प्रकरण १०
पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसात बसला असतांना त्याला कार्तिक कामत ची जुनी सेक्रेटरी मृण्मयी भगली चा फोन आला. कार्तिकच्या ऑफिसात काहीतरी गंभीर गोष्टी घडल्याचं लक्षात आलं होतं तिच्या. पाणिनीने नेमके काय झालाय असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की वेगवेगळ्या दुरुस्त्या करणासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी एखाद्या कंपनीला चेक ने पेमेंट केल्याचं दिसतंय पण नेमकं काय काम दिलं होतं किंवा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या होत्या त्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिलेलीच नव्हती.खर्चाच्या तपशिलाची चलने पण बरोबर नाहीत म्हणजे चलनावर तपशील भरताना मोघम भरला गेलाय. पाणिनने तिला सांगितलं की यात फार गंभीर असेल काही वाटत नाही.मृण्मयीने संबंधित कंपनीला फोन लावावा आणि त्यांनी कोणत्या वस्तू कामतच्या ऑफिसात पाठवल्या होत्या ते विचारावं.
“ मी ते आधीच केलंय पटवर्धन. उदा.अॅक्मे इलेक्ट्रिक कंपनीची बरीच बिले आहेत.म्हणून त्यांना फोन करण्यासाठी मी त्यांच्या पावत्या पहिल्या तर त्यावर फोन छापला नव्हता.म्हणून मी डिरेक्टरी वरून अॅक्मे कंपनीचं नाव शोधलं, तर तश्या नावाची नोंदच नाही.”
“ पावत्यावर पत्ता नव्हता छापलेला?” पाणिनीने विचारलं.
“ पत्ता होता, १३९७, साटम मार्ग. पण त्या पत्त्यावर ती कंपनी अस्तित्वातच नाहीये.”
“ ओह, गॉड, आहे खरं गंभीर. मला सांग अॅक्मे इलेक्ट्रिकला अशी किती रक्कम दिली गेल्ये?”
“ छोट्या छोट्या रकमांचे पेमेंट सुरुवातीला झालं नंतर वाढत वाढत गेलंय एकूण साधारण वीस लाखाच्या आसपास आहे असं आत्तातरी दिसतंय.”
“ तुझा अंदाज काय आहे? कसं झालं असावं?” पाणिनीने विचारलं.
“ आद्रिका अभिषेकी ही फारसे लक्ष देत नसणार आर्थिक बाबींकडे.ज्या कोणी हे केलं त्यांनी आधी लहान रकमेची बिलं तिच्याकडून पेमेंट करून घेतली.नंतर तिचं नियंत्रण नाही हे लक्षात आल्यावर मोठ्या रकमांची खोटी बिले मंजूर करून घेतली.”
“ अच्छा.” स्वत:शी पाणिनी पुटपुटला.
“ मला भीती वेगळीच आहे पटवर्धन, हे सर्व अॅक्मे इलेक्ट्रिक पुरतेच मर्यादित असेल तर ठीक आहे पण तशी शक्यता नाही.इतर बऱ्याच कंपन्यांचे नावाने असं पेमेंट झालं असणार.”
“ कार्तिक ने चेकवर सह्या कशा केल्या पण? काही न बघता?”पाणिनीने विचारलं.
“ तुम्हाला त्यांचा स्वभाव माहित्ये ना? सेक्रेटरीने सर्व बघितलेच असेल अशा विश्वासानेच ते काम करतात. दहा तारखेच्या आत पेमेंट केलं तर रोख डिस्काऊंट मिळतं असं पावतीवर छापलेलं होतं त्यामुळे त्याने पटापट सह्या केल्या असणार.गंमत अशी की आद्रिकाने हे रोख डिस्काऊंट मिळवलं सुद्धा नाही.” मृण्मयी म्हणाली.
“ बरं झालं मला हे सर्व सांगितलंस. मला त्या पावत्यावर छापलेला पत्ता सांग पुन्हा.” पाणिनी म्हणाला.
मृण्मयी ने पुन्हा त्याला सांगितला आणि फोन ठेवला. त्या नंतर पाणिनीने कनकला बोलावून त्याला तो पत्ता सांगितला आणि अॅक्मे कंपनीची काही माहिती मिळत्ये का ते शोधायची सूचना दिली. तेवढ्यात त्याला वैखरी चा फोन आला.
