रिव्हॉल्व्हर
प्रकरण १
एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच मुलगी खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली.
“ मी मिस ऋता रिसवडकर ”
पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,
“ तुम्ही सौंम्याला तुमची जी माहिती संगीतल्ये, त्यानुसार तुम्ही मिस्टर कामत च्या मुलाशी संबंधित आहात म्हणजे त्याच्याशी...” पाणिनी म्हणाला.
“ ते मी यथावकाश सांगीन मिस्टर पटवर्धन.त्या आधी मी कशासाठी इथे आल्ये ते सांगते.” ऋता म्हणाली.
“ मी एक बाब आधीच स्पष्ट करतो.” पाणिनी म्हणाला. “ कामत हे माझे खूप जुने क्लायंट आहेत.म्हणजे नियमित नाहीत पण पूर्वी मी त्यांचे बराच काळ चालणार मोठ काम केलंय. आणि मुख्य म्हणजे ते माझे मित्र पण आहेत. त्यामुळे तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे कामत च्या मुलाशी संबंध असेल तर तुमचं वकील पत्र घेण्यापूर्वी तुमचे आणि कामतचे हित संबंध एकमेकांच्या आड येत नाहीत ना हे मला तपासून बघावं लागेल.”
“ जरूर पटवर्धन. उलटपक्षी मी त्याच मताची आहे की तुम्ही प्रथम त्यांच्याशी बोलावं.”
पाणिनीने सौंम्याला कामतला फोन लावायला सांगितला.सौंम्याने फोन लावला. थोडावेळ ती पलीकडील बोलणे ऐकत राहिली.
“ ठीक आहे मी कधी भेटू शकेन त्यांना? ओह ! बर, बर, तुम्ही फोनवर बोलाल तेव्हा त्यांना सांगा की पाणिनीपटवर्धन अॅडव्होकेट, यानाचा फोन आला होता म्हणून.” सौंम्याने फोन बंद केला. नंतर ती पाणिनीला म्हणाली, “ त्यांची सेक्रेटरी, आद्रिका अभिषेकी होती फोनवर ती म्हणाली कामत साहेब बाहेर गेलेत आणि त्यांचा नंबर नाही देता येणार. ”
“आद्रिका अभिषेकी? अरे! मग मृण्मयी मोहिते कुठे गेली? ” पाणिनीने विचारलं.
“ तिच्या लग्नाला आपण गेलो होतो आठवतंय? बहुदा तिने नंतर नोकरी सोडली असावी.” –सौंम्या
“ मला माहित्ये कामत सर बाहेर गेलेत. मी पण त्यांना फोन करायचा प्रयत्न करत होते.” ऋता म्हणाली.
“ ठीक आहे, ते येतील तेव्हा पाहू.पण आपल्यात हे नक्की ठरवू की त्यांच्याशी बोलल्यावरच मी तुझी केस घ्यायची की नाही हे ठरवेन.तुला हे मान्य असेल तर तुला काय सांगायचं आहे ते सांग.” पाणिनी म्हणाला.
“ मला वारसा हक्काने गोव्यातील मोठी इस्टेट मिळाल्ये.”
“ काय स्वरुपाची आहे ही इस्टेट?” पाणिनीने विचारलं.
“ एक कॅसिनो आणि एक हॉटेल, म्हणजे हायवेवरचे.”
“ मोटेल.” पाणिनी म्हणाला.
“ हो.फार मोठं नाहीये पण पुढे वाढवायला संधी आहे.” ऋता म्हणाली.
“ तुझा हिस्सा किती आहे त्यात?”
“ ती सगळी इस्टेट एका खाजगी कंपनीच्या नावाने आहे. माझे वडील त्याचे मुख्य होते.माझा हिस्सा ४०% आहे उरलेला ६०% चार माणसात विभागाला गेला आहे.प्रत्येकी १५% प्रमाणे.”
