Revolver - 6 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 6

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 6


प्रकरण ६

पाणिनी कुमार कामतच्या सेकण्ड हँड कार विक्रीच्या शो रूम मधे आला.लगेच त्याच्या मागे तिथले सेल्स मन लागले.

“ मला गाडी खरेदी किंवा विक्री करायची नाहीये.कामतला भेटायला मी आलोय.” पाणिनी म्हणाला. तरीसुद्धा त्या लोकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.त्यांना भीक न घालता कामत च्या केबिन मधे पाणिनी आला. “ मला तुझ्याशी महत्वाचं आणि तातडीने बोलायचंय. जिथे आपल्यात कोणीच व्यत्यय आणणार नाही.तुझ्या या सेल्स मेन नी मला वैताग दिलाय.त्यांना कटवायचा काही मार्ग नाही का? ” पाणिनीने विचारलं.

“ एकच उपाय आहे.तुझी कार विकायची.” कामत म्हणाला. त्याने पाणिनी बरोबर आलेल्या सेल्समन ला सांगितलं की या पाणिनी पटवर्धन ची गाडी बाहेर घेऊन जा चालवून बघा.आणि आपण किती ऑफर देऊ शकतो ते लगेच सांग.पाणिनी जाम वैतागला.पण मनाशी त्याने विचार केला की त्या निमित्ताने हा सेल्समन इथून जाणार असेल तर बरंच होईल.तो जाताच पाणिनीने मुद्द्याला हात घातला, “ तुझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे? म्हणजे माझा अंदाज आहे की असावं,कारण इथे तुम्ही मोठाल्या रकमांचे व्यवहार करताय ना ! ”

“ आहे.” कामतचा मुलगा म्हणाला.

“ त्याचं परमिट आहे? ”

“ अर्थातच.”

“ कुठे ठेवतोस तू ते रिव्हॉल्व्हर?” पाणिनीने विचारलं.

“ इथेच माझ्या या टेबलाच्या ड्रॉवरमधे.”

“ ते जाग्यावर आहे का तपासून सांग मला.” पाणिनी म्हणाला.

“ का? म्हणजे असणारच ना! कुठे जाणारे ते?”

“ बघून सांग तरीही.”

कामतने ड्रॉवर उघडला. आतलं रिव्हॉल्व्हर बाहेर काढलं.पाणिनीला दाखवलं.पाणिनीने आपला हात पुढे केला.कामतने टेबलावरून ते पाणिनीच्या दिशेने सरकवलं.पाणिनीने ते आपल्या हातात घेऊन जरा वर उडवून त्याच्या वजनाचा अंदाज घेतला.

“ हे तर तुझ्या वडिलांच्या कडे असलेल्या रिव्हॉल्व्हरची डुप्लीकेट आहे.” पाणिनी म्हणाला.

“ हो.त्यांनीच मला हे भेट दिलंय.त्यांनी ते.....” बघता बघता पाणिनीने एकदम रिव्हॉल्व्हरचा चाप दाबून गोळी झाडली. कामतचं बोलणं एकदम थांबल. उडालेली गोळी कामतच्या टेबलाला चाटून उडाली आणि भिंतीत रुतली.

“ ए ssss काय केलसं हेsss” कामत चा मुलगा ओरडला. त्याची सेक्रेटरी घाबरून बाहेरून आत आली.एक आडदांड सेल्समन आत आला. “ कामत सर,तुम्ही ठीक आहात ना? हा दरोडा वगैरे नाही ना? ” त्याने विचारलं.

“ असूदे असूदे.हा पाणिनी पटवर्धन आहे. वकील.” त्या दोघांना उद्धेशून कामत चा मुलगा म्हणाला.

“ अरे बापरे ! यात गोळ्या असतील याची मला कल्पनाच नव्हती. मी सहज हात लावून पहात होतो आणि चापाला जरासा स्पर्श होताच एकदम गोळी उडाली. ” पाणिनी म्हणाला.

“ फार आधुनिक आणि अगदी तयारीचं हत्यार आहे हे. मी कायम त्याला तेलपाणी करून जैय्यत तयारीतच ठेवतो नेहेमी. वापरायची वेळ कधी सांगून येत नाही ना ! ” कामत म्हणाला.

