प्रकरण १२.
पाणिनी समोरच्या आरामशीर सोफ्यावर हात ठेवायच्या जागी आपले पाय ठेवून आणि हात ठेवायच्या दुसऱ्या जागी आपली पाठ टिकवून कनक ओजस सिगरेट शीलगावत बसला होता.
“इकडे आड तिकडे विहीर अशी तुझी अवस्था झाल्ये पाणिनी.” तो म्हणाला
“कार्तिक कामत ला जामीन मिळालाय आणि पुढच्या दोन तासातच तो बाहेर येईल. दुसरीकडे ऋता रिसवडकर ला खुनाच्या आरोपात दोषी धरण्यात आलंय. तिला जामीन मंजूर झालेला नाही. सरकारी वकील खटला तातडीने सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा अनुभव असा आहे की बचाव पक्ष खटला जेवढा उशिरा सुरू होईल याच प्रयत्नात असतो. त्यामुळे तुझ्यावर दबाव टाकण्यासाठी ते केस तातडीने सुरु करताहेत.” कनक म्हणाला
“निशांगी जयस्वाल बद्दल मी तुला माहिती काढायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं?” पाणिनीने विचारलं
“अशा प्रकारच्या मुलींची माहिती काढणं थोडं अवघड असतं. विशेषता तिने एका मोठ्या उद्योजक कुटुंबातील कुमारशी नुकतंच लग्न केलं असल्यामुळे. तुला माहिती आहे ना की ती एक मॉडेलिंग करणारी मुलगी आहे ,अशा मुली सर्वसाधारणपणे खूप कष्ट करून हळूहळू आपला जम बसवणाऱ्या असतात. त्यातल्या बऱ्याच जणींची लग्न होतात, त्यांना मुलं होतात ,आई किंवा बायको म्हणून त्या आपल्या भूमिका चांगल्या निभावतात पण अशा मुलींबद्दल समाजाची दृष्टी जरा वेगळी असते कारण त्यांना अशा अर्धनग्न फोटो देऊन अंग प्रदर्शन करणाऱ्या मुली आवडत नसतात.” कनक ओजस म्हणाला.
“अरे पण तू हे तत्त्वज्ञान मला कशाला सांगतो आहेस? तुला मी माहिती काढायला सांगितली होती, तो विषय सोडून तू वेगळंच बोलतो आहेस.” पाणिनी म्हणाला.
“मी हे तुला एवढ्यासाठी सांगतोय की समाजाच्या दृष्टीने अशा मुली फालतू वर्गात असल्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे आसपास चौकशी करून तिचा ठाव ठिकाणा काढणं थोडं अवघड आहे. तरी मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ती एक फालतू म्हणावी अशा प्रकारचीच मॉडेल आहे. म्हणजे होती लग्नापूर्वी. चांडक ,हा सुद्धा एक जुगारी ब्लॅकमेलर असाच माणूस असल्यामुळे तिचा आणि त्याचा परिचय होता. म्हणजे बऱ्यापैकी घसट होती. ते एकत्र फिरायला वगैरे जात असत. मला मिळालेल्या माहितीनुसार एकतर त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं किंवा त्या दोघांच्यात कुठले तरी व्यावसायिक जुगाड चालू होतं. चांडक हा ब्लॅकमेलर जुगारी होताच पण तो तसा असल्याबद्दलचा पुरावा मिळाला मिळालेला नाही अजून. तो एकदम ऐषारामी जीवन जगत होता पण त्यासाठी तो नेमका कुठून पैसा आणायचा हे अजून गुलदस्त्यात आहे. त्याचं कुठल्याही बँकेत खातं नाही तो इन्कम टॅक्स भरत नाही. त्याचं सगळं उत्पन्न आणि सगळा खर्च रोखीनेच करायचा. त्याचा जेव्हा खून झाला तेव्हा त्याच्या खिशात पंधरा हजार रुपये रोख मिळाले. त्याला त्याच्या धंद्यातून मिळणारे पैसे तो कुठेतरी पुरून ठेवत असावा किंवा लपवून तरी.” कनक म्हणाला.”
“इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला त्याचा कधीही संशय नाही आला?” पाणिनी नं विचारलं.
“मला मिळालेल्या माहितीनुसार इन्कम टॅक्स आणि त्याचा कधी संबंध आला नाही. तो सर्व व्यवहार रोखीने करायचा पण कुठलाही व्यवहार त्याने स्वतः जाऊन केल्याचं सिद्ध झालेलं नाही. स्वतःला मागे ठेवून दुसऱ्या कोणा तर्फे तरी तो व्यवहार करायचा. इतकं की चांडक नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वात आहे याचा सुद्धा पुरावा त्याने ठेवला नव्हता....
निशांगी जयस्वाल ला तिचे आणि चांडकचे असलेले संबंध कधीच चव्हाट्यावर येऊन द्यायचे नव्हते आणि ते तिला लग्नानंतर तर परवडणारच नव्हतं विशेष काय एवढ्या मोठ्या उद्योजकाच्या कुटुंबात पत्नी किंवा सून म्हणून आल्यानंतर....
आता थोडंसं कार्तिक कामतच्या कुमारबद्दल.” कनक पुढे सांगू लागला.
“तुला माहित आहे की तो सेकंड हॅन्ड कार विक्रीच्या व्यवसायात आहे. छोटी मोठी उलाढाल करून तो आपला व्यवसाय चालवतो पण प्रत्येक व्यवहारात तो नफा कमवतोच. कुठलाही व्यवसाय त्याने तोट्यात केलेला नाही. या व्यतिरिक्त तो रियल इस्टेट व्यवसायातही आहे. त्याला कुठून माहिती मिळते ते मला समजलं नाही पण विकाऊ असलेल्या छोट्या-मोठ्या जमिनी किंवा इतर प्रॉपर्टी याची खबरबात तो ठेवून असतो त्यातही तो बऱ्यापैकी नफा कमवतो.”
