Teen Jhunzaar Suna - 20 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 20

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 20

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुना  बाई                     श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

 

 

 

भाग २०     

भाग १९   वरून पुढे वाचा .................

आतमध्ये रावबाजीची तीन माणसं होती, ती गेट जवळ येऊन थांबली होती. ती आता गेट उघडून बाहेर आली. त्यांना येतांना बघून रावबाजी खुश झाला. जीप मधली चार आणि आतून आलेली तीन अशी ७ माणसं आता त्याच्या जवळ होती. आता तो सहज आतमध्ये जाऊ शकत होता.

विजयी मुद्रेने तो म्हणाला “चला रे आता कोणाची हिम्मत नाही मला अडवण्याची” असं म्हणून तो समोर आला खरा, पण आता चकित व्हायची पाळी त्याची होती. गेट मधून बाहेर आलेल्या तिघांपैकी दोघे जण रघुवीरच्या सोबत जाऊन उभे राहिले तिसरा इकडे तिकडे बघत राहिला आणि शेवटी त्याने पळ काढला.

आता रावबाजीचा नाईलाज झाला. त्याला परतावंच लागलं. सरिता कडे खाऊ की गिळू या नजरेने बघत त्याने जीप वळवली.

हे सगळं झाल्यावर, मागे अंधारात उभी असलेली बाकीची १० माणसं समोर आली. सगळ्यांनी सरिताचं अभिनंदन केलं. तिचं हे रूप त्यांना नवीन होतं. पण त्यांना हे ही जाणवलं की त्यांचं आयुष्य आता एका खंबीर व्यक्तीच्या हातात आहे आणि त्याचा त्यांना आनंदच झाला होता.

पांच माणसांना तिथेच ठेवून सरिता परत घरी आली. आई, बाबा तिची वाटच पहात होते. सरितानी मग सगळं वृत्तान्त त्यांना कथन केला. त्यांनाही फार समाधान वाटलं. म्हणाले

“आता मला काळजी नाही. तू हे सगळं खटलं उत्तम रित्या सांभाळू शकशील याची खात्री पटली आता. आमचा आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर.”

सकाळी सकाळी, सरितानी फोन करून निशांत आणि विशालला पण बोलावून घेतलं. ते आले तेंव्हा सरिता आणि बाबा, सर्व मजुरांना एकत्र करून पुढच्या योजना काय असतील या बद्दल बोलत होती. आता ५ ऐवजी ३० एकरांचं नियोजन करायचं होतं. हे चौघे जणं आल्यावर सरितानी आदल्या रात्रीची घटना सविस्तर सगळ्यांना सांगितली.

चौघेही जण ही कहाणी ऐकून अवाक झाले. काय बोलावं हेच समजत नव्हतं कोणाला. हे असं काही घडेल यांची कल्पनाच कोणी केली नव्हती. भानावर आल्यावर निशांत म्हणाला “ वहिनी, तू फार मोठी रिस्क घेतलीस. तू नागाच्या शेपटीवर पाय  ठेवला आहेस. अग रावबाजी साधासुधा  माणूस नाहीये. तो आता कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही. अग जरा तरी विचार करायचा होतास.”

“निशांत,” वर्षा मध्येच बोलली. “जर तुला माहीत होतं की रावबाजी बदमाश माणूस आहे मग त्याला शेत कसायला का दिलं? आणि हे सगळं तू आत्ता सांगतो आहेस? काय म्हणायचं तुला ! हात जोडते तुम्हाला.”

“अग नाही, आम्हाला हे सगळं नंतर कळलं. आधी माहीत असतं तर हा व्यवहार केलाच नसता.” निशांतनी सफाई दिली.

“म्हणजे काही चौकशी न करताच त्या माणसाला आपलं शेत कसायला देऊन टाकलं? कमाल आहे तुम्हा लोकांची. त्यांनी दाखवलेल्या १० लाखांची एवढी भूल पडली तुम्हा लोकांना? आणि केलं काय त्या पैशांच, नुसते उधळले. कुठला बिझनेस उभा केला त्या मधून? ते तरी सांगा.” विदिशा आता संतापली होती.