“ अशा प्रकारच्या बंदुकी वापरायची गरज मला कधी भासली नसल्यामुळे मी या बाबत अनभिज्ञच आहे.” पाणिनी म्हणाला.

“ कोर्टात तू साक्षीदारांना रिव्हॉल्व्हर बद्दल प्रश्न विचारतोस तेव्हा तुला या बद्दल काही माहिती नाही असं कोणीच म्हणणार नाही.”- कामतचा मुलगा म्हणाला.

“ सॉरी, सॉरी.” सेल्समन आणि सेक्रेटरीला उद्देशून पाणिनी म्हणाला. “ तुमच्या साहेबांना मी एक टेबल देणं लागतो. ”

कामतच्या कुमारने त्या दोघांना बाहेर जायची खूण केली आणि जातांना दार लावून जायला सांगितलं.ते बाहेर गेल्याची खात्री झाल्यावर तो पाणिनीला उद्देशून म्हणाला, “ तू पाणिनी पटवर्धन सोडून दुसरा कोणी असतास,तर मी तुझ्या या अभिनयाची तारीफ केली असती. काय भानगड आहे ही?”

“ हे रिव्हॉल्व्हर घे बरोबर,आपल्याला बाहेर जायचंय.” पाणिनी म्हणाला.

“ बाहेर? ठीक आहे.मी दुसऱ्या गोळ्या भरतो त्यात .......”

“ नाही! असंच असूदे ते. चल.एक फेरी मारून येऊ आपण.” पाणिनी म्हणाला.

एका सेल्समन ला सूचना देऊन कामतच्या कुमारने एक स्पोर्ट्स कार तयार ठेवायला सांगितलं.बाहेर आल्यावर त्याने ती पाणिनीला चालवयाला लावली.वाटेत सतत तो कारचं कौतुक करत होता.पाणिनीने गाडी अचानक त्रिकाल अपार्टमेंटपाशी आणताच तो हबकला.

“ चल, उतर.” पाणिनी म्हणाला.

“ नाही, मी इथे येणार नाही.....” तो म्हणाला पण पाणिनीने त्याला हाताला धरून ऋता च्या दारासमोर ओढतच नेलं.

“ तू इथे काही बोलायचं नाहीस.फक्त ऐकायचं आहेस. तुला वाटलं तर फक्त मान डोलव.” पाणिनी म्हणाला.

“ पण तसं वाटलं नाही तर?”

“ फक्त उभा रहा. काहीही न करता.”

“ तू काय करतो आहेस तुला कळतंय न पाणिनी?”

“ बहुतेक.” पाणिनी म्हणाला. तेवढ्यात ऋताने दार उघडलं.दारात पाणिनीच्या मागे उभा असलेल्या कामत च्या कुमारला पाहून ती हादरलीच.

“ हे बघ ऋता, माझा यात काही दोष नाही ही कल्पना पाणिनी पटवर्धन.....”

“ चूप बस.” पाणिनी खेकसला.

“ अभिनंदन कामत.” ऋता म्हणाली.

“ तू ही चूप बस.” पाणिनी पुन्हा ओरडला आणि त्याने कामत च्या कुमारला आत ढकलून दार लावून घेतलं.

“ ऋता, या माणसाचं जरी नुकतंच लग्न झालं असलं तरी तुम्हा दोघांची अजून मैत्री टिकून आहे, त्यामुळे त्याला अजून तुझी काळजी वाटत्ये.विशेषत: तुझ्या बाबांच्या मृत्यू नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची.तुझ्या बाबांच्या मागे लागलेले गुंड, वगैरे. त्यामुळे तुला धिका आहे असं त्याला वाटतंय आणि तुझ्या संरक्षणासाठी त्याने तुला देण्यासाठी रिव्हॉल्व्हर आणलंय. ” पाणिनी म्हणाला.

“ कामत, तुझं रिव्हॉल्व्हर दे तिला.” त्याला उद्देशून पाणिनी म्हणाला.

कामतच्या कुमारने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर तिला दिलं.

“ हे घेऊन मी काय करू?”

“ तू उशीखाली ठेऊ शकतेस ते.” पाणिनी म्हणाला.

“ त्यातून एक गोळी झाडली गेल्ये पाणिनी....”कामतचा मुलगा म्हणाला.पाणिनीने त्याला गप्प बसवलं.

