Revolver - 13 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 13

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 13


प्रकरण १३
 न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही यानी नावाप्रमाणेच एक सक्षम वकील म्हणून प्रक्टिस सुरु केली होती. आणि वीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची महिला न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. कोर्टात खटला चालू झाला. अॅडव्होकेट खांडेकर आपलं प्रास्ताविक करायला उभे राहिले. 

“या प्रकरणात मी वस्तुस्थितीदर्शक आणि संक्षिप्त अशी भूमिका घेणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांप्रमाणे कुठलीही नाट्यमयता आम्ही त्यात आणणार नाही. आमचं सादरीकरण हे गणितानुसार खात्री देणार आणि त्यातून नि:संदिग्धपणे अनुमान काढता येईल, अर्थ काढता येईल असं असणार आहे.” खांडेकर पुढे बोलू लागले.....

“यावर्षीच्या सात ऑक्टोबरला चांडक चा मृत्यू झाला. वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आम्ही दाखवून देऊ की रिव्हॉल्व्हर चांडकच्या अंगाला हृदयाच्या थोडंसं खाली, डाव्या बाजूला रोखलं गेलं होतं. आणि त्यातून गोळी झाडली गेली होती. वैद्यकीय भाषेत याला इंग्रजीमध्ये कॉन्टॅक्ट वुन्ड म्हणतात. म्हणजे रिव्हॉल्व्हरची नळी शरीराला टेकवून मारलेली गोळी. अशाप्रकारे ज्यावेळेला गोळी मारली जाते त्यावेळेला गोळीतून निघणारा वायू हा गोळीच्या बरोबरीने मृताच्या शरीरात शिरतो आणि त्याचबरोबर गोळी झाडल्याचा आवाज सुद्धा अगदी बारीक येतो. आम्ही सरकार पक्ष असेल दाखवून देऊ की ऋता रिसवडकर ने चांडकची अपॉइंटमेंट घेतली होती त्यानुसार ती त्याच्या घरी गेली त्याच्या अपार्टमेंटला दोन दार आहेत ती पुढच्या दाराने गेली. आम्ही असेही दाखवून देऊ की तिला संशयितरित्या अपार्टमेंटच्या मागच्या दाराने बाहेर पडताना बघितलं गेलं आहे.” खांडेकर क्षणभर थांबले.लोकांची उत्सुकता ताणून पाहण्यासाठी, आणि पुढे बोलू लागले..... 

“आम्ही हेही दाखवून देणार आहोत की चांडकच्या रक्ताच्या थारोळ्यात तिच्या बुटाचा पाय पडला. ते लक्षात आल्यानंतर ती बाथरूम मध्ये गेली. आणि त्यावरच रक्त तिने पुसायचा प्रयत्न केला. पण फरशीवर तिच्या बुटाचा ठसा उमटला ज्या टॉवेलने तिने रक्त पुसायचा प्रयत्न केला त्यावर रक्ताचे डाग आहेत आणि त्याचबरोबर तिच्या बुटाचे काही कण सुद्धा त्या टॉवेलला लागलेले आहेत.” 

“आम्ही पुढे हे दाखवणार आहोत की तिचा मित्र किंवा हितचिंतक कार्तिक कामत याने तिचा हा गुन्हा लपवायचा प्रयत्न केला. काही पुरावा नष्ट करण्याचा किंवा त्यात संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याच्यावर स्वतंत्र खटला भरण्यात येईलच, पण या आरोपीवर मात्र खटला चालवण्याजोगा पुरेसा पुरावा आमच्याकडे आहे......” 

“सरकार पक्ष हे दाखवून देणार आहे की ज्या रिव्हॉल्व्हर ने खून करण्यात आला ते रिव्हॉल्व्हर आरोपीच्या ताब्यात होतं. आरोपीचा वकील पाणिनी पटवर्धन याने दुसऱ्या रिव्हॉल्व्हर च्या साह्याने गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ते काहीही असलं तरी ज्या हत्यारांनी खून झाला ते हत्यार आरोपीच्याच ताब्यात सापडलं आहे. आता ते तिच्याकडे कसं आलं ते तिलाच स्पष्ट करू दे.”