“ तू बाबांचा उल्लेख ‘होते’ असा केलास, कधी गेले ते?” पाणिनीने विचारलं.
“ सहा महिन्यापूर्वी.” ती म्हणाली. थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, “ त्यांचा खून झाला.”
“ काय !! ” आश्चर्याने पाणिनी ओरडलाच.
“ तुम्ही त्यावेळच्या पेपरात वाचलं असेल.”
पाणिनी विचारात पडला, काहीतरी आठवल्या सारखं केलं आणि एकदम उद्गारला, “ तुझ्या बाबांचं नाव कोदंड रिसवडकर तर नव्हतं? ”
तिने मान डोलावली.
“ माझ्या माहिती प्रमाणे ती केस कधीच सोडवली गेली नाही. ”
“ खुनाला स्वत:हून वाचा फुटत नसते.” ऋता म्हणाली.
“ खरं आहे. पुढे सांग.”
“ मी चार वर्षांची असतांना माझी आई गेली.एका अर्थाने ती माझ्या साडेसातीची सुरुवात होती.निदान माझ्या वडलांना तरी तसं वाटलं.ते प्रचंड अंध श्रद्धाळू होते.सगळेच जुगारी असतात. आई गेल्यावर ते फारच उद्वस्त झाले.त्यांचे काम गेले,पैसे संपले. मिळेल ते काम घेण्यास त्यांनी सुरुवात केली.एका टपरी वजा रेस्टॉरंट मधे त्यांनी काम मिळवलं.पुढे मालक वारला.बाबांनी ते त्याच्या नातलगाकडून खरेदी केलं.थोड बांधकाम केलं.वृत्तीने बाबा जुगारी होते.त्या रेस्टॉरंट मधे त्यांनी दारू आणि जुगाराचा अड्डा बनवला. ”
पाणिनी मधे न बोलता लक्षपूर्वक ऐकत होता.
“ जुगारी माणसात काही गुण आणि काही अवगुण असतात. माझ्या बाबांनी मला बोर्डिंग स्कूल मधे टाकलं.पण त्या संस्थांना आपल्या शाळेत जुगाऱ्याची मुलं नको असतात कारण त्यात त्याचं प्रेस्टीज जातं.म्हणून बाबा आपण शेअर मार्केट मधील ब्रोकर असल्याचं सांगत.अर्थात हे खोटं फार काल लपून रहात नसे. ते शाळेला कळलं की मला शाळेतून काढून टाकलं जाई, मग पुन्हा नवी शाळा.असं करत करत मी कसबसं शिक्षण पूर्ण केलं पण तेव्हा ठरवलं की बाबांवर अवलंबून न राहता स्वतंत्र व्हायचं म्हणून मी मोडेलिंग चा व्यवसाय निवडला.त्यात थोडेफार पैसे कमावले.दरम्यान बाबांनी गोव्यात काही मिळकत खरेदी केली,त्यावर हॉटेल बांधलं पण त्यात काही अर्थ नव्हता कारण बाबा दुपार पर्यंत अंथरुणात लोळत पडायचे.पण काळाच्या ओघात मिळकतीची किंमत वाढत होती. एका ग्रुप ने आमच्या हॉटेलच्या बाजूची जागा खरेदी केली होती त्यांना मोठे स्टार हॉटेल, काढायचे होते त्यासाठी जास्तीची जागा लागणार होती त्यांनी बाबांना जागा विकता का म्हणून विचारलं पण बाबांना त्यांनी देऊ केलेली किंमत मान्य नव्हती.त्यांच्यात वाद सुरु झाले.त्यांनी बाबांना धमक्या द्यायला सुरुवात केली. बाबा त्यांना हसले. आणि तिथेच फसले. ” ऋता म्हणाली.
“ त्या लोकांनीच मारलं तुझ्या बाबांना?” पाणिनीने विचारलं.
