Revolver - 2 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 2

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 2


प्रकरण २

आद्रिका अभिषेकी उंचपुरी सडपातळ बांध्याची आणि ‘ चिकणी ’ असं जिचं वर्णन करता येईल, अशी मुलगी होती. आपल्या सेक्रेटरीच्या टेबलवर बसली होती.तिच्या आधीच्या सेक्रेटरीने ज्या ठिकाणी टेबल ठेवलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला तिने ते हलवलं होतं.दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला आणि त्याच वेळी आद्रिकाला फोन आला. पाणिनीला तिने हसून अभिवादन केलं आणि अगदी बारीक आवाजात ती फोन वर बोलत बसली. “ सॉरी, मला नाही सांगता येणार ते कधी परत येतील.बाहेरगावी आहेत ते. त्यांना काही निरोप आहे? बरं, बरं ” ती म्हणाली आणि फोन बंद करून पाणिनी कडे वळली.

“ मी पाणिनी पटवर्धन.” पाणिनी म्हणाला.

“ ओह ! प्रसिद्ध वकील ! पाणिनी ! ” ती आश्चर्याने उद्गारली.

“ तुमच्या सेक्रेटरीने मला सांगितलंय की कामत सर आले की त्यांना तुमच्याशी बोलायला सांगायचं आहे.” आद्रिका

“ हो.बरोबर.तुमचं टेबल तुम्ही पूर्वीच्या ठिकाणाहून दुसरीकडे लावलेलं दिसतंय.” पाणिनी म्हणाला.

“ हो.मृण्मयी ने जिथे ठेवलं हो त्या जागी प्रकाश बरोबर नव्हता येत.”—आद्रिका

“ तिची काय खबरबात?” पाणिनीने विचारलं.

“ इथे आली होती दोनदा ” जरा अलिप्तपणे ती म्हणाली.

“ तिचं आता सासरच नाव काय आहे हो? मी तिला आधीच्याच मृण्मयी मोहिते नावाने ओळखतो.” पाणिनी म्हणाला.

“ लक्ष भगली नावाच्या माणसाशी तिचं लग्न झालंय.”

“ हो खरंच.मी लग्नाला गेलो होतो तिच्या.कामत माझे जुने क्लायंट आहेत ना! बरं कामत कुठे आहेत? ”

“ ते व्यावसायिक कामासाठी परगावी गेलेत.” आद्रिका म्हणाली

“ कधी गेले ते?”

“ काल दुपार पासूनच ते गेलेत.” आद्रिका ने उत्तर दिलं.

पाणिनीने तिच्याकडे साशंक नजरेने पाहिलं. “ काही गंभीर किंवा अनपेक्षित बाब आहे?”

ती हसली.“ अजिबात नाही.तुम्हाला माहितीच आहे की त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळकती असल्याने आणि गुंतवणुका केल्या असल्याने ते बरेच वेळा अशा प्रकारे बाहेर जातात. ”

“ त्यांच्या सर्व कायदेशीर बाबी मी हाताळतो हे तुला माहित असेलच.” पाणिनी म्हणाला.

“ मी ऐकलंय त्यांच्याकडून तुमच्या बद्दल. ”-आद्रिका

“ मला त्यांना अत्यंत तातडीने भेटायचं आहे.”

“तुमचं काम हे मिस रिसवडकर बद्दल आहे? ”

 पाणिनीने आपला चेहेरा भावनाशून्य ठेवला आणि विचारलं,“ का? ”

“ मी जरा मोकळेपणाने बोलते तुमच्याशी.आपल्याला कोणी अडथळा आणू नये बोलताना, म्हणून आपण कामत साहेबांच्या केबिन मधे बसून बोलूया का?” आद्रिकाने विचारलं.

“ काहीच हरकत नाही.” पाणिनी म्हणाला. आणि ते दोघे कामतच्या केबिन मधे आले.

“ मी हे तुम्हाला बोलले आहे हे जर साहेबांना कळल तर माझ्यावर ते प्रचंड संतापतील.” आद्रिका म्हणाली. पाणिनी काही बोलला नाही. हे पाहून आद्रिकानेच बोलायला सुरुवात केली.

