती बैलांच्या. बैलांनाही भूक लागली आहे असा विचार करुन त्यानं बैलं सोडले. त्यांना पाणी पाजलं. तसं त्यांना एका झाडाच्या सावलीत बांधलं व शेतातील वैरण त्यांना खायला देवून तो घरी आला. घरी आल्यावर आजारी आईनं बनवलेल्या पिठल्या भातावर तो ताव मारु लागला. तसं जेवन होताच उन्हाच्या डुलकीनं तो झोपेच्या आधीन झाला होता.
          दुपार कलंडली होती. तसे दुपारचे तीन वाजले होते. स्वानंदचा डोळा उघडला होता. तसा तो लगबगीनं उठला. त्यानं लगबगीनं हातपाय धुतले व तो आईला म्हणाला,
          "आई, मी वावराकड जातोय. बैलाले थोडं चारतोय आन् सांजच्याला त्यांना घेवून घरी येईन." 
          ते स्वानंदचं बोलणं. त्यावर आईनं झोपल्याझोपल्याच होकार दिला. तसा तो शेताकडं निघाला होता. कारण त्याला केव्हा केव्हा शेतात जातो आणि केव्हा केव्हा नाही. असं होवून गेलं होतं.
          सायंकाळचे चार वाजले होते. स्वानंद शेतात पोहोचला होता. त्यानं चार वाजता बैल सोडले. त्यानं बैलांना पाणी पाजलं. त्यानंतर त्यानं त्यांना चरायला सोडलं.
          बैलं रानात चरु लागले होते आणि स्वानंद झाडाखाली बसून त्यांच्या चरण्याकडे पाहू लागला होता. तोच त्याच्या मनात कुतूहल जागं झालं. आपण सकाळसारखं वखरण करुन पाहिलं तर....... तो विचार करु लागला. त्यातच तो बैलाजवळ गेला. त्याचे दावे धरले व ते वखराला जुंपून तो वखर चालवू लागला. असं वखरण त्यानं सहा वाजेपर्यंत केलं. त्यानंतर बैलं सोडले व ते बैलं रानात चारु लागला होता.
         सुभद्रेची प्रकृती खराब होती. तिची तब्येत सुधरायला फार वेळ लागला नाही. तरीही तीन चार दिवस लागले होते, तिची प्रकृती सुधारायला. त्यातच स्वानंद दररोज शेतात ठरलेल्या वेळेत जायचा व तो वखर जुंपून वखरण करुन पाहायचा. त्यातच त्यानं आज तीन चार दिवसानंतर अख्खं शेत वखरुन टाकलं होतं.
       आज सुभद्रेला बरं वाटत होतं. तशी तिला चिंताही होती की तिचं शेत कसं असेल. आज चार दिवसांपासून ती शेतात गेली नव्हती. तशी आज शेतात फेरफटका मारुन यावं. असा तिनं विचार केला व लागलीच ती शेतात गेली.
         सुभद्रा शेतात गेली होती. ती पाहात होती, ते शेतातील वखरणं. तसा तिच्या मनात प्रश्न आणि कुतूहल निर्माण झालं. कोणं केलं असेल हे वखरण? जादूची कांडी तर नाही की आपोआपच हे वखरण होईल. तसं तिला आठवलं. आठवलं की तीन चार दिवसांपासून तिचा मुलगा स्वानंद शेतात बैलं चरायला आणत आहे. कदाचित त्यानंच. ती विचार करु लागली. कदाचित त्यानंच तर वखरण करुन पाहिलं नसावं? विचारुनच बघावं. 