“पाणिनी पटवर्धन जे या प्रकरणात आरोपी आणि कार्तिक कामत दोघांचीही वकिली करत आहेत, त्यांच्यावर पुरावा दडपल्या प्रकरणी किंवा आरोपीचा सहाय्यक म्हणून आत्ता जरी बोट ठेवण्यात आलं नसलं तरी अजून संशयातून त्यांची सुटका झालेली नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर आरोपीला खून केल्याच्या आरोपाखाली शिक्षा देण्याची विनंती मी कोर्टाला करतो. आरोपीला खून करण्याचं कारण होतं का आणि संधी होती का एवढ्याच बाबींचा विचार या प्राथमिक सुनावणीत न्यायाधीशाने करणं अपेक्षित आहे.” एवढं बोलल्यानंतर जाणून बुजून पाणिनी पटवर्धन कडे बघून ते पुढे म्हणाले, “ पुराव्यात गोंधळ निर्माण करणे, तो दडवणे याबद्दल जे कोणी संबंधित लोक आहेत त्यांचं काय करायचं ते आम्ही यथावकाश करू. आता आमची विनंती आहे की आरोपी बद्दलचा निर्णय कोर्टाने घ्यावा.” एवढं बोलून न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही यांचेकडे आणि कोर्टात जमलेल्या सर्वांकडे एक दृष्टिक्षेप टाकून ते आपल्या खुर्चीत जाऊन बसले. 

न्यायाधीश सौ. बहुव्रीही यांनी पाणिन पटवर्धन कडे पाहिलं आणि विचारलं,

“ बचाव पक्ष आत्ताच काही प्रास्ताविक करणार आहे की नंतर करणार आहे?” 

“आम्ही प्रास्ताविक करणार नाही नंतर करू.” पाणिनी म्हणाला. 

“ठीक आहे, मिस्टर खांडेकर, तुमचा पहिला साक्षीदार बोलवा.” बहुव्रीही म्हणाल्या.

खांडेकरांनी आपला पहिला साक्षीदार म्हणून जो पोलिस अधिकारी चांडकच्या घरी दाखल झाला होता आणि ज्याने प्रेताचं वर्णन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं होतं त्या पोलिसाला त्याची उलट तपासणी पाणिनीने घेतली नाही.

 त्यानंतर इन्स्पेक्टर होळकर ला साक्षीदार म्हणून बोलवण्यात आलं आपण महत्त्वाचे साक्षीदार आहोत याची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यानं आपल्या साक्षीत हे कथन केलं की त्याच्या हाताखालच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बोलल्यानंतर आपण चांडकच्या घरी आलो फोटोग्राफर कडून फोटो काढून घेतले. नंतर ज्या ठिकाणी प्रेत पडलं होतं तिथे खडूने खुणा केल्या त्या फ्लॅट मधील फिंगरप्रिंट घेण्याची व्यवस्था केली आणि पोस्टमार्टम साठी प्रेत पाठवलं.

पाणिनी पटवर्धन यांनी आपली उलट तपासणी घ्यावी आणि आपलं महत्व वाढावं अशी त्याची अपेक्षा होती पण ती अपेक्षा पाणिनीने पूर्ण केली नाही. त्याची उलट तपासणी घेतली गेली नाही. 

त्यानंतर ज्या फोटोग्राफरने वेगवेगळ्या कोनातून प्रेताचे फोटो घेतले होते, त्याला साक्षीदार म्हणून बोलावलं गेलं आणि त्यांने घेतलेले फोटो पुरावा म्हणून दाखल केले गेले. त्याचीही उलट तपासणी पाणिनीने घेतली नाही. न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही यांनी आश्चर्याने पाणिनीकडे बघितलं त्यांना काहीतरी बोलायचं होतं परंतु पाणिनीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतर पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरला पाचारण करण्यात आलं. त्यानं जखम कुठल्या प्रकारची झाली होती, गोळी शरीरात कशाप्रकारे घुसली, वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्ट वुंड म्हणजे काय याबद्दल माहिती दिली. त्यांन सांगितलं एका गोळीतच चांडकचा मृत्यू झाला होता, मात्र गोळी लागल्यानंतर सुरुवातीला काही काळ तो बेशुद्ध झाला होता आणि त्यादरम्यानच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यानं पुढे सांगितलं की ज्या गोळीने चांडकचा मृत्यू झाला होता ती गोळी प्रेताच्या शरीरातून काढण्यात आली होती आणि त्याची तपासणी करण्यात आली होती. मृत्यूची वेळ त्याच्या म्हणण्याप्रमाणे सात ऑक्टोबरला संध्याकाळी सात ते रात्री बारा या दरम्यानची निश्चित करता येणार होती. त्यानं प्रेताचं पोस्टमार्टम आठ तारखेला दुपारी केलं होतं आणि त्यानुसार पोस्टमार्टम करण्यापूर्वी १२ ते १७ तास अगोदर मृत्यू झाला असावा असा त्याचा अंदाज होता. साक्षीत त्याने पुढे असं सांगितलं, १२ ते १७ तासाऐवजी अधिक काटेकोरपणे पाहिलं गेल्यास पंधरा ते सोळा तास असं गृहीत धरायला हरकत नाही. आश्चर्य म्हणजे या महत्त्वाच्या साक्षीदाराची देखील उलट तपासणी पाणिनी ने घेतली नाही.