“ ऋता रिसवडकर ही अत्यंत नीच,कपटी,स्वार्थी आणि पाताळयंत्री बाई आहे. ” ती म्हणाली आणि पुढे बोलू लागली.

“तुम्हाला कल्पना असेलच मिस्टर पटवर्धन की कार्तिक कामत च्या कुमारशी तिचे संबंध होते आणि आता तो दुसऱ्या मुलीच्या मागे लागलाय त्यामुळे ऋता त्याच्या वडिलांची विशेष काळजी घेताना, त्यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित करताना दिसते आहे आणि कामत सुद्धा तिच्यात रस घेत आहेत. ती नक्की काय खेळी खेळते आहे मला माहित नाही पण स्वतःला फायदा मिळण्यासाठीच ती ही खेळी खेळते आहे हे नक्की. माझी तुम्हाला विनंती आहे की ती जे काही तुम्हाला सांगते आहे, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला मगाशी विनंती केल्याप्रमाणे यातलं काहीच तुम्ही कार्तिक कामत यांना सांगू नका नाहीतर माझी काही खैर नाही. मी मोठ्या विश्वासाने तुम्हाला हे सगळं सांगितलं त्या विश्वासाला तुम्ही तडा तर देणार नाही ना ? " आद्रिका ने विचारलं.

पाणिनी हसला. “ तुझ्या भावना मी समजू शकतो. मी तुला दगा देणार नाही.” 

“माझ्या मनावरचं ओझं हलकं केलं तुम्ही.” ती म्हणाली. आणि पाणिनीशी हस्तांदोलन करून आपलं आता काहीच काम राहिलं नाही अशी अप्रत्यक्ष सूचना केली. 

पाणिनी तिथून बाहेर पडला आणि त्याने सौम्याला फोन लावला. 

“सौम्या आपल्याकडे कामतची जुनी सेक्रेटरी मृण्मयी मोहिते हिचा फोन आणि पत्ता आहे का?” 

“शोधून कळवते तुम्हाला. तिला भेटणार आहात?” 

“हो. डोक्यात आहे.” पाणिनी म्हणाला. 

“भेट झाली तर मी आठवण काढली सांगा” सौंम्या 

सौम्याने तोपर्यंत मृण्मयी मोहितेचा पत्ता पाणिनीला दिला. पाणिनीने टॅक्सी केली. टॅक्सीवाल्याला तो पत्ता दिला. तिच्या घरापर्यंत टॅक्सी पोचेपर्यंत पाणिनी डोळे मिटून शांतपणे विचार करत बसला . 

मोहितेचं घर आल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने पाणिनीला घर आल्याची सूचना केली. त्याला थांबायला सांगून पाणिनीने खाली उतरून तिच्या घराची बेल वाजवली मृण्मयीने दार उघडलं समोर पाणिनी पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद पसरला. “पटवर्धन ! ” ती एकदम उद्गारली. 

अरे वा ! छान दिसताय तुम्ही. पाणिनी उत्स्फूर्तपणे म्हणाला 

“उगाचच खेचू नका माझी. केवढी जाडी भरडी झाल्ये मी. सातवा महिना चालू आहे मला. एखाद्या हत्तीणी सारखी दिसत्ये मी. या या आत या पटवर्धन. घरातल्या पसाऱ्याकडे लक्ष न देता खुर्चीत बसा आरामात.” ती म्हणाली. तेवढ्यात पाणिनीला आठवलं की त्याने टॅक्सी बाहेरच उभी केली होती. त्याने ड्रायव्हरला आत बोलावलं त्याला पैसे दिले आणि जायला सांगितलं. 

तोपर्यंत मृण्मयी मोहितेने आत जाऊन पाणिनी साठी पाणी आणलं

 “काय घेणार तुम्ही? चहा की कॉफी?” 

“खरं म्हणजे काहीच नको. चहा कॉफी पेक्षा सुद्धा मी काही माहिती घेण्यासाठी आलोय.कार्तिक कामत विषयी.” पाणिनी म्हणाला.

“कामत साहेबां विषयी काय हवंय तुम्हाला?” 

“सगळ्यात पहिल्यांदा आत्ता ते मला कुठे भेटतील याची माहिती हवी आहे.” पाणिनी म्हणाला.

“म्हणजे? त्याचा ऑफिसला नाहीयेत ? बाहेर आहेत ?”