       तिच्या मनातील तो विचार. विचारांती तिनं आपल्या बाळाला आवाज दिला. विचारलं की हे कर्तृत्व त्यानं केलं काय? तिचा तो प्रश्न. त्यावर स्वानंद अगदी स्तब्ध उभा होता. तो काहीच बोलत नव्हता. तशी सुभद्रेला त्याबद्दल उत्सुकता वाटली. ती अधिकच विचार करु लागलीय. मुलगा कामाचा झालाय. परंतु त्याची जर उत्सुकता वाढवली तर तो शिकू शकणार नाही. त्याला शेतातच रमायला आवडेल व तो शिक्षण सोडेल. असं समजून ती त्याला म्हणाली,
         "बाळ, मी बिमारच पडू नये असं तुले वाटते का? मी का सोंग करत होती का? बिमारी का माह्या घरची होये का की मी सांगतल्यावर येईन? मले सांगू सांगू बिमारी येते का? हे नुसते प्रताप करुन ठेवले. आजच्यानंतर असं कराचं नाय. नाईतं पाहतच राय. मी तुले घरातच ठेवणार नाय."
         सुभद्रेनं रागवत बोलल्यासारखा चेहरा केला. ती बोलत होती स्वानंदला. अन् स्वानंद खाली मान टाकून निपचीत उभा होता. परंतु त्याला त्याचं चुकलं असं वाटत नव्हतं.
         ती वेळ निघून गेली होती. तशी आईची गोष्ट न ऐकता स्वानंद शेतात वखरण करीत होता, ज्यावेळेस त्याची आई कामानिमित्त बाहेर जात असे. कधी तो नांगरणही करुन पाहात होता. कधी डवरणही करुन पाहात होता. हे त्याचं कृत्य कधी आपल्या शेतात तर कधी शिकण्यासाठी तो शेजारच्या शेतात करुन पाहात होता. त्यानंतर अगदी थोड्याच अवधीत तो शेतातील कामात तरबेज झाला होता. ज्यात सल्फेट टाकणं, धान रोवणं, पेरणं, नांगरणं, वखरणं, डवरणं आणि निंदणं. यासारख्या कला त्याला येत होत्या. हे तो छंद म्हणून नाही तर आपल्या आईला कामात थोडीशी मदत व्हावी म्हणून करीत होती. ज्यात कधीकधी त्याची आई त्याचेवर रागावत होती. कधी ती त्याला मारायलाही धावायची.
       स्वानंद शेतातील कामं करीत होता. त्याचबरोबर तो शिक्षणही शिकत होता. शिक्षणावरही त्यानं कोणत्याच स्वरुपाचं दुर्लक्ष होवू दिलं नव्हतं. 
         स्वानंद मॅट्रिक पास झाला होता. मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यानं महाविद्यालयात नाव टाकलं होतं. ते नाव नावापुरतंच आहे. असं त्याला वाटत होतं. तशीच महाविद्यालयात जायची तेवढी गरज नाही. असं त्याला वाटत होतं. तसा तो घरी अभ्यास करु लागला होता. परंतु एकच महिना झाला होता महाविद्यालय सुरु होवून. त्यानंतर त्याला एक पत्र आलं, त्याच्या गावच्या पत्त्यावर. ज्यात त्याची महाविद्यालयात अनुपस्थिती दर्शवली होती. 
          महाविद्यालय...... महाविद्यालयात नाव टाकल्यानंतर जावं लागत नाही. असं स्वानंदनं बरेचदा ऐकलं होतं. त्यामुळंच त्याच्या मनात तसा भ्रम बसला होता. परंतु ते पत्र. ते पत्र त्याला विचार करायला लावत होतं. तसं त्या पत्राविषयी त्यानं आईला सांगितलं. आई सुभद्राही चिंतेत पडली. शेवटी तो महाविद्यालयात भेटायला गेला. प्राचार्यांची भेट घेतली. त्यानं त्यानंतर आपली परिस्थिती महाविद्यालयातील प्राचार्यांना सांगितली. परंतु ते ऐकतील तेव्हा ना. त्यांनी सांगितलं की हे महाविद्यालय आहे व आमच्या महाविद्यालयाला विशेष असा दर्जा आहे. आपल्या मुलाचा चांगल्या महाविद्यालयात नंबर लागला. असं महाविद्यालय कोणाला मिळत नाही. लोकं पैसे भरायलाही तयार होतात. आपल्या मुलाचा तर नि:शुल्क नंबर लागला. शिकायचं असेल तर महाविद्यालयात यावंच लागेल नियमीत. नाही तर आपल्या मुलाचं नाव काढून दुसरीकडं त्याला शिकवू शकता. जिथं महाविद्यालयात जायची गरज नाही. 
