Once upon a time, two parrots... in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | एकदा दोन पोपटांनी..

Featured Books
Categories
Share

एकदा दोन पोपटांनी..

"मी नाही पाहिलंय कोणाच्याच घरी असं.. आपल्या इथंच काये रे हे बाबा... असं कोणी करतं का?" सान्वी आलोकला विचारत होती.
आठ नऊ वर्षांच्या चिमुरडीला काय उत्तर द्यावं याची जुळवाजुळव आलोकला अजूनही करता येत नव्हती. दोघे कार मध्यें बसून घरी येत होते. तिला तिच्या आजी आजोबांच्या घरून आलोक घेऊन येत होता.

सान्वीचे प्रश्न संपत नव्हते आणि आलोकची निरुत्तर अवस्था देखील. शेवटी आता कसं समजवावं सान्वीला याचा विचार करत आलोक चमकला. एक कल्पना त्याला सुचली. 
"सानू तुला मी एक story सांगू?" त्याने तिचे बोलणे मधेच अडवत विचारले.

"स्टोरी? Wow!! सांग कि बाबा." सान्वी उत्साहात म्हणाली. लहान मुलांच्या उत्साहाचा प्रवाह किती सहज वळवता येतो.

"तर... एका झाडावर ना एक पोपट राहायचा. पोपटाचं घरं म्हणजे त्या झाडाच्या उंच बुंध्याची एक डोली होती.

" डोली म्हणजे? " सान्वीने विचारले.

" डोली म्हणजे झाडाच्या खोडाला असलेलं एक होल. त्यात तो पोपट राहायचा. एकदम मस्त. नीटनेटका पोपट. दिवसभर कामावर जायचा... संध्याकाळी घरी यायचा. त्याला ना इतर पोपटासारख्या गोष्टी नाही आवडायच्या.. म्हणजे अस्तव्यस्त राहणे.. कधीही खाणे.. कुठेही उंडरणे.. कितीपण वेळ झोपणे. तो भले एकटा असला तरी जाम शिस्तीचा होता. संध्याकाळी घरी आल्यावर आपल्या डोलीतून सूर्यास्त पहात चहा घेणे त्याचा आवडता छन्द होता."

" चहा?? पोपट चहा घेतो???"🤭 सानुला गंमत वाटली.

"गोष्टीतला पोपट आहे कि नाही सानू? मग तो चहा पण घ्यायचा आणि स्वतःचा स्वयंपाक पण करायचा. रोज सकाळी व्यायाम, घरं स्वच्छ करने, आपले कपडे धुणे, व्यवस्थित आवरून ठेवणे..अशी रोजची कामे करूनच तो बाहेर पडत असे. त्याच्या घरात कधीही जां सर्व गोष्टी जिथल्या तिथे असायच्या... त्याला फारसे मित्र नव्हते कोणी. म्हणजे तो काही स्वभावाने फार कडक वैगरे नव्हता.. पण त्याला आवडायचं आपल्याच नादात राहायला... पण त्याच्या आयुष्यात जरा एक वेगळीच गोष्ट घडली.." तो म्हणाला.

"कसली गोष्ट? त्याला काही झालं तर नाही ना?" सान्वीने विचारलं.

" नाही गं बाळा.. घडलं असं कि त्याच्या झाडावरच्या त्याच्या डोली शेजारच्या रिकाम्या डोलीमध्ये कोणीतरी राहायला आलं." तो म्हणाला.

" कोण आलं? डेंजर होतं का कोणी? क्रो होता कि स्नेक?" तिने बालसुलभ प्रश्न विचारला.

" यांच्या पैकी कोणी नाही.. ते होतं. एक गोल गोल डोळ्यांची आणि हसऱ्या चेहऱ्याची पोपटीन.. अगदी तुझ्यासारखी गोड.. " आलोक म्हणाला.

" wow... पोपटीन.. Cute.. मग पुढे? दोघे फ्रेंड्स झाले असतील ना? " सान्वीने विचारले.

" फ्रेंड्स?? नाही.. सुरुवातीला अजिबात नाही.. ती पोपटीन या पोपटाच्या अगदी विरुद्ध होती. पोपट रोज सकाळी योगा करायचा.. त्यासाठी तो छान तानपुरा लावून बसायचा.. नेमका त्यावेळी पोपटीनीला झुंबा डान्स करायचा असायचा.. ती लाऊड गाणी लावून सकाळची सगळी शांतता भन्ग करायची. पोपटाच्या डोलीच्या बाहेर कधीच त्याचे कपडे वाळत नसायचे.. जे असेल ते आत. हिचं म्हणजे एखाद्या बेडकाच्या तोंडातून जीभ लोम्बत असल्या सारखे तिच्या डोलीतून कपडे लोम्बत असायचे.. डोलीतून एकदोन वेळा तिला कचरा डायरेक्ट फेकताना बघितलं त्याने. " तो म्हणाला.

