मोहनचे बोलणे ऊमा ऐकत होती
हे खाजगी बोलणे आहे ..
ते फक्त मला तुम्हालाच सांगायचे आहे “
आता ऊमाला नवल वाटले ..
अशी काय गोष्ट आहे जी इतकी खाजगी आहे ?
“हो मोहन सांगा जे तुम्हाला सांगायचे आहे ते
ऊमा म्हणाली ,
इथे माझ्याजवळ कोणीही नाही
त्यामुळे आपले संभाषण कोणालाच समजणार नाही
अगदी मोकळेपणाने बोला जे काही तुम्हाला बोलायचे आहे ते .
मी ऐकते आहे लक्ष देऊन ..
ऊमा ऐकते आहे म्हणल्यावर मोहनने बोलायला सुरवात केली.
“वहिनी काल मला सतीशचा फोन आला होता ..”
“काय ...?
ऊमाच्या कानावर विश्वास बसेना ..
काय सांगताय मोहन ...?
सतीशचा फोन ..खरे की काय ?
ऊमाने अधिरतेने विचारले ..”
ऊमाला नवल वाटणे साहजिकच होते ..
गोष्टच अशी घडली होती ना ...
मोहन पुढे म्हणाला..
“वहिनी मला सुद्धा प्रथम आश्चर्यच वाटले होते ,
आधी एका अनोळखी नंबर वरून मला फोन आला ..
फोनवरची व्यक्ती काय बोलत होती तेच आधी कळेना ..
अगदी अशक्त व्यक्तीने बोलावे असा अस्पष्ट आवाज होता तो ..
मोहन मी सतीश बोलतोय ..अशी ती व्यक्ती म्हणाली ...
आता माझ्या लक्षात आले आणि मी सतीशचा आवाज ओळखला ...
तरीपण मी मुद्दमच त्याला ओळखले नाही असे दाखवले आणि म्हणालो ..
“कोण सतीश ..?
त्यावर ती व्यक्ती म्हणाली ,”
मोहन तु सुद्धा आता माझी ओळख नाकारतो आहेस का ..?
अरे मीच बोलतोय सतीश ..तुझा ऑफिस मधला मित्र ..”
असे म्हणल्यावर मी म्हणालो ,
पण हा तर तुझा नंबर दिसत नाही
माझ्याजवळ तुझा जो नंबर सेव्ह आहे तो तर कित्येक दिवस बंद येतोय ..”
त्यावर तो म्हणाला ,”
होय रे माझा जुना फोन हरवला म्हणून
मला नवा नंबर आणि फोन घ्यावा लागला .
तुम्हाला म्हणजे तुला आणि ऊमाला
हा नंबर कळवायचा होता पण माझ्या कडून राहूनच गेले “
हे ऐकल्यावर ऊमा चिडली आणि फटकन म्हणाली
काय बोलतो रे हा सतीश ..
किती बेजबाबदार आहे हा “
ऊमाचे बोलणे ऐकून मोहन म्हणाला ,
“ हो ना वहिनी तुम्हाला तर माहीतच आहे
कशा आणि किती थापा मारत असतो ते
अहो मला पण राग आला त्या बोलण्याचा..
मग मीच पुढे म्हणालो
‘अरे पण तु तर बेपत्ता झाला होतास ना ?
घरच्या कोणाला काहीच कल्पना न देता पळून गेला होतास .
वर आणि जाताना ऑफिसमधले पैसे घेऊन गेला होतास ..
त्यावर म्हणतो कसा मला ..
काय सांगायचे तुला माझ्यावर किती बाका प्रसंग आला ते ..
कसेतरी करून मी माझा जीव वाचवला होता तेव्हा ..
मी म्हणलो ,अरे असे जर होते आणि इतका वाईट प्रसंग होता
तर वहिनींना का नाही विश्वासात घेतलेस .?
त्या तर तुझी बायको होत्या ना ?
हो रे ती बायको असली तरी मला समजून घेत नव्हती ना ..
आणि ती काय करणार होती मदत मला ..
.तिला काय समजणार होते .
यावर ऊमा मोहनचे वाक्य तोडत म्हणाली ,”
बघा मोहन शेवटी सगळा दोष माझ्यावर घालतो आहे हा सतीश
पैशाची मदत तर याला मी नेहेमीच करीत होते ..
यांच्या व्यसनांना मी किती पुरे पडणार होते ?
सांगा बरे ..
तिच्या बोलण्यावर मोहन म्हणाला ,
हे सगळे तर आपल्याला माहित आहेच ..
आता जरा तुम्ही प्लीज पूर्ण ऐकून घेता का माझे ?..
“सॉरी मोहन माझे पण भान सुटले ..