          ते महाविद्यालयही गावात नव्हतं. गावात शिक्षणाच्या सोईच नव्हत्या. त्यातच गावातून काही अंतर पायपीट करुन बसथांब्याच्या गावी यावं लागायचं. ते मोठं कसरतीचं काम होतं. सुभद्रेसमोर व त्यातच स्वानंदसमोर प्रश्न उभा झाला होता. कसं शिकायचं? काय करावं? शेवटी तिनं त्यातून मार्ग काढला. मार्ग होता, शहरातच महाविद्यालयाजवळ राहायचं. परंतु कुठं राहायचं? तोही एक प्रश्न होता. शेवटी ते दोघंही मायलेक घरी आले.
          रात्र झाली होती. तसे ते दोघंही मायलेकं विचार करु लागले होते. काय करावं? शहरात किरायाचा कमरा केला तर कदाचित प्रश्न मिटेल. परंतु किरायच्या कमऱ्याचा पैसा कुठून भरायचा. शिवाय जाणंयेणं केलं गावातून तर त्यालाही पैसे लागणारच. त्यातच गावातून बसथांब्यावर जायला कितीतरी अंतराचा रस्ता पायपीट करुन जावा लागतो. ज्या रस्त्यानं जंगली श्वापदांची भीती असते. ज्या रस्त्यानं जात असतांना रस्त्यावर सापासारखे प्राणी दिसतात की ज्यांची भीती वाटते. तशीच ती नदी. त्या नदीतील पाण्यातून जावं लागतं. कधी तिला पूर असल्यास जाणं कठीण. काहीजण उच्चं शिक्षणासाठी ती नदी पोहूनच जातात. ते जरी श्रीमंत असले तरी. आपण गरीब. आपला मुलगा जाईलही पायपीट करुन बसथांब्याच्या गावी. परंतु तेथून दररोज जायला यायला पैसाच लागेल. 
         स्वानंदची आई शिक्षणाच्या बाबतीत चिंतेत होती. काय करावं सूचत नव्हतं. किरायाचा कमरा करायचा म्हटल्यास त्यालाही पैसेच पडत होते व गावातून महाविद्यालयात येणं जाणं करतो म्हटलं तर त्यालाही पैसेच पडत होते. शेवटी न राहवून ते महाविद्यालयीन शिक्षण शिकूच नये या निर्णयाप्रत ती येवून पोहोचली. त्यानंही तोच निर्णय घेतला होता.
          आठ दिवस झाले होते. तो महाविद्यालयात गेला नव्हता. शिक्षण सोडून द्यावं व शेतीच करावी असं त्याला वाटत होतं. त्याच्या शिक्षणाची आस खुंटली होती. परंतु सुभद्रेनं शिक्षणाची आस सोडली नाही. ती आजही विचार करीत होती व लोकांना त्याबद्दल विचारत असे. तोच एका गृहस्थानं सांगीतलं की ज्या शहरात ते महाविद्यालय आहे, त्याच शहरात महाविद्यालय लगतच एक वसतीगृह आले. तिथं त्याला प्रवेश मिळू शकते. परंतु त्या वसतीगृहात प्रवेश घेण्याची वेळ निघून गेलेली आहे. 
          तो एका व्यक्तीनं दिलेला सल्ला. त्यावर विचार करणारी सुभद्रा. लागलीच ती दुसऱ्याच दिवशी शहरात गेली. तिनं त्या वसतीगृहाचा शोध काढला. ज्यात ती त्या वसतीगृहाच्या अधिक्षकाला भेटली. अधिक्षकानं सांगितलं की वसतीगृहात प्रवेश घेण्याची वेळ निघून गेलेली आहे. आता तिथं प्रवेश घेता येणार नाही. ते नियमाच्या विरुद्ध होईल. 
