४
स्वानंद शहरात रुळावला होता. तो शहरातच चांगले वेतन कमवीत होता. त्याला आता काही कमी नव्हतं. परंतु तो सुखी नव्हता. कारण तो एकटाच घरात राहात होता व त्याला घरातच एकटे राहतांना वेगवेगळे विचार येत होते.
स्वानंद आज तरुण झाला होता व त्याला विवाह करावा असं वाटत होतं. तसं पाहिल्यास जात, त्याही काळात चरणसीमेवर होती. तशीच जातीची मुलगी मिळणं त्याचेसाठी कठीण होतं.
स्वानंदची नोकरी सरकारी झाली होती. परंतु त्याची नोकरी जरी सरकारी झाली असली तरी तो आजही फाटक्याच वस्रात वावरत होता. त्यानं गरिबी अनुभवली होती नव्हे तर पाहिली होती. ज्या गरिबीतून त्याला सरकारी नोकरी लागूनही त्याच्यात बदलाव झाला नव्हता. शिवाय ना घर त्यानं व्यवस्थित केलं होतं, ना त्यानं गाडी विकत घेतली होती. गाडी त्यानं बरेच दिवसपर्यंत घेतली नव्हती. तेवढे पैसेच नव्हते त्याचेजवळ. ज्यातून तो गरीबच असावा व त्याला सरकारी नोकरी नसावी असं वाटत होतं. अशातच ती जातीप्रथा मधात ठाण मांडून बसली असल्यानं कोणी त्याला मुलगी दाखवत असल्यास त्याला त्याच्या सरकारी नोकरी आहे असं सांगण्यावरुन विश्वासच वाटत नसे. अशातच त्याच्या संपर्कात स्नेहल नावाची मुलगी आली.
स्नेहल..... स्नेहल नावाची ती एक मुलगी. जी देखणी होती. ती नुकतीच त्याच्या शाळेत प्रवेशली होती. ती आता खाजगी तत्त्वावर काम करीत होती. तिची नोकरी सरकारी नव्हती. परंतु ती स्वभावानं चांगली होती.
स्नेहल शाळेत आली होती. ती ज्या दिवशी शाळेत आली. त्याच दिवशी स्वानंद तिच्याशी बोलला होता. ज्यातून तिनं त्याला शिपाई समजण्याची चूक केली होती. तसं तिनं कोणाला तरी विचारलंही होतं की तो शिपाई आहे काय? त्यावर कोणीतरी उत्तर दिलं होतं की तो शिपाई नसून शिक्षक आहे. परंतु तो तिला आवडत नव्हता. तो मात्र तिच्याशी नित्य बोलत असे. कारण ती त्याला आवडत होती नव्हे तर ती त्याची गरजच होती.
स्नेहल पाहिजे तेवढ्या प्रमाणात श्रीमंत नव्हती. ती फारच गरीब होती व घरात विश्वकोटीचं दारिद्र्य होतं. कसेतरी चार दोन पैसे मिळतील या हेतूनं ती शाळेत आली होती. परंतु ती जरी गरीब असली तरी तिच्या एकंदर वागण्यातून ती गरीब असल्याचं जाणवत नव्हतं. तिचं रहनसहन फारच चांगलं असून ते रहनसहन श्रीमंतीला लाजवत होतं.
सुरुवातीचा तो काळ. स्नेहल काही स्वानंदशी बोलत नव्हती. परंतु ती त्याला आवडत होती. ते पाहून स्नेहल आपल्याला भेटावी. तिच्याशी आपण विवाहबद्ध व्हावं असं स्वानंदला वाटत होतं. परंतु तो तिच्याशी त्या गोष्टी स्पष्टपणे बोलणार कसा? कारण ती त्याच्या जातीची नव्हती आणि जात विकल्प त्या काळात अतिशय महत्वाचा विकल्प होता. लोकं जातीच्याच व्यक्तीशी विवाह करीत असत आणि तसं न घडल्यास त्या परिवारांना वाळीत टाकत असत.