“नाही, चुकलंच जरा आमचं. पण आता यापुढे आम्ही काळजी घेऊ.” विशाल जरा नरमाईने बोलला.

विषयाला जरा वेगळंच वळण लागतंय असं बघून बाबांनी हस्तक्षेप केला. म्हणाले. “ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता यावर वादावादी कशाला करतोय आपण. त्यापेक्षा आपण पुढच्या काय योजना आहेत त्यावर बोलू. उगाच वेळ वाया का घालवता आहात.”

“अगदी बरोबर बोललात बाबा, ३० एकरांची बांधणी करायची म्हणजे सविस्तर चर्चा करणं आवश्यक आहेच.” सरितानी बाबांशी सहमती दर्शवली.

पण बाबांचा मूड वेगळाच होता. ते म्हणाले की “ मला असं वाटतं की आधी आपण शेताची पाहणी करून येऊ, त्या रावबाजीने निशांतला सांगितलं की शेत जमीन खराब अवस्थेत आहे, त्याची शहानिशा करणं आवश्यक आहे, कारण त्यानुसार पुढची आंखणी करणं सोपं पडेल.” सगळ्यांनाच ते पटलं. मग सगळे जण शेताची पाहणी करायला निघाले.

जाता जाता, निशांत सरिताला म्हणाला, “वहिनी, आत मधे असलेल्या रावबाजीच्या दोन माणसांना तू कसं फितवलं ?”

“मी नाही, ते आपल्या रघुवीरचं काम आहे. रघुवीर आणि त्यांची गॅंग आपल्याकडे किती सुखात आहेत आणि आपण सर्वांची किती आणि कशी काळजी घेतो हे ते दोघं बघत होते, वर रघुवीर त्यांना पटवत होता. त्यांना रावबाजी किती बदमाश आहे ते दिसतच होतं, मग काय ? उलटले ते, आणि आले आपल्याकडे.”

शेतीचं पूर्ण निरीक्षण करून झाल्यावर, सगळ्यांनी सुटकेचा नी:श्वास टाकला. शेती उत्तम होती. याचाच अर्थ, पीक पाणी  उत्तम आलं होतं, पण रावबाजीने खोटं सांगून पैसे देण्याचं नाकारलं होतं. पण या गोष्टीला मागे टाकून सर्व जण यापुढे काय करायचं हे ठरवण्या साठी बसले.

प्रत्येकांनी आपापले विचार सांगायला सुरवात केली.

शेतावरून आल्यावर सगळे जणं अंगणात कोंडाळं करून बसले. आंबा आणि चिंचेची झाडं असल्यामुळे, उन्हाचा ताप जाणवत नव्हता. फक्त बाबा त्यांच्या खुर्चीवर बसले होते बाकी सगळे खालीच मांडी घालून बसले. काल पासून जो गोंधळ चालू होता, तो मजुरांच्या बायकांपासून लपलेला नव्हता. त्यांच्या लक्षात आलं की ही बैठक महत्वाची असणार आहे आणि बराच वेळ चालणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच नाश्ता करून ठेवला होता. आता सर्व बसल्यावर त्यांनी दिला. आणि त्या पण काय ठरतंय हे बघण्यासाठी येऊन बसल्या. चहा, नाश्ता झाल्यावर सरिता बोलायला उभी राहिली. आता सरिताचं नेतृत्व निर्विवाद पणे स्थापित झालं होतं.

सरिता बोलायला उभी राहिली. सर्व जण आता ती काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी म्हणून सरसावून बसले. ती काय बोलणार आहे याचा कोणालाच अंदाज येत नव्हता,

“माझ्या मनात काय आहे ते मी सांगते. नंतर कोणाला काही सूचना करायच्या असतील, तर तसा त्या सूचनांवर विचार करू.” सर्वांनी माना डोलावल्या.

“आज आपल्याकडे माणसांची संख्या जरी जास्त असली, तरी शेताची जमीन ५ एकरांवरून ३० वर गेली आहे त्यामुळे, अपार कष्ट करावे लागणार आहेत. अथक श्रम करण्याची तयारी आहे का सर्वांची ? हे प्रथम सांगा.”