         सुभद्रेनं जसं ते ऐकलं. तशी ती त्या अधिक्षकाला विनवणी करु लागली. ती त्याच्या पायाही पडली व म्हणाली,
          "सायेब, हवं तं त्याले आपलं लेकरु समजा. त्याले वडील नाय. अनाथासारखाच आतंपर्यंत वाढला तो. कसातरी तो मॅट्रिक पास झाला. सायेब, आमच्या गावात उच्च शिक्षणाच्या सोईबी नाईत. आमचं गाव नदीपल्याड हाये. बसथांब्यावर याले नदी ओलांडून यावा लागते. नदीत पाणी केव्हा चढन याचा काई नेम नसते. मरणाच्याच दारातून शिकाले येतेत आमची मुलं. एवळंच नाई तं सायेब, ज्या रस्त्यावरुन आमची मुलं बसथांब्यावर येतेत नं. त्या रस्त्यावर सापासारखे प्राणी दिसतेत. अन् वाघ, सिंहबी. लय भेव वाटते सायेब. अन् बसथांब्यावर आलेबी आमची मुलं तं, त्याईले या शयरात शिकायसाठी याले पैसे लागत्यातच. अन् या शयरात किरायानं कमरा घेवून म्हणलं तं तेवळे पैसे नाईत आमच्याजोवर. सायेब, तुम्हीच म्हणताय ना का शिक्षण वाघिणीचं दूध हाये. परंतु आमच्या गावातल्या लेकराईले हे दूध प्यालेच भेटत नाई. प्यायची बरीच इच्छा असते. सायेब, आमी ग्रामीण भागात रायतो, म्हणून का आम्ही शिक्षणाचं दूध प्यायचं नाई काय? आमी गावात राहात असलो म्हणून आमच्या मुलाईले शिकवूच नये काय? सायेब, दया करा हो माह्या पोरावर. त्याची लय शिकायची इच्छा हाये. आपल्या उपकारानं शिकन मा लेकरु. आपले उपकार आमी जनमभर ईसरणार नाई."
           ते सुभद्रेचं अधिक्षकाशी बोलणं. त्यात भावना होती. व्यतिरिक्त तो जिव्हाळा होता त्या आईचा. ज्या आईनं स्वानंदला जन्म दिला होता. 
          ते सुभद्रेचं बोलणं. त्या बोलण्यावर भारावलेला अधिक्षक अचानक पिघलता झाला व म्हणाला,
          "हे बघा, हे वसतीगृह काही तुमच्या भावनेवर चालत नाही. हे चालतं नियमांवर. या वसतीगृहाचेही काही नियम असतात. जे आपल्याला पाळावे लागतात. आता वेळ तर निघून गेली. आता प्रयत्न करुन काही उपयोग होणार नाही. परंतु एक उपाय आहे. उपाय हा की ॲडमिशन होईल. परंतु ॲडमिशन हे पैशानं होईल. काही पैसे भरावे लागतील. चालेल काय?"
         "किती पैसे?"
         "हेच की दोन चार हजार रुपये."
         "चालेल, चालेल."
         सुभद्रेनं ते ऐकलं. त्यानंतर तिनं पैसे भरले व ती तेथून चालती झाली.
         स्वानंदचा वसतीगृहात नंबर लागला नव्हता. परंतु तरीही अधिक्षकाच्या कृपेनं त्याला वसतीगृहात प्रवेश मिळाला होता. आता स्वानंदला ना नदी पार करावी लागत होती, ना पायी चालत बसथांब्यावर यावं लागत होतं. ना त्याला बससाठी येण्याजाण्याचे पैसे द्यावे लागत. मात्र आईपासून दुरावल्याचा एकाकीपणा त्याला सतावत होता. ती आई, जी आता एकटी राहणार होती.
         काबाडकष्ट करणारी सुभद्रा. मुलाला वसतीगृहात पाठवताच ती एकाकी झाली. तिला आपल्या लेकराची आठवण येत होती. परंतु ती आठवण तिला विसरणे भाग होते. तशी ती आठवण विसरली व ती आपल्या शेतात रममाण होवू लागली. त्यानंतर स्वानंदनही मागे वळून पाहिलं नाही. तो शिकतच राहिला. बारावीनंतर त्यानं उच्च शिक्षणही घेतलं. अन् ते घेत असतांना त्याच्या आईचं वय वाढत गेलं. सुभद्रा आता म्हातारी झाली होती. तिला आता म्हातारपण आलं होतं. बैलंही थकून गेले होते. त्यातच एक बैल मोठा असल्यानं तो जास्तच थकला होता.
