दुकानातून निघून जाताना राजू दुकानातला कचरा आणि दुधाच्या वापरलेल्या पिशव्या कचऱ्यात टाकायला घेऊन गेला .आता लाडू ,वड्या, चिवडा असे किरकोळ कोरडे पदार्थ घेऊन जायला काही लोक येत होते .पण खरी मोठी ऑर्डर आता एक वाजता असायची .रोज एक वाजता जवळच्या एका शाळेतले सात आठ शिक्षक लोक गरम थालीपीठ खायला येत असत ,सोबत काही लाडू ,वडी सुद्धा खात .नंतर चहा तर असेच... ठरलेला रोजचाच नेम होता त्यांचा तो .आता बारापर्यंत सुजाता येणारच होती .तत्पूर्वी हळूहळू किरकोळ कामे ऊमा आटोपत राहिली . कांदा कोथिंबीर चिरणे वगैरे थालीपीठाची तयारी करीत राहिली . थोड्याच वेळात सुजाता आली ..आणि परत दोघी मिळुन कामात गर्क होऊन गेल्या यानंतर सहा कधी वाजले दोघींना समजलेच नाही .सुजाता आणि ती दोघी दुकान बंद करून बाहेर पडल्या .सुजाता जवळच रहात होती .ऊमाचा निरोप घेऊन ती निघून गेली .उद्या रविवार असल्याने आता सोमवारीच त्या दोघी भेटणार होत्या .रविवारी तेथील कॉलेज शाळा बंद असत .शिवाय रविवारी ऊमाला इतर कोरडे पदार्थ ,त्यांची तयारी ,आणि ते तयार करणे ही कामे असत .नयना पण रविवारी घरीच असे .त्यामुळे ऊमा रविवारी दुकान बंदच ठेवत असे .ऊमा घरी पोचली तेव्हा नयना काही वाचन करीत बसली होती .आईला बघताच ती उठली आणि म्हणाली ,“आलीस आई ,हातपाय धुऊन घे मी चहा टाकते तोवर .”ऊमा हसून आतल्या खोलीत वळली . रोज संध्याकाळचा हा मायलेकींचा शिरस्ता होता .आई आली की नयना चहा करीत असे ,दोघी चहा घेत दिवसभराच्या गप्पा करीत .कपडे बदलुन बाहेरच्या खोलीत आलेल्या ऊमाच्या हातात नयनाने मस्त आले घातलेला वाफाळलेला चहा आणून दिला .लेकीने प्रेमाने दिलेला तो गरम चहा पोटात जाताच ऊमाचा शीण पार पळून गेला.थोडा वेळ दोघीजणी इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसल्या .नंतर मात्र ऊमा संध्याकाळच्या स्वयंपाकाकडे वळली . नयनाचा नुकताच अकरावीचा निकाल लागला होता . ती चांगल्या मार्काने पास झाली होती .सध्या सुटीचे दिवस होते पण तिचे बारावीचे क्लासेस मात्र सुरु झाले होते. सकाळी अकरा ते चार तिचे क्लासेस असायचे.फिजिक्स, केमिस्ट्री ,गणित तीन विषयांचे क्लास असत .ते संपले की क्लासजवळ असलेल्या कॉलेजच्या स्टडीरूम मध्ये नयना अभ्यास करीत बसे .त्यांचे घर दोनच खोल्याचे आणि लहान असल्याने अभ्यासाला जागाच नव्हती घरात.तशात घर एका वाड्यात होते त्यामुळे सतत लोकांची वर्दळ ,मुलांचे खेळणे ,गप्पा चालू असत .अभ्यासाला लागणारी शांतता,एकाग्रता तिथे अजिबात मिळत नसे .म्हणून नयना तिचा अभ्यास स्टडी रूममध्येच आटोपून सात साडेसात पर्यंत घरी येत असे .तिची मैत्रीण रितूपण तिच्यासोबतच अभ्यास करीत असे .खरेतर रितुचा मोठा बंगला होता तिच्याकडे तिची स्वतंत्र मोठी रूम होती .पण तिला नयनासोबत अभ्यास करायला आवडत असे .अगदी शाळेच्या पहील्या इयत्तेपासून दोघीही पट्ट मैत्रिणी होत्या .शिवाय नयना खुपच हुशार असल्याने तिच्यासोबत अभ्यास करणे रितुलाही फायद्याचे वाटे .एकमेकींची घरे जरी दूर असली तरी त्या कायमच सोबत असत .नुकतीच रितुच्या वडिलांनी तिला स्कुटी घेऊन दिली होती .त्यामुळे कुठेही जायचे असले की रितू स्कुटी घेऊन येत असे आणि परत जाताना नयनाला घरी सोडुन जात असे .त्यांच्या या मैत्रीमुळे ऊमा निर्धास्त असे .नयना आणि रितूची मैत्री अगदी बालपणापासून पक्की होती .रितुच्या घरचे लोक तर नयनाला अगदी रितुच्या बहिणीप्रमाणे समजत .सुंदर ,हुशार आणि गुणी असणारी नयना रितुपेक्षा जास्तच लाडकी होती त्यांच्या घरात .ही मात्र खरोखरच एक जमेची बाजु होती ऊमाच्या आयुष्यात !!आतापर्यंत ऊमाने आयुष्यात खुप काही पाहिले आणि भोगले होते .आता फक्त आणि फक्त नयनाच्या चांगल्या आयुष्याची स्वप्ने ती पाहत होती .अतिशय हुशार असलेल्या नयनाला चांगले शिक्षण द्यायचे ऊमाला .यासाठी ती दिवसरात्र कष्ट करीत होती .सासर माहेर दोन्हीकडून तिला कोणाचाच आधार नसल्याने प्रपंचाची सगळी धावपळ तिलाच करावी लागत असे .हे दुकान चालू केल्यापासून मात्र घरखर्च भागून चार पैसे ती शिल्लक टाकू शकत होती .नयना पण फार गुणी मुलगी होती .आपल्या परिस्थितीची आणि आईच्या कष्टांची तिला चांगली जाण होती .आईला शक्य तितकी मदत करण्याकडे तिचा कल असे .ऊमा शक्यतो तिच्या मदतीला नकार देत असे .आपल्या नशिबी आले ते आपल्या लेकीने करू नये असे तिला वाटे .नयनाने फक्त स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे एवढीच तिची इच्छा होती .शिवाय नयना घर आवरणे इतर किरकोळ कामे हे तर नेहेमीच करीत असे .छोट्या छोट्या कामात नयनाची मदत खूप असे ऊमासाठी स्वयंपाक झाल्यावर ऊमाने लेकीला गरम गरम भाकरी आणि भाजी वाढली .आणि मग दोघींची जेवणे झाली .टेबल आवरून दोघी बाहेरच्या खोलीत टीव्ही पाहत बसल्या .दहाच्या सुमारास दोघीही झोपून गेल्या .
क्रमशः