स्वानंदचा विवाह आणि तोही जातीच्याच व्यक्तीशी विवाह करण्यात त्याला फार मोठी अडचण होती. कारण त्याला जातीत ना कोणी ओळखत होते, ना जातीच्या व्यक्तींना त्याचा परीचय होता. तेच स्नेहलचंही होतं. स्नेहल जरी दिसायला सुंदर असली तिचा विवाह करतांना बऱ्याच अडचणी होत्या. त्यातील पहिली महत्वाची अडचण होती, तिच्या विवाहप्रसंगी द्यावा लागणारा हुंडा.
स्नेहल उच्च जातीची होती व तिच्या समाजात हुंड्याला जास्त महत्व होतं. जी रक्कम गोळा करता करता संपुर्ण आयुष्य खर्ची करावं लागलं असतं. शिवाय विवाह देखील थाटामाटात करण्याची प्रथा होती. या दोन्ही गोष्टी स्नेहल गरीब असल्यानं तिला वा तिच्या परिवाराला शक्य नसल्यानं तिचा विवाह समाजात जुळत नव्हता.
स्वानंदला विवाह करायचा होता. तशीही त्याला पत्नीची गरज होतीच. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तसं पाहिल्यास ती काही त्याचेवर प्रेम करीत नव्हतीच. तरीही एक दिवस संधी साधून त्यानं तिला विवाहाविषयी विचारुनच पाहिलं. परंतु तो तिला आवडत नसल्यानं तिनं त्याला स्पष्ट नकार दिला.
स्वानंदला स्नेहल आवडत होती व त्यानं संधी साधून तिला विवाहाविषयीही विचारलं. परंतु तिनं त्याला स्पष्ट नकार देताच त्याला अतीव वाईट वाटलं व तो दुसरी मुलगी आपल्या विवाहासाठी शोधू लागला होता.
बरेच दिवस झाले होते. ते होत आले होते. आज स्नेहलचाही विवाह झाला नव्हता, ना स्वानंदचाही विवाह झाला होता. स्नेहलचा विवाह हुंडा पद्धती व थाटामाटात विवाह न करता येत असल्यानं जुळला नव्हता तर स्वानंदचा विवाह त्याच्याबद्दल नोकरीचा संभ्रम असल्यानं जुळला नव्हता. शिवाय ओळख्यापाळख्याही नव्हत्याच त्याच्या. त्यातच दोघांचेही वय होत आले होते. तसं पाहता संधी साधून एक दिवस स्वानंदनं स्नेहलला विवाहाविषयी विचारलं. परंतु तिनं त्या विवाहाबाबत नकार दिल्यानं आता तो तिला विवाहाबद्दल विचारण्याच्या कोसो दूर होता. त्याला आजही ती आवडत होती. परंतु त्याला आजही शाश्वती होती की ती जात मानणारी मुलगी, जातीलाच महत्व देत असल्यानं ती त्याचेशी विवाह करणार नाहीच. ती आपल्याच जातीशी विवाह करेल. परंतु हे जरी खरं असलं तरी आज तिचं वय वाढल्यानं तिला आज तोच आवडायला लागला होता. परंतु आता त्याला विचारायचं कसं? हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. तसं पाहिल्यास त्याचं तिला विवाहाबद्दल विचारल्याची बाब हे सर्व कर्मचारी वर्गाला माहित होती. त्यानंतर बरेचवेळेस बाकी कर्मचाऱ्यांनीही तिला त्याबद्दल विनवलं होतं. ज्यावर तिनं नकारच दिला होता.