“हो बाहेर आहेत ”

“मग त्यांची नवीन सेक्रेटरी आद्रिका शी बोललात का तुम्ही?”-मृण्मयी ने विचारलं. 

“मी बोललो तिच्याशी”

मृण्मयी हसली. “आणि तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं नाही असंच ना?” 

“अगदी तसंच. काहीही माहिती मिळाली नाही मला तिच्याकडून कामत विषयी ” पाणिनी म्हणाला. 

“ मी कामत साहेबांच्या ऑफिसमध्ये दोन तीनदा गेले होते, लग्न झाल्यानंतर. तिथे गेल्यानंतर मला काय अनुभव आला असेल हे तुम्हाला आता कळलं असेल.” मृण्मयी म्हणाली. 

“तेव्हा तुझी कार्तिक शी भेट झाली ?” पाणिनीने विचारलं.

“दोनदा गेले होते मी. दोन्ही वेळा नाही झाली भेट. अर्थात मला हे माहिती आहे की ते खूप व्यग्र असतात. पण दुसऱ्या वेळेला मी गेले तेव्हा मला माहिती होतं की ते व्यग्र नव्हते कामात पण त्याच्या सेक्रेटरीने माझी भेट होऊन दिली नाही.” 

“काय हेतू आहे यामागे तिचा?” पाणिनीने विचारलं.

“मला कल्पना नाही. अर्थात तुम्हाला माहिती आहे की मी बारा वर्ष त्यांच्या बरोबर काम केलं आहे. इतक्या वर्षानंतर तुम्ही आपल्या साहेबांशी आणि त्याच्या व्यवसायाशी खूप जवळचे झालेले असता. कार्तिक कामत साहेबांची बायको गेल्यानंतर ते पूर्ण उध्वस्त झाले होते हळूहळू ते मूळ पदावर येऊ लागले होते पण त्या वेळेला मी लग्नाच्या बंधनात अडकले. माझ्यावर विश्वास ठेवा पटवर्धन, त्यांचं ऑफिस डिस्टर्ब होऊ नये म्हणून माझं लग्न मी तीन महिने पुढे ढकललं. सुरुवातीला ही गोष्ट त्यांना माहितीच नव्हती पण जेव्हा त्यांना कळलं की मी तीन महिन्यापेक्षा सुद्धा आणखीन पुढे माझं लग्न ढकलते आहे तेव्हा त्यांनी मला चांगलंच झापलं. आणि सांगितलं की तातडीने लग्न उरकून घे ऑफिसचं काम हे चालूच राहतं. तो खरंच फार मोठा माणूस आहे स्वभावाने.” मृण्मयी म्हणाली.

“तू तिथे असताना ऋता रिसवडकर चा संबंध आला होता का?” पाणिनीने विचारलं.

“नाही. ती नंतर आली कार्तिकच्या कुमारच्या म्हणजे कुमारच्या आयुष्यात. त्यापूर्वी आत्ताची सेक्रेटरी आद्रिका अभिषेकी त्याच्या आयुष्यात आली होती. आणि तोही हळूहळू स्थिरावत होता. तो वेगवेगळ्या मॉडेल्स बरोबर कायमच संबंध ठेवून असतो. ऋता रिसवडकर हळूहळू त्याच्या आयुष्यात डोकावू लागली होती. त्याआधी त्याने आपल्या वडिलांना सांगून आद्रिकाला मोठ्या पगारावर सेक्रेटरी म्हणून नोकरीला ठेवायला लावलं. तुम्ही आद्रिकाला बघितलंच आहे,

 ती कशी नाचरी-नटवी आहे ते. ती मला ती पहिल्यापासून कधीच आवडली नाही. सेक्रेटरी म्हणून काम करण्यापेक्षा ती टायपिस्ट म्हणूनच जास्त काम करायची उरलेला वेळ ती टीव्हीवर वेगवेगळ्या कोर्पोरेट मधल्या सेक्रेटरींचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यात घालवत असे.” मृण्मयीने माहिती दिली. 

"पण मग ती कामतचा कामाचा व्याप कसा सांभाळत असे?" पाणिनीने विचारलं.

“ त्याची उत्सुकता तर मलाही आहे. मला असं वाटतंय की कामत देवनार मध्ये असावेत.”

