Teen Jhunzaar Suna - 21 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 21

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 21

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

 

भाग २१

भाग २० वरून पुढे वाचा .................

“बघा साहेब, मी म्हणालो  होतो न, की काल मला शेतात जायला या लोकांनी प्रतिबंध केला म्हणून. आता तुम्हीच बघा. माझ्याच शेतात मला जायला अडवताहेत. काय तर म्हणे वहिनीसाहेबांची  ऑर्डर आहे. आता ह्या वहिनीसाहेब कोण ते मला काल कळलं.  काल तर यांची बरीच माणसं होती अडवायला. साहेब ही गुंडागर्दी आहे. तुम्हीच सांगा आता.” रावबाजीने  पोलिसांकडे रडगाणं  गायलं.

पोलिसांना हे सगळे प्रकार नवीन नव्हते, आणि रावबाजीचा इतिहास सुद्धा पोलिसांना माहीत होता. समोर तीन महिला होत्या आणि ते श्रीपतराव आणि प्रताप, दोघांना पण चांगले ओळखत होते.

“वहिनीसाहेब कोण आहेत ?”- पोलिस.

“मी. सरिता प्रताप पाटील.” – सरिता.

“यांच म्हणण आहे की ते त्यांच सामान नेण्या साठी आले असतांना तुम्ही यांना प्रतिबंध केला. यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे ?” – पोलिस.

“साहेब, कुठलाही सभ्य माणूस आपलं सामान नेण्या साठी दुसऱ्याच्या कडे रात्री दोन वाजता जाणार नाही. रात्री फक्त वाकड्या चालीची माणसंच जातात आणि त्यांना रोखणं आवश्यक असतं, हे तुम्ही पण मान्य कराल साहेब. आम्ही पण तेच केलं.” – सरिताने सडेतोड उत्तर दिलं.

पोलिसांनी रावबाजीकडे करड्या नजरेने बघितलं म्हणाले “ रावबाजी तू रात्री दोन वाजता गेला होतास हे आम्हाला सांगितलं नाही. आमच्या पासून लपवून ठेवलं. अश्या परिस्थितीत आम्ही या बाबतीत काही करू शकत नाही.”

“साहेब,” रावबाजी तक्रारीच्या सुरात म्हणाला “हे शेत मी कसायला घेतलं आहे. जो पर्यन्त हे माझ्या ताब्यात आहे तो पर्यन्त मला हे लोकं कसे रोखू शकतात ?” अजून मी यांना शेताचा ताबा दिला नाहीये. मला किमान तीन वर्ष शेत कसायला मिळेल याच बोलीवर मी शेत कसायला घेतलं होतं. पण आता यांनी पलटी मारली.  हे बरोबर आहे का ? आणि काल तर यांनी जबरदस्ती शेताचा ताबा घेतला आहे. साहेब यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.”

“बोला वहिनी, हे म्हणताहेत की काल तुम्ही जबरदस्ती शेताचा ताबा घेतला म्हणून. हे जर खरं असेल तर आम्हाला कारवाई करावी लागेल.” – पोलिस.

आता सरितानी बरोबर आणलेले कागद उलगडले. ते करारपत्र होतं. बघा साहेब. हे शेत  कसायला देण्यासाठी केलेलं करारपत्र आहे. हा मुद्दा बघा. आधी हा वाचा, आणि मग मी देते तुमच्या प्रश्नाचं उत्तर.

पोलिसांनी ते कारारपत्र वाचलं. त्यातला मुद्दा, जो सरितानी वाचायला सांगितला  होता तो असा होता. “करारात जी तारीख टाकली होती, त्या तारखेला शेत, मूळ मालक परत ताब्यात घेईल आणि त्या बाबत जी काही तयारी करायची असेल ती बटाईदाराने एक महिना अगोदर सुरू करावी आणि जर बटाई ला शेत पुन्हा द्यायचं असेल तर त्याचा विचार त्यानंतरच होईल” दुसरं कलम असं होतं की “जर बटाईदाराला त्याचं काही सामान शेतावर आणायचं असेल तर त्यांची यादी बनवून त्यावर निशांत किंवा विशालची सही असणं आवश्यक आहे.” तीन म्हणजे “आमच्या मालकीचं कुठलंही सामान आमच्या परवानगीशिवाय बाहेर जाणार नाही.”