आज तिचं वय वाढलं होतं व आता तिला तो आवडू लागला होता. तसा तिचा तरुणपणाही उतरत चालला होता. तिचा चेहराही पार उतरला होता. त्यातच ते तरुण वय. जरी ते तरुण वय उतरत चाललं असलं तरी तिला आता कुणावर तरी प्रेम करावंसं वाटत होतं. परंतु तसा कोणताच तरुण व्यक्ती अन् तोही तिला हक्कानं साथ देणारा, तिला विचारणारा कोणीच तिला गवसत नव्हता. त्यातच अचानक तिला आठवला तो पुर्वीचा दिवस. ज्या दिवशी स्वानंदनं तिला विचारलं होतं. विचारलं होतं की त्याला तिच्याशी विवाहबद्ध व्हायचं आहे. तिची काय इच्छा आहे. त्यावर तिनं उत्तर दिलं नव्हतं. आज तिला तेच विचारायचं होतं त्याला. परंतु विचारायचं कसं? हा प्रश्न होता. तशी तिची आता हिंमत होत नव्हती. तशी तिलाही एक दिवस संधी चालून आली. तशी संधी साधून व हिंमत एकवटून ती शाळेतच एक दिवस त्याला म्हणाली,
"स्वानंद, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय."
तिचं ते बोलणं. ते बोलणं ऐकताच तो आनंदावला. कदाचित तेच बोलणं तर नाही. असंही त्याला वाटलं. काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना. तसा तो म्हणाला,
"बोला, काय बोलायचं ते?"
"इथं नाही. इथं बरं दिसणार नाही."
"बोला ना इथंच. काय बोलायचं आहे ते लवकर लवकर बोला. त्यात काय एवढं?"
"नाही. इथं नाही. जरा सवडीनं बोलायचंय मला. फार महत्वपुर्ण गोष्ट आहे ती. मला दुसरीकडं बोलावं लागेल."
"कुठे?"
"जरा दूर अशा ठिकाणी. भेटाल का मला?"
त्यानं तिचं बोलणं ऐकलं. तसा तो विचार करु लागला. त्यातच ती म्हणाली,
"आपण उत्तर दिलं नाही. तसंही आपण नाही म्हणण्याचे हक्कदार आहात. कारण मी एकदा आपल्याशी बोलली नव्हती. मला त्याबद्दल आजही वाईट वाटतं. आपला अपमानच झाला होता तो."
"त्या जाऊ द्या मागच्या गोष्टी. मी विसरलोच मागील गोष्टी. आता बोला. कुठं भेटू आपल्याला?"
"बागेत भेटता का? तिथं कोणीच नसणार. बोलणंही व्यवस्थित होईल. हं, तुम्हाला घरी बोलावलं असतं. परंतु माझ्या घरी असं कोणत्या पुरुषाला भेटणं चालत नाही ना." ती म्हणाली व चूप झाली.
तिची त्याला बागेत भेटायची इच्छा. ती इच्छा त्यानं ऐकली. तसा तो मनापासून आनंदीत झाला व त्यानं लागलीच तिला होकार दिला व भेटायचं स्थळ ठरलं. वेळही ठरली. दिवसही ठरला व ती निघून गेली.
तो दिवस तिच्यासाठी फार आनंदाचा वाटत होता. त्यालाही तो आनंदाचाच दिवस वाटत होता. आता आपण एकमेकांना केव्हा केव्हा भेटतो व केव्हा केव्हा नाही असं त्यांना होवून गेलं होतं. अन् तसंच घडलं.
आज सायंकाळी ते चार वाजता भेटणार होते. मस्त गप्पागोष्टी मारणार होते. ती विचारच करीत होती. तशी आज शाळेला सुट्टी होती. तिनं मनाशी ठरवलं व ती घड्याळाच्या काट्याकडं टक लावून बसली. तसं ठरवून केव्हा केव्हा चार वाजतात व केव्हा केव्हा नाही असं तिला होवून गेलं होतं.
दुपारचे तीन वाजले होते. तसं तिला वाटलं. आपण आपल्या चेहर्यावर कल्प न करता भेटायला गेलो आणि त्याला आपला चेहराच आवडला नाही तर..... ती विचार करु लागली. तोच ती उठली. तिनं आपले हातपाय धुतले व ती चेहर्यावर मेकअप करु लागली.