" याक.. मेस करायची म्हणजे ती.. I dont like.. " सानू म्हणाली.

" पोपटाला पण राग आला.. मग तो एकदा सकाळी तिच्या घरात दणदण म्युजिक चालू असताना तिच्याकडे गेला. त्याने दार वाजवले. तर ही पोपटीन दारात तोंडातल्या ब्रश सोबत उभी. सकाळी सकाळी एवढं लाऊड म्युजिक लावून सगळं आवरण्याचा हा कसला बेकार छन्द होता तिला. तिच्या मागे तिच्या घराकडे नजर टाकली. तर घरं किमान पंधरा दिवस आवरलं नव्हतं असं वाटत होतं. अगं. तिच्या सोफ्याच्या बाजूला असलेल्या टेबल लॅम्प वर टॉवेल पडला होता. तिचे शूजचे सगळे जोड दारातच पडले होते... टोटल मेस.. बाकीचं तर राहूच देत... पण tv जमिनीवर होता. त्याला wall वर असलेल्या mount मध्यें टाकायचे कष्ट पण पोपटीन बाईंनी घेतले नव्हते. डायनिंग वर रात्रीचं खरकटं ताट तसंच पडलं होतं.  त्याने ते सर्व पाहिलं आणि काहीही न बोलता तसंच निघून आला." आलोक म्हणाला.

"ओ.. बापरे ती अशी का पसारा करायची? पोपटासारखं शिस्तीत नव्हती राहत.. मग बरोबरे कशी होणारं मैत्री.. पोपट किती शांत आणि पोपटीन किती लाऊड..!" सान्वी म्हणाली.

"खरंय सानू.. पण दिसतं तसं नसतं बरं का सानू.. असं काही घडलं ज्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली." आलोक म्हणाला.

"काय रे बाबा? काय घडलं?" सानू आश्चर्याने विचारू लागली.

" एका संध्याकाळी पोपट चहा घेत होता. सूर्यास्त होत आलेला. तेवढ्यात त्यांच्या कानावर violine ची धून पडली.. एकदम सॉफ्ट.. एकदम गोड.. खूप खोलवरून आलेली. निर्मळ मनाची साद जणू. ती धून शेजारून येत होती. पोपटीनीच्या डोलीतून... तो अचंबित झालेला.. त्याने रागदारी ओळखली आणि लगबगीने आत पळाला. आपल्या कपाटातून त्याने आपली बासरी काढली आणि धावत आपल्या गॅलरीमध्ये आला. तिच्या violin च्या स्वरामध्ये बासरीचे सुर मिसळू लागले आणि मग दिव्य अशी जुगलबंदी सारंच्या सारं झाड अनुभवू लागलं. दोघे कितीवेळ वाजवत होते याचं भान दोघांनाही नव्हतं. " तो म्हणाला. त्याच्या गालावर डोळ्यातला अश्रू ओघळला होता.

"बाबा हे तर..." सानू म्हणतच होती.

"हो... सानू बाळ.. दोघेजन अगदी वेगळे असले तरी एका गोष्टीत खूप साम्य होतं त्यांच्या. खोल मनातला एकटेपणा संगीतातून व्यक्त करण्याची सवय.. पोपटाला हे खूप अनपेक्षित होतं कि पसाऱ्यात गबाळेपणाने राहणारी त्याची शेजारीण एवढी संवेदनशील आहे. " तो म्हणाला.

" संवेदनशील म्हणजे रे बाबा? सानुला कळला नाही शब्द.

" म्हणजे feelings असणारी.. म्युजिक बद्दल ज्याला feelings असतात ती व्यक्ती स्वतः वागायला कशीही असली तरी वाईट मनाची असू शकत नाही असं पोपटाला वाटलं. म्हणून त्याला ती संवेदनशील वाटली." त्याने गालावरचा अश्रू पुसत सान्वीला सांगितलं.