        सुभद्रेनं आतापर्यंत बरेच कष्ट केले होते. आता तिच्यानं जास्त कष्ट करणं जमत नव्हतं. तरीही ती शेतात जात होती. शेतातील कामं करणं आता अवघड जात असली तरी तिची ती मजबुरी होती आणि तिचं प्रेमही होतं त्या शेतावर. ज्या शेतानं तिला पोषलं होतं. तिचा आधारवड संपला असला तरी तिला सांभाळून घेतलं होतं.
        स्वानंदला आठवत होता तो काळ. ती म्हातारी आई. त्यातच ते बैलाचं मरण. त्या बैलाच्या जोडीपैकी एक जोडीदार मेलेला होता. जेव्हा तो गावाला गेला होता. अन् दुसरा एक जीवंत होता. स्वानंद दुसरा जोडीदार घेवू पाहात होता. परंतु तो घेणार कसा? कारण बैलाला सांभाळणारं कोणीच नव्हतं. त्याची आई म्हातारी झाल्यानं तिला जोडी चारायला नेणं कठीण होत होतं. शिवाय स्वानंदही शहरातच राहता झाला होता. त्याला आता गाव आवडत नव्हतं.
        एक बैल मरण पावल्यानं एक बैल जीवंत होता. स्वानंद त्याला विकून टाकावं असे आपल्या आईला सांगत होता. परंतु बैलाच्या उपकाराची जाणीव असलेली त्याची आई त्याला तो बैल विकायला मनाई करीत होती. तिचं म्हणणं होतं की ऐन संकटकाळात ज्या बैलानं तिला मदत केली. त्या बैलाला विकायचं कसं आणि त्याच्या म्हातारपणात त्याला घेणार तरी कोण? अन् घेतीलही तर कापणारे कसाई. जे आपल्या लेकरागत पाळलेल्या बैलाचा जीव घेतील. 
          स्वानंद शहरातच राहात होता. तो शिकत शिकत कामधंदेही करीत होता. नुकतंच त्यानं शिक्षकाचं प्रशिक्षण पुर्ण केलं होतं व तो एका खाजगी शाळेत कमी वेतनावर शिक्षक म्हणून काम करीत होता. तिथं त्याला कायमस्वरुपी नोकरी लागली नव्हती.
         सुभद्रा मात्र आजही शेतात राबत होती. ती आता आपलं शेत मोलमजूरीनं करीत होती. त्यातच ती आपल्या लेकरागत असलेल्या बैलाला सांभाळत होती. त्याला दररोज चारायला रानात नेत होती. अन् दररोज घरी आणत होती. तसं तिच्यानं जमत नसलं तरी. 
         सुभद्राला तिच्या या उतारवयात स्वानंदची गरज होती. परंतु स्वानंदही काही शहरातून येवू शकत नव्हता. त्याला वाटत होतं की कदाचीत खाजगी शाळेत नियुक्ती होवून तिथंच त्याला सरकारी नोकरी लागेल. ज्यातून त्याचं उरलेलं आयुष्य सुखकारक होईल. 
        दोघांचीही मजबुरी. त्यातच सुभद्रेला येत असलेलं वार्धक्य. सुभद्रेलाही काय करावं सूचत नव्हतं. मुलाला बोलावलं तर मुलाची नोकरी जाईल अन् आपण आपला बैल विकतो म्हटलं तर लेकरु विकणं होईल. शिवाय त्या बैलाला तिनं लेकरासारखं सांभाळलं होतं. तिला आठवत होतं की तिनं ज्यावेळेस आपल्या लेकराचं म्हणजेच स्वानंदचं भविष्य सुधरावं म्हणून शहरात वसतीगृहात टाकलं होतं. तेव्हा याच बैलांच्या साहाय्यानं ती गावात राहिली होती. ती बैलं म्हणजे तिचं मनोरंजनच असायचं. कधी एखाद्यावेळेस बाळाची आठवण आलीच तर ती त्या बैलांशी बोलायची. 