पोलिसांचं वाचून झाल्यावर सरितानी बोलायला सुरवात केली. “साहेब, आता करारानुसार जी तारीख टाकली आहे ती बघा, त्याला १५ दिवस होऊन गेलेत. रावबाजी ताबा द्यायला टाळाटाळ करत होता आणि करारात दर्शवलेली उर्वरित रक्कम पण द्यायला नाही म्हणत होता. कालच सकाळी निशांत आणि विशाल दोघांनी पुन्हा एकदा रावबाजीची भेट घेतली आणि त्याचं फायनल उत्तर काय आहे हे विचारलं. रावबाजीनी  सर्वच गोष्टींना नकार दिल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. जे काही सामान असेल ते त्यांनी  घेऊन जावं, त्यासाठी आमची ना कधीच नव्हती पण त्या करता रात्री दोन वाजताची वेळ निवडून, इथे येणं, आणि आम्हाला धमक्या देणं हे बरोबर आहे का ? यांचा तुम्हीच निवाडा करा.”

पोलिसांनी मोठ्या आवाजात करार वाचला, त्यात सगळंच स्वच्छ लिहिलेलं  होतं. त्यांनी रावबाजीला विचारलं “तुम्हाला यावर काय म्हणायचं आहे?,” रावबाजी जवळ काहीच उत्तर नव्हतं. तरी पण तो म्हणाला की “माझ्या सामानाचं काय? त्यांच्यासाठी मला का अडवता आहात ? ते गोळा करायला मला आणि माझ्या माणसांना आत मधे जावच लागणार आहे, त्याला पण तुम्ही आडकाठी करता आहात. साहेब आता तुम्हीच बघा.”

याचं उत्तर सरितानीच दिलं. “तुमचं कोणचं सामान आत मधे आहे याची यादी द्या आणि घेऊन जा. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये.”

यावर रावबाजी म्हणाला की “साहेब, तुम्हीच सांगा कामाच्या गर्दीत यादी बनवायला वेळ असतो का? आमचं बरंच सामान आत मधे अडकलं आहे. मी सांगतो आहे त्यावर विश्वास नाही का?”

“नाही,” सरिता म्हणाली. “ मुळीच नाही, तुम्ही सभ्य माणसांसारखे वागला असता तर विश्वास ठेवायला थोडी तरी जागा होती, पण आता नाही. निशांतची सही असलेली यादी दाखवा आणि ते सामान उचला.”

आता रावबाजी चवताळला तो म्हणाला “ वहिनीसाहेब, हे तुम्ही चांगलं करत नाही आहात, यांचे परिणाम फार वाईट होतील, सांगून ठेवतो.”

आतापर्यंत जे संभाषण चाललं होतं, त्यामुळे विदिशा अस्वस्थ होत होती. मुळातच तिचा पिंड जशास तसे वागण्याचा होता. आत्ता तिची सहनशीलता संपली आणि तीच पुढे झाली आणि ताबडतोब याचं उत्तर दिलं. “बरं झालं, रावबाजी, तुमचा खरा स्वभाव आता पोलिसांना पण कळून आला. चक्क पोलीसांसमोरच तुम्ही आम्हाला, असल्या धमक्या देता आहात? इतकी मजल गेली तुमची? साहेब तुम्ही असतांना, तुमच्या समोर हा रावबाजी अशी भाषा वापरण्याची हिम्मत करतो आहे, मग काल रात्री यांनी काय तमाशे केले असतील यांचा अंदाज लावा.”

विदिशा पुढे म्हणाली “ साहेब, यांनी उर्वरित रक्कम तर नाहीच दिली ठरल्याप्रमाणे, पण यांनी आम्हाला कसलेही हिशोब सुद्धा दिले नाहीयेत. आता तुम्हीच सांगा साहेब, आपण करार करतो तो पाळण्यासाठीच ना ? आणि हे सगळं विश्वासावरच अवलंबून असतं. यांनी तर करार न पाळून विश्वासघातच केला आहे.”

