Revolver - 5 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 5

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 5


प्रकरण ५

“ वा,वा, पाणिनी ! पहाटे पहाटे लौकर उठून हे दोन पंछी कुठेले किडे पकडायला बाहेर पडले होते?” सौंम्याआणि पाणिनीकडे आळीपाळीने बघत तो म्हणाला.

“ आम्ही याला पहाट म्हणत नाही.” पाणिनी म्हणाला.

“ म्हणा काहीही पण तुम्ही भटकंती मात्र खूप करता.” तारकर म्हणाला, “ चला वर जाऊ म्हणजे जरा आपल्याला बोलता येईल निवांतपणे.”—तारकर

“ कशावर बोलायचंय तुला एवढ?” पाणिनीने विचारलं.

“ खुना बद्दल.” तारकर म्हणाला आणि त्याने बोलता बोलता त्यांना बरोबर यायला भाग पाडून ऑफिस पर्यंत नेलंच.

“ बोल, तारकर.” पाणिनी म्हणाला.

“ गंधर्व चांडक.” तारकर त्रोटकपणे उद्गारला.

“ त्याचं काय?”

“ मेला तो.”—तारकर.

“ कसा काय?” पाणिनीने विचारलं.

“ अडतीस कॅलीबर ची गोळी लागून.”

“कधी?” पाणिनीने विचारलं.

“ काल रात्री केव्हातरी.”

“ कुठे?”

“ ज्या अपार्टमेंट मधे तू त्याला आठ वाजता पाहिलंस, त्याच ठिकाणी.” तारकर म्हणाला.

“ खरं की काय? आणि तुला कोणी दिली ही माहिती?” पाणिनीने विचारलं.

“ ते माझं गुपित आहे.व्यावसाईक गुपित.त्यामुळे मला किती माहिती आहे हे नेमकं तुला कळणार नाही.मला त्यामुळे सगळे प्रश्न विचारता येतील.”

“ आणि मी तुला उत्तरं देतांना सत्य सांगणार नाही हे तू गृहित धरतोयंस ”

“ तू मला असत्य सांगशील असं मी म्हणत नाही.पण तुझी उत्तरं द्यायची विशिष्ठ अशी पद्धत आहे.ज्यात तू थेट उत्तरं देत नाहीस तर उत्तरादाखल दुसऱ्यालाच प्रतिप्रश्न करतोस आणि तो असा असतो की त्यातून तुला काय म्हणायचं आहे याचा अर्थ काढावा लागतो.आणि आम्ही जो अर्थ काढू तो तू नाकारतोस आणि म्हणतोस की मला हे म्हणायचं नव्हतं. पाणिनी तू काय सांगतोस या पेक्षा तू काय सांगत नाहीस याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं.”

पाणिनी हसला.

“ तर मग मला सांग काल रात्री चांडकला तू कशासाठी भेटलास?”-तारकर.

“ एका व्यावसायिक कामा निमित्त.” पाणिनी म्हणाला.

“ कसलं काम?”

“ ज्यात माझ्या अशिलाचे हित संबंध गुंतले आहेत.”-पाणिनी म्हणाला.

“ सुरु झालंच बघ तुझं गोल गोल फिरवणं. मला स्पष्ट सांग की तुमच्यात काय चर्चा झाली.”-तारकर

  “ ते कसं सांगता येईल? अशीलाशी वकिलाचं, डॉक्टरचं रुग्णाशी झालेलं बोलणं गोपनीय असतं. ”

तारकरने पाणिनीचा चेहेरा नीट न्याहाळला. “ चांडक ला त्या रात्री इतरही अपॉइंटमेंटस् होत्या.” तो म्हणाला.

“ अच्छा !” पाणिनी म्हणाला.

“ तुला माहिती असेल ना, कोण येणार होतं भेटायला?”—तारकर

“ कोणीतरी येणार होतं एवढं माहिती होतं मला.”

“ नेमकं कोण?”—तारकर

“ या बाबतीत मी मदत नाही करू शकत तुला.” पाणिनी म्हणाला.

“ करू शकत नाहीस की करणार नाहीस?”

“ तिसरी शक्यता सुद्धा असू शकते त्यात,तारकर.आणि या तिसऱ्या शक्यतेला कोर्टात काहीच किंमत नसते. ऐकीव माहिती. म्हणूनच मी जेव्हा म्हणालो की मी मदत नाही करू शकत तुला, तेव्हा त्याचा अर्थ,माझ्याकडील माहिती कोर्टात काही सिद्ध होवू शकेल अशी नाही.” पाणिनी म्हणाला.