“ देव जाणे.” ती उद्गारली. “ पण बाबा गेल्यावर त्यांच्या कंपनीतले इतर भागधारक घाबरले. त्याचं म्हणणं होतं की आहे त्या रकमेला मिळकत विकून टाकावी. आणि व्यावहारिकही होतं ते.”
“ बर,पुढे?”
“ मला चाळीस टक्के हिस्सा वाट्याला आला.बाकीचा साठ टक्के चार जणांच्या वाट्याला आला प्रत्येकी पंधरा टक्क्या प्रमाणे.मी बाबांच्या मृत्युच्या गडबडीत असतानाच्या काळात एक जण, सध्या आपण त्याला क्ष म्हणू, पटापट तिघांचे शेअर्स खरेदी करायला लागला आणि ते तिघे येईल त्या किंमतीला ते विकायला तयार होते.बाबा जाण्यापूर्वी मी आणि कुमार कामत कामत एकमेकांच्या संपर्कात आलो होतो.भेटत होतो. माझ्या बाबांच्या मृत्यू नंतर कुमार कामत च्या वडिलांनी म्हणजे कार्तिक कामत यांनी मला विचारलं की बाबांच्या मृत्यू बद्दल माझं काय मत आहे, मी त्याना स्पष्ट सांगितलं.माझ्या आधी त्यांना समजलं होत की बाकीचे तिघे येईल त्या किंमतीला शेअर्स विकायला तयार आहेत.कार्तिक कामत यांनी त्या माणसाला म्हणजे जो माणूस पटापट तिघांचे शेअर्स खरेदी करायला लागला होता त्याला शह द्यायचा प्रयत्न केला पण त्याला उशीर झाला होता.तरी कार्तिक नी तीन जणांपैकी एकाला गाठून त्याचे शेअर्स खरेदी केले पण बाकीचे दोघे निसटले. थोडक्यात आता कार्तिक कामत यांचेकडे पंधरा टक्के हिस्सा आहे, माझ्याकडे चाळीस टक्के आहे. आणि या बाहेरच्या माणसाकडे,पंचेचाळीस टक्के आहे हिस्सा,त्याला सगळेच शेअर्स खरेदी करायचे आहेत आणि शंभर टक्के मालकी करायची आहे. ” ऋता म्हणाली.
“तुला नेमकं काय हवंय? ” पाणिनीने विचारलं.
“ मला माझा हिस्सा विकायचा आहे.पण बाबांच्या मृत्यूचा फायदा घेऊन नाममात्र रकमेला त्यांना मी विकून देणार नाही.”
पाणिनी लक्षपूर्वक ऐकत होता.
“ तर हा क्ष नावाचा माणूस या शहरात आहे.मला तो माहिती आहे.मोडेलिंग च्या व्यवसायात असतांना माझी आणि त्याची देवनार मधे भेट झाली आहे. आता क्ष हा एखाद्या कंपनीचं प्रतिनिधित्व करतोय की एकटा आहे ते मला माहित नाही.मला इतकंच माहित्ये की तो जो कोणी आहे,तो बाकीच्या तिघांना भेटला होता.त्यांना घाबरवून त्याने पडेल त्या किंमतीला रोख रक्कम देवून त्यांचा हिस्सा खरेदी केला. मलाही त्याचा फोन आला होता की माझा आणि कामत चा हिस्सा त्याला खरेदी करायचाय. ” –ऋता
“ तू भेटणार आहेस त्याला?” पाणिनीने विचारलं.
“ उद्या रात्री साडे आठ वाजता त्याने मला भेटायला बोलावलंय.मला कामत यांचेकडून हे जाणून घ्यायचय की त्यांना त्यांचा हिस्सा विकायचा आहे का.ते विकणार असतील तरच मी विकेन माझा हिस्सा किंवा कामत आणि मी आमचा हिस्सा एकत्र करू.”
“ आणि तू कार्तिक कामत शी संपर्क करू शकली नाहीस? ” पाणिनीने विचारलं.