“ आणि तो तिथे असेल तर तो मुक्कामाला कुठे असू शकतो.” पाणिनीने विचारलं.

 तिने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाली “ ९०% शक्यता आहे की तो ‘डॉल्बी नावाच्या मॉटेल मध्ये मुक्कामाला असतील. ते नवीनच हॉटेल आहे पण आद्रिकाला नक्कीच माहित असणार ते कोठे आहेत याबद्दल.” –मृण्मयी

“ ती म्हणाली की तिला माहित नाहीये.”

  मृण्मयीने आपली मान नकारार्थी हलवली. “ कामत साहेबांचं हे एक वैशिष्ट्य आहे की ते कुठेही असले तरी ते आपल्या ऑफिसशी संपर्क ठेवून असतातच. इतर कोणालाही आपण कुठे आहोत हे त्यांना सांगायचं नसलं तरी सुद्धा ते सेक्रेटरी या नात्याने मला सांगत असत म्हणजे काही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर मी त्यांना संपर्क करू शकत असे.” 

“आद्रिकाला यातली काहीच कल्पना नाही असे एकंदरीत दिसतय अर्थात ती तसं भासवतही असेल.” पाणिनी म्हणाला. 

“अभिनय करत असेल हे जास्त खरं आहे.” मृण्मयी हसून म्हणाली; “मला तुमचं मत प्रदूषित करायचं नाहीये मिस्टर पटवर्धन पण लग्न झाल्यानंतर कसं असतं तुम्हाला माहिती आहे. मला जर कोणी सांगितलं असतं की लग्न झाल्यानंतर तुझा कामत साहेबांशी काहीही संबंध राहणार नाही तर त्या माणसाला मी वेडा म्हणाले असते. खरं म्हणजे याच प्रेमाखातर मी लग्न झाल्यानंतर सुद्धा काही दिवस त्यांना मदत करण्यासाठी जात होते पण तिला स्वतंत्रपणे काम करायचं होतं माझी मदत नको होती. म्हणून मी नंतर तिथे जायचे बंद झाले. मला वाटलं की ती मला फोन करेल काही विचारण्यासाठी पण तिने कधीच फोनही केला नाही आणि मग तिच्याबद्दल गेल्या कित्येक दिवसात मला काहीही कळलं नाही. म्हणून काही दिवसानंतर मी ऑफिसमध्ये गेले मी तिला म्हणाले की मी ऑफिस जवळच काही खरेदीसाठी आले होते आणि मला वाटलं की ऑफिसमध्ये यावं आणि गारमेंट सरांशी थोडं बोलून जावं काही मदत हवी का विचारावं पण आद्रिकाने मला ताकास तू लागून दिला नाही तेवढेच म्हणाली की कामत साहेब मीटिंगमध्ये आहेत. त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी मी एकदा तिकडे गेले ती अत्यंत कृत्रिमपणे आपण नम्रपणे बोलत असल्याचा भासवत होती. मी तिथे दहा-पंधरा मिनिटं काढली थोड्या गप्पा मारल्या मला माहिती होतं की तेव्हा कामत साहेब ऑफिसमध्येच होते परंतु तिने मी आल्याची कल्पना सुद्धा कामत साहेबांना दिली नाही मी विचार केला की कधी काही माझी मदत लागली तर कामत मला फोन करतीलच. आणि मी निघून आले.” 

“मग फोन केला कामत साहेबांनी तुला कधी?” 

“ नाही.तिने तिचा अहंकार जपण्यासाठी म्हणून मला फोन केला नाही हे मी समजू शकते पण फक्त मलाच माहिती असलेले कित्येक विषय होते की कामत साहेबांना मला फोन करण्यापासून गत्यंतरच नव्हतं कारण त्यांना हवी असलेली सर्व माहिती माझ्या ओठावर होती पण त्यांनी मला कधी फोन केला नाही कदाचित मला फोन करण्यासाठी त्यांनी आद्रिका ला सांगितलं असेल पण तिने तो मुद्दामच लावला नसेल.” 

“आणि तू ही नाही लावलास त्यांना कधी फोन?” 

“ नाही लावला. मी विचार केला की खरंच काही त्यांना अडचण असेल तर ते थेट मला फोन लावतील.” 