" दोघांचं वाजवणं संपलं आणि दोघांनी डोळे उघडले तर समोर एकमेकांना बघत होते. काहीतरी आपलंस वाटू लागलं दोघांना एकमेकांबद्दल. ते बोलले.. एकमेकांबद्दल म्युजिक बद्दल..मग रोज बोलू लागले. पोपट तिला जेवणासाठी बोलावू लागला. तिला तिच्या घरी जाऊन नीट राहण्याबद्दल उपदेश देऊ लागला. ती त्याची पाहिली मैत्रीण झाली. एखादं वर्ष यात सरलं आणि मग एकदा पोपटाने तिला लग्नाबद्दल विचारलं. तिचं राहणीमान, सवयी माहित असूनपण त्याने तीच्या मनाकडे बघत हा निर्णय घेतला होता. तिला पण तो आवडलेला. मग दोघांच्या आईबाबांकडूनपण संमती मिळवली दोघांनी आणि एका छानश्या ठिकाणी लग्न केलं. लग्न करुन दोघे पोपटाच्या डोलीत राहायला आले. " तो म्हणाला.

"Wow! बाबा ही तर happy ending.. किती छान. एकदम sweet story.. मूवी मध्यें येतं the end लिहून तशी." सान्वी म्हणाली.

" अगं. मूवीच्या शेवटी जे the end येतं. ती तर खरी आयुष्याची सुरुवात असते. त्यापुढंच आयुष्य खरी story असते. खूप उतार चढाव असलेली. त्यामध्ये प्रेम, राग, सुखं,  दुःख असं सगळं भरलेलं असतं त्यात." आलोक तिला म्हणाला.

" म्हणजे पुढे पण आहे.. काय झालं पुढे? " सानूने विचारले.

" दोघे राहायला तर आले एकत्र. पण दोघं वागायला दोन टोके. पोपटीन बेशिस्त आणि पोपट शिस्तप्रिय. सुरुवातीचे काही दिवस सरले नीट. पण नंतर नंतर पोपटीनीच्या बेशिस्तीचा पोपटाला आणि पोपटाच्या शिस्तप्रिय वागण्याचा पोपटीनीला कंटाळा येऊ लागला.. आधी कंटाळा.. मग त्या कंटाळ्याच रूपांतर झालं वैतागात.. वैतागाच रूपांतर झालं चिडचिडित आणि मग त्या चिडचिडीच रूपांतर झालं रागात.. मग दोघे एकमेकांच्या रागाला एकमेकांवर व्यक्त्त करू लागले. दोघांच्यात भांडणे होऊ लागली. शेवटी एकदा त्यांचं खूप मोठं भांडणं झालं आणि पोपटीनीने ठरवलं कि आता एकत्र राहता येणार नाही. तिने तिचं सामान उचलले आणि ती तिच्या डोलीत परतली. " अलोक म्हणाला.

"ओह्ह!! सो सॅड!! दोघे भांडून वेगळे झाले? एकत्र राहत नाहीत आता? किती वाईट." सानू म्हणाली. 

"सानू.. प्रेमाची नाती फार विलक्षण असतात बरं का.. पुढे काय घडेल हे कधीच सांगता येत नाही. जवळजवळ तीन महिने दोघे एकमेकांना टाळत होते. बघत नव्हते, कि बोलत नव्हते. पण या तीन महिन्यात जवळच रहात असूनपण आलेला दुरावा खूप त्रासदायक वाटू लागला दोघांना. एका संध्याकाळी खूपच असह्य झाल्यावर पोपटाने धूळ खात पडलेली त्याची बासरी काढली आणि मग पोपटीनीच्या दुराव्यामुळं आलेल्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी त्याने बासरीला फुंकर घालायला सुरुवात केली. काहीच मिनिट गेली. तितक्यात पलीकडून त्याचं स्वरात violin ने त्याला प्रतिसाद मिळाला. ती संध्याकाळ आणि काहीसा रात्रीचा वेळ दोघांनी संपूर्ण दुःख त्या वाद्याच्या नादामध्ये स्वतःतून बाहेर वाहू दिली आणि ठरवलं परत दुःखी व्हायचं नाही. काहीतरी मार्ग काढायचा. दोघे बसले. बोलले. शांतपणे एकमेकांना समजावून घेऊ लागले. खूप डोकं लावून दोघांनी एक मार्ग काढला. एकमेकांना सहन होईल इतपर्यंतच एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश.. तसं कॉन्ट्रॅक्टच केलं म्हण.."
अलोक म्हणाला.

" कॉन्ट्रॅक्ट?? म्हणजे कसं? ते दोघे हजबंड वाईफ होते ना? " सानूने विचारले.