तिनं हातपाय धुतले होते. त्यानंतर तिनं चेहर्यावर सुगंधीत पावडर लावलं. ओठाला ओष्ठरंग अर्थात लिपस्टिक लावली. त्यावर एका पेन्सिलनं शेड काढली. आपल्या डोळ्याच्या भुवया रंगवल्या. डोळ्यात अंजनही भरलं व सुगंधी उटण्याचा फवारा शरीरावर मारला. चांगले स्वच्छ भरजरी कपडे घातले. केससज्जा केली. तिच्याकडं पाहून असं वाटत होतं की जणू एखादी नवरीच लग्नासाठी सजत आहे की काय?
ती नवी नवेली नवरीच वाटत होती. तिचं सजतांना तिची आई पाहातच होती. तशी आई म्हणाली,
"कुठे चाललीय एवढी सजून?"
"अगं आई, मैत्रीणीकडे जात आहे. जरा नाश्त्याचा कार्यक्रम आहे. वेळ होईल बरं का?"
तिनं आपल्या आईला उत्तर दिलं. ज्यात तिच्या आईला काय माहित होतं की ती एका मुलाला भेटायला जात आहे. तसा तिच्या आईनं तिच्यावर विश्वास ठेवला व ती सजूनधजून आपल्या आवडणाऱ्या स्वानंदला भेटायला बागेत निघून गेली होती.
तिनं चार वाजताची त्याला दिलेली वेळ. ती लवकरच घरुन निघाली. ती बसमध्ये बसली व त्याच बागेजवळ उतरली. जिथं तिला त्याला भेटायचं होतं. तशी ती बाग आली व तिनं त्याला शोधलं.
स्वानंद हा आधीच पोहोचला होता. तो बागेतील दरवाज्याजवळ उभा होता. तसं त्यानं तिला ओळखलं नाही. कारण ती चेहर्यावर दुपट्टा बांधून होती. तो तिनं आपण कोणाला ओळखू येवू नये म्हणून बांधलं होतं.
ती बागेच्या दरवाजाजवळ पोहोचली. तो प्रतिक्षाच करीत होता तिथं. तसं तिनं त्याला ओळखलं व हात हलवत ती त्याला आवाज देवू लागली. तसा तो जवळ आला. त्यानंतर ती त्याला म्हणाली,
"केव्हा आलाय?"
"मगाशीच."
"मला जास्त वेळ तर नाही ना लागलाय."
"नाही. वेळ चारची होती ना. अन् तुही बरोबरच पोहोचली चारला."
"होय, परंतु थोडा उशीरच झाला. तसं स्रियांना मेकअप करायला वेळच लागतोय ना."
"होय. वेळच लागतोय."
"म्हणूनच मला वेळ लागलाय."
"हो काय?"
"होय."
"म्हणजे तू मेकअप केला तर......."
"होय."
"परंतु कशासाठी केलाय एवढा मेकअप?"
"तुम्हाला भेटण्यासाठी."
"मला!"
त्यानं तिला आश्चर्यचकित होत म्हटलं. तशी ती ओशाळली. तिला लाज वाटली. तिला वाटलं की ती भलतंच काही बोलली. तशी ती गप्प झाली. ते पाहून तो परत म्हणाला,
"अहो, सांगा ना. माझ्यासाठी का बरं केला मेकअप?"
"इश्य. मला लाज वाटते."
"आता सांगा. नाहीतर मी इथूनच जातोय परत."
"नाही नाही. सांगतेय हं."
"मग सांगा तर."
"मी तुमच्यावर प्रेम करायला लागलीय. तुम्ही मला आवडताय. तशीच मी तुम्हाला आवडावं म्हणूनच केलाय मी मेकअप." तिनं थेट त्याला सांगून टाकलं. परंतु ते बोलतांना तिची मान खाली होती.
तिची मान खाली होती व ती खाली मान टाकून बोलत होती. तसं त्यानं तिचं मी तुमच्यावर प्रेम करायला लागलेय म्हणणं ऐकलं व आपण काहीतरी स्वप्नातच आहो. असं त्याला वाटलं. तसं पाहिल्यास ही त्याची पहिलीच वेळ होती व पहिल्याच वेळेस चट मंगनी पट विवाह. असंच घडलं होतं. त्याचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. तसा तो म्हणाला,
"अहो तुम्ही हे काय बोलताय. मी स्वप्नात तर नाही ना. अन् माझी आवड निवड विचारलीय का तुम्ही? याचसाठी मला इथं बोलावलंय का तुम्ही. असं जर होतं तर हे मला आधी ना सांगायचं होतं. मला वाटलं की तुम्हाला फार महत्वाचं काम आहे. म्हणूनच तुम्ही मला अर्जंट बोलावलंय. मला याचा फार राग आलाय."