ठीक आहे असू दे नको वाईट वाटून घेऊ तुझी तब्येत सांभाळून अधून मधून माझ्याशी आणि सौम्याशी संपर्कात रहा तुला भेटायला आम्हा दोघांनाही कायमच आनंद वाटेल. सोम्याने तुझी आठवण काढली आहे” पाणिनी म्हणाला आणि निघण्यासाठी उठून उभा राहिला

“नक्कीच राहीन मी तुमच्या संपर्कात मिस्टर पटवर्धन ते जुने दिवस आठवून छान वाटतं मला पण.”

त्याला निरोप देण्यासाठी मृण्मयी दारात पर्यंत सोडायला आली. 

बाहेर आल्यावर पाणिनीने टॅक्सीला हात केला आणि तिथून आपल्या ऑफिसला आला. 

ऑफिसला आल्यावर त्यांने सौम्याला मृण्मयी भेटल्यापासून काय काय झालं ते सर्व सांगितलं.

“सौम्या, कामत आणि आपल्या ऑफिसचा शेवटचा संपर्क कधी झाला होता जरा बघून सांग.मला त्याच्या ऑफिसमधल्या एकंदरीत वातावरणावरून काहीतरी गूढ आहे असं वाटतंय” 

“साधारण एक वर्ष झालं. थोडा जास्तच” सौम्यान आपलं रेकॉर्ड बघून सांगितलं.

“ याचा अर्थ त्याने नवीन सेक्रेटरीची नेमणूक केल्यापासून आपल्याशी संपर्क ठेवलेला नाही.” पाणिनी म्हणाला.

“ म्हणजे आपल्याशी संपर्क करायला लागेल असा प्रसंग आला नसावा.” सौंम्या म्हणाली.

“ एकंदरित नवीन सेक्रेटरीच्या नियुक्तीनंतर वातावरण बरंच बदललंय हे नक्की. कदाचित कामतने वेगळा वकील नेमला असेल त्याच्या कायदेशीर बाबी हाताळायला. ते काहीही असो सौंम्या,आपण त्या निमित्ताने कामत ला भेटायचा प्रयत्न करू.देवनारच्या डॉल्बी हॉटेल मधे फोन लाव आणि कामत आहे का बघ.”

सौंम्याने लगेच फोन लावला.पहिल्याच फटक्यात कामत फोन वर आला,सौंम्या ने पाणिनीकडे फोन दिला.

“ हॅलो पाणिनी, काय म्हणतोयस ! आज अचानक फोन केलास? खूप दिवसांनी भेट होते आहे.” कार्तिक कामत म्हणाला.

“ तू अत्ता आहेस त्या ठिकाणाहून मोकळे पणाने बोलू शकतोस?” पाणिनी म्हणाला.

“ मर्यादित स्वरुपात.” कामत त्रोटकपणे म्हणाला.

“ एक उंचपुरी,घाऱ्या डोळ्याची मुलगी माझ्या ऑफिसात आली होती.तुला ज्या कंपनीत रस आहे त्याचा चाळीस टक्के हिस्सा तिच्याकडे आहे. तिला इतर काही जण भेटले आहेत ज्यांना......” पाणिनी म्हणाला.

“ थांब पाणिनी.पुढे काही नको बोलू. मी तासाभरात तुला ऑफिसात फोन करतो.” कामत पाणिनीला मधेच थांबवत म्हणाला आणि फोन बंद झाला.

“ तो आता संध्याकाळी पाच नंतरच फोन करेल. तो पर्यंत आपण दुसऱ्या प्रकरणातील ब्रीफ पूर्ण करू.” पाणिनी म्हणाला. आणि त्याने आणि सौंम्याने मिळून जवळ जवळ साडेपाच पर्यंत ते काम पूर्ण केलं. बरोब्बर पाच पस्तीस झाले आणि कामत चा फोन आला.

“ काय घडलंय अचानक पाणिनी? काही गडबड झाल्ये? ....आणि ऐक, कोणाचीही नावं घेऊ नकोस फोन वर.” कार्तिक कामत म्हणाला.

