बोलता बोलता तिने विषय काढला“काका किती दिवस झाले सतीशचा काहीच पत्ता लागत नाहीय ..काय करावे समजेना झालेय “काय करावे ते समजत नाही असे ऊमा म्हणताच काका म्हणाले ,”होय तु त्याची बायको म्हणून तुला त्याची काळजी वाटणे साहजिक आहे पण पोरी पोलीस शोधात आहेतच की त्याच्या शोध लागला की सांगतील ना..... तु कशाला काळजी करतेस? तसे म्हटले तर बराच काळ उलटला आहे त्याला बेपत्ता होऊन .पण देवावर विश्वास ठेव ग यातून काहीतरी चांगलेच निघेल .नक्की पत्ता लागेल सतीशचा ,नको काळजी करूस आम्ही आहोतच की, आमचे घर म्हणजे तुझे माहेरच आहे हे इथे तुम्ही दोघी सुरक्षितच आहात.तसाच काही एकटेपण वाटत असेल तर नयनाला घेऊन थोडे दिवस इथे राहायला ये . झोपायला पण नको जाउस तिकडे ..सतीश आला की मगच दोघी परत जा ..इतके दिवस तु नवर्याला सोडून राहते आहेस तुझा पण धीर सुटणे शक्य आहे ”काकांचे बोलणे ऐकुन ऊमाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली “काका अगदी खरेय बघा तुमचे म्हणणे ..आता कायमचे तुमच्याकडेच राहायला यायची वेळ येणार आहे आम्हा दोघींवर ““म्हणजे ?“असे विचारत काकांनी तिच्याकडे नजर उचलुन पाहिले ..आणि ऊमा हमसून हमसून रडू लागली ..तिला रडताना पाहतच काकु चटकन पुढे आली आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली ..“काय झाले ग पोरी असे रडायला ...?मग मात्र तिने त्या दोघांना सर्व काही सांगितले ..सतीशचे मानसिक रुग्ण असणे ..त्याला त्यावरची औषधे चालू असणे .त्याला असलेले दारूचे व्यसन ,त्यापायी ऊमाला होणारी मारझोड नंतर ऊमाला समजलेले सतीशचे जुगाराचे व्यसन त्यापायी हरलेले पैसे नेण्यासाठी घरी आलेले आणि त्याला धमकी देणारे गुंड ऑफिसच्या पैशाचा अपहार करुन पळून गेलेला सतीश .शिवाय ते राहते घर त्याच्या मालकीचे नसून भाड्याचे असणे ..त्याने सोन्याचे म्हणून लग्नात घातलेले दागिने खोटे असणे ..सतत ऑफिसला दांडी मारल्याने पगार तर नसणे वर मित्रांची देणी असणे आजपर्यंतचे जे जे घडले आणि तिने सहन केले ते सगळे सगळे ती भडभडा बोलत गेली ..काका आणि काकु हे सारे ऐकुन अतिशय थक्क झाले . यावर काय बोलावे ते त्या दोघा वृद्धांना समजेना ..मग ऊमा म्हणाली , “काका मला आता ते राहते घर सोडायला लागणार आहे ,कारण स्वतः घरमालकांनीच मला ते सोडायची नोटीस दिली आहे . मी माझे सगळे सामानसुमान घेऊन नयना सोबत इकडेच राहायला येणार आहे .आता तुम्हा दोघांशिवाय मला कोणाचाच आधार नाहीय “ काका तर हे सगळे ऐकुन सुन्नच झाले होते .काही बोलावे अशी आता त्यांची परिस्थितीच नव्हती ..काकु मात्र आपले अश्रू आवरत ऊमाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली ..“ऊमें पोरी तु केव्हाही इथे येऊ शकतेस ,,अग तुझेच घर आहे हे .ऊमाने रडता रडता वर पाहिले तर काय ..काका उशीवरून एका कडेला कलंडले होते ..आणि त्यांचे डोळे मिटलेले होते...“काका ..काका काय झाले तुम्हाला ...असे म्हणत ऊमा उठली आणि त्यांना हलवून पाहु लागली पण ते उठेनात त्यांची शुद्ध हरपली असे वाटत होते .तिने तत्काळ डॉक्टरना फोन केला .काकु पण काकांची अवस्था पाहून घाबरून गेली होती .डॉक्टर आले आणि काकांची तब्येत पाहून त्यांनी काकांना ताबडतोब दवाखान्यात दाखल करायचा सल्ला दिला आणि रुग्णवाहिका बोलावून घेतली .दवाखान्यात नेल्यावर ताबडतोब काकांना सलाईन लावले गेले ,पुढचे उपचार सुरु झाले .पण ते फारसा प्रतिसाद देईनात .