          आज बैलजोडी जरी शाबूत नसली तरी त्यातील एक बैल तिचं मनोरंजन करीत होता. स्वानंद जरी तिच्याजवळ नसला तरी तिला उरलेला एक बैल आसरा होता. तिला वाटत होतं की तोच एक बैल, त्याचं आयुष्य संपलं की ती आपल्या लेकराजवळ राहायला जाईल व सुखानं डोळे मिटवेल. याच आशेनं ती आयुष्याचा शेवटला क्षण जगत होती. मनात स्वानंदचीही आठवण होतीच.
         आज तो काळा दिवस उगवला. पाऊस सतत कोसळत होता. तसं घरी सुभद्रेच्या एका बैलाला वैरण नव्हतंच. जसं वैरण पुर्वी असायचं. 
         पुर्वी सुभद्रा आपल्या बैलजोडीसाठी खायला घरीच वैरणाची सोय करुन ठेवायची. त्यावेळेस तिच्यात रक्तीशक्ती होती. परंतु आज ती थकली होती. आज तिच्यात डोक्यावर ओझं वाहून आणायची क्षमता नव्हती. पुर्वी जशी ती वैरणाच्या पेंढ्या डोक्यावर वाहून आणायची. आता ती थकली होती व तिला कडब्याच्या पेंढ्या डोक्यावर ओझी म्हणून वाहून आणताच येत नव्हत्या. तसं पाहिल्यास बैलगाडीनं कडबा, कुटार बैलासाठी वैरण म्हणून आणतो म्हटल्यास तेही करता येत नव्हतं. कारण तिच्याकडे एकच बैल होता व तोही थकला होता. शिवाय म्हाताराही झाला होता.
         बाहेर पाऊस सुरु होता, ज्याला आठ दिवस पुरते झाले होते. आठ दिवस सुभद्रा घरीच होती व घरी असलेलं सगळं वैरण तिनं बैलाला आठ दिवस पुरवलं होतं. आज तिच्यात तेवढी ताकद नव्हती की ते वैरण डोक्यावर आणू शकेल. शेवटी बैल उपाशी राहिल तर केव्हापर्यंत राहिल. असा विचार करुन तिनं शेवटी बैल सोडला व ती त्याला रानात चारण्यासाठी घेवून गेली.
         ते रान...... त्या रानात जातांना तिला असाही तो एक रस्ता लागत होता, जो रस्ता चिखलातून जात होता. दुसरा एक रस्ता पायीचा होता. जो एका शेतकऱ्याच्या शेतातून जात होता. ज्या शेतातून बैल न्यायला मनाई होती. तिचं शेत त्याच रस्त्याला पार करुन येत होतं. शिवाय दुसऱ्याच्या शेतात ती बैलाला चारु शकत नव्हती. शिवाय आपल्या शेतात जावून बघावं अशी तिची इच्छा होती. तसा शेतात पाऊस किती झालाय. हेही तिला पाहायचं होतं. 
        सुभद्रानं आपला बैल सोडला व ती शेतकऱ्याच्या शेतातून निघाली. जो बैल चिखलाच्या वाटेनं निघाला. ज्यात फसन होतं. अशातच तिचा तो बैल चिखलात फसला. तसा तो म्हातारा असल्यानं त्याला त्या चिखलातून निघताच येत नव्हतं. ती जोरजोरात बैलाला आवाज देत होती व बैलही ताकद लावत होता, त्या चिखलातून निघण्यासाठी. परंतु तेवढी ताकद त्याचेमध्ये नव्हती. आता बरीच ताकद लावून बैल थकला होता. त्यातच थकल्यानं तो खाली बसला. ते पाहून त्याला काढण्यासाठी तिही त्या चिखलात शिरली. परंतु जिथं बैलाची ताकद पुरली नाही. तिथं माणसाची ताकद किती पुरणार ! मग जे व्हायचं तेच झालं. माणसाचीही ताकद हारली व सुभद्राही त्या बैलाला चिखलातून काढण्याच्या चक्करमध्ये फसली. त्यातच प्रयत्न करता करता तिही दमली व तिही चिखलात बसली.  