“ पाणिनी, या जगात तू एकटाच हुशार आहेस असं नको समजू.तू तुझ्या नेहेमीच्या वेळेत ऑफिसात आला नाहीस आणि सौंम्या घाई घाईत बाहेर पडली हे आम्हाला समजलं पण तुम्ही नेमके कुठे गेलात ते समजायला मार्ग नव्हता.म्हणून तू ऑफिसात कधी येतोस याच्या मागावर होतो.आणि तू फसलास.तू टॅक्सी ने येताना थेट तुझ्या ऑफिस पर्यंत टॅक्सी आणलीस.आता त्या ड्रायव्हरचा टॅक्सी चा नंबर मला मिळालाय आणि त्याला शोधायला मी माझी माणसं कामाला लावल्येत.एकदा त्याला ताब्यात घेतला की तो पोपटासारखा बोलेल.मग तुझा ठाव ठिकाण शोधणं कितीसं अवघड आहे?” तारकर म्हणाला.

“ धन्यवाद, माझी चूक निदर्शनाला आणून दिलीस.” पाणिनी म्हणाला.

“ तुझ्या बरोबर टॅक्सीत जी चिकणी पोर होती ना, ती नसती तर नक्कीच तू ऑफिस पर्यंत टॅक्सी आणली नसतीस एक चौक आधीच उतरून चालत आला असतास.मग मला तुझा मागोवा काढता नसता आला.तर आता आता मला सांग ती चिकणी कोण होती आणि तुझ्या बरोबर ती का नाही उतरली टॅक्सीतून?” तारकरने विचारलं.

“ तिचं नाव आद्रिका अभिषेकी. कार्तिक कामतची भूतपूर्व सेक्रेटरी.” पाणिनीने कबूल केलं. “ तिला पुढे स्क्रीन टेस्ट द्यायला स्टुडीओत जायचं होतं.”

“ माहिती बद्दल आभार.” तारकर नाटकीपणाने म्हणाला. “ पण ज्या अर्थी तू एवढा सविस्तर तपशील सांगितलास त्या अर्थी तिचा खुनाशी संबंध नसावा हे न कळण्याएवढा मी मूर्ख नाही. तर आता मला सांग या व्यतिरिक्त तू टॅक्सीने कुठे कुठे फिरलास?”

“ ते नाही सांगता येत. ” पाणिनी म्हणाला.

“ बरं, बरं. तू म्हणतोस की ही बया कार्तिक कामत ची सेक्रेटरी आहे? ” –तारकर.

“ नाही.” पाणिनी म्हणाला.

“ अरे पाच मिनिटापूर्वी तू आहे असं म्हणालास ना?” वैतागून तारकर म्हणाला.

“ होती असं म्हणालो मी.” पाणिनी म्हणाला.

“ आणि कामत तुझं अशील आहे?”

“ हो.” पाणिनी म्हणाला.

“ त्याला तू शेवटचा सल्ला कधी दिलास पाणिनी?” –तारकर.

“ हे बघ तारकर, तो माझा खूप जुना क्लायंट आहे. त्याच्या धंद्याच्या सगळ्या कायदेशीर बाबी मीच हाताळतो.कधीकधी रोज आम्ही अनेकदा फोन करतो कधीकधी कित्येक महिन्यात भेटताही नाही,बोलतही नाही.” पाणिनी म्हणाला.

तारकर सौंम्याकडे वळून म्हणाला, “ काय माणूस आहे हा ! सरळ प्रश्नाला सरळ उत्तरं हे त्याला माहीतच नाही.तूच मला सहकार्य कर सौंम्या. माझा साधा प्रश्न आहे तुला,की कामत ने तुझ्या साहेबांचा सल्ला घेण्यासाठी सर्वात अलीकडे केव्हा संपर्क केला होता. कुठलाही शब्द-च्छल न करता उत्तर दे. ”

सौंम्याला बोलायची संधी पाणिनीने दिली नाही, पटकन तो म्हणाला, “ कामत ने मला संपर्क केला नाही उलट मीच सोमवारी दुपार पासून त्याला भेटायचा प्रयत्न करतोय.अगदी अत्ता पर्यंत करतोय.”

“ तू सोमवारी त्याला भेटायचा प्रयत्न केलास?” –तारकर

“ हो.” पाणिनी म्हणाला.

“ आणि अजूनही भेटायचा प्रयत्न करतोयस?”

“ बरोबर.” पाणिनी म्हणाला.

“ मग मला असं सांग की सोमवारी प्रथम संपर्क करायच्या वेळे पासून ते अत्ता या क्षणापर्यंत तू संपर्क करायचा प्रयत्न करतो आहेस तो पर्यंत तू कामत ला भेटला नाहीस किंवा पाहिलं नाहीस ?” –तारकर.