बरोबर याच वेळी इन्स्पेक्टर होळकर ला खांडेकरांनी पुन्हा साक्षीसाठी बोलावलं. 

“ इन्स्पेक्टर होळकर, तुला मी पॉईंट अडतीस कॅलिबर च रिव्हॉल्व्हर दाखवतो. मला असं विचारायचंय, हे रिव्हॉल्व्हर तू यापूर्वी पाहिलं आहेस का?” 

“हो सर, बघितलं आहे ”

“कधी बघितलंस हे प्रथम ? ”

“ ८ ऑक्टोबरला पावणे बाराच्या सुमारास दुपारी ” 

“कुठे बघितलंस ते प्रथम ?” –खांडेकर.

“ऋताच्या अपार्टमेंट मध्ये”

म्हणजे या खटल्यातील आरोपी?” 

“हो.” 

“अपार्टमेंट मध्ये नक्की कुठे होतं.?” 

“खोलीच्या मध्यावर असलेल्या टेबलवर ठेवलं होतं ” 

“ या अपार्टमेंटचा फोटो घेतला गेला आहे का? ” 

“हो सर घेतला आहे.” 

“आणि या फोटोग्राफ मध्ये रिव्हॉल्व्हर नेमकं कुठे होतं हे दिसतंय का?”-खांडेकर 

“हो सर.”  

“आता तुझ्याकडे तो फोटोग्राफ आहे का?” 

“आहे.” होळकर म्हणाला आणि त्याने तो फोटो खांडेकरांकडे दिला. 

“हा फोटो सरकार पक्षाचा पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात यावा.” खांडेकर म्हणाले 

या ठिकाणी प्रथमच पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. 

“एक मिनिट, पुरावा म्हणून हा फोटो दाखल करून घेण्यापूर्वी मला इन्स्पेक्टरला काही विचारायचं आहे या फोटोच्या संदर्भात.” 

इतका वेळ शांत असलेला पाणिनी पटवर्धन प्रश्न विचारायला उभा राहिल्यामुळे न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर आता उत्सुकता निर्माण झाली. 

“ठीक आहे विचारा मिस्टर पटवर्धन” न्यायाधीश म्हणाल्या.

“या फोटोत टेबलावर ठेवलेलं रिव्हॉल्व्हर दिसतंय. बरोबर ?” पाणिनीने विचारलं

“हो सर” 

“तुम्ही आता ओळखलेलं तेच हे रिव्हॉल्व्हर आहे?” 

“हो सर” 

“फोटो ज्या अवस्थेत ते रिव्हॉल्व्हर दिसतंय त्याच अवस्थेत तुला ते तिच्या फ्लॅटमध्ये आढळलं होतं?” 

“होय सर.” 

“याचा अर्थ रिव्हॉल्व्हर तिथून हलवण्यापूर्वी हा फोटो घेतला गेला आहे?” 

इन्स्पेक्टर होळकर थोडा घुटमळला. आपल्या हाताची आणि पायाची अस्वस्थपणे हालचाल झाली. 

“ खरं म्हणजे ते रिव्हॉल्व्हर उचललं गेलं, तपासलं गेलं आणि नंतर पुन्हा होतं तसंच होतं त्या जागी जसंच्या तसं ठेवलं गेलं आणि नंतर त्याचा फोटो काढला गेला ” 

“ कुणी तपासणी केली त्याची?” 

“मी केली.” 

“ तुझ्या व्यतिरिक्त आणखी कोणी?” 

“गुन्हे अन्वेषण चे माझे वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर तारकर माझ्यासोबत होते त्यावेळी.” 

“तपासणीमध्ये काय काय तपासलं गेलं?” पाणिनीने विचारलं 

“आम्ही त्या रिव्हॉल्व्हर चा सिलेंडर उघडला आत एक रिकामं काडतूस होतं. आम्ही नळीचा हुंगून वास घेतला.”