“ डॉल्बी मोटेल्स मधून वैखरी बोलत्ये. तुम्हाला आठवत असेल ना की तुमचा काही निरोप असला कार्तिक सरांना आणि ते नसतील तर मला तो निरोप द्या असं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं.”
“ हो ओळखलं मी. बोल.”
“ कार्तिकना त्यांच्या कुमारला तातडीने भेटणं गरजेचं होतं.”
“ फोनवरून?” पाणिनीने विचारलं.
“ नाही समक्ष. त्यामुळे ते विमानाने जाणार होते.जातांना त्यांनी मला सांगितलं की ते मला तीन,सहा, आठ आणि दहा वाजता फोन करतील. या पैकी कुठलाही एक फोन त्यांच्याकडून मला आला नाही तर मी तुम्हाला फोन करून कळवायचं. अन्यथा मी कार्तिक सर कुठे आहेत ते कुणालाही सांगायचं नाही.” – वैखरी म्हणाली.
“ आणि त्यांचा तीन वाजता अपेक्षित असलेला फोन आला नाही. बरोबर?” पाणिनीने विचारलं.
“ बरोबर.म्हणूनच मी तुम्हाला कळवलं.” वैखरी म्हणाली.
“ याचा अर्थ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.ठीक आहे अत्ता तरी आपण काही करू शकत नाही जो पर्यंत ते त्याच्यावर विशिष्ठ आरोप ठेवून अटक करत नाहीत तोपर्यंत. मला फोन केलास बर झालं. थँक्स” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला.पुन्हा तो येरझाऱ्या घालायला लागला. अचानक तो सौंम्याला म्हणाला,
“ माझं म्हणणं आहे की साक्षीदार स्वत:हून कोर्टात येई पर्यंत वकिलाने थांबायची आणि त्याला प्रश्न विचारून त्याला काय आठवतंय हे तपासायची गरज नाही. ”
“ म्हणजे?” –सौंम्या
“ म्हणजे परिस्थिती जर पटापट बदलत असेल आणि त्यामुळे साक्षीदाराचा गोंधळ वाढत जात असेल तर जो पर्यंत एखादा वकील कोणताही पुरावा दडवून ठेवत नाही किंवा नष्ट करत नाही तो पर्यंत वकील कायद्यातच वागणारा असतो.”
सौंम्याच्या चेहेऱ्यावर आठ्या पडल्या ती अजूनच गोंधळली. पाणिनी तिला समजावून सांगत पुढे म्हणाला,
“ या केस मधे मी म्हणतोय तशी परिस्थिती बदलते आहे, सर्वसाधारण पणे काय होतं की पोलीस आधी संशयिताला पकडतात पण त्यांना खुनात वापरलेलं हत्यार सापडत नाही.इथे काय झालंय, आधी हत्यार सापडलंय आणि संशयित मात्र बरेच आहेत त्यामुळे काय करायचं हा गोंधळ झालाय त्यांचा.”
“ या बाबतीत तुम्ही त्यांच्यापुढे एक पाऊल आहात.” सौंम्या म्हणाली. “ तुम्ही खून केला नाही हे माहित आहे तुम्हालाही आणि पोलीसानाही आणि खुनी हत्यार कामतच्या कुमारच्या ड्रॉवरमधे असल्याचं तुम्हाला माहित होतं.
“ प्रश्न हा आहे ,सौंम्या, की ते त्याच्या ड्रॉवर मधे ठेवलं कुणी हे मला माहित नाहीये.आणि जो पर्यंत मी कार्तिक शी बोलत नाही तोपर्यंत मला ते समजणार नाही.”
“ आणि कार्तिक ने ते ठेवलं नसलं तर? ” सौंम्याने विचारलं
“ तर ते खुन्याने ठेवलं.” पाणिनी म्हणाला. “ हे बघ सौंम्या आपल्याला आज रात्री उशिरा पर्यंत काम करायला लागणारे.कनक कडून आपल्याला हे शोधून काढायला लागणारे की ती खोटी बिले कोणत्या प्रिंटर ने छापली.”