पाणिनी हसला.

“तू काय बोलतोस त्या पेक्षा तू काय सांगत नाहीस हे ओळखावं लागतं, म्हणजे दोन ओळच्या मधलं वाचव लागतं. आणि त्यासाठी तू उत्तरं देतोस ना तेव्हा तुझा चेहेरा पाहूनच त्यातली खरी खोटी स्थिती ठरवावी लागते. ” तारकर म्हणाला. “ तुझ्या माहितीसाठी ऐक,पाणिनी, काल रात्री चांडक आणि कामत ची भेट झाल्ये.”

“ काssय ! ” पाणिनी ओरडला.

“ तुला एक खाजगी प्रश्न विचारायचाय.”-तारकर.

“ काय?” पाणिनीने विचारलं.

“ काल रात्री तू चांडक च्या घरी गेला नव्हतास? तिथे जरा थांबलास, नंतर मागच्या दाराने बाहेर पडलास, आणि तिथून एका तरुणीला आपल्या गाडीत बसवून नेलंस?”

पाणिनी काही उत्तरं देत नाही हे पाहून तारकर पुढे म्हणाला, “ हे बघणारा एक साक्षीदार आहे.त्याने ओळखलंय तुला व्यवस्थित.”

“ खरं की काय!”

“ आता असं घडलं असावं का? एका तरुणीने चांडकवर रिव्हॉल्व्हर उगारून गोळी झाडली.नंतर तुला फोन केला आणि म्हणाली, मिस्टर पटवर्धन, एक भयानक घटना घडल्ये, मी चांडकला भेटायला आले होते, त्याच्यात आणि माझ्यात जरा वादावादी झाली, त्याला घाबरवायला मी त्याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली पण अचानक त्याने माझ्याशी झटापट करून ती पकडायचा प्रयत्न केला त्यात काय झालं समजायच्या आतच एकदम गोळीच्या स्फोटाचा आवाज झाला आणि पहाते तो काय चांडक एकदम दाराजवळ पडलेला दिसला.”

“ आणि पाणिनी, असं घडलं असाव की तिचा फोन आल्यावर तू तिला सल्ला दिलास की या परिस्थितीत पुढच्या दाराने बाहेर पडणे धोकादायक आहे तेव्हा तू मागच्या दारापाशी येशील आणि तिला आपल्या गाडीतून बाहेर नेशील.जे काही घडलंय त्याबद्दल तिने कुठे अवाक्षर काढायचं नाही.” तारकर म्हणाला.

“ तुझं म्हणणं असं आहे की मी तिला घडलेली घटना पोलिसांना न कळवण्याचा सल्ला दिला?” पाणिनीने विचारलं.

“ मला वाटतंय तसं.” तारकर म्हणाला.

“ म्हणजे प्रेताची सुद्धा पोलिसांना खबर न देण्याचा सल्ला?”

“ हो.”

“ माझ्या व्यावसायिक नीतिमत्तेला धक्का लावून मी हे केलं असावं?” पाणिनीने विचारलं.

“ तुझी नीतीमत्ता नेहेमी तुझ्या अशीलाच्या बाजूनेच तू वाकवतोस.तुझ्या अशिलावर शिंतोडे उडू नयेत म्हणून तू त्याला काहीही करायचा सल्ला देऊ शकतोस पाणिनी. ”-तारकर.

“ तशी शक्यता असेल तर ती फारच आश्चर्यकारक असेल.”

“ तू अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस,पाणिनी.”

“ तुला उत्तर हवंय?” पाणिनीने विचारलं.

“ हो.”

“ नाही.” पाणिनी म्हणाला.

“ तू मला फसवत नाहीयेस ना?”

“तर मग मला सांग चांडक मेल्याचं प्रथम तुला कधी समजलं?”

“ सौंम्याने मला आज सकाळी सांगितलं.” पाणिनी म्हणाला.

“ तिला कोणी सांगितलं पण?” –तारकर

“ तिने बातम्यात ऐकलं ”

“ आणि ऐकता क्षणीच तू तुझ्या अशिलाला भेटायला गेलास?”-तारकर

“ हो.”

“ कामतला?”

“ हो.”- पाणिनी म्हणाला.

“ का?”

“ चांडक मेल्याचं त्याला सांगणं आवश्यक होतं.मला वाटलं की त्याने केलेल्या प्लॅन मधे या घटनेमुळे त्याला बदल करावे लागतील.”- पाणिनी म्हणाला.

“ भेटला कामत?”