“ ऋता, या कामत ला तुझ्या सुरक्षेची खरंच काळजी आहे.तू ते रिव्हॉल्व्हर ठेऊन घ्यावास असं त्याला खरंच वाटतंय.तुला जर कोणी विचारलं की हे रिव्हॉल्व्हर तुझ्याकडे कसं आलं,तर तू सांगू शकतेस की मला कामत ने दिलंय म्हणून.आणि कामत कडून मिळालेलं रिव्हॉल्व्हर कुठे आहे असं कोणी विचारलं तर तू हे रिव्हॉल्व्हर त्याला दाखवू शकतेस.जेव्हा हे रिव्हॉल्व्हर तुला दिल गेलं तेव्हा त्यातून एक गोळी आधीच झाडली गेली होती याची तुला कल्पना आहे आता,पण ती गोळी कोणी,कधी आणि कुठे झाडली याची तुला माहिती नाहीये.त्यामुळे कुणाला या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर त्यासाठी त्याला कामतला भेटावे लागेल.”

ऋता हे सगळं डोळे विस्फारून ऐकतच राहिली.

“ मला एवढंच सांगायचं होतं, तू लक्षपूर्वक ऐकलंस बरं वाटलं.” पाणिनी म्हणाला. “ चल कामत.”

“ मी तुला लग्नाबद्दल.....” कामतचा मुलगा बोलायचा प्रयत्न करत म्हणाला.

“ मी तुला ओळखते.तू काही खुलासा करायची गरज नाही. आपण मित्र म्हणून राहू शकतो.” ऋता म्हणाली.

पाणिनीने कामत च्या कुमारला हाताला धरून बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला.दोघेजण लिफ्ट ने खाली आले आणि बाहेर पडून गेट च्या दिशेने जायला निघणार तेवढ्यात त्याची नजर गेटवर पडली आणि त्याने कामत ला हाताला धरून थांबवलं आणि गेटकडे जाण्याऐवजी पटकन विरुद्ध बाजुला वळवलं.

गेट मधून इन्स्पे.तारकर आणि होळकर आत शिरत होते.ते आत येऊन लिफ्ट मधे शिरेपर्यंत पाणिनी आणि कामतचा मुलगा लपून बसले.

“ वाचलो थोडक्यात. तुझी स्पोर्ट्स कार होती म्हणून बर, माझी गाडी असती तर तारकरने ओळखली असती. ” पाणिनी म्हणाला.

“ म्हणूनच तुला सांगतोय पाणिनी, आता तुझी जुनी गाडी मला विक आणि ही स्पोर्ट्स घे. ” त्याही परिस्थितीत आपले मार्केटिंग कौशल्य दाखवत कामतचा मुलगा म्हणाला.

****************************

दुपारी सव्वादोन वाजता मृण्मयी भगली, म्हणजे कार्तिक कामत ची जुनी सेक्रेटरी चा फोन पाणिनी ला आला.

“ पटवर्धन, इथे ऑफिसात तारकर आणि होळकर नावाचे पोलीस आलेत आणि त्यांच्याकडे चांडकच्या खुनाच्या संदर्भात रक्ताचे डाग, कपडे किंवा तत्सम गोष्टी सापडतातका हे तपासायचे वॉरंट आहे.मी काय करू?” मृण्मयी म्हणाली.

“ त्यांना एकदम छान ट्रिटमेंट दे.चहापाणी कर.त्यांना सांग की तुम्हाला जे काही हवंय ते सर्व तपासू शकता.त्या होळकरला माझा निरोप दे फक्त की तपासणी करतांना सिगारेट ओढायला हरकत नाही पण त्याची थोटकं जमिनीवर टाकून कचरा करू नको.” पाणिनी म्हणाला.

“ ठीक आहे.” मृण्मयी हसून म्हणाली.

“ सौंम्या, घटना भराभर घडायला लागल्येत.मी जरा कनकच्या ऑफिसात जाऊन येतो. काही लागलं तर फोन कर.” पाणिनी म्हणाला. आणि त्याच मजल्यावर असलेल्या कनक ओजसच्या ऑफिसात गेला. कनक जरा निवांत होता.

“ काम हवंय?” पाणिनीने विचारलं.

“ दे.”

“ चांडक.” पाणिनी म्हणाला.

“ तो तर मेलाय.काल रात्री त्याचा खून झालाय.” कनक म्हणाला.