“ ते कालच परगावी गेलेत असं समजलं.त्यांची सेक्रेटरी मला ताकास तूर लागू देत नाहीये.”-ऋता
“ तुझा मित्र कुमार कामत कडून सुद्धा त्याच्या बाबांचा ठाव ठिकाणा समजत नाही?”
“ तोही कुठेतरी मीटिंग ला गेलाय.”
“ हा विषय तू एकटीने हाताळावास असं कार्तिक कामत ना वाटत असेल असं मला वाटत नाहीये.कदाचित यासाठी त्यांना माझी मदत हवी असेल. मला सांग, तुझ्या वडिलांच्या खुन्याला शिक्षा मिळावी असं वाटतंय ना तुला?” पाणिनीने विचारलं.
“ अर्थातच.तुमच्याकडे यायचं तेही एक कारण आहे.या शेअर्स खरेदीचा व्यवहार मार्गी लागला की तुम्ही माझ्या वडलांच्या खुनाच्या संदर्भात आवश्यक ते पुरावे गोळा करण्यासाठी एखादा गुप्तहेर नेमावा आणि त्याचे पुरावे पोलिसांना सुपूर्त करावेत. ”
“ पोलिसांनी खुनाची केस सोडवावी म्हणून तुम्हाला वकील नेमायची गरज नाही.” पाणिनी म्हणाला. “ पण मला सांग ऋता, ही क्ष व्यक्ती खुनात गुंतली असायची शक्यता किती आहे? कारण त्याचा फायदा त्याला शेअर खरेदीच्या व्यवहारात होणार आहे. ”
“ नक्कीच गुंतला असू शकतो तो.” ऋता म्हणाली.
“ तर मग तू कामत ला सांगायला हवंस की त्या व्यक्तीशी बोलणी करा म्हणून.”
“ जेव्हा कामत यांनी पंधरा टक्के हिस्सा खरेदी केला तेव्हा त्यांच्या मनात होतं की मला विवाहाची भेट म्हणून हा हिस्सा वर्ग करावा.मला ते त्यांची सून मानत होते.पण आता परिस्थिती बरीच बदलल्ये. ”ऋता म्हणाली.
“ ठीक आहे.” पाणिनी विचार करत म्हणाला. “ आपण उद्या दहा वाजता भेटू.”
“ ठीक आहे पटवर्धन” ती उठून उभी रहात पाणिनीला शेक हँड करत म्हणाली आणि बाहेर पडली.
“ मी आता जरा बाहेर जाऊन कामतच्या नव्या सेक्रेटरीला भेटून येतो.तिच्या कडून काही माहिती मिळेल का अंदाज घेतो.” ऋता बाहेर जाताच पाणिनी सौंम्याला म्हणाला.
“ सर,जर तिला कार्तिक कामत ने संमती दिली आणि तिने तिच्या हिश्याचे शेअर्स विकले तर तिच्या अपेक्षेनुसार तुम्ही तिच्या बाबांच्या खुनाच्या प्रकरणात खरंच मध्यस्त म्हणून काम करणार? ” सौंम्या ने विचारलं.
“ मला माहित नाही सौंम्या. ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून राहील.” पाणिनी म्हणाला.
“ माझं अंतर्मन मला सांगतंय की यातून तुम्ही जरा लांबच राहावं.” सौंम्या म्हणाली.
“ मी प्रथम आद्रिका अभिषेकी, म्हणजे कार्तिक कामत च्या नव्या सेक्रेटरीला भेटून तर येतो मग पाहू. ”
“ म्हणजे नेहेमी प्रमाणे पूल येईल तेव्हा तो कसा ओलांडायचा ते तुम्ही ठरवणार तर.” नाईलाजाने सौंम्या म्हणाली.
( प्रकरण १ समाप्त.)
हा भाग आवडला असेल तर केवळ लाईक करू नका .कॉमेंट्स करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांनाही वाचायला सुचवा