बर, तुझं डोकं दुखत होतं ते कसं आहे?” पाणिनीने विचारलं.
“ खूप बर आहे.” एक डोळा मारत सौंम्या म्हणाली.
************************************
पाणिनी आणि सौंम्या हॉटेलात जेवण घेत होते.
कनक ओजस चा फोन घणघणला. पाणिनीने घेतला.
“ अरे कुठे होतास तू बाबा? ”
“ मी आणि सौंम्या जरा निवांतपणे जेवायला गेलो होतो.” पाणिनी म्हणाला.
“ अरे मला कामाला लावतोस तू आणि स्वत: सौंम्या ला घेऊन मस्त मजा मारतोस ! कधीतरी तुझ्या खर्चाने मला पण नेत जा.”
“ तुझ्या कामाचे पैसे मी तुला देतोय.एकही रुपया बाकी नाहीये आज अखेर. मग वेगळ जेवण कशासाठी द्यायचं?” पाणिनीने विचारलं.
“ सौंम्याला सुद्धा तू पगार देतोसच ना तिच्या कामाचा? मग तिला जेवायला का नेतोस? पगारा व्यतिरिक्त हा खर्च का करतोस तिच्यावर?” कनक डाफरला.
“ कारण माझ्या बरोबरीने ती काम करते. तू मात्र तुला मी दिलेलं काम तुझ्या असिस्टंट ना वाटून मोकळा होतोस आणि स्वत: ऑफिसातच बसून राहतोस.त्यांच्याकडून आलेला अहवाल मला देतोस.तू फक्त पोस्टमनचेच काम करतोस.” कनक ला जळवत पाणिनी म्हणाला.
“ तो इन्स्पे.तारकर तुझ्यावर पेटलाय.” कनक ओजस म्हणाला.
“ का?” पाणिनीने विचारलं.
“ त्याने कार्तिक कामत ला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आणि कार्तिक म्हणतोय की पाणिनी पटवर्धन वकील म्हणून तिथे उपस्थित असल्याशिवाय मी कोणत्याही प्रश्नांची उत्तर देणार नाही. खांडेकर वकील पत्रकारांना बोलावून सगळ रामायण सांगायच्या तयारीत आहेत, तू आला नाहीस तर.”
पाणिनी जरा विचार करायला लागला.
“ ऐकतो आहेस ना पाणिनी?” कनक म्हणाला.
पाणिनीने पटकन निर्णय घेतला.
“ हो ,हो ऐकतोय मी, कार्तिक कुठे आहे?”
“ खांडेकरांच्या ऑफिसात.”कनक म्हणाला.
“ त्यांना म्हणावं येतोय मी थांबा.” पाणिनी म्हणाला. आणि त्याने फोन बंद केला.
“ छान जेवणाची वाट लागली.” सौंम्या म्हणाली.
“वाट लागली असे समजू नको. आपण ते जरा पुढे ढकलू.कार्तिक कामतला पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी त्याला बोलायला लावण्याचा बराच प्रयत्न केला पण मी तिथे असल्याशिवाय काही बोलायला त्यांनं नकार दिला. त्यांनं पोलिसांना निक्षून सांगितलं की वकील या नात्याने त्यांनी मला कळवलं पाहिजे ”
“त्यानुसार त्यांनी केलं?”
“ हो त्यांनी केलं ”
“ याचा अर्थ पोलीस तुमच्यासाठी सुद्धा काही सापळा लावतायेत ” सौंम्या म्हणाली.
