Heartbeat in Marathi Comedy stories by Shabdbhramar books and stories PDF | काळजाचा ठोका

Featured Books
Categories
Share

काळजाचा ठोका

"अहो!! जेवण झाल्यावर जरा टेरेसवर चला काही बोलायचंय!" आजकाल एवढं ऐकलं तरी काळजाचा ठोका चुकतो. 😬


पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादातरी प्रसंग घडलेला असतो ज्यातल्या आपल्या सहभागाची "कर्म" आपल्या काळजाच्या ठोक्याची लय बिघडवून जातात. तर मग सादर आहे अशीच एक माझी कर्मकथा. 😬

****

"अरे दिवानो मुझे पेहचानो कहा से आया मै हू कौन?😎 " असं गुणगुणत, थिरकत मी शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर घराकडे आलो. आम्ही चाळीत राहायचो. उद्या रविवार आल्यामुळे रात्री उशीरपर्यंत खेळायचा मनसूबा मनात रचून हुरळून जायला झालं होतं. 😁

दाराबाहेर चपला काढणार तेवढ्यात आमच्या शेजाराच्या बकुळा आजीकडे पोस्टमन आला.
"बकुळाबाई शिंदे!? तार घ्या." त्याने आवाज दिला. 
बकुळा आजी बाहेर आली आणि तिने तार घेतली. 

"आजी सही करा इथं. " तो म्हणाला.

"बया! मला यती व्हय सही? मला यत असती तर तुझी साहेब झाली असती की म्या." म्हातारी लय कजाग होती बोलायला.

"आणि कुणी नाय व्हय घरात?" त्याने विचारलं. 

" नाय कोण. ए म्हसऱ्या हिकडं य!" म्हातारी बकुळा आजी मला दारात उभा बघून म्हणाली. 🫤
मी गेलो. 

" द्ये तो कागुद याला. " पोस्टमनाला म्हणाली.

"ए!सही कर त्यावर.. नायतर ह्या पोस्टमनला त्याचा साहेब कामावरन काढल." असं म्हणून म्हातारी फीसकन हसली.

दोघांचाही पानउतारा करुन म्हातारी लईच मजा घेत होती. मी पाचवीत गेलेलो. सही येत होती. केली आणि कागद दिला परत. पोस्टमनकडे.

"हा आता ती तार वाचून दाव." म्हातारी पोस्टमनाला म्हणाली.

"अशा सगळ्यांच्या तारा वाचित बसलो तर साहेब मला कामावरणं काढेल.😎" असं म्हणून त्याने सायकलवर टांग मारली आणि म्हातारीवर पाणउताऱ्याचा सूड उगवत निघून गेला. 

"मरिआय बसली मेल्या तुझ्यावं. 😠 " म्हातारीने ओरडून त्याला शाप दिला. 

मी हळूहळू सटकत होतो तेवढ्यात तिनी मला धरला. 😵‍💫

"अय पोरा. शाळला जातू ना? हे घे. वाचून दाव." माझ्या हातात तार कोंबत म्हातारी म्हणाली.

मी तार उलगडली. अक्षरे इंग्रजीत होती. नुकतच इंग्रजी सुरु झालेलं. पण अजून व्यवहारात आलं नव्हतं. हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग. 😱

दहा हजार किलोमीटर लांब उगम पावलेल्या त्या भाषेच्या राणीला म्हणजे विक्टोरियाच्या थडग्याला मनात नमन करीत मी ते वाचायला घेतलं. 

"अण्णा.. एक्स.. एक्स.. प.. प.. हा अण्णा एक्सप्रेस.. स.. टार्ट.. इम्म्मी...  डे..  ते.. ली. असं लिहिलंय." मी म्हणालो. 

"म्हंजी रं मुडद्या? नीट सांग की जिभिव कांजनी आलीये व्हय तुझ्या?🫤" बकूळा आजी म्हणाली.

"अण्णा कोणे आजी?" मी विचारलं.