“ नाही.”

“ फोनवर बोललास?”

“ नाही.”

तारकर उठला. “ थँक्स.मला तुझी या विषयावर कुमारखत घ्यायचीच होती.मला वरिष्ठांकडून तशी सूचना होती.”

“ पोलिसांशी सहकार्य करायला मला नेहेमीच आवडत.” पाणिनी म्हणाला.

“ अरे,पाणिनी, मला सांग,मला मिळालेली माहिती खरी आहे का, की कामतने स्वत:च्या संरक्षणासाठी बॉडी गार्ड ठेवला होता. तो रात्री अपरात्री केव्हाही फिरायचा मोठी रोख रक्कम घेऊन त्यामुळे. तुला माहित असेल ना कामत ची रिव्हॉल्व्हर कुठे आहे अत्ता ते?”

“ रिव्हॉल्व्हर? कुठली रिव्हॉल्व्हर?”

“ कामत जी नेहेमी आपल्या बरोबर बाळगायचा ती.”-तारकर

“ त्याची रिव्हॉल्व्हर त्याच्याच कडे असेल ना? आणखी कुठे असणार?” पाणिनीने निष्पाप पणे विचारलं.

“ तेच आम्हाला शोधून काढायचंय ” पाणिनीकडे आपलं बोट रोखून तारकर म्हणाला आणि बाहेर पडला.

तो बाहेर जाताच पाणिनीने कामतची जुनी सेक्रेटरी मृण्मयी भगलीला फोन लावला.

“ तुला भेटून गेल्यावर बऱ्याच गोष्टी घडल्येत.कामतशी संपर्कच होत नाहीये.तुला जर त्याचा फोन आला तर लगेचच माझ्याशी बोलायला सांग त्याला,पण जरा काळजी घेऊनच कारण पोलीस शोधत असणार त्याला. ”

“ पोलीस ! ” ती घाबरून उद्गारली. “ पण ते मला फोन करतील असं का वाटतंय तुम्हाला?”

“ कारण आद्रिका अभिषेकी तुझ्याशी कसं वागली, मला तिने कशी वागणूक दिल्ये ते सर्व मी कामत ला सांगितलं होतं.त्याने आद्रिकाला या गोष्टीवरून वाईट झापलं, आणि आद्रिकाने नोकरी सोडल्ये. त्यामुळे आता कामत तुला कधीही फोन करू शकतो त्याला काही लागलं तर.” पाणिनी म्हणाला.

“ पटवर्धन, मी लगेच पुन्हा नोकरीत रुजू होते. माझ्याकडे अजूनही ऑफिसच्या किल्ल्या आहेत.मला अजूनही त्यांच्या संपर्कातील लोकांचे पत्ते, फोन माहित आहेत. कोणाचे निरोप त्यांच्या पर्यंत पोचवायचे, फोन कोणाचे जोडून द्यायचे, कुठल्या फायली कुठे आहेत सर्व,सर्व मला पाठ आहे पटवर्धन.त्यांना दुसरी सेक्रेटरी मिळे पर्यंत मी जाते. ” –मृण्मयी

“ परिस्थिती बदलल्ये बरीच तू सोडल्यानंतर.” तिला सावध करत पाणिनी म्हणाला. “ कामतला भेटायला इच्छुक असणाऱ्या माणसात साध्या वेषातील पोलीस असू शकतात.” - पाणिनी म्हणाला.

“ हो,हो, थँन्क्स पटवर्धन सर.मला टिप दिल्याबद्दल.मला त्यांचा फोन आला तर मी तुम्हाला फोन करायला सांगेनच.तुम्हाला आला तर त्यांना सांगा की लगेच मी कामावर रुजू होत्ये.मला पगार सुद्धा नको. फक्त घरातून ऑफिसात जायचा आणि यायचा टॅक्सीचा खर्च मी घेईन.”-मृण्मयी

“ ठीक आहे कल्पना वाईट नाही.” पाणिनी म्हणाला. आणि आपण आपली गाडी घेऊन बाहेर जात असल्याचा निरोप त्याने सौंम्याला दिला.

“ मी साक्षीदार म्हणून लागणारे तुम्हाला ? ”-सौंम्या

“ नाही.त्यापेक्षा तू इथेच थांब आणि.... ” तेवढ्यात पाणिनी चा फोन वाजला. फोनवर कामत होता.

“ पटवर्धन,माझ्याकडे खूप कमी वेळ आहे नीट ऐक. तुझी सर्व ताकद लावून ऋता ला सांभाळून घे.शक्यता आहे की स्वत:ला वाचवताना तिच्या हातून चुकून चांडक वर गोळी झाडली गेली असावी.”

