Punhmilan - 1 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 1

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 1

 घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच ऊमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली ,“नयन ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे बघ तुझे .स्वयंपाक घरात जवळच्या छोट्या टेबल वर दोन ताटात ऊमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरून शेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून ऊमाने गॅस बंद केला .आणि नयनाच्या पोळीवर तुप वाढले  .तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच ऊमा बसली .ऊमाने बघितले तर ..नयनाच्या हातात पुस्तक होते ,ते घेऊनच ती खुर्चीवर बसली .पुस्तकात बघत बघत ती खात होती .“नयन काय ग हे तुझे वागणे ?किती वेळा सांगितले जेवताना वाचत जाऊ नकोस .ठेव बरे ते पुस्तक बाजूला ..”असे म्हणत ऊमाने तिच्या हातातले पुस्तक काढून बाजूला ठेवले .“बर बाई नाही वाचत आता ...आईच्या बोलण्याने थोडीशी वरमलेली नयना हसून म्हणाली . आता दोघींनी एकत्रच खायला सुरवात केली .खाणे संपल्यावर ऊमाने आपली ताटली उचलून सिंकमध्ये ठेवली आणि हात धुता धुता ती म्हणाली  “नयन आता माझी जायची वेळ झाली बर का मला आज लवकर जायला लागणार आहे .आज सुजाता नाही येणार तेव्हा मलाच दुकान उघडायला लागणार आहे “नयनाने तिच्याकडे पहात मान डोलावली . हा बघ इथे तुझा डबा भरून ठेवलाय तो टाक आधी आठवणीने सॅकमध्ये ..आठवते आहे न परवा गडबडीत तु डबा टेबलवरच विसरली होतीस आणि मग तु तर बाहेरचे काही खात नाहीस त्यामुळे उपाशी राहायची वेळ होती बरे तर बरे त्या दिवशी रितुने कधी नव्हे तो डबा आणला होता म्हणून तुझ्या पोटाला तरी आधार झाला ”आईचे बोलणे ऐकून नयना म्हणाली ,हो ग होते कधीतरी गडबडीत विसरायला.. आता टाकते बघ तुझ्या समोरच .. आणि आई आज मला थोडा उशीर होईल काही लेसन पूर्ण करायचे आहेत.उगाच काळजी नको करत बसू ..माझ्या सोबत रितू आहे ..रितू आणि मी येऊ एकत्रच ,मला सोडेल ती तिच्या स्कुटीवरून .”“रितू आहे म्हणल्यावर मला काही काळजी नाही ग नयन तुझी” ऊमा म्हणालीलगबगीने तिने तिचा डबा पर्समध्ये टाकला आणि बाहेरच्या खोलीत जाऊन कपडे बदलू लागली .नयनाचे खाऊन झाल्यावर तिने सगळे टेबल आवरले आणि डबा घेऊन ती बाहेरच्या खोलीत आली .आपल्या सॅकमध्ये पाण्याची बाटली आणि डबा तिने ठेवला .आणि परत ती तिचे उरलेले वाचन करू लागली .एव्हाना ऊमाचे आवरले होते नयनाचा निरोप घेऊन ती बाहेर पडली .घराच्या कोपऱ्यावरच  बसस्टॉप होता. आज मिळेल ती बस घेऊन जायला हवे.आज थोडे लवकर निघाल्याने नक्की आता किती वाजता बस आहे हा तिला अंदाज नव्हता .तेवढ्यात बस आलीच ...ऊमा पट्कन चढली आणि बसमधल्या एका रिकाम्या सीटवर जाऊन बसली .बसने प्रवासाच्या दहा मिनिटाच्या अंतरावर तिचे दुकान होते .तिकीट काढून बसल्यावर ऊमाच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले .आधी ती एका मेडिकल स्टोअर मध्ये नोकरीला होती .नुकतेच वर्षभरापूर्वी तिने आपले स्वतःचे असे एक छोटे फूड शॉप सुरु केले होते .ज्यामध्ये ती लाडू, चिवडा, चकल्या, केक, वड्या असे कोरडे पदार्थ विकायला ठेवत असे .तसेच चहा ,कॉफी, वडे ,थालीपीठ, उप्पीट असे उपाहाराचे जिन्नस ही सकाळ, दुपारच्या वेळी पुरवत असे.यासाठी तिने मदतीला सुजाता म्हणून एक मुलगी पण ठेवली होती .हे दुकान तिच्या एका स्नेह्यांनी तिला नाममात्र भाड्याने दिले होते .आधीपासूनच तिथे तीन चार छोटी टेबल काही खुर्च्या व काउंटर, कपाटे वगैरे साहित्य होतेच .एक छोटेसे बाथरूम सुद्धा होते .काही किरकोळ वस्तू दुकानासाठी घेतल्यावर तिला ते दुकान सुरु करायला अगदीच सोपे गेले .कोरडे पदार्थ मात्र आठवड्यातून दोन तीन वेळेस ती घरीच बनवत असे .तिच्या या दुकानाच्या जवळच एक कॉलेज ,दोन सरकारी ऑफिस, दोन शाळा होत्या .आणि या सर्वासाठी लागणाऱ्या लेखन साहित्याच्या सामानाच्या विक्रीची दोन दुकाने पण होती .त्यामुळे तिच्या दुकानात दिवसभर वर्दळ असे .दुकान पहिल्या दिवसापासुनच चांगले चालले होते .सुजाता सकाळी नऊ पर्यंत दुकान उघडून झाडपूस करत असे .मग दुकानातल्या कोरड्या पदार्थांची विक्री ती सुरु करीत असे .ऊमा साधारणपणे साडेनऊच्या पोचत असे .मग दोघी मिळुन चहा कॉफी इतर नाश्त्याचे पदार्थ तयार करीत असत.जसजशी मागणी असे तसतसे ताजे नाश्त्याचे पदार्थ  ऊमा बनवत असे . आणि सुजाता त्यांचे वाटप करीत असे .उष्ट्या कपबशा ,ताटल्या, ग्लास धुवायला एक वेगळी बाई होती .ती शेजारीच एका झोपडपट्टीत राहायला होती .अधून मधून येऊन ती सर्व उष्टी भांडीकुंडी धुवुन जात असे .अगदीच काही राहिले असेल तर सुजाता ते पूर्ण करून टाकत असे

 क्रमशः