“हो मला जाणीव आहे त्याची. तरी मला जायला लागेलच. माझी कार घेऊन आपल्या ऑफिसला जा आणि जरा वाट बघ. मला शक्य होईल तेव्हा मी लगेचच येईन. नंतर आपण परत जेवायला जाऊ मी इथं टॅक्सी करून पोलीस चौकीत जातो. तिथे अॅडव्होकेट खांडेकर आलेत.” पाणिनी म्हणाला. आणि पटकन टॅक्सीत बसला. टॅक्सीवाल्याला त्यानं पत्ता सांगितला आणि लवकरात लवकर पोहोचव म्हणून सांगितलं टॅक्सीवाल्याने खरोखरच एखाद्या कुशल ड्रायव्हर सारखी आपली टॅक्सी ट्रॅफिक म्हणून चालवली आणि त्याला त्याच्या इच्छित स्थळी पोहोचलं पाणिनीने त्याला टॅक्सीचं बिल दिलं आणि आणखी दहा रुपये वर टीप दिली. खांडेकर त्याची वाटच बघत होते पाणिनी त्यांच्या ऑफिसच दार. ढकलून आत गेला
“गुड इव्हिनिंग” तो त्यांना म्हणाला. तिथे खांडेकर यांच्या व्यतिरिक्त इन्स्पेक्टर तारकर कार्तिक कामत आणि काही पत्रकार होते सगळ्या खोलीत एक तणावपूर्ण वातावरण होतं आणि सिगारेटच्या धुराने खोली भरली होती. नोट्स लिहून घेणाऱ्या पत्रकाराकडे बघून खांडेकरांनी मान डोलवली.
“या मिस्टर पाणिनी पटवर्धन, बसा. वकील या नात्याने तुम्ही आला आहात हे रेकॉर्डवर येऊ दे.” खांडेकर त्याला म्हणाले आणि कामतला म्हणाले, “तर मग मिस्टर कामत, तुम्ही म्हणाला होतात की तुमचा वकील आल्यानंतरच तुम्ही काय तो खुलासा द्याल. आता मी तुम्हाला आज्ञा देतोय की खून झालेल्या चांडकच्या अपार्टमेंट मध्ये रक्ताचे ठसे लागलेले जे बूट मिळालेत त्याचा तुम्ही खुलासा करा.”
“एक मिनिट थांबा.” पाणीनी म्हणाला, “माझं अशील जर काही विधान करणार असेल तर त्यापूर्वी मला त्याच्याशी जरा बोलायचंय ”
“आम्ही आधीच खूप वेळ थांबलोय ” खांडेकर म्हणाले
“ मला माझ्या अशिला बरोबर बोलायची संधी जर तुम्ही दिली नाहीत, तर मी त्याला असा सल्ला देईन की कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नको आणि तसं झालं तर तुम्हाला आणखीही बराच काळ केवळ वाटच बघावी लागेल.”
“ तू तसा प्रयत्न केलास पाणिनी, तर त्याच्या संभाव्य बदनामी पासून आम्ही वाचवू शकणार नाही. तो एक मोठा व्यावसायिक आहे आणि मी आधीच त्याला सांगितलं की आम्हाला कुठलाही अन्याय त्याच्यावर करायचा नाही किंवा मुद्दामहून त्याचं नाव कुठेही गोवायचं नाहीये की जेणेकरून त्याचं नाव जनमानसात खराब होईल.” खांडेकर म्हणाले
“तसं असेल तर मी म्हणतो हे ही रेकॉर्डवर येऊ दे की मी त्याच्याशी खाजगीत बोलण्याची मागणी केली होती आणि हेही रेकॉर्डवर येऊ दे की माझ्या मागणीला प्रत्युत्तर देताना सरकारी वकील खांडेकर यांनी अशी धमकी दिली की ते माझ्या अशीलाचं नाव वर्तमानपत्रात बदनाम करतील ”
अॅडव्होकेट खांडेकर रागाने लालीलाल झाले. इन्स्पेक्टर तारकर जागेवरून उठला आणि खांडेकरांच्या कानात काहीतरी कुजबुजला त्यानंतर खांडेकर पाणिनीला म्हणाले,
“ठीक आहे,. आम्ही दहा मिनिटांचा वेळ देतो तुला पटवर्धन.शेजारी एक केबिन रिकामी आहे. तिथे जाऊन बोल त्याच्याशी. कार्तिक लगेच आपल्या जागेवरून उठला. पाणिनीने खांडेकरांनी दाखवलेल्या केबिनचा दरवाजा उघडला आत मध्ये एक टायपिंग मशीन, काही स्टेशनरी आणि बऱ्याच खुर्च्या अशी व्यवस्था असलेली ती खोली होती पाणिनीने त्या खोलीची काळजीपूर्वक पाहणी केली नंतर शेजारचा दुसरा एक दरवाजा उघडला ती त्याहून एक छोटी खोली होती.
