काकुच्या त्या संसारातले .. भांडीकुंडी आणि डबे आटोपशीर होते ते मात्र उपयोगी येतील म्हणून तिने बरोबर नेण्यासाठी बांधून ठेवले काकुच्या दोन तीन साड्या आणि काकांचे दोन पायजमा शर्ट स्वतःजवळ आठवण म्हणून उमाने ठेवले आणि बाकीचे त्या दोघांचे कपडे तिने वृद्धाश्रमात देऊन टाकले .उरलेले त्यांचे सर्व सामान वृद्धाश्रमात दिल्यावर ..दुपारपर्यंत ऊमाने वाड्यातील सर्वांचा निरोप घेतला .त्तीचाही लग्नापूर्वी वाड्यातील लोकांशी ऋणानुबंध होताच .त्यांना आता कायमचेच सोडून जायला लागणार होते .त्या सर्वांना सुद्धा ऊमाला निरोप देताना जड जात होते .पुढील चांगल्या आयुष्याची स्वप्ने सोबत घेऊनच ऊमा हे घर सोडत होती .त्यामुळे सर्वानीच तिला शुभेच्छा दिल्या . जन्मापासून काकुच्याच घरात वाढली असल्याने ..वाड्यात नयनाने खुप दोस्त मंडळी जोडली होती .सर्वांना वाईट वाटले ..पण नयना मात्र नव्या गावी जायचे म्हणून जाम खुष होती . घरमालकांना किल्ली देऊन ऊमा बाहेर पडली .मोहनसोबत पुण्यातल्या त्या उपनगरात पोचल्यावर आणि मोहनच्या मित्राला भेटल्यावर ऊमा खरोखरच आश्वस्त झाली .मोहनच्या मित्राने त्यांना लागलीच आपल्या घरीच जेवायला नेले .त्याच्या घरचे सर्वचजण खुप चांगले होते .मोहन जे काही करतो आहे ते योग्यच असणार अशी त्याच्या मित्राच्या घरच्या सर्वांची खात्री होती .ऊमा आणि नयना विषयी सर्व पूर्वकल्पना मोहनने मित्राच्या घरी आधीच देऊन ठेवली होती घरातल्या सर्वच लोकांनी ऊमा आणि नयनाचे प्रेमाने आणि उत्तम स्वागत केले .सर्वांनी मोहनला आश्वासन दिले की ते ऊमाची आणि नयनाची चांगली काळजी घेतील .मोहनने अजिबात त्यांची काळजी करू नये .नंतर मोहनचे मित्र ऊमाला तिचे सामान घेऊन त्यांच्या वाड्यातील खोल्या दाखवायला घेऊन गेले .त्यांच्याच दुसऱ्या एका मोठ्या वाड्यात दोन लहान खोल्या होत्या .वाडा मोठा आणि गजबजलेला होता .तशी वाड्यात राहण्याची त्या दोघी मायलेकींना सवय होतीच .तशात मोहनच्या मित्राने दोघींविषयी सर्व कल्पना दिली असल्याने वाड्यातल्या इअतर भाडेकरूंनी सुद्धा अगदी प्रेमाने दोघींचे स्वागत केले . वाड्यात नयनाच्या वयाची बरीच मुले मुली होती .एक दोन दिवसात वाड्यातील शेजारच्या आजींकडे नयनाला ठेऊन ऊमा कामाला जाऊ लागली .दोन दिवस ऊमाची नीट व्यवस्था लागेपर्यंत मोहन मित्राच्या घरीच राहिला होता .त्यांचे रुटीन नीट लागल्यावर त्यांचा निरोप घेऊन मोहन परत गेला .जाताना नयना त्याला मामा तु परत कधी येणार असे विचारत होती .लहान असल्यापासून नयनाचा सहवास असल्याने मोहनला पण तिचा निरोप घेणे थोडे जड गेले .काही लागले तर फोन करा असे ऊमाला सांगुन आणि शिवाय मित्राला पुन्हा पुन्हा दोघींवर लक्ष ठेवायला सांगुन तो जड मनाने परत गेला .तो जाताना दोघींचेही डोळे पाणावले होते .नयनाने तर तिच्या दर वाढदिवसाला त्याने यायला हवे असे पक्के वचनच घेतले होते त्याच्याकडून.आता सगळे सुरळीत होईल अशी ऊमाला खात्री देऊन आणि तिच्या या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन तो गेला .आणि आता ऊमाच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु झाला .छोट्या नयनाचे बोट धरून आता नवीन स्वप्नांच्या जगात तिने पाय ठेवला होता .हळूहळू नव्या आयुष्याला ऊमा आणि नयना दोघीही सरावत गेल्या .इतके दिवस आयुष्याचे अतिशय भयंकर असे रंग पाहिल्यानंतर ...आता मात्र सगळे काही खरोखर बरे चालेल असे वाटत होते .