".........."
तो बोलला. परंतु ती गप्प बसली. तिला आता पश्चाताप वाटत होता. स्वतःच्याच मागील क्रियाकर्मावर ती पश्चाताप करीत होती. तसा थोड्या वेळाचा अवकाश. तोच म्हणाला,
"अहो, रागावलात काय? मी जास्तच बोललो काय? माफ करा. अन् जर आपण माझ्यासाठी मेकअप जर केलेला आहे तर मला आपला चेहरा दाखवा. कसे दिसताय आपण हे काही मी बघितलं नाहीय."
तसं त्यानं म्हटलं. तिनं ते ऐकलं. परंतु ती चूपच होती. तसा तो परत म्हणाला,
"आपण मला माफ केलं नाही काय? "
ते त्याचं बोलणं. त्यावरही तिनं काहीच प्रतिसाद दिला नाही. ते पाहून तो परत म्हणाला,
"आता बऱ्या बोलानं माफ करा. नाहीतर मला परवानगी द्या. मी निघतोय जर वाईट बोललो असेल तर....... आता तरी मला बोला. आपला राग व्यक्त करा. काहीही म्हणा मला. परंतु माझ्याशी बोला."
ते त्याचं बोलणं. त्यावर ती म्हणाली,
"माफ करा मला. मी जास्तच बोलले."
"नाही, नाही. मीच जास्त बोललोय. तशी मी गंमत केलीय आपली. मी आपणाला माफीही मागू शकत नाही आणि आपण माफ करावे, अशी अपेक्षाही नाही माझी."
"मी एक बोलू काय?"
"बोला. एक नाही हजार बोला."
"आता माफी तेव्हाच, जेव्हा आपण माझा चेहरा बघाल."
"मग दाखवा ना चेहरा मला."
"इथं नाही. इथं कोणीही पाहिल. मला ओळखेल. मग समस्या उत्पन्न होतील. कोणी माझ्या घरी जाऊन सांगेल. जरा आतमध्ये चाला. मग दाखवते मी माझा चेहरा. ठीक आहे."
"ठीक आहे तर......." तो म्हणाला. तसं त्यानं तिकीट काढलं व ते दोघंही आतमध्ये गेले. त्यांनी बागेत बसण्यासाठी बागेतील कोपर्यामध्ये जागा शोधली व ते तिथंच बसून गप्पागोष्टी करु लागले.
त्या दोघांनाही बागेत बसण्यासाठी मोकळं स्वातंत्र्य होतं. तसा बागेतील एक कोपरा पाहून ते बसले होते. त्यातच त्यानं तिचा एक हात हातात घेतला.
तो तिचा हात. तो हाताचा स्पर्श. तो एका स्रिचा स्पर्श. तो त्याला एका स्रिचा झालेला पहिलाच स्पर्श होता. ज्या स्पर्शानं तो सुखवून गेला होता. तसा तिचा तो हात, हातात घेऊन तो म्हणाला,
"आता एक विनंती करु काय तुम्हाला?"
"बोला."
"तुम्ही आता आपल्या चेहर्यावरील हा नकाब काढा. आतातरी मला आपला चेहरा पाहू द्या. मला आपला चेहरा पाहण्याचा अधिकार द्या."
ते त्याचं बोलणं. त्यावर उत्तर देत ती म्हणाली,
"होय. परंतु एका अटीवर."
"कोणती अट?"
"मला आपण अहो, तुम्ही, आपण असं म्हणू नका."
"मग काय म्हणावं मी?"
"अगं म्हणा. हवं तर तू मी म्हणा. परंतु अहो मला तरी बरं वाटत नाही."