“ इकडे ये.” तो कामतला म्हणाला. तिथे ते एकमेकांच्या जवळ बसले. “ खांडेकरांनी सुचवलेली ही शेजारची खोली आपल्या दृष्टीने बरोबर नव्हती कारण त्याच्यात बहुतेक मायक्रोफोन्स लावले असावेत. आपण काय बोलतो हे त्यांना समजलं असतं त्यामुळे. खूप हळू आवाजात विचारतो त्या प्रश्नांची उत्तर दे . ही सगळी काय भानगड आहे हे मला प्रथम सांग.” पाणिनी म्हणाला.
कामत म्हणाला, “ खरंतर हे मी तुला आधीच सांगायला हवं होतं पाणिनी, बर,ते जाऊ दे ती चूक झाली माझी. तर तुला आता काय झालं ते सांगतो माझ्या कुमारवर मी फार नाराज होतो. त्यांने एक तर न सांगता लग्न केलं आणि चुकीच्या मुलीशी लग्न केलं म्हणून. म्हणजे आधी माझी तशी समजूत होती पण आता मला वाटतंय की त्याने योग्य जोडीदार निवडला.”
“याचा अर्थ कार्तिक, तुला असं म्हणायचंय की ऋता रिसवडकरशी त्याने लग्न केलं असतं तर ती चुकीची मुलगी ठरली असती? म्हणजे थोडक्यात ती या खुनात गुंतली आहे असा तुला संशय आहे?” पाणिनीने विचारलं.
“अजिबात नाही. मला असं सुचवायचंय की त्यानं ऋताशी लग्न केलं नाही हे बरं झालं कारण मीच तिच्या प्रेमात आहे. माझ्याही नकळत बराच काळ तिच्यात गुंतलो होतो मी तिला भेटलो तेव्हापासूनच .”
“अरे बापरे! बरं, तू हे ऋताला सांगितलंयस का?”
“तस मी अप्रत्यक्षरीत्या तिला सुचवलं होतं पण स्पष्ट शब्दात कधीच नाही. वयाने तर मी तिचा बाप शोभेन असा आहे.” कामत म्हणाला.
“ तरीही काही मुली वयस्कर माणसाशी लग्न करतात ही वस्तुस्थिती आहेच.” पाणिनी म्हणाला. “आपल्या हातात दोनच मिनिटं राहिल्येत. त्यामुळे काय काय घडले ते पटापट सांग. तू खुनात वापरली गेलेली रिव्हॉल्व्हर तुझ्या कुमारच्या ऑफिस मधल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलीस. बरोबर? खरंतर तू ऋताला दिलेल्या रिव्हॉल्व्हर वरचं पोलिसांचं लक्ष काढून घ्यायचं होतं म्हणून मी दोघांच्या बंदुका एकमेकांशी बदलण्याचा प्रयत्न केला आणि...”
“थांब,थांब पटवर्धन. चुकीचं बोलतोयस तू. मी माझ्या कुमारच्या ड्रॉवर मध्ये कुठलीही रिव्हॉल्व्हर ठेवलेली नाही.”
“तुझ्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी तू चांडकच्या अपार्टमेंट मध्ये गेलास. तू त्याला मारलंस की नाही ?”
“वेडेपणा करू नकोस पटवर्धन. मी गेल्यानंतर ऋताने त्याला पाहिलंय ”
“ तू काय केलंस नेमकं?”
“ऑफिसला जाताना मी चांडक ला भेटण्यासाठी मध्ये थांबलो . मी देवनार वरून आलो होतो. सव्वा आठच्या सुमारास साधारण, मी त्याला फोन वगैरे करून सावध करायचा प्रयत्न केला नाही मुद्दामच मी सरळ वर गेलो आणि दार वाजवलं. त्याने ते उघडलं पण मला त्यांने आत ये म्हणून सांगितलं नाही. मी कोण आहे हे त्याला सांगितल्यानंतर तो खूप अपसेट झाल्यासारखा वाटत होता मला तो म्हणाला की त्याच्याकडे कोणीतरी आता आलं आहे आणि तो आता खूप बिझी आहे त्याने मला सुचवलं की ११ वाजता पुन्हा भेटूया एवढे बोलून त्यानं मी दारात उभा असतानाच माझ्या तोंडावर दार बंद केलं मी सरळ जिना उतरून रस्त्यावर आलो. पण मला एक कळत नाहीये पटवर्धन की हे सगळं तू कसं शोधून काढलस, मी हे कोणाला सांगितलं नव्हतं.”