" हो.. म्हणूनच.. त्यांना एकमेकांशी त्या बंधनाने जगायचं सुद्धा होतं आणि स्वतःची स्पेस पण जपायची होती. एक अशी अरेंजमेंट केली ज्यामुळे ते पॉसिबल झालं. संसार पण चालू राहिला आणि एकमेकांच मनस्वास्थ्य पण नीट राहिलं. परत नात्यावर कसलाही दुष्परिणाम झाला नाही." अलोक म्हणाला.

" मग काय केलं त्यांनी? " तिने विचारलं.

" चल घर आलंय वर जाऊन सांगतो. " अलोक म्हणाला.

दोघे घरी पोहोचले. आलोक सान्वीला घरात घेऊन आला. हॉलला असलेला एक दरवाजा जो पलीकडच्या फ्लॅट मध्यें उघडत असे. तो त्याने ढकलला. सानू त्या दाराने त्या दुसऱ्या फ्लॅटच्या हॉल मध्यें गेली.

"आई!! " सानू ओरडली तशी प्रज्ञा सानूची आई किचनमधून बाहेर आली. 

" आलात का दोघे.. जेवायला बसता का? थालीपीठ केलेत मी." ती म्हणाली.

" अरे best.. लगेच वाढ.. आलोच मी फ्रेश होऊन.. सानू चल. पटकन फ्रेश होऊ.. थालीपीठ आज.. मजा.." आलोक म्हणाला.

सानुला बाथरूम कडे पाठवत तो अलीकडच्या फ्लॅट मध्यें आला. परिट घडीचा टॉवेल बाथरूम जवळच्या क्लोजेट मधून काढत तो आत गेला. त्याने साबणाने स्वच्छ हात पाय तोंड धुतले. बाथरूम मध्यें अर्धी बादली पाणी ओतलं. जेणेकरून साबणाने येणारा चिकटपणा फरशीवर राहणार नाही. टॉवेल ने हात पाय चेहरा पुसत कपडे चेंज करुन अंगातले कपडे लॉंड्री बकेट मध्यें टाकले. स्वच्छ घरातले कपडे अंगावर चढवले. पाणी पिऊन ग्लास वॉश करुन परत एकदा रॅक मध्यें ठेवला. हॉल मधल्या टीपॉय वर सकाळी वाचून ठेवलेला news paper एका कॅबिनेट मधल्या रद्दीच्या चळतीवर ठेवला. आपल्या फ्लॅट मधल्या सर्व लाईट्स बंद करत तो प्रज्ञाकडे आला. 

तिच्या किचनमध्ये काम करतं मग्न असलेल्या प्रज्ञाला त्याने मागून मिठीत भरले.

" पतू.. दुपारची भांडी तशीचेत राणी.. मी घासून घेऊ?" त्याने सिंक कडे बघत विचारले.

"ए पोपटा तू तुझं किचन बघ जां.. इथे काय करायचं ते माझं मी बघेन.. समजलास.." प्रज्ञा हसत म्हणाली.

"चोमडीने लगेच सांगितलं पण? " आलोक म्हणाला.

"पोपट पोपटीनीने काय मार्ग काढून एकत्र राहिले तुझ्या लेकीला अर्ध्याच स्टोरीतून कळलं. डोलीला होल पाडून दोन घरं एकत्र केलीत म्हणाली ती. " प्रज्ञा तोंड दाबत हसत म्हणाली.

"हेहें... कुठं गेली कार्टून.. " असं म्हणत आलोक सानुला बघायला बेड मध्यें गेला.

"बाबा.. तू आणि आईने वेगळं राहून पण एकत्र राहण्याचा प्रयत्न केला ते माझ्यासाठी खूप छान केलंत.." असं म्हणत ती त्याला येऊन बिलगली.

"चला लवकर.. ताटे घेतलीत." प्रज्ञाची हाक ऐकू आली.

Dining टेबल वर असलेला टॉवेल उचलून गॅलरीतल्या दोरीवर नीट वाळत घालत तिरक्या नजरेने प्रज्ञाकडे पाहत आलोक जेवायला बसला. प्रज्ञा मंद हसत होती.

मर्यादेचं कुंपण पारदर्शक असलं तरी गरजेचं होतं. दोघांनीही जाणीवपूर्वक ते जपलं होतं.त्यांच्या विलक्षण वैवाहिक आयुष्याची ही व्यवस्था आता लेकीलाही पटली होती. चिंतेचा हलका मळभ घरातून दूर झाला होता. प्रेमाचं शीतल चांदणं पसरलं होतं...✨


- शब्दभ्रमर 🍁🍁