“ तुझी तशी सूचना असेल तर पाहतो मी.पण तू आहेस कुठे? आणि.....” पाणिनी म्हणाला.

“ मी पोलिसांचं लक्ष्य दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करतोय पाणिनी.”

“ हे धोकादायक आहे पण, कारण तू पोलिसांपासून पळून जायचा प्रयत्न केलास तर कायदेशीर दृष्ट्या, तू दोषी असल्याचा तो पुरावा समजण्यात येतो.” पाणिनी म्हणाला.

“ तर मग मी मी मुद्दामच तसं करतो पाणिनी. तुझं काम ऋता ला वाचवण हे आहे.माझं संरक्षण मी करेन.”

“ तू त्यात अडकला असलास तरी ?” पाणिनीने विचारलं.

“ तरीही.” कामत ठामपणे म्हणाला.

“ एवढ कशासाठी पण? म्हणजे तिच्यासाठी स्वत:ला सुद्धा अडकवायला तयार होतो आहेस?”

“ मला ती पोरगी आवडल्ये.माझा मुलगा तिच्या बरोबर काही दिवस फिरत होता,लग्न करणार होते दोघे.आता जरी त्याने दुसरीशी लग्न केलं असलं तरी माझ्या मनात ऋता बद्दल अजूनही प्रेम आहे. तिच्यावर विश्वास आहे.”-कामत म्हणाला.

“ ठीक आहे कामत. तुला अजून एक बातमी द्यायच्ये.तुझी सेक्रेटरीआद्रिका अभिषेकी ने तुझी नोकरी सोडल्ये. तुझं ऑफिस आता पूर्ण बंद आहे.एखाद पिंप बंद करावं तसं.” पाणिनी म्हणाला.

“ का sss य ! ” कामत ओरडला. “ असं कसं होवून चालेल ! अक्षरशः हजारो कामं पेंडिंग आहेत.मला तातडीने एखादी सेक्रेटरी मिळवून दे पाणिनी.”

“ मी आधीच काम केलंय तुझं.तुझी आधीची सेक्रेटरी मृण्मयीला भेटून मी आद्रिका बद्दल सगळी हकीगत सांगितली.तू तिला फायर केल्याचं आणि ती नोकरी सोडून गेल्याचं सांगितल्यावर लगेच ती टॅक्सी करून तुझ्या ऑफिसात जायला निघाली सुद्धा. तिच्याकडे ऑफिसची किल्ली आहे अजूनही. खरं तर ती प्रेग्नंट आहे तरी तिला तुझी फार काळजी आहे.” पाणिनी म्हणाला.

“ ओह हो.माझी केवढी काळजी दूर झाली तुला सांगू शकत नाही मी. पाणिनी, तिला म्हणावं जेवढ शक्य होईल तेवढा वेळ ऑफिसात ये.अर्थात तब्येत सांभाळून. मी काही दिवस तरी तिकडे फिरकणार नाहीये. ” कामत म्हणाला आणि पाणिनीला बोलायची संधी न देता फोन बंद केला.पाणिनीने सौंम्याला सगळं बोलणं सांगितलं.

“ मी आता बाहेर निघालोय सौंम्या, जर मला भेटायला कोणी आलं,तर मी कुठे आहे याची तुला थोडी सुद्धा कल्पना नाहीये.” पाणिनी म्हणाला.

“ पण मी अंदाज करू शकते का? ”—सौंम्या

“ कर ना.”

“ तुम्ही कार्तिक कामत च्या ऑफिसला जाताय. पोलिसांना तिथे काही सापडणार नाही याची खात्री करण्यासाठी. ”

“ कल्पना म्हणून चांगली आहे ही.पण त्यात दोन अडचणी आहेत.एक म्हणजे वकील या नात्याने मी कोणताही पुरावा हलवू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही.तसं केलं तर गुन्हा ठरेल.दुसरी गोष्ट म्हणजे मला त्याहून महत्वाच्या काही गोष्टी हातावेगळ्या करायच्यात.पण त्यातल्या त्यात दोन गोष्टी बद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत.”

“ कुठल्या?”—सौंम्या

“ पहिली गोष्ट म्हणजे टॅक्सी कोणत्या रस्त्याने गेली याचा तपास पोलीस घेणार असल्याचं आपल्याला आधीच समजलंय.”- पाणिनी म्हणाला.

“ आणि दुसरी?”

“ ते मी नंतर सांगेन..” पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला. सौंम्या काही न समजून त्याच्याकडे पाहताच राहिली.

( प्रकरण ५ समाप्त.)