“ नेमका कधी खून झालाय त्यात मला रस आहे. पोलिसांचा संशय कुणावर आहे, त्यांना नेमकी माहिती काय आहे, ते मला हवंय.चांडक ची सगळी पार्श्वभूमी खणून काढ. तुला एक टिप देतो, तो देवनार चा आहे. जिथे त्याचं प्रेत सापडलं तिथे तो कधीपासून राहतोय ते मला हवंय. आणखी एक टिप देतो, काही महिन्यांपूर्वी तुला कोदंड रिसवडकर नावाच्या माणसाचा खून झाला होता, आठवतंय?” पाणिनीने विचारलं.

“ टोळी युद्ध ” –कनक ओजस म्हणाला.

“ जरी पोलिसांनी त्याचा बळी टोळीयुद्ध म्हणून गृहीत धरला असला आणि त्यावर काहीही कारवाई केली नसली तरी मला नाही वाटत,टोळी युद्ध होतं म्हणून.” पाणिनी म्हणाला.

“ पण चांडक जुगारी लोकांशी संबंधित होता आणि माझ्या माहिती प्रमाणे तुझा हा कोदंड रिसवडकर सुद्धा त्याच्या हॉटेलात जुगारी,पत्ते खेळणारे, अशा ग्राहकांना येऊ द्यायचा.”-कनक म्हणाला.

 

“ या रिसवडकर ची मुलगी माझ्याकडे मदतीला आल्ये.” पाणिनी म्हणाला.

“ अशील आहे तुझी?”—कनक

“ संभाव्य. म्हणजे अजून वकीलपत्र दिलं नाहीये तिनं मला.” पाणिनी म्हणाला.

“ ठीक आहे पाणिनी, मी तुला हवी असलेली माहिती काढायला सुरवात करतो लगेचच.” कनक ने सांगितलं आणि पाणिनी बाहेर पडला.कनक च्या ऑफिसातून आपल्या ऑफिसच्या दिशेने येत असतांना त्याला कॉरीडोर मधे आपल्या मागे पावलांचे आवाज आले.त्याने मागे पाहिलं तर ऋता येत होती.

“ ओह, पटवर्धन, बर झालं बाई तुम्ही भेटलात! ” ती उद्गारली.

“ का काय झालं? आणि तू अचानक कशी आलीस इथे?” पाणिनीने विचारलं.

“ मला भेटायचंय”

पाणिनीने आपल्याकडील किल्लीने आपल्या ऑफिसचे दार उघडलं आणि ते दोघे आत गेले.

“ पटवर्धन, तुम्ही गेल्यावर लगेचच पोलीस आले, रिव्हॉल्व्हर तिथेच टेबलवर होतं.मी पटकन त्यावर टॉवेल टाकून ते दडवण्याच्या प्रयत्नात होते पण ते फसलं.पोलिसांनी ते ताब्यात घेतलं, तपासलं, त्याचा वास घेतला.उघडून पाहिलं. मला ते कुठून मिळालं याची चौकशी केली.”

“ तू काय सांगितलंस त्यांना?”

“ मी सांगितलं की माझी काळजी वाटत होती म्हणून कामत यांनी मला ते दिलं.” ऋता उत्तरली.

“ वडील की मुलगा हे तू सांगितलंस का?” पाणिनीने विचारलं.

“ मी सांगायला हवं होतं का?”

“ मला नाही सांगता येणार.” पाणिनी म्हणाला.

“ मी त्यांना तेवढंच सांगितलं की कामत ने दिलं.त्यानंतर त्यांनी विचारलं की कामत शेवटचा कधी भेटला होता. तेव्हा मीच सांगितलं की सकाळी भेटला होता. त्यावर ते एकदम एक्साईट झाले आणि त्यांनी बरीच फोन फोनी केली. आणि घाई घाईत निघून गेले.” ऋता म्हणाली.

 “ काहीही प्रश्न न विचारता?”

“ हो.”

“ मला वाटत ते पुन्हा तुला विचारतील प्रश्न.आणि विचारलं तर सांग की पटवर्धन असल्याशिवाय मी आता काहीही सांगणार नाही.”

“ पण पटवर्धन, तसं सांगणं म्हणजे गुन्हा मान्य असल्यासारखं नाही होणार का?”-ऋता.