रघुवीर आणि बालाजी उभे राहिले, म्हणाले “आम्हाला कल्पना आहे आणि तयारी पण आहे. आम्ही कोणीच कामाला मागे हटणार नाही.”

“छान. माझी हीच अपेक्षा होती.” सरितानी समाधानाची पावती दिली.

“आपण ५ एकरात सफेद मुसळी आणि अश्वगंधाची लागवड केली, ती तशीच करायची आहे पण आता २० एकरात, आणि  ५ एकरात भृंगराज ची लागवड करायची. बाकीच्या  ५ एकरांपैकी एका एकरात गुग्गुळ ची नर्सरी तयार करायची. बाकीच्या चार एकरांपैकी दोन एकरात चरावू कुरण  तयार  करायचं. आणि दोन एकर राखीव ठेवायचे.” – सरिता.

“राखीव कशा साठी ?” निशांतनी विचारलं.

“राखीव याच्यासाठी की सफेद मुसळी पसरून ठेवावी लागते म्हणून. तो कालावधी सोडून त्या जमिनीचा उपयोग आपण दुसरी झटपट पिके घेण्यासाठी करू शकतो.” – सरिता.

सरितानी सांगितलेल्या कार्यक्रमावर थोडी चर्चा होऊन बैठक संपली. सगळ्यांचा प्रमुख म्हणून बारीकराव व्यवस्था पाहणार होता. त्याच्या मदतीला रघुवीर होता.

सगळे मजूर लोकं गेल्यावर, आता फक्त घरचीच मंडळी उरली होती. आता ऊन पण चढायला लागलं होतं म्हणून सगळे घरात जाऊन बसले. निशांत थोडा अस्वस्थ होता. त्याने वर्षाकडे पाहिलं. पण वर्षांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तो तसाच चुळबुळत राहिला, सरिताच्या ध्यानात त्यांची अवस्था आली. ती म्हणाली –

“निशांत, काहीतरी तुझ्या मनात चाललंय. काय ते सांगशील का ?”

निशांत काही बोलणार तेवढ्यात बालाजी सांगत आला की “रावबाजी पोलिसांना घेऊन आला आहे आणि गेट उघडायला सांगतो आहे.”

“मग” – सरितानी विचारलं.

“आम्ही सांगितलं की वहिनी साहेबांना घेऊन येतो तो पर्यन्त इथेच थांबा. पण तो ऐकायला तयार नाहीये. तो पोलिसांना म्हणाला की साहेब बघा, माझ्याच शेतात हे मला जाऊ देत नाहीयेत.” – बालाजी.

“ठीक आहे. तू हो पुढे मी आलेच.” असं म्हणून सरिता आत गेली; आणि काही कागद पत्रे बरोबर घेतली आणि शेताकडे चालू पडली. तिच्या मागे मागे वर्षा आणि विदिशा पण निघाल्या. त्यांना जातांना पाहून निशांत आणि विशाल पण निघाले. त्यांना बाबा म्हणाले की “ तुम्ही समोर जाऊ नका. जरा मागेच थांबा. जर असं वाटलं की तुमची गरज आहे, तरच सरिताला जॉइन व्हा.”

“काय रावबाजी, आज पोलिसांना घेऊन आलात ?” सरितानी विचारलं.

“बघा साहेब, मी म्हणालो  होतो न, की काल मला शेतात जायला या लोकांनी प्रतिबंध केला म्हणून. आता तुम्हीच बघा. माझ्याच शेतात मला जायला अडवताहेत. काय तर म्हणे वहिनी साहेबांची  ऑर्डर आहे. आता ह्या वहिनी साहेब कोण ते मला काल कळलं. काल तर यांची बरीच माणसं होती अडवायला. साहेब ही गुंडागर्दी आहे. तुम्हीच सांगा आता.” रावबाजीने  पोलिसांकडे रडगाणं  गायलं.

पोलिसांना हे सगळे प्रकार नवीन नव्हते, आणि रावबाजीचा इतिहास सुद्धा पोलिसांना माहीत होता. समोर तीन महिला होत्या आणि ते श्रीपतराव आणि प्रताप, दोघांना पण चांगले ओळखत होते.

“वहिनीसाहेब कोण आहेत ?”- पोलिस.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.