“अॅक्मे कंपनी बद्दल काय माहिती मिळाली?”
“अॅक्मे आणि युरेका असोसिएटेड कंपनी दोन्ही कंपन्यांना १३९७ साटम रोड या एकाच पत्त्यावर पत्र पोचतात. कुठल्यातरी माणसांनी या पत्त्यावर एक खोली भाड्याने घेतली आहे तो माणूस क्वचितच तिथे राहतो पण आपलं भाडं नियमित भरतो आहे आणि आलेलं टपाल पत्र वगैरे घेण्यासाठी तो तिथे येतो.” कनक म्हणाला
“या माणसाचं वर्णन आहे का?” पाणिनीने विचारलं
“वर्णन मिळालं आहे पण ते सर्वसाधारण वर्णन आहे. म्हणजे कुठल्याही माणसाला ते लागू पडेल असं आहे. तो त्या खोलीत खूप कमी वेळा आणि आला तर फक्त रात्रीच येतो तेव्हा आसपासच्या लोकांनी त्याला पाहिलेले नाही आपलं भाडं सुद्धा तो आगाऊ भरतो त्यामुळे जागा मालकांनी सुद्धा त्याला फारसं पाहिलेलं नाही”.
“एकंदरीत तू दिलेल्या माहितीवरून मला फारसा काही फायदा होईल असे दिसत नाही” पाणिनी म्हणाला.
“तुला एक मी टीप देतो पाणिनी.” कनक म्हणाला.
“बोल”
“मला मिळालेल्या माहितीनुसार अॅडव्होकेट खांडेकर हे त्यांना करता येईल तेवढं निशांगी जयस्वाल ला या प्रकरणाच्या बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत कारण त्यांना खात्री आहे की तूच खुनी हत्याराची अदलाबदल केलीस आणि त्यांना असं वाटतंय की हे सिद्ध करू शकतील. ते ऋता रिसवडकरकडून त्याना खूप महत्त्वाची माहिती या कामासाठी मिळणार आहे. तू अर्थात त्यांच्या मनात ही कल्पना बिंबवू शकतोस की निशांगी जयस्वाल इमेज चांडकला मारलेलं असू शकतं कारण त्यांचा पूर्वपरिचय होता आणि त्याला मारण्याचं तिला कारणही होतं, पण ज्या क्षणी त्यासाठी तू रिव्हॉल्व्हर बद्दलचा पुरावा सादर करशील, खांडेकर असं निदर्शनास आणतील की तूच जाणून बुजून रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून गोंधळ निर्माण केलास आणि तेवढ्या अवधीत रिव्हॉल्व्हरची अदलाबदल केलीस याचा एकमेव कारण की खुनाचा आरोप निशांगी जयस्वाल वर यावा असा तुझा हेतू होता.”-कनक
“त्यांना मी पुरेशी संधी देणार आहे, जे काही त्यांना सिद्ध करायचं आहे ते करण्यासाठी. पण मी तुला सांगतो कनक मी रिव्हॉल्व्हरची आदलाबदल केली हे ते सिद्धच करू शकणार नाहीत.”
“त्यांना तीच टोचणी लागून राहिली आहे पाणिनी, तू रिव्हॉल्व्हरची आदलाबदल केलीस हे ते सिद्ध करू शकत नाहीत पण ते करण्यात तुझा फायदा होता आणि ते करायची संधी तुला होती असा अंदाज ते बांधू शकतात आणि न्यायाधीशांचे मन कलुषित करू शकतात. बरं मला सांग पाणिनी,तू ऋता रिसवडकरची वकिली घेणार आहेस?”
“हो मी राहणार आहे तिचा वकील”
“बरं मला वैयक्तिकरित्या एक सांग, याबद्दल तिचं काय म्हणणं आहे? काय घडलंय नेमकं?” कनक न विचारलं.
“ती काहीच बोलत नाहीये. ती मला फक्त एक आश्वासन देते की चांडकतिने मारलं नाही कुठल्याच गुन्ह्यात ती गुंतलेली नाही यापेक्षा ती अधिक काही सांगायला तयार नाहीये. मी तिची उलट तपासणी घ्यायला लागलो तर कोणालाच माहीत नसलेली गोष्ट तिला समोर आणावी लागेल असं तिचं म्हणणं आहे आणि ती तिला आणायची नाहीये.”
“म्हणजे तिच्या भूतकाळाबद्दल काही?” कनक ने विचारलं.
"मला तसं वाटतंय पण पुढे ती कधीतरी मोकळेपणाने मला तेच सांगेल अशी आशा आहे पण आता तरी ती त्याबद्दल गप्प आहे . तिचं म्हणणं आहे की ते तिच्यावर संशय घेतील पण तिला अटक करण्याएवढा पुरावा त्यांच्याकडे नाहीये आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिला तिचं गुपित उघड करायचं नाहीये." पाणिनी म्हणाला.
"ठीक आहे तुला ती लवकर सांगेल यासाठी शुभेच्छा" कनक म्हणाला
"ती बिलं कुठल्या प्रिंटिंग प्रेस मध्ये छापली गेली होती त्याच्याबद्दल काही माहिती कळली?"
“नाही, अजून नाही कळली. आमची फोनाफोनी चालू आहे माहिती मिळवण्यासाठी. पण अजून त्यात काही नशीब जोरावर नाही.”
“बरं चालू ठेव तुझं काम.” पाणिनी म्हणाला
कनक ओजस खुर्चीतून उठला, “काही माहिती मिळाली तर तुला कळवीन मी”
(प्रकरण १२ समाप्त)