“ नाही. त्यांना कशाचेही उत्तरं देऊ नको.किती वाजले असं विचारलं तरी सुद्धा काही बोलू नको.तुझी जन्मतारीख विचारोत किंवा हवे बद्दल असो, गप्प बसायचं.जमेल तुला?” पाणिनीने विचारलं.

“ तुम्ही म्हणत असालं तर जमवीन मी.”

“ छान.” पाणिनी म्हणाला.

“ तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, काल रात्री कामत आले होते.”

“ वडील की मुलगा?” पाणिनीने विचारलं.

“ वडील.”

“बरं, मग काय झालं पुढे?”

 “तो म्हणाला मला झोप लागत नाहीये त्याला माझ्याशी बोलायचं होतं मग आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या.” ऋता म्हणाली. 

“तो केव्हा गेला नंतर?” 

“तेच मला महत्त्वाचं सांगायचं होतं. साधारण मध्यरात्र झाली होती तो निघाला तेव्हा.” 

“ठीक आहे, हरकत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ नको. आणि सहजगत्या आणि लगेच त्यांना उपलब्धही होऊ नको.” पाणिनी म्हणाला.

“तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय?” 

तिच्याकडे दुर्लक्ष करून पाणिनी सौम्याला म्हणाला,

“हिच्या अंगावर आत्ता जो ड्रेस आहे, तो तुला आवडलाय सौम्या?” पाणिनीने विचारलं. 

“हो खूपच आवडलाय तो मला.” –सौंम्या म्हणाली. 

“पण मला नाही आवडला तो. तो काय फार चांगला नाहीये फोटो काढण्याजोगा. सौम्या हा ड्रेस जर बदलायचा झाला आणि त्याच्या जागी गडद काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा आणि व्ही आकाराचा गळा असलेला ड्रेस आणायचा झाला तर किती वेळ लागेल म्हणजे अशा ड्रेसमध्ये फोटो खूप छान येईल.” पाणिनीने विचारलं. 

“अगदी तुमच्या मनात आहे तसाच ड्रेस मिळवायचा झाला तर थोडा वेळ लागेल त्यासाठी.” पाणिनीच्या चेहऱ्यावरील भाव अचूक ओळखत सौम्या म्हणाली. 

“ठीक आहे तर ऋता, तू आत्ता लगेचच सौम्याबरोबर शॉपिंग साठी बाहेर जाणार आहेस. पैसे आहेत ना तुझ्याकडे पुरेसे?” 

“हो, आहेत.”

“तर मग जा आणि भरपूर शॉपिंग करा आणि दुकानात जाशील तेव्हा तू बऱ्याच जणांच्या दृष्टीस पडशील म्हणजे नजरेत भरशील, अशी काळजी घे. म्हणजे बरेच ड्रेस अंगात घालून बघ. सेल्समन शी थोडी कटकट कर जेणेकरून तू लक्षात राहशील.” पाणिनी म्हणाला. 

“नंतर काय करायचं मी?” ऋता म्हणाली.

“खरेदी करून झाली की तुला हवं तिथे जा.फक्त कुठे संपर्क करायचा ते मला सांगून ठेव.” पाणिनी म्हणाला.

“आणि पोलिसांची मी अजिबात बोलायचं नाही ना?” 

“पोलिसांशी पण नाही पत्रकारांशीही नाही. कोणाशीच नाही. मी समोर असल्याशिवाय कोणाशीच बोलायचं नाही. म्हणजे अगदी थेट शब्दात बोलायला नकार द्यायचा नाही उद्धटपणे, पण माझ्या वकिला समोरच बोलेन असं सांगायचं.” 

“ठीक आहे जमवते मी.” –ऋता

“दुसरी रिव्हॉल्व्हर कुठे आहे?”

“कोणाला ती कधी सापडणार नाही अशा जागी मी ती ठेवल्ये.”

ती बाहेर पडली आणि पटकन सौम्याने पाणिनीला विचारलं,

 “पुरावा दडवणं हा गुन्हा नाही का?” 

“गुन्हा नक्कीच आहे पण न बोलण्याचा सल्ला आपल्या अशीलाला देणं हा गुन्हा नाही.” 

त्याच्या उत्तरावर आपलं हसू आवरत सौम्या सुद्धा बाहेर पडली 

(प्रकरण ६ समाप्त)