सांगा पूर्ण .काय झाले ते मी ऐकून घेते सर्व “
ऊमा ओशाळून बोलली .
मोहन तुढे म्हणाला ..
मग मी त्याला इतकेसुद्धा म्हणालो की
ऊमा वहिनीनी तुझी बेपत्ता होण्याची तक्रार पण केली होती पोलिसांकडे ..
पण गेली तीन साडेतीन वर्षे तुझा तपास करून
अखेर पोलिसांनी केस पण बंद करून टाकली की “
माझ्या या बोलण्यावर तो काही क्षण गप्प बसला ..
मग म्हणाला ,” नको रे मोहन तु तरी असे नको बोलूस
पोलिसांनी केस बंद केली असली तरी मी अजून जिवंत आहे रे ..
मेलेलो नाही “
त्याचे बोलणे मध्येच तोडून ऊमा म्हणाली ,
“अरे तो जर जिवंत आहे तर इतके दिवस होता कुठ ?
अशी कोणती जागा आहे की जिथे तो असून सुद्धा
इतकी वर्षे तो पोलिसांना सापडू शकत नाही ?”
हो ना मी म्हणालो ...ना त्याला असे
“तु जर जिवंत आहेस तर इतके दिवस होतास कुठे ..?
घरात कोणालाही न सांगता .
.तुझ्या बायकोला आणि मुलीला वार्यावर सोडून तु असा कुठे गेलास ?
स्वतःच्या घराची, मुलीची सगळी जबाबदारी झटकून तु निघून गेलास
त्या दोघींची काय हालत झाली असेल
असा साधा विचार पण नाही आला का तुझ्या मनात ?”
त्यावर तो म्हणाला,
“काय सांगू तुला ..
अडचणच अशी आली की मला परागंदा होणे भाग पडले .
इतकी वर्षे कोणालाच संपर्क करू शकलो नाही याचे
कारण माझे मलाच माहित आहे
मी कसातरी जगत होतो बास“
“काय झाले होते ..?
कसली एवढी अडचण होती की सगळे सोडून पळून गेला
हे सांगितले की नाही त्याने ?
थोडे रागानेच ऊमाने मोहनला विचारले ..
“हो हे ही मी विचारले त्याला
अगदी खोदून खोदून विचारले नक्की काय झाले होते ते .
तर म्हणतो कसा ..
तुला काय सांगू माझी मलाच लाज वाटली होती
मी असा घर सोडून गायब झालो त्याची .
नयनाची आणि ऊमाची आठवण आली नाही
असा एकही दिवस नाही गेला माझा .
त्याना भेटायसाठी माझे प्राण आसुसले होते ..
पण दिवसच असे कठीण होते की मी मनात असूनसुद्धा
तुम्हाला कोणालाच संपर्क करू शकलो नाही .
माझ्याकडे जो फोन होता तो पण काढून घेतला होता त्यांनी ‘
मग मीच विचारले ,कोणी काढून घेतला तुझा फोन आणि का ?
सांग की काय झाले होते “
पण नक्की काय झाले होते ते सांगेना तो ..”
ऊमाला माहित होते सतीश बोलायला कोणालाही ऐकत नसे .
आणि समोरच्याला गप्प बसवण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नसे .
तिने या गोष्टींचा चांगला अनुभव घेतला होता .
तिने परत विचारले ,’पुढे काय झाले मोहन ?
“हं ऐका आता त्याचे पुढचे बोलणे
मग तो म्हणाला
मोहन माझी हालत सध्या खूप खराब आहे
फारच मुश्किलीने मी हा फोन लावला आहे .
तुझा नंबर तर मला माहिती होताच .
ऊमाचाही माहित आहे पण माझे धाडस नाही तिला फोन करायचे
आणि माझ्या संकटांची कहाणी काय तु फक्त फोनवरच ऐकणार आहेस का ?
मला भेटायला येऊ देणार नाहीस का...
माझी बाजू एकदा पूर्णपणे ऐकून घे
आणि मग माझा काय तो न्यायनिवाडा कर .
त्यावर मी त्याला म्हणालो ..
तुझा न्यायनिवाडा मी कोण करणार ?
तुझ्यामुळे तुझी बायको आणि मुलगी अक्षरशः रस्त्यावर आली
याचे तुला भान आहे का ?
ऊमा वहिनींचा तु अपराधी आहेस .
त्यांच्याशी बोल तु आणि आता त्याच करतील तुझा न्यायनिवाडा ..
ऊमावहीनींचा नंबर देऊ का तुला?
त्यांनी आता बदलला आहे त्यांचा नंबर
जुन्या नंबरवर फोन नाही लागणार
क्रमशः