"अन् तुही मला अहो जावो म्हणू नकोस. अरे तुरे म्हण. आपण आजपासून एकमेकांचे चांगले मित्र बनणार. परंतु हं, लक्षात ठेव. शाळेत माझ्याशी बोलतांना तुम्ही आम्हीच म्हणायचं. मीही तुम्हास तुम्ही आम्हीच म्हणणार. ठीक आहे."
"ठीक."
"आतातरी तुम्ही आपला नकाबपोश काढा बरं का?"
त्यानं तसं म्हणताच तिनं त्याचेकडे पाहिलं व ती पाहातच राहिली. तशी त्याच्या चूक लक्षात आली. तसा तो म्हणाला,
"अगं प्रिये, आतातरी तुझा नकाब काढ व त्या नकाबाआड लपलेला माझा चंद्र मला दाखव."
ते त्याचं बोलणं. त्यावर ती स्मित करीत हसली. त्यातच तिनं आपल्या चेहर्यावरील नकाब काढला व त्याला आपला चेहरा दाखवला. जो नकाबाच्या आड लपला होता. ज्या मेकअपनं तिचा चेहरा आणखीनच फुलून गेला होता.
स्नेहलनं नकाब काढला होता. त्यामुळंच स्वानंदलाही तिचा चेहरा पाहता आला होता. तो मेकअप केलेला तिचा चेहरा. आज ती नेहमीसारखी दिसत नव्हती. ती सुंदर दिसत होती व त्याचं मन मोहून घेत होती. तिचा चेहरा गवतावर जसं दवबिंदू असतं. तसा खिळला होता. त्यातच ती एक नवी नवेली नवरीच जणू वाटत होती.
स्वानंदनं तिचा चेहरा पाहिला. त्यातच तसा तिचा एक हात त्याच्या हातात होता. ज्यातून त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आज त्याला बराच आनंद झाला होता.
ती बागही आज धन्यच झाली होती. ज्या बागेत स्वानंद व स्नेहलची पहिल्यांदाच भेट झाली होती. येथूनच त्यांचं प्रेम वाढणार होतं नव्हे तर आयुष्याच्याही गाठी बांधता येणार होत्या. आज जणू तो व ती स्वप्न रंगवत होते त्या बागेत. ज्या बागेत आज ते पहिल्यांदाच भेटले होते.
स्वानंदनं तिचा हात आपल्या हातात घेतला होता. त्यातच तो तिच्याशी गप्पागोष्टीही करीत होती. तसा गप्पागोष्टी करीत असतांना कधी तिचा हात घट्ट दाबत होता तर कधी त्याला तो सैल सोडत होता. अशातच रात्र केव्हा झाली ते त्यालाही कळलंच नाही. ते तिलाही कळलं नाही. तशी रात्र होताच बाग बंद झाली होती व बागेतील लाईटही बंद झाले होते. त्यातच त्यांच्याजवळ एक शिपाई दस्तक द्यायला आला. म्हणाला,
"सायेब, रात्र झालीया. आता घरास्नी निघा."
ते शिपायाचं बोलणं. ते ऐकताच स्वानंद भानावर आला. तिही भानावर आली. जणू ते त्या पहिल्याच भेटीत अथांग अशा प्रेमाच्या सागरात बुडून गेले होते. स्वानंदनं शिपायाचं बोलणं ऐकलं. तसा तो भानावर आला. त्यानं घड्याळात वेळ पाहिली. रात्रीचे नऊ वाजले होते. तसा तो म्हणाला,
"आता निघायला हवं. वेळ बराच झालाय."
"होय. वेळ बराच झालाय."
"तुला रागावणार तर नाहीत ना घरचे लोकं."
"नाही रागावणार."
"का?"
"मी सांगून आलेय की मी मैत्रीणीच्या घरी जात आहे. एक कार्यक्रम आहे. जरा वेळ लागेल."
"हो काय."
"होय."
"आता कशानं जाशील?"
"ऑटो करणार."
"पैसे आहेत का?"
"होय. आहेतच पैसे."
"मी सोडून देवू का?"
"गाडी आणलीय का आपण?"