“ तू अत्ता जिथे आहेस त्या ठिकाणच्या एका कंपनीच्या प्रतिनिधीचा या घाऱ्या डोळ्याच्या मुलीला फोन आला होता.त्याने तिला एक प्रस्ताव दिलाय.आणि उद्या तो पुन्हा तिच्याशी बोलणार आहे. तिला असं वाटतंय की या संदर्भात जे काय करायचंय ते तू आणि तिने एकत्रच करणे हितावह आहे अन्यथा ही संबंधित क्ष व्यक्ती टोकाचा निर्णय घेऊ शकते.” पाणिनीने त्याला वस्तूस्थितीची जाणीव करून दिली.

“ ओह ! अच्छा.” पलीकडून कामत उद्गारला.

“ मला वाटत तुझ्या कामात मी अडथळा आणलं नसावा.” पाणिनी म्हणाला. “ तसं तुला शोधायला मला फार म्हणजे फारच प्रयास पडला.”

“ अरे असूदे पाणिनी.मला काही त्रास नाही झालाय तुझ्या फोन मुळे.पण मला कसं शोधून काढलस तू?”

“ मृण्मयी कडून समजलं.”

“ अरे! पण मी तिला बोललो नव्हतो मी इथे आहे म्हणून.” –कामत म्हणाला.

“ तू देवनार मधे कुठे असशील याचा अंदाज तिने मला दिला.” पाणिनी म्हणाला.

“ अरे पाणिनी, माझ्या आत्ताच्या सेक्रेटरीला भेटायच्या ऐवजी त्या जुन्या सेक्रेटरीला का भेटलास पण?”

“ मी तुझ्या आद्रिका अभिषेकी ला भेटलो पण ती तुझ्या ठाव ठिकाण्याबद्दल काहीही सांगू शकली नाही.” पाणिनी म्हणाला.

“ सांगू शकली नाही ! म्हणजे काय?” कामत किंचाळून म्हणाला.

“ बरोबर.” पाणिनी म्हणाला.

“ अरे पण मी तिच्याशी संपर्क ठेऊन होतो रोजच.”

“ कदाचित तिला वाटलं असाव की ही माहिती देण्याच्या लायकीचा मी नाही.” पाणिनी म्हणाला.

“ असं नाही होणार.म्हणजे, होता कामा नाही.” कार्तिक कामत म्हणाला. “ ही तरुणी ज्या माणसाशी व्यवहार करू पहाते आहे,त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कळलंय का?”

“ तिने फक्त क्ष असा उल्लेख केला त्याचा.” पाणिनी म्हणाला.

“ मला अंदाज आलाय साधारण तो कोण असावा या बद्दल. फार धोकादायक आहे तो. मी आता तुला सांगतो पटवर्धन,माझ्यासाठी तू नेमकं काय करावस ते, पहिली गोष्ट म्हणजे या तरुणीला तू पूर्ण संरक्षण दे.माझ्या वाट्याचा जो पंधरा टक्के हिस्सा मी खरेदी केलाय, त्याचं काय करायचं हे तू ठरवणार आहेस, जो पर्यंत मी तिकडे प्रत्यक्ष येत नाही तो पर्यंत असं तू त्या तरुणीला कळव.ही क्ष व्यक्ती कोण आहे हे तू शोधून काढ आणि मला लगेच फोन कर.मी फोन वर भेटलो नाही तर वैखरी ला मागून घे आणि तिच्याकडे या क्ष ची माहिती दे.” कार्तिक कामत म्हणाला.

“वैखरी? ” पाणिनीने विचारलं.

“ बरोबर.”

“ तुझ्या शेअर ची किंमत तुला ठरवायच्ये का?” पाणिनीने विचारलं.

“ ठरवायची आहे पण अत्ता लगेच नाही.आधी त्या क्ष कडून किती चा प्रस्ताव येतोय ते मला बघायचंय. तू आणि मी दोघेही यात आहोत हे त्या व्यक्तीला कळू दे.त्याला जर वाटलं की त्याचा फक्त एकाच व्यक्तीशी व्यवहार होणार आहे आणि ती स्त्री आहे, तर काय होईल ते मला नाही सांगता येणार. पटवर्धन, मला आता जास्त बोलता नाही येणार मला भेटायला एक जण येणार आहेत... ओके, ठेवतो.....” पलीकडून अचानक फोन बंद केला गेला.

( प्रकरण २ समाप्त.)