         ती दुपारची वेळ होती. दुपारी रस्त्यावरुन जाणारे येणारे कोणीच नव्हते. रस्ता पुर्णतः सामसूम झाला होता. तशी ती स्मशान शांतता. त्या शांततेत थकलेले ते दोन्ही जीव. तेही म्हातारे. ते चिखलातच रुतून बसलेले. शिवाय बराच प्रयत्न करता करता त्याच चिखलात दोघंही जीव समाधिस्थ झाले.
         सायंकाळ झाली होती. सायंकाळी लोकं शेतातून घरी परतत होते. त्यातच ते शेतकरी शेजारील शेतकऱ्यांच्या धुऱ्यावरुन चालत होते व त्यांची बैलं ही त्याच चिखलातून वाट काढत चालत होते. अशातच एका शेतकऱ्याचं लक्ष सुभद्राकडे गेलं. त्यानं तिला ओळखलं व तो स्वगत म्हणाला, "सुभद्रा होये की काय?"
          त्यानं तिच्याकडे न्याहाळून पाहिलं. तशी त्याला ती सुभद्राच असल्याची जाणीव झाली. मग काय, त्यानं अख्खं गाव तिथं गोळा केला व बैलाला तिथंच सोडून सुभद्राचं प्रेत तिथून काढून घरी आणलं. त्यानंतर त्यांनी शहरातच रुळलेल्या तिच्या मुलाला निरोप पाठवला. 
          मुलाला यायला दुसराच दिवस उजळला. त्याचं कारण होतं, अपेटी गाव. ज्या गावात वाहनांची सोय नव्हती आणि रस्तेही बरोबर नव्हते. तसा स्वानंद दुसऱ्या दिवशी आला. त्याला आई गेल्याचं फार दुःख झालं होतं. जो आज पुर्ण स्वरुपात अनाथ झाला होता. आता त्याची आईही जीवंत नव्हती ना आज त्याचे वडील जीवंत होते. शिवाय पैसाही पुरेसा जवळ नव्हता.
         स्वानंद घरी आला खरा. परंतु त्याचेजवळ पैसे नसल्यानं मैयत ही गाववर्गणीतून केल्या गेली. त्यानंतर तो काही दिवस गावच्याच घरी राहिला. 
          ते घर..... आज ते घर त्याला खायला धावत होतं. घरी आईवडील कोणीच नसल्यानं त्याला तिथं करमत नव्हतं. गावची मंडळी त्याचेशी संवाद साधत असत. परंतु त्यांच्याद्वारे त्याचं मनोरंजन तरी किती होणार! शेवटी त्यानं गावातून शहरात जायचा निर्णय घेतला व तो शहरात गेला. तो आता शहरात गेला तो कायमचाच. गावच्या मातीत पुन्हा कधीही न परतण्यासाठी. परंतु जाण्यापुर्वी त्यानं घरदार व शेती, सारंच विकून टाकलं होतं. 
           स्वानंदनं गावचं घर विकलं होतं. शेतीही विकली होती. तसा त्याला त्यातून भरपूर पैसा आला होता. तसा संपुर्ण पैसा घेवून तो शहरात आला होता. त्यानं त्या पैशात एक आयतं बनवलेलं लहानसं छोटेखाणी घर विकत घेतलं. काही पैसा त्यानं आपल्या शाळेत भरला व तो ज्या खाजगी शाळेत काम करीत होता. तिथं कायमस्वरुपाचा झाला. आता त्याची नोकरी सरकारी झाल्यानं त्याला सरकारी वेतन लागू झालं होतं. शेवटी त्याला जे वेतन मिळायला लागलं होतं. त्यातून थोडंसं का होईना, सुख आलं होतं. जे सुख त्याला मापदंडात मोजता येत नव्हतं.