"होय. मी माझ्या गाडीनंच आलोय. हवं तर सोडून देतोय."
"परंतु घरी नको सोडाल. मी म्हणेल तिथं सोडाल."
"का बरं? भीती वाटतेय का?"
"होय. भीती वाटतेय. कारण माझे आईवडील हे जुन्या विचारांचे आहेत. ते जात पात पाळतात. त्यांना असं कुणाबरोबर फिरणं आवडत नाही. ते जातीचा मुलगा शोधत आहेत माझा विवाह करायला. परंतु ना त्यांना तसा मुलगा सापडत. ना माझा विवाह होत कुण्या मुलाशी."
"का बरं? विवाह आणि जात. यात कशाचा फरक आहे?"
"अरे आमच्या जातीत हुंडा आहे. लय हुंडा आहे. शिवाय वराकडील लोकांना थाटामाटात लग्न सुद्धा पाहिजे. जेही मुलं मला पाहायला आले, ते असेच म्हणाले. मग मी तरी काय करु. माझा विवाह जुळत नसल्यानं माझं एवढं वय वाढलंय, जे तुला दिसतंय. त्यातच मी विचार केलाय. विचार केलाय की माझा अशानं विवाहच होणार नाही. कारण अशा अमाप असलेल्या हुंडा पद्धतीनं कोणता राजकुमार माझ्यापर्यंत येणार आहे. अन् थाटामाटात लग्न न करणारा कोणता व्यक्ती मला गवसणार आहे. त्यापेक्षा मी एखाद्यावर प्रेम केलेलं बरं.
तो माझाच निर्णय. मी माझ्या मनात पुष्कळ विचार केला व ठरवलं की ज्या माणसानं मनात न कचरता मला विचारलं होतं की हे स्नेहल, तू माझ्याशी विवाह करशील का. अन् त्यावर मी नकार दिला होता. मी विचार केला की तोच व्यक्ती मला सांभाळून घेवू शकतो. माझ्या इच्छा आकांक्षा पुर्ण करु शकतो. तो माझ्यावर प्रेम करु शकतो. माझ्याच विचारांचा असू शकतो तो. हे मला पटताच मी ताबडतोब त्यावर निर्णय घेतला व तुला इथं भेटीचं आमंत्रण दिलं. सुरुवातीला तुझीही भीती वाटत होती. वाटत होतं की तू कदाचित माझ्यावर रागवशील. परंतु सगळं व्यवस्थित झालं. आता मला फारच बरं वाटतंय. भीतीही नष्ट झालीय आणि कळलंय की तू जगापेक्षा बरा आहेस. आता आपण नियमीत भेटत राहू. अन् मी वचन देतेय की लवकरच आपण विवाहबद्धही होवू."
ते तिचं बोलणं. ते तिचं बोलणं आता त्याला तिच्या ह्रृदयाच्या कप्प्यातून आलं होतं. ते तिचं खरं प्रेम निर्माण झालं होतं त्याचेवर. ज्या प्रेमाला ती विसरु शकत नव्हती. ज्या प्रेमासाठी त्याला बराच काळ नव्हे तर बरेच वर्ष वाट पाहावी लागली होती. ते तिचं बोलणं ऐकताच त्याच्या मनातील आनंदाला उकळ्या फुटू लागल्या होत्या.
थोडा वेळ झाला होता. ते बोलत बोलत बागेतून बाहेर आले. तिनं परत एकदा तोंडाला दुपट्टा बांधला. कारण तिला वाटत होतं की त्या अंधाऱ्या रात्री तरी तिला कोणी पाहिल्यास ओळखतील. तसे ते गाडी थांब्याजवळ आले. स्वानंदनं गाडी थांब्यावरुन काढली. ती सुरु केली. त्यानंतर स्नेहल त्याच्या गाडीवर दोन्ही पाय दोन्ही बाजूस टाकून त्याला चिपकून बसली. अन् तो गाडी चालवू लागला होता. मात्र वाटेत जात असतांना त्यांच्या मनात असंख्य विचार फेर धरुन नाचत होते.