 “त्यावरचे हाताचे ठसे मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला का?”

 “हो केला.” 

 “त्यानंतर काय झालं?” पाणिनीने विचारलं 

“ नंतर आम्ही ते रिव्हॉल्व्हर होतं त्याच ठिकाणी पुन्हा ठेवलं म्हणजे होतं त्याच अवस्थेत फोटो घेण्यासाठी.”

 “आणि नंतर हा फोटो घेतला गेला आहे? जो तुम्ही आता पुरावा म्हणून सादर करू इच्छिता?” 

 “हो बरोबर” 

 “ज्या गोळीने चांडक मारला गेला होता, त्या गोळीचा आणि या रिव्हॉल्व्हरचा परस्पर संबंध आहे का हे ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात का ?”

 “थांबा.. थांबा...” अॅडव्होकेट खांडेकर उठून उभे राहत म्हणाले. 

 “हा संबंध दाखवण्यासाठी माझा पुढचा साक्षीदार असणार आहे. तो बंदुकीच्या गोळ्यांचा तज्ज्ञ म्हणजे बॅलेस्टिक एक्सपर्ट आहे. आम्ही त्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याची उलट तपासणी पटवर्धन घेऊ शकतात आणि स्वतःच शंका निरसन करून घेऊ शकतात.” 

 पाणिनी हसला. त्याचा मुद्दा न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही यांच्या लक्षात आला. त्या म्हणाल्या, “ठीक आहे. हा साक्षीदार एवढेच उत्तर देऊ शकतो की असा प्रयत्न केला गेला की नाही.” 

 “हो युवर ऑनर. असा प्रयत्न केला गेला.” होळकर म्हणाला. 

“ कधी?” पाणिनीने विचारलं

“ रिव्हॉल्व्हर सापडल्यानंतर लगेचच. अगदी निश्चित अशी वेळ सांगता येणार नाही पण पुढच्या काही तासातच.”

“काही तासातच म्हणजे नक्की कधी म्हणायचंय तुला?” पाणिनीने विचारलं

“अगदी काही काळातच ” होळकर म्हणाला.

“ म्हणजे पुढच्या २४ तासात? ” 

साक्षीदार गोंधळला. थोडा घुटमळला. 

“ पुढच्या ४८ तासात?” पाणिनीने विचारलं 

“नाही एवढे ४८ तास नाही ” 

“ मग २४ तास असू शकतात?” 

“असू शकतात. मला वाटतं त्याहून थोडे कमी असतील.” -होळकर 

“तपासणी झाल्यानंतर टेबलावर ते रिव्हॉल्व्हर आधी होतं त्याच अवस्थेत नेमकं कोणी ठेवलं?” 

“मीच ठेवलं.” होळकर 

“अगदी नेमक्या कुठल्या अवस्थेत ते सुरुवातीला होतं हे तुला कसं कळलं ? ” 

“मला आठवत होतं, म्हणजे लक्षात होतं.” 

“ते उचलण्यापूर्वी तू काही खूण करून ठेवली होतीस का?” पाणिनीने विचारलं 

“ नाही.” 

“ जेव्हा तू खोलीत प्रवेश केलास आणि तुला हे रिव्हॉल्व्हर दिसलं त्या वेळेला रिव्हॉल्व्हर ची नळी दाराच्या दिशेने होती की दारापासून वेगळ्या दिशेला होती?”

“ टेबलवर होतं,फोटोत दाखवलंय तसंच होतं. ” होळकर जरा वैतागून म्हणाला.

पाणिनीने आपल्या हातात फोटो असा धरला की साक्षीदाराला तो दिसणार नाही.

“रिव्हॉल्व्हर ची नळी दाराच्या दिशेने होती की दारापासून वेगळ्या दिशेला होती?” त्याने तोच प्रश्न पुन्हा विचारला.

“ तेव्हा मला आठवत होतं.आता लक्षात नाही पण फोटोत दिसतोय तसच होतं. मी जेव्हा ते उचललं तपासायला तेव्हा ते तपासून पाचच मिनिटांनी पुन्हा जाग्यावर ठेवलं त्यामुळे माझ्या लक्षात होतं की आधी कसं होतं ते.आता मला आठवत नाही नीट.” होळकर म्हणाला.