"भाऊ हाय माझा श्यापूरला माझं माहेर न्हवं का? तिकडला."म्हातारी शिवापूरला पण श्यापूर म्हणतं होती.🙄

"मग ते अण्णा यतायत असं लिहिलंय. एक्सप्रेस नी." मला 
जसं समजलं होतं तसं मी सांगितलं.

"बया माहा तुळशीदास आण्णा!! यनारे व्हय... बया बया... लय ग्वड बातमी हाय. चला त्येच्यासाठी पुरणपोळी करायला घिते.. भजी बी..लय आवडती अण्णाला. तू बी ये थोड्या वेळानी दोन भजी तुला बी देते." असं म्हणून ती घरात गेली.

खडूस म्हातारी!!  त्या अण्णासाठी पुरणपोळी आणि मला दोन भजी.🫤 
मला रागच आला तिचा.

तासभर झाला असेल मी  मित्रांसोबत चाळीसमोरच गोट्या खेळू लागलो. दोन डाव जिंकून मी खुश झालेलो. तेवढ्यात बकुळा आजीच्या घराकडून त्या म्हातारीचा मोठा हम्बरडा ऐकू आला.

"बया गं!! माझा आण्णा... माझा आण्णा.. अण्णाव.. 😫😫😭😭" बकुळा आजी ओरडत होती.

आम्ही सर्वानी गोट्या गोळा करुन खिशात भरल्या आणि आज्जीच्या दराकडे बिन पैश्याचा तमाशा बघायला पळालो.
आम्ही पोहोचलो आणि पाहतोय तर काय?....

आत आमच्या चाळीतली वीणा ताई आणि बकुळा आजी होत्या. स्वयंपाकाचा हा राडा पडला होता. पुरण पातेल्यात होतं. बकुळा आजी पीठ मळत असावी. तिच्या डोक्याला ओली कणिक लागली होती. 😱 वीणा ताईच्या हातात ती तार होती.

थोड्यावेळा पूर्वी खुश होऊन मला भज्याचं बक्षीस डिक्लेर करणारी बकुळा आजी, अशी काय वागतीये मला कळेना. 😵‍💫

"ह्योक.. ह्योक ह्योच तो मुडदा मला म्हणाला आण्णा यतोय श्यापूर वरणं... आर!! काळतोंड्या.. मेलेलं माणूस यत असतंय व्हय रं!!... माझा आण्णा तिकडे वारला आणि मी पोळ्या करायला घितल्या की.. कुठं फेडशील रे डुकरा ...😫😫" असं म्हणून तिने फेकून मारलेला पुरणाचा हातभर गोळा मला अजून आठवतो. 🥴

मी हदरलो कळजाचा ठोकाच काय थरकाप उडाला. छातीवर पुरण झेललेला मी पुरणवीर, नंतर जमलेल्या गर्दीतून वाट काढत बाहेर पळालो. माझ्या मागे वीणा ताईपण आली. ती कॉलेजला जाणारी होती.

"ए बैला..थांब...!!" तिने ओरडून हाक मारली. मी थांबलो. 

"काय वाचलंस तू?" तिने विचारलं.

"आण्णा एक्सप्रेस सटार्ट... असं लिहिलं होतं. मला वाटलं. की आण्णा येतायत.." मी खजिल होऊन म्हणालो. 😵‍💫🥴

तिला बहुतेक हसू आवरत नसावं. म्हणून तिने तोंड काही सेकंद तिकडे फिरवलं. नंतर कसबस सरळ करत म्हणाली,

"बावळ्या ते लिहिलेलं असं आहे.
ANNA EXPIRED START IMMIDIATELY.
म्हणजे आण्णा वारलेत. लवकर निघा." 🤦‍♂️

आजपण कोणी हे वाचा ओ म्हणलं की माझ्या काळजाचा ठोका चुकतो.😒

🍁🍁🍁🍁

- शब्दभ्रमर