एवढं सगळं ऐकल्यावर पोलिसांना पण पटलं की रावबाजी उलट्या बोंबा मारतो आहे. आणि त्यांनी तिथून कुठलीही अॅक्शन न घेता परतण्याचा निर्णय घेतला. परंतु जाण्या पूर्वी ते रावबाजीला चांगले खडसावून, सुनावून गेले. मग नाईलाजाने रावबाजी पण तिथून निघाला. जातांना त्यानी एक जळजळीत नजर विदिशा आणि सरिताकडे टाकली आणि मगच गेला. पण त्यांची देह बोली सांगत होती की त्याचं अवसान आता संपुष्टात आलं आहे म्हणून. रावबाजी आणि पोलिस गेल्यावर सगळ्यांनी सुटकेचा नी:श्वास टाकला. बाकी सगळी मंडळी मागेच उभी होती. त्यांचा वहिनीसाहेबांवर पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळे ते निश्चिंत होते. निशांत आणि विशाल आता समोर आले. काय बोलावं हेच त्यांना सुचत नव्हतं. या परिस्थितीला ते दोघं कसे सामोरे गेले असते हे त्यांनाच उमगत नव्हतं.

सगळे जणं घरी आले. झालेल्या प्रसंगाबद्दल प्रत्येक जण विचार करत होता, बोलत कोणीच नव्हतं. बायकांनी काहीही न विचारता जेवण्याची तयारी केली आणि सगळे जेवायला बसले. जेवण तसं शांततेत पार पडलं. बाबांनीही काही विचारलं नाही. त्यांना आपल्या तिन्ही सुना न घाबरता प्रसंगाला सामोऱ्या जातील याची खात्री होती. सगळ्यांच्या चेहऱ्यांवरून त्यांना कळलं की काम फत्ते झालं आहे म्हणून.

जेवण झाल्यावर सगळे पांगले. घरी आल्यावर सरिता म्हणाली की –

“निशांत, मघाशी तू काही सांगणार होतास, पण मध्येच हे रावबाजीचं प्रकरण झालं. पण आता सर्व तात्पुरतं का होईना, निपटलं आहे. त्यामुळे तू आता बोल, काय प्रश्न पडले आहेत तुला ?”

“वहिनी,” निशांत म्हणाला “ तू जवळ जवळ सगळीच जमीन हर्बल शेतीसाठी करायला घेतली आहेस, मग आपली नेहमीची पिकं कुठे घ्यायची ? अश्या उद्योगांनी  तर आपण नुकसानीत येऊ. Every chance is there, that we will land in trouble”

“no, absolutely not.” सरिताच्या ऐवजी विदीशाच बोलली.” असं बघ निशांत हर्बल

शेती खूप फायदेशीर आहे, आणि हे आम्ही ५ एकरात जे उत्पन्न घेतलं त्यावरून स्पष्ट होतेय. आता हाच प्रयोग आपण २५ एकरात केला तर तो नुकसानीत कसा जाईल ?”

“नाही विदिशा, तुला कळत नाहीये, तुम्हाला सर्वांना शेतीची जुजबी माहिती आहे आणि beginner’s luck म्हणतात तसं तुमचं झालं आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे. पण आता हेच बघ, सगळी माती आपली नेहमीच्या पारंपारिक पिकांसाठी तयार झालेली आहे, ती आता तुम्ही भरपूर रेती मिसळून, हर्बल पिकांसाठी तयार करता आहात. यासाठी वारेमाप खर्च पण केला आणि करणार आहात, आता जर काही कारणांमुळे, पुन्हा पारंपारिक शेतीकडे वळायची जर वेळ आली, तर ती माती पारंपारिक पिकां करता पुन्हा सक्षम करता येणार आहे का ? उपासमारीचीच पाळी येईल. म्हणून मी काय म्हणतो की अर्धी जमीन तरी नेहमीच्या पिकांसाठी राखून ठेवा.”

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.