“ मला एवढंच विचारायचं होतं, या साक्षीदाराला.” पाणिनी म्हणाला.

“ तर आम्ही आता हा फोटो पुरावा म्हणून घेऊ इच्छितो.” खांडेकर म्हणाले.

“ माझी काही हरकत नाही.” पाणिनी म्हणाला.

खांडेकरांनी तो फोटो क्लार्क कडे दिला आणि पुरावा म्हणून दाखल झाला. खांडेकर पुन्हा होळकर कडे वळले.

“ आरोपीने या रिव्हॉल्व्हर संदर्भात तुझ्याशी काही बोलणं केलं का?”

“ मी विचारल्यावर ती म्हणाली की कामतने तिला दिलंय ते.”

“ आणखी काय म्हणाली?” –खांडेकर.

“ त्या रिव्हॉल्व्हर मधून एक गोळी झाडली गेल्या बाबत मी तिला विचारलं.त्यावर ती म्हणाली की मला त्याबाबत काहीच माहित नाही.तिला ते मिळाल्यापासून ते त्याच अवस्थेत म्हणजे आहे तसंच आहे. ” होळकर म्हणाला.

“ हे रिव्हॉल्व्हर सरकार पक्षाचा पुरावा म्हणून दाखल करावं.” खांडेकर म्हणाले.न्यायाधीशांनी क्लार्क ला तसे आदेश दिले. फोटो पुरावा क्रमांक २९ आणि रिव्हॉल्व्हर पुरावा क्रमांक ३० असा दिला गेला.

“ तुम्ही करा उलट तपासणी.” खांडेकर पाणिनीला म्हणाले.

“ कामत कडून रिव्हॉल्व्हर मिळालं असं तिने सांगितलं?” पाणिनीने विचारलं

“ हो.” होळकर म्हणाला.

“ मुलगा की वडील?”

“ कामत कडून, एवढंच म्हणाली ती.”

“ कधी मिळालं रिव्हॉल्व्हर या बद्दल बोलली का ती?”

“ नाही.” –होळकर

“ ऐका एक मिनिट.” खांडेकर.मधेच म्हणाले.“ वेळेबाबतचं स्पष्टीकरण मी करतो.मला होळकरला एकच प्रश्न विचारूदे मधेच. होळकर तू आरोपीच्या घरी कधी गेलास?”

“ पावणे बारा वाजता.” –होळकर

“ मला आणखी काही विचारायचं नाही.” पाणिनी म्हणाला.

“अलक्षचंद्र रेडकर ला बोलावलं जावं. तो रिव्हॉल्व्हर तज्ज्ञ म्हणजे बॅलॅस्टिक एक्स्पर्ट आहे. ” खांडेकर म्हणाले.

“ मी तुला सरकारी पुरावा क्र. ३० म्हणून नोंदवलं गेलेलं रिव्हॉल्व्हर दाखवतो.तुझ्या ते परिचित आहे का सांग.” खांडेकर म्हणाले.

साक्षीदाराने आपल्या हातात ते रिव्हॉल्व्हर घेतलं. निरखून पाहिलं.त्यावरचा नंबर पहिला आणि म्हणाला, “ मला माहित्ये हे पूर्णपणे.”

“ आता तुला मी पुरावा क्र. १४ म्हणून दाखल झालेली , आणि चांडक च्या खुनाला कारणीभूत ठरलेली गोळी दाखवतो आणि विचारतो की तू त्याच्याशी परिचित आहेस का? ” खांडेकर म्हणाले.

अलक्षचंद्र रेडकर ने आपल्या खिशातून भिंग काढून ती गोळी तपासली आणि म्हणाला, “ मला माहिती आहे ही गोळी.त्यावर मी केलेली खूण आहे.”

“ ही गोळी पुरावा क्र. ३० म्हणून सादर झालेल्या रिव्हॉल्व्हर मधून मारण्यात आली आहे?”

“ होय.”

“ अन्य कुठल्याच रिव्हॉल्व्हर मधून नाही?”

“ नाही नक्कीच नाही.” अलक्षचंद्र रेडकर म्हणाला.

“ विचारा तुमचे प्रश्न.” खांडेकर पाणिनी पटवर्धन ला म्हणाले.

“ माझे काही प्रश्न नाहीत.” पाणिनी म्हणाला.

( प्रकरण १३ समाप्त)



माझी कथा आपल्या मित्र ,नातलग यानाही वाचायला सुचवा. आपण स्वत: comment करा.