एक दोन महिन्यात ऊमा दुकानच्या कामात चांगली तयार झाली .सगळे काम तिने चटकन आत्मसात केले .तिची हुशारी आणि कामाचा वेग पाहून मोहनचे मित्र म्हणजे दुकान मालक पण खुष होते .नयना आता साडेचार वर्षाची होती. त्यामुळे ऊमाने आता नयनाला बालवाडीच्या दुसऱ्या वर्षाच्या वर्गात दाखल केले .पुढील वर्षी ती पहिलीत जाऊ शकली असती .ही शाळा अगदी जवळच होती .संध्याकाळी जरी ऊमाला दुकानातील कामामुळे उशीर झाला तरी वाड्यातील सर्व जण नयनाकडे लक्ष देत. तिची काळजी घेत ,खाऊपिऊ घालत .त्यामुळे ऊमाला घरची आणि नयनाची काळजी वाटत नसे .मोहन अधून मधून चौकशी करीत असे ,येत जात असे .दुकानात पगार बरा होता,दरवर्षी थोडा थोडा वाढवायची कबुली पण मालकांनी दिली होती . घरभाडेही अगदी थोडकेच होते त्यामुळे ऊमाचे घरचे भागून काही पैसे शिल्लक पडू लागले .आणि जवळ आला नयनाचा वाढदिवस...आता नयना चांगलीच कळती झाली असल्याने आपला वाढदिवस जवळ आला आहे ह्याची खबर तिला होतीच .आता या नवीन घरी ,या वाड्यात पण तिने भरपूर मित्रमंडळी गोळा केली होती .तिचे सुंदर रूप ,गोड बोलणे ,मनमिळावू स्वभाव यामुळे तिचे कधीच कुणाचे भांडण नसे .वाढदिवस चार दिवसावर आला आणि तिने ऊमाला आठवण केली .“आई मोहनमामाला फोन केलास का माझ्या वाढदिवसाचा ?नाहीतर विसरेल बघ तो माझा वाढदिवस ..मला फोन लावून दे ,मी बोलते त्याच्याशी फोनवर ..”नयनाचे बोलणे ऐकून ऊमाला हसू आले .पण नयनाचे बोलणेही खरेच होते म्हणा ..हा नयनाचा पहिलाच वाढदिवस होता जेव्हा मोहन त्यांच्यापासुन दूर होता .नाहीतर यापूर्वी मोहन सतत तिच्या सोबत होताच .गेले तीन वर्षे तरी अतिशय वाईट दिवसात सुद्धा मोहन नयनाच्या वाढदिवसाला हजर असे .किंबहुना तो स्वतःच तिच्या वाढदिवसाला पुढाकार घेत असे .मागील वर्षी तर काकुच्या आजारपणात सुद्धा त्याने नयनाचा हिरमोड त्याने अजिबात होऊ दिला नव्हता .त्या दिवशी इतक्या आजारपणात सुद्द्धा काकुचा चेहेरा सुद्धा खूप उत्साही होता .तिनेही खूप उत्साह दाखवला होता नयनाच्या वाढदिवसाचा .. काका होते तेव्हा ते पण तिच्या वाढदिवसाला अगदी आनंदी आणि खुष असत .आत्तापर्यंत बापाचे प्रेम सोडता ..काका, काकु, मोहन आणि ऊमा या तिच्या जवळच्या माणसांनी तिला काही कमी पडू दिले नव्हते तिने प्रेमाने नयनाला जवळ घेतले आणि म्हणाली .”पिल्लू नको काळजी करू आहे मोहन मामाच्या लक्षात तुझा वाढदिवस .काल आला होता फोन त्याचा ,मला म्हणाला फोनवर मी येणार आहे तिकडे वाढदिवसाला .तुला सुद्धा अगदी खास फोन करणार आहे म्हणे ..मग बोल तुझ्या लाडक्या मामाशी ...ओके ..?”आईचे बोलणे ऐकून नयनाचा चेहेरा अगदी खुलून गेला .परत नयना म्हणाली,” आई ग मला आजीची आणि आबांची पण आठवण येतेय ..”ऊमाही गहिवरली ..”बाळा आजी आबा पण बघणार बर का आकाशातून ..आपल्या नयनाचा वाढदिवस कसा होतोय ते ...”मग नयना बाहेर खेळायला निघून गेली .दुसऱ्या दिवशी दुपारी ऊमा लंच ब्रेकमध्ये नुकताच डबा संपवून बसली .आणि फोन वाजला .बघितले तर मोहनचा फोनउमाने फोन घेतला आणि म्हणाली ,’ बोला मोहन काय म्हणता ?“वहिनी जेवण झाले का तुमचे ?आणि एकट्याच आहात न तिथे ? मोहनने विचारले .त्याचे बोलणे ऐकून ऊमा म्हणाली ,“मी तर नुकतीच जेवले आणि इथे मी एकटीच आहे आत्ता , पण तुम्ही असे का विचारता आहात ?”ऊमाच्या या प्रश्नावर मोहन म्हणाला ,”वहिनी आता जे मला तुमच्यासोबत बोलायचे आहे ते अतिशय खाजगी आहे .क्रमशः