“ कसं शोधून काढलं हे फारसं महत्त्वाचं नाहीये चांडकला भेटल्यानंतर तू तुझ्या ऑफिसमध्ये गेलास ?” पाणिनीने विचारलं.
“ थेट ऑफिसात नाही गेलो मी. आधी पेट्रोल पंपावर गेलो आणि देवनारला फोन केला. नंतर मी ऑफिसला गेलो. माझ्या ऑफिसमध्ये केबिनला लागून एक छोटी खोली मी घेऊन ठेवली आहे म्हणजे अडीअडचणीला किंवा तातडीचं काही असेल तर मला तिथे राहायची सोय करून ठेवली आहे मी. आद्रिका अभिषेकीला तिथे फोन करून बोलावून घेतलं होतं मला काही माहिती तिच्याकडून हवी होती.”
“बर, ठीक आहे तू तुझ्या ऑफिस मध्ये गेलास. पुढे काय झालं ?” पाणिनीने विचारलं.
“मी माझ्या रूम मध्ये जाऊन आंघोळ केली, कपडे बदलले दरम्यान आद्रिकाला मी सांगितलं की मला हवी असलेली सर्व माहिती तयार ठेव मी तिला विचारलं की पाणिनी पटवर्धन यांना मी कुठे आहे हे तू का सांगितलं नाहीस. यावर तिने काहीतरी उत्तर दिलं आणि वादातून वाद वाढत गेले मी तिला खूप फायर केलं नंतर तुला माहितीच आहे काय झाल पुढे ते.”
“मला नाही वाटत मला नक्की माहिती आहे ”
“ठीक आहे. नंतर मी तुला भेटायला गेलो नंतर आपण ऋताकडे गेलो आणि..... मी तिला स्पष्ट सांगितलं की आमच्या कुटुंबात तिनं यावं अशी माझी किती मनापासून इच्छा होती ....”
“ रिव्हॉल्व्हर बद्दल काय?”
“माझ्याकडे कायमच रिव्हॉल्व्हर असतं. माझ्या खांद्याला लावलेल्या छोट्या कप्प्यात ती असते. मी माझे सूट शिवतो तेव्हा मला ती माझ्या डाव्या बगलेत ठेवता येईल अशा पद्धतीने मी कप्पा करून घेतलेला आहे. कोणालाही ती रिव्हॉल्व्हर दिसत नाही.”
“जेव्हा तू तुझी रिव्हॉल्व्हर तिला दिलीस तेव्हा ती गोळ्यांनी पूर्ण भरलेली होती?”
“अर्थातच”
“त्यातून गोळी झाडली गेली होती?”
“कित्येक महिन्यात त्याच्यातून गोळी झाडली गेली नाही, पटवर्धन. तुला मी हे सांगतोय इतर कोणालाही मी सांगणार नाहीये. देवनारला जाण्यापूर्वी मी त्यातली काडतुसं काढून नवीन भरली होती त्या चांडक बरोबर मी थोडं आक्रमकपणे वागायचं ठरवलं होतं. मी जेव्हा त्याला जाब विचारायला जाणार होतो तेव्हा माझ्याकडे माझं रिव्हॉल्व्हर तयार असलं पाहिजे या मताचा मी होतो” कार्तिक म्हणाला.
“ठीक आहे. पुढे काय झालं?”
“दुसरी एक रिव्हॉल्व्हर माझ्या ऑफिसच्या तिजोरीत मी ठेवतो. मी चांडकला भेटायला जाणार होतो पण त्याबद्दल मी कोणालाही सांगितलं नव्हतं त्यामुळेच मी जेव्हा ऋताच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा पहिलं माझ्या ऑफिसमध्ये आलो. ती दुसरी रिव्हॉल्व्हर तिजोरीतून घेतली आणि माझ्या बगले मधल्या रिव्हॉल्व्हर ठेवण्याच्या कप्प्यात ठेवून दिली आणि मग मी चांडक भेटायला निघालो”
( प्रकरण १० समाप्त)