डॉक्टर म्हणाले त्यांची शारीरिक स्थिती ठीक आहे आता .पण त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे त्यामुळे मनाने ते यातून सावरू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या शरीराने पण असहकार पुकारला आहे .त्यानंतरचे दिवस मात्र ऊमासाठी आणि काकुसाठी खरेच खुपच कठीण होते.काकांनी ऊमाच्या आयुष्यात घडलेल्या या सगळ्या गोष्टींचा धसका घेतला होता .ते अजिबात डोळेच उघडायला तयार नव्हते ..खाणे, पिणे, बोलणे तर लांबच ..त्यामुळे त्यांचे सलाईन पण काढता येत नव्हते .काकांची ही अवस्था पाहून काकु पण घाबरली होती .काकांच्या अवस्थेत काहीच सुधारणा होत नव्हती .काकांना दवाखान्यात ठेवले तेव्हाच ऊमाने मोहनला कळवले होते .तो मात्र ताबडतोब मदतीला धावून आला होता . ऊमाने पण आता ऑफिसमध्ये रजा पाठवून दिली .नयनाला सांभाळणे ,काकूला धीर देणे ,दवाखान्याच्या फेऱ्या औषधांची व्यवस्था करणे,या सगळ्यात मोहनची खूपच मदत होत होती.त्याचा भक्कम आधार होता ऊमाला .काकू काकांच्या सोबत दवाखान्यातच राहिली होती .ऊमाने खूप आग्रह करूनसुद्धा ती घरी अजिबात येईना .काकांच्या काळजीने तिने पण आता जवळ जवळ अन्न त्यागल्यासारखे केले होते.ती काहीच खात नव्हती .अन्नाचा घास तोंडाजवळ नेलेला परत पानात ठेवत होती .दुध चहा कॉफी एवढेच कसेतरी ऊमाने आग्रह केला की घेत होती .काकांची अवस्था आता मात्र हळूहळू जास्त बिघडू लागली .आता त्यांचा प्रतिसाद पूर्णच बंद पडला .डॉक्टरांनी लाईफ सपोर्ट सिस्टम लावायचा सल्ला दिला .तो पण उपाय करून बघितला .पण ...मग दोन दिवसातच काकांनी दवाखान्यात प्राण सोडला .शेवटपर्यंत ते शुद्धीवर मात्र आलेच नाहीत .त्यांच्याशी कोणाचेच बोलणे होऊ शकले नाही .त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावना किंवा त्यांना काही सांगायचे होते का ...हे कोणालाच समजू शकले नाही .काकांच्या मृत्युनंतर काकुने तर रडून नुसता गोंधळ घातला होता .मोहनने ,ऊमाने बरेच सावरायचा प्रयत्न केला ..पण तिचे दुख्ख: अगदी आटोक्याबाहेर गेले होते .साहजिकच होते ते म्हणा ...इतक्या वर्षाची पतीची साथ सुटली होती तिची .रडून रडून तिने स्वतःची अगदी वाईट अवस्था करून घेतली होती .नयनाला तर काहीच समजत नव्हते. आजारी असेलेले आबा आता एकदम कुठे गेले ते समजत नव्हते .ती फक्त आबा ...आबा इतकेच बोलत होती काकु आणि नयनाकडे लक्ष देता देता ऊमाला स्वतःचे दुख्ख: मनातच ठेवायला लागत होते .ऊमाने आता तिच्या घरी आधीच बांधुन ठेवलेले सर्व सामान काकांच्या घरी आणले आणि घरमालकांना उरलेले पैसे देऊन ते घर सोडले .काय काय स्वप्ने पाहिली होती या घरात प्रवेश करताना आणि काय होऊन बसले होते .घर सोडताना ऊमाचा जीव तीळतीळ तुटत होता .त्यानंतरची वर्षे ऊमासाठी खुप कठीण होती .काकु दिवसेदिवस खंगत चालली होती काकांच्या मृत्यू नंतर जणु ती तिच्या आयुष्यातून निवृत्तच झाली होती .काकुच्या अशा अवस्थेमुळे ऊमाला नोकरी करणे कठीण झाले कारण नयनाला आता तिच्यावर सोपवताच येत नव्हते .तिला स्वतःची काळजी घेता येत नव्हती मग ती नयनाकडे काय लक्ष देणार मात्र नयनाला खेळताना पाहून काकुच्या चेहेऱ्यावर जो आनंद दिसत असे तितका ऊमासाठी खुप होता .आईच्या जागी असलेल्या काकुला आनंदी बघणे इतकेच ऊमाला हवे होते . या परिस्थितीत ऊमाने आपली नोकरी सोडुन दिली.दुसरा काहीच पर्याय नव्हता .नोकरी सोडताना मिळालेले फंडाचे थोडे पैसे बँकेत ठेवून ती घर चालवू लागली .क्रमशः