Bolka Vruddhashram - 6 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | बोलका वृद्धाश्रम - 6

Featured Books
  • શંકા ના વમળો ની વચ્ચે - 23

    બરોડા પહોંચ્યા પછી સોનાલી ના પપ્પા ને ઘરે તેમના બેડરૂમ માં આ...

  • Smile and Solve

    ઘણી બધી અકળામણ અને પછી નક્કી કરેલો નિર્ણય..... પહેલું વાક્ય...

  • પ્રણય ભાવ - ભાગ 3

                                        આજે પ્રણય ભાવ ના આ પ્રકર...

  • તુતી

    (રસ્કિન બોન્ડ ની વાર્તા monkey business નો ભાવાનુવાદ.)તુતીદા...

  • મેઘાર્યન - 4

    મેઘા ભારપૂર્વક બોલતી હોય તેમ કહ્યું, “આ કામ તમારી સૌથી પ્રિય...

Categories
Share

बोलका वृद्धाश्रम - 6

           
        
          दिवसामागून दिवस जात होते. नुकताच पावसाळा लागला होता. हा उन्हाळाही तसाच कोरडा गेला होता. स्नेहलला याही वर्षी कोणीच पाहायला आलं नाही. त्यातच स्नेहल व स्वानंदचं वय वाढत चाललं होतं. ते एकमेकांना भेटतच राहिले. त्यातच एक दिवस तिनं विचारलं,
         "स्वानंद, तू माझ्याशी लग्न करशील काय की हा तुझा टाईमपास आहे."
           "आधी तू सांग."
           "मला तर वाटतेय की तू माझ्याशी विवाह करावा. परंतु तुला काय वाटते?"
          "मलाही अगदी तसंच वाटते."
          "परंतु मी लग्न केल्यानंतर माझ्या बाबांना माझ्यासोबत सासरी नेणार आहे. कारण माझ्या बाबांना माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. खरंच तू त्यांचा स्विकार करशील काय?"
          "का नाही. अन् त्यांनी तरी कुठं जावं. शिवाय मी एकटाच राहतो घरी. मला आईवडील कोणीच नाही हे तुलाही माहित आहे ना. अन् तुझ्या वडिलांना सांभाळलं तर त्यात काय बिघडलं. मी सांभाळून घेणार तुझ्या वडिलांना. ठीक आहे."
          "असं जर आहे तर ठीक आहे. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. परंतु एक समस्या आहे."
          "कोणती समस्या?"
          "माझ्या वडिलांना जात विवाह पसंत आहे. त्यांना आंतरजातीय विवाह पसंत नाही."
           "बस एवढंच ना. मग सांगून टाक ना की माझं एका मुलांवर प्रेम आहे म्हणून."
           "हो, तेही सांगीतलं असतं रे. परंतु तुला माहित नाही की त्यातही एक समस्या आहे."
            "कोणती समस्या?"
            "अरे, माझे वडील हार्ट पेशंट आहेत. मी जर त्यांना सांगीतलं आणि लागलीच त्यांना ह्रृदयविकाराचा झटका आला तर...... माहित आहे, आधीच आई गेल्यानं मी पोरकी झालीय. आता एक वडील आहेत. त्यांना तरी जगू दे दोन चार दिवस. निदान त्यांना माझं लग्न तर पाहू दे."
           "परंतु केव्हा पाहणार ते लग्न? तू म्हातारी झाल्यानंतर. असं जात जात म्हणत म्हणत एवढे वर्ष झाले. अजून एकही जातीवंत मुलगा तुझ्याशी लग्न करायला आलेला नाही. माझं ऐक. आपल्या प्रेमाबद्दल सांगून टाक एखाद्या दिवशी."
         "हो रे, सांगायचंच आहे मला आपल्या प्रेमाबद्दल. परंतु हिंमत होत नाही ना. मग मी तरी काय करु?"
          "परंतु तुला तशी हिंमत एक ना एक दिवस करावीच लागेल ना. जर तू तशी हिंमत केली नाही तर म्हातारी होशील व तुझे बाबाही या जगात राहणार नाही. राहिलं तुझं लग्न. तेही तुझ्या वडिलांना पाहायला मिळणार नाही. म्हणूनच तुला हिंमत करुन सांगावंच लागेल आपल्या वडिलांना. ठीक आहे."
           "ठीक आहे. मी करेल एखाद्या दिवशी तशी हिंमत."
           "करच तू."
           स्वानंदनं तिचा आत्मविश्वास जागवला. तसं बळ पोटात घेवून ती आज घरी गेली होती. आपण आजच आपल्या वडिलांना विचारुन घेवू असं तिला वाटायला लागलं होतं.
           स्नेहल घरी आली होती. तसा तिनं नेहमीसारखाच आजही स्वयंपाक बनवला. ज्यात दोन चांगले पक्वान काढले होते. ते वडिलांच्या पुढ्यात ठेवले व ती जेवायला बसली. तशी जेवता जेवता ती म्हणाली,
           "बाबा, बघता बघता हाही उन्हाळा गेला. याही उन्हाळ्यात माझा विवाह जुळलेला नाही. असंच जर घडत राहिलं तर मी उद्या म्हातारी होणार व माझ्याशी लग्न करायला कोणीच तयार होणार नाहीत."
          "मग काय करायचं म्हणतेस बाळ?" तिच्या वडिलानं तिला प्रश्न केला.
           "माझं म्हणणं आहे की मी जर यातून मार्ग काढला तर."
            "म्हणजे?"
             "बाबा, मीच माझा जोडीदार शोधला तर."
             "ठीक आहे. परंतु जातीचाच शोध."
             "जातीचा कसा मिळेल बाबा?"
             "मग?"
             "मला आंतरजातीय जोडीदार मिळू शकेल. परंतु तो आपल्याला चालेल काय?"
             "चालेल. चालवून घ्यावं लागेल ना."
             "ठीक आहे. मग मी प्रयत्न करतेय." ती म्हणाली व तिनं बोलणं बंद केलं. तसं जेवनही आटोपत आलं होतं.
            दोन तीन महिने असेच निघून गेले होते. तिची काही स्वानंदबाबत आपल्या वडिलांना सांगायची हिंमत होतच नव्हती. परंतु तिला ते सांगावं लागणारच होतं. तिलाही वाटत होतं की ते सांगावं लागणारच. त्याशिवाय तिच्या वडिलांना माहित कसं होणार. शेवटी विचार करुन स्नेहलनं हिंमत बांधली व एक दिवस ती आपल्या वडिलांना म्हणाली,
          "बाबा, मागे मी म्हटलं होतं ना की विवाहासाठी मीच एखादा राजकुमार शोधणार."
           "होय तर. मग?"
           "मी शोधलाय माझ्यासाठी राजकुमार."
            "राजकुमार! काय करतोय तो?"
           "तो शिक्षक आहे. शिक्षक आहे माझ्याच शाळेत. नोकरी पक्की आहे. घरी आईवडील कोणीच नाही. फक्त एकुलता एक आणि तोही तुम्हाला सांभाळणारा. पण......."
            "पण काय बाळ?"
            "पण बाबा, तो आपल्या जातीचा नाही. तो दुसऱ्या जातीचा आहे. अन् तोही खालच्या जातीचा."
            "म्हणजे?"
            "बाबा, तो आदिवासी जातीचा आहे. त्याच्या जातीला विशेष असं आरक्षण आहे. म्हणूनच लवकर लागली बाबा त्याला नोकरी. आता मला सांगा. तो चालेल का माझ्यासाठी?"
           "पण बेटा, तुला जातीचा एखादा राजकुमार नाही गवसला विवाहासाठी?"
            "बाबा, आता सोडा ना जात."
            "ठीक आहे तर. परंतु त्याला माझ्या भेटीला आणावे लागेल." तिचे वडील तिला म्हणाले.
           "ठीक आहे बाबा. मी लवकरच त्याला आपल्या भेटीला आणेल."
            स्नेहल आज बरीच खुश झाली होती. तिच्या वडिलांनी परवानगी दिल्याने तिला फारच आनंद झाला होता. आता तिला स्वानंदला केव्हा केव्हा भेटतो व केव्हा केव्हा भेटीचं आमंत्रण देतो. असं होवून गेलं होतं.
            दुसरा दिवस उजळला. या दिवशी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी होती. तसं तिनं आदल्याच दिवशी त्याला भेटायचा इशारा दिला होता. तसे ते दर सुट्टीच्याच दिवशी भेटत होतेच. आजही ते भेटणार होतेच. 
          स्नेहलच्या मनात आज विचारांचं काहूर माजलं होतं. वाटत होतं की स्वानंदला केव्हा भेटतो आणि त्याला तिच्या गोष्टी केव्हा सांगतो. तशी दुपार झाली. 
          आज दुपारीच तिनं आपला मेकअप करुन घेतला व लवकरच ती घराच्या बाहेर पडली आणि त्याच बागेजवळ ती त्याची वाट पाहात इकडून तिकडे घिरट्या घालत बसली.
         आज स्वानंद थोडा उशीराच आला होता तिला भेटायला. तसा तो दिसताच स्नेहल लागलीच त्याच्या जवळ गेली व त्याला म्हणाली,
          "एवढा वेळ."
          "हो वेळ झालाय. तू केव्हा आली?"
          "मी आज दुपारीच आली."
          "का बरं एवढ्या लवकर?"
          "मला आज काही महत्वपुर्ण तुला सांगायचं आहे."
          "काय आहे महत्वपुर्ण?"
          "जरा चल तर आत. निवांत बसू. मग सांगतेच."
          "असं आहे काय. तर मग ठीक आहे. आपण आत जावूया. मग बोलूया. ठीक आहे."
          "ठीक आहे."
           ती शांत झाली होती. तसं त्यानं तिकीट काढलं व स्वगत विचार करु लागला. 'मला जरा उशीरच झाला वाटते. आज ही बया जरा लवकरच येवून बसली. आज एवढं कोणतं महत्वाचं काम असेल बरं.'
           त्याचा तो विचार. त्याच्याही मनात विचारांचं वादळ सुटलं होतं. तसं तिकीट काढताच ते आत गेले. आतमध्ये स्वानंद बसण्यासाठी एक कोपरा शोधू लागला. परंतु कोपरा सापडला नाही. 
          आज स्वातंत्र्यदिन होता. आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी बरेचसे प्रेमीयुगल बागेत फिरण्यासाठी आले होते. त्यातच त्या बागेत बरीच भीड होती. ते प्रेमीयुगल स्वातंत्र्याच्या नावाखाली रंगरलिया साजरी करायला आले होते. मात्र स्नेहल व स्वानंद त्यासाठी आलेले नसून ते आपली विवाहगाठ तयार करायला आले होते. ते पाहून हेच का स्वातंत्र्य? स्वानंदच्या मनात ते विचार आले होते.  
         आज त्याला बराच वेळ झाला होता. कारण आज त्या बागेत फार भीड होती व प्रेमीयुगल जागोजागी जागा घेवून बसले होते. त्यांच्या बसण्याच्या अवस्थाही वेगवेगळ्याच होत्या. सगळेच कोपरे जवळपास वेढलेले होते. 
           आज बागेत एकही कोपरा खाली नव्हता. तसा एक तळ्याचा भाग दिसला. ज्यात काही प्रेमीयुगल त्या तळ्याच्या काठावर पाण्यात पाय टाकून बसले होते. तसं त्यानं त्यांना पाहताच स्वानंद तिला म्हणाला,
          "इथं बसुयात का आपण?"
           "बसुयात. माझी काही हरकत नाही. परंतु या खुल्या मैदानात मी तुला माझा हात तुझ्या हातात देणार नाही. चालेल काय?"
          "चालेल, चालेल."
          "ठीक आहे तर. आपण मग इथंच बसुयात."
          ते दोघंही त्या तळ्याच्या काठावर बसले. त्यातच त्यांनी आपले दोन्ही पाय त्या तळ्याच्या पाण्यात टाकले. तसा तो म्हणाला,
          "बोल, काय महत्वपुर्ण बोलायचं आहे ते. आजही बराच वेळ आहे आपल्याला जायला."
           त्यानं तिला म्हटलं. तोच तिही जीव लावून त्याच्याशी बोलायला तयार झाली. म्हणाली,
           "आज माहित आहे, मी तुला आनंदाची गोष्ट सांगणार आहे. ती फारच आनंदाची गोष्ट आहे."
           "सांग तर. अशी कोणती आनंदाची गोष्ट आहे?"
            "माझ्या बाबांनी तुला भेटायला बोलावलंय."
           "हो का. केव्हा बोलावलंय?"
           "तू ये केव्हाही. तुझं स्वागतच आहे घरात."
           "ठीक आहे. या रविवारीच येतो."
           "हो ये. मलाही आता तुझ्याशिवाय राहावसं वाटत नाही."
           "हो का आणि मलाही नाही."
           "असं वाटतंय, केव्हा केव्हा आपलं लग्न होतंय."
           "मलाही अगदी तसंच वाटतंय."
           "नक्कीच येशील न रविवारी."
           "होय, नक्कीच येणार मी."
           ते तळ्याच्या किनार्‍यावर बसलेले ते प्रेमीयुगल. त्यांचा तो आपापसातील संवाद. तो संवाद त्यांना स्वतःला प्रेमबंधनातून संसार बंधनात बांधण्यासाठी खुणावत होता. आज त्यांच्या बोलण्यात ते दररोजचं प्रेम नव्हतं तर एक प्रकारचा वेगळाच भाव होता. आज त्याला तिचा हात हातात घ्यावासाही वाटला नाही. कारण त्याला आज वाटायला लागलं होतं की ज्या तरुणीचा मी ती आवडत असल्यानं हात हातात घेतला होता. आता जन्मभर तोच हात माझ्या हातात असेल तिला सांभाळण्यासाठी.
        त्याचा तो विचार. तशा काही वेळ गप्पागोष्टी चालल्या. त्यानंतर ती म्हणाली,
         "आज नेहमीसारखा तू माझा हात हातात घेणार नाहीस का?"
         "नाही."
         "का बरं?"
         "आज मुड नाहीय माझा."
         "आज काय झालं मुड नसायला?"
         "सहजच."
         "सहज म्हणजे? मी माझ्या वडिलांनी भेटायला बोलावलं असं सांगीतल्यामुळं की काय?"
         "नाही तसं नाही."
         "कदाचीत तुला हे आवडलं नसेल. वाटत असेल की आपण केवळ हिच्याशी टाईमपास करावं. लग्न करु नये हिच्याशी. अन् तसं असेल तरी सांग. मलाही तसंच मंजूर आहे. जे नियतीनं माझ्या नशिबात लिहिलं असेल, तेच होणार की नाही. उगाच माझी तुझ्यावर जबरदस्ती नको."
            "नाही गं. तसं नाही."
            "नाही, मला तसंच वाटलंय. अन् हे बघ स्वानंद. माझी काही तुझ्या विचारावर जबरदस्ती नाही. तुला जर वाटत असेल की उगाच लग्नबंधनात हिच्याशी लटकू नये तर तेही सांग. मी हा आपला भूतकाळ होता, असं समजून विसरुन जाईल."
         "नाही नाही. तसं जर असतं तर मी आधीच विवाह करुन मोकळा झालो असतो. मी एवढे दिवस तुझ्यासाठी थांबलोच नसतो."
          "तर मग ठीक आहे. ये या रविवारी. मी वाट बघेन. तसंच मी माझ्या वडिलांना घरीच ठेवेल."
          स्वानंदनं होकार दिला. तशा त्या बागेत त्यांच्या बऱ्याच गप्पागोष्टी झाल्या. त्यानंतर सांज झाली व तिला आठवलं की आपण आता घरी जायला हवं. सांज झाली."
          आज लवकरच ते दोघंही बागेतून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यानं तिला घराजवळ सोडून दिलं. नंतर तो घरी गेला.
          स्वानंद घरी आला होता. त्यानं नेहमीप्रमाणेच जेवन बनवलं. तसा दररोज तो स्वयंपाक घरीच बनवायचा. त्यानंतर जेवन झाल्यावर तो अंथरुणावर पहुडला. मात्र आज त्याला झोप येत नव्हती. सारखी तीच आठवत होती. तिच्याशी आपण केव्हा विवाहबंधात अडकतो आणि ती केव्हा केव्हा आपल्या घरी येते असं त्याला होवून गेलं होतं. त्याचबरोबर त्याला आठवली त्याची आई. ज्या आईनं त्याला सांभाळलं होतं. शिक्षण शिकवलं होतं नव्हे तर त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं केलं होतं. कदाचीत आज आई असती तर..... तर ती किती खुश झाली असती. त्याच्या मनात आईचं प्रेम उभं राहिलं. तसा तो विचार करु लागला.
          आज माझी आई असती तर..... तर ती बरीच खुश झाली असती. ती आई, तिनं रक्ताचं पाणी केलं. शेतात राबराब राबली आयुष्याच्या शेवटपर्यंत. आपलं लेकरु शिकायला हवं. त्याला नोकरी लागायला हवी म्हणून तिनं काबाडकष्ट केलेत. अन् मी अभागी तिच्या मृत्यूचे वेळीही तिथं हजर नव्हतो. मी काय केलं असं विशेष. ज्या आईनं आपल्या शेतीला आपली आई म्हणून आयुष्यभर सांभाळलं. त्या शेतीलाही मी विकून मोकळा झालो. अन् तिचा भाव करुन जे पैसे आले, ते पैसे भरुन नोकरीला लागलो. मी किती लालसी. म्हणूनच माझा विवाह आज झालेला नाही. माझ्या आईनं माझ्यासाठी बरंच काही केलं. अन् मी अभागी लालसी. मी माझ्या आईसाठी काहीच केलं नाही. आता मात्र एक करणार. माझी आई आज जीवंत जरी नसली तरी एक दोन एकराचा पट्टा घेणार. ज्या शेतीवर तिचं प्रेम होतं. ती मालमत्ता विकत घेणार. तिथंच एक मकान बांधणार. अन् त्या मालमत्तेवर आईचंच नाव लिहिणार, सुभद्राश्रम. जिथं मला राहायला आवडेल व आयुष्याचे शेवटचे क्षण घालवता येईल. त्यातच माझ्या आईच्या आत्म्यालाही बरं वाटेल. तुर्तास आपल्या आईच्या आत्म्याला तिची सुन आणून दाखवूया.
          त्याचा तो विचार. तो विचार बऱ्याच रात्रीपर्यंत चालत होता त्याच्या मनात. त्याला पुरेशी झोपही आली नव्हती बऱ्याच रात्रीपर्यंत. तो सारखा कडेवर कड फेरत होता. कधी त्याला आईची आठवण यायची तर कधी स्नेहलची. अशातच त्याच्या मनातील विचाराच्या चक्रीवादळानं गिरकी घेतली व त्याला झोप केव्हा